‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ : समकालीन तथाकथित देशभक्तीपर चित्रपटांकडे पाहता तांत्रिकदृष्ट्या उजवा ठरणारा चित्रपट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’चं पोस्टर
  • Sat , 19 January 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie उरी : द सर्जिकल स्ट्राइक URI Vicky Kaushal विकी कौशल

अतिरेकी राष्ट्रवाद आणि अजेंडा या दोन्ही गोष्टी ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील सर्वाधिक न्यूनतम समस्या आहेत. कारण या दोन्ही गोष्टींच्या (आणि त्यांच्या अस्तित्वाच्या) अनुषंगानं चित्रपटाकडे पाहिलं तर त्यात सदर बाबींपेक्षा अधिक खटकतील अशा इतर गोष्टी आहेत. ज्या चित्रपटाच्या ‘याहून अधिक चांगला होऊ शकला असता’ आणि ‘बऱ्यापैकी बरा’ म्हणाव्याशा प्रकारात मोडण्यासाठी पुरेशा आहेत. म्हणजे एकीकडे त्याची दिग्दर्शक-लेखक आदित्य धरने चतुराईनं केलेली मांडणी आणि उत्तम छायाचित्रण अशा गोष्टी त्याला इतर युद्धपटांहून उजवा बनवतात, तर दुसरीकडे स्टीरियोटिपिकल आणि उथळ पात्रं, सत्यघटनांपासून फारकत घेऊनही तार्किकतेच्या अंगानं कमकुवत असणारं चित्रण अशा बाबी त्याला मारक ठरतात. परिणामी तो स्वीकारार्ह ठरतो.

मेजर विहान सिंग शेरगिल (विकी कौशल)नं चित्रपटाच्या सुरुवातीच्याच दृश्यात एका पराक्रमी आणि साहसी मोहिमेचं नेतृत्व करत, सर्व साथीदारांना सहीसलामत परत आणणं देशाच्या पंतप्रधानांना (मोदींसारखी दाढी आणि पेहराव असलेला रजित कपूर) कौतुकास्पद वाटतं. त्यांच्यासोबत वावरणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गोविंद भारद्वाज (परेश रावल) आणि संरक्षण मंत्री (योगेश सोमण) यांनाही तसंच वाटत असणार यात नवल नाही. यानंतर विहान राजीनामा देत असल्याचा विषय निघतो. त्याचं कारण असतं त्याच्या आईचा अल्झायमरचा आजार. मग पंतप्रधान त्याला राजीनाम्याऐवजी आईची काळजी घेण्यासाठी दिल्लीत डेस्क जॉब मिळेल अशी व्यवस्था करतात. देश आणि आई दोन्हींची काळजी घेणारा विहान सर्वांसाठी आदर्श आहे. परिणामी तो या चित्रपटाचा ‘हिरो’ आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीच्याच भागात उत्तम पद्धतीनं कोरिओग्राफ केलेली आणि तितक्याच परिणामकारकरित्या चित्रित केलेली, विहानच्या सुरुवातीच्या मोहिमेची दृश्यं चित्रपटाच्या विषयाला (आणि माचो नायकाला) साजेशी सुरुवात करून देतात. ‘हाऊ’ज द जोश?’ला ‘हाय सर’ असं उत्तर देणारे सैनिक चित्रपटात गरजेची असलेली राष्ट्रप्रेमाची भावना उफाळून आणतात. यानंतर मात्र ही भावना जराशी मागे सरकते आणि विहानच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी चित्रपटाच्या कथानकाचा ताबा घेतात. ज्यामुळे चित्रपट त्याच्या मूळ विषयापासून फारकत घेतो. शिवाय पुढे वाढून ठेवलेल्या काही घटनांमुळे देशप्रेम किंवा ‘उरी’तील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर देणं ही भावना मागे पडून नायकाच्या वैयक्तिक शोकांतिकेचा ‘बदला’ घेणं अशा काहीशा भावनेचं अस्तित्व समोरील दृश्यांत जाणवू लागतं. याबाबतही आक्षेप असण्याचं कारण तसं नाहीच, कारण चित्रपट ज्या प्रकारे एकूणच कथानकाची मांडणी करू पाहतो, त्यात हे सगळं योग्यच वाटतं. मात्र सदर कथानक आणि मूळ घटना या दोन्हींकडे तुलनात्मकरित्या पाहता अनेक गोष्टी तार्किकदृष्ट्या खटकू लागतात. कारण ही सगळी मांडणी मुळातच प्रेक्षकांना भावनिक आवाहन करण्यासाठी केलेली गिमिकरी प्रकारातील असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे मूळ मुद्द्याकडे लवकरात लवकर येण्याऐवजी नायकाचं वैयक्तिक आयुष्य आणि इतर गोष्टींच्या चित्रणात चित्रपट बराच वेळ घालवतो. आणि मुळातच चित्रपटाचा महत्त्वाचा घटक आणि प्लस पॉइंट असलेल्या लढाईच्या दृश्यांना कमी वेळ मिळतो.

याखेरीज रॉ एजंट आणि काही काळ गुप्त पद्धतीनं विहानच्या आईची नर्स म्हणून काम करणारी जास्मिन/पल्लवी (यामी गौतम) आणि सध्या जिच्यावर कारवाई सुरू आहे ती हवाई दलातील अधिकारी सीरत कौर (कीर्ती कुल्हारी) या दोघीही मूळ सर्जिकल स्ट्राइकच्या मोहिमेत या ना त्या प्रकारे समाविष्ट असल्यानं त्याही अधूनमधून दिसत राहतात. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मूळ विषयाकडे वळायला चित्रपट बराच वेळ लावतो, पण सोबतच विनोदाच्या उत्पत्तीसाठी बऱ्याच उथळ गोष्टी करतो. ज्यात पाकिस्तानी पात्रांचं (मग ती लष्करी अधिकारी असोत वा अतिरेकी असोत) केलेलं नको तितकं उथळ चित्रण चित्रपटाची सत्यघटनेची पार्श्वभूमी पाहता त्याच्या नकारात्मक परिणामांत भर घालतात. शिवाय, मूळ स्ट्राइकचं चित्रण परिणामकारक असलं तरी त्यातील वास्तविक घटना ते अतिरेक्यांची संख्या, अशा सर्वच बाबतीत दिसणारी, नायकाच्या ‘माचो’ प्रतिमेत भर घालणारी सहजता खटकते. कर्तव्यनिष्ठ भारतीय अधिकारी आणि अगदीच मूर्ख कृती करणारे पाकिस्तानी अधिकारी/अतिरेकी हा विरोधाभास चित्रपटाच्या वास्तविकतेला (किंवा किमान तशा आभासाला) तडा पोचवतो.

असं असलं तरी एकूणच पाहता ‘उरी’ बऱ्याचशा पातळ्यांवर उत्तमरीत्या बनवलेला चित्रपट आहे. म्हणजे त्याच्या पटकथेतील विहानच्या आयुष्याकडे नको तितकं लक्ष केंद्रित करत चित्रपटाची वाढलेली लांबीची आणि संलग्नतेच्या संभाव्य चुकांची उणीव चित्रपटाच्या विविध चॅप्टर्सच्या रचनेच्या निमित्तानं भरून काढली जाते. मितेश मिरचंदानीचं छायाचित्रण चित्रपटाच्या एकूण परिणामात भर घालतं. त्यासोबत असलेलं कधी लाऊड तर कधी पूरक ठरणारं पार्श्वसंगीत अपेक्षित परिणाम साधून आवश्यक ती वातावरणनिर्मिती करण्यास मदतीचं ठरतं. गेल्या वर्षभरात अनेकविध आणि अनेक छटांच्या भूमिकांमध्ये शोभलेला विकी कौशल इथंही शोभतोच. ‘वॉर क्राय’वालं दृश्य या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचा परमोच्च बिंदू असावा. इतर भूमिकांमधील कलाकार कधी योग्य तसं काम करतात, तर कधी रजित कपूरसारखे लोक त्या त्या भूमिकांमध्ये मिसफिट वाटत राहतात.

‘उरी’ कसा आहे, तर त्यातील शेवटच्या - सर्जिकल स्ट्राइकच्या दृश्यांसारखा आहे. सदर चित्रपट सगळं काही सत्य दाखवेल ही भावना आणि तर्क यांना बाजूला सारत, समोर दिसणारी उत्तमरित्या चित्रित केलेली, अगदी अतिरेक्यांवर झाडलेल्या गोळ्यांनंतर खाली पडणाऱ्या ‘ब्लँक्स’चा आवाजही स्पष्टपणे ऐकू येणाऱ्या दृश्यांसाठी पहावा असा आहे. त्यावर अपेक्षांचं किंवा सत्यघटना दाखवण्याचं ओझं न ठेवलेलं बरं नसता पदरी निराशा पडण्याची शक्यताच अधिक आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nikkhiel paropate

Mon , 21 January 2019

अत्यंत सुंदर समिक्षा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख