अजूनकाही
मुस्लीम विचारवंत प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या स्मृतिनिमित्त ‘सामाजिक समतेचा प्रवाह’ हा स्मृतिग्रंथ रविवार, २० जानेवारी रोजी पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्तानं या पुस्तकाचे एक संपादक कलीम अजीम यांचं हे मनोगत...
.............................................................................................................................................
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राचीन संस्कृती म्हणून भारताची ओळख आहे. ‘सभ्यता’ आणि ‘विविधता’ हे या संस्कृतीचे मानदंड मानले जातात. विविध धर्म, भाषा आणि संस्कृतीमुळे भारत जगाच्या पाठीवर इतर देशांपेक्षा वेगळा ठरतो. खान-पान, वेशभूषा, भाषा, बोली व संमिश्र सहजीवनामुळे भारत आंतरराष्ट्रीय पटलावर आपलं वेगळंपण सिद्ध करू शकलेला आहे. अशा वैविध्यपूर्ण आणि मिश्र संस्कृतीला तडा जाणाऱ्या घटना गेल्या काही वर्षांपासून घडत आहेत. त्यामुळे जगाची भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे.
२०१४च्या सत्तांतरानंतर धर्मवादी शक्तींचा उन्माद मोठ्या प्रमाणात वाढला. मुसलमानांविरोधातील हल्ले व तुच्छतावादाला भाजपप्रणीत सत्ताकाळात ‘लेजिटीमसी’ प्राप्त झाली. परिणामी धर्मवादी शक्तींनी डोकं वर काढलं. ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ म्हणण्याच्या सक्तीतून ‘राष्ट्रवाद’ व ‘देशप्रेमा’ची नवी व्याख्या मांडण्यात आली. देशभक्तीच्या संकल्पनेला हिंदुत्ववादाची आवरण चढवलं गेलं. इतकंच नव्हे तर महिला व मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्याला वाचवण्यासाठी राष्ट्रभक्तीचा आधार घेतला गेला. कथित ‘लव्ह जिहाद’ व गौरक्षेच्या नावाखाली नागरी स्वातंत्र्य धोक्यात आणलं गेलं. हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक अल्पसंख्याकांच्या प्रार्थना व उपासनेच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणली गेली. अशा प्रतिगामी मूल्यांना उभारी मिळण्याच्या आणि उजव्या धर्मवादी राजकारणाची गती वाढण्याच्या वर्तमानात ‘सामाजिक समतेचा प्रवाह’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाची निर्मिती होत आहे.
गेल्या पाच वर्षांचा कालखंड पाहिला तर ‘घर वापसी’पासून सुरू झालेली मुस्लिमद्वेषाची ही मोहीम कथित ‘लँड जिहाद’पर्यंत येऊन ठेपली आहे. सुरुवातीला मुस्लिमद्वेषापुरता मर्यादित असलेला हिंदुत्ववाद कालांतरानं दलित व आदिवासींच्या जीवावर उठला. गोरक्षेच्या नावानं मुसलमानच नव्हे तर दलित व आदिवासींच्या नागरी स्वातंत्र्यावर आघात झाला. त्यांच्या खाण्या-पिण्यावर बंधनं आली. सामान्य जनतेला मनासारखी कपडे परिधान करण्यावर बंदी आली. चांगली नाटकं-सिनेमे पाहू नयेत, अशी व्यवस्था केली गेली. आवडतं संगीत ऐकण्यावर बंधनं आली. हवं ते पुस्तक वाचण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं. इतकंच नाही तर प्रतिगामी शक्तींनी अल्पसंख्याकांचे नागरी अधिकार नाकारले. त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्याचं षडयंत्र आखलं गेलं.
रोजी-रोटीच्या चिंतेत व्यस्त असलेल्या सामान्य माणसाला धर्माच्या नावानं भडकवण्यात आलं. मुस्लिमाविरोधात हिंदू समाजाला उभं करून त्यांना धर्माच्या भ्रमात ठेवलं गेलं. त्यातून बहुसंख्याकांकडून भारताच्या गंगा-जमुनी संमिश्र सहजीवनाची बहुसांस्कृतिक सहिष्णू रचना नष्ट करून त्याच्या मूल्यव्यवस्थेला हादरे दिले गेले. इतिहासाचं विकृतीकरण करून पुन्हा एकदा मुस्लिमांच्या शत्रूकरणाची प्रक्रिया राबवली गेली. परिणामी हजारो वर्षांपासून गुण्या-गोविंदानं एकत्र राहत आलेला समाज एकमेकांकडे संशयानं पाहत आहे. नेमकं चुकलो कुठे? याचा शोध घेत असताना ‘सामाजिक सौहार्द’ व ‘सदभावनेच्या मानदंडाची’ पुनर्उभारणी करणं गरजेचं होतं. त्याच दृष्टिकोनातून या ग्रंथाची रचना करण्यात आली आहे.
धर्मवादी शक्तीच्या उन्मादात सुरू असलेल्या तुच्छतावादी राजकारणाला विवेकवादी उत्तर म्हणून आम्ही या ग्रंथाची निर्मिती करत आहोत. विरोधी गटाकडून होणारा प्रतिक्रियावाद हा उजव्या निष्ठांची प्राणांतिक गरज असते. त्यामुळे प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा विवेकवादी होत हिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी या निमित्तानं आम्ही केलेली आहे. ‘सामाजिक सौहार्द’ व ‘सदभावनेच्या मानदंडाची’ पुनर्उभारणी करताना हिंदू-मुस्लिम सहजीवनाचे आधारस्तंभ शोधण्याचं काम आम्ही या निमित्तानं केलेलं आहे.
कला, साहित्य आणि सहजीवनातून उलगडत जाणारा बहुरंगी भारत शोधण्याचं काम आम्ही या ग्रंथाच्या रूपानं केलेलं आहे. हिंदु-मुस्लिमांच्या लोकजीवनाचं तत्त्वज्ञान शोधत असताना त्याची पुनर्उभारणी करण्याचं आव्हान आम्ही या ग्रंथातून पेललेलं आहे. सदरहू ग्रंथ संपादित स्वरूपाचा असून त्यात अनेक मान्यवरांचे लेख आहेत. प्रत्येक लेखातून बहुरंगी भारताचा शोध आम्ही घेतला आहे. मराठी मुसलमानांची संस्कृतीवर चर्चा करताना त्यांच्यातील प्रादेशिकता शोधून त्याआधारे त्यांच्या मूल्यनिष्ठांची उभारणी करण्याचा हा प्रयत्न आहे.
हजारो वर्षांपासून एकत्रित राहणारा समाज आज एकमेकांना शत्रूस्थानी बघत आहे. नेमकं चुकलं कोणाचं? व काय चुकलं? याची चाचपणी करण्याची उसंत आजच्या स्वार्थी राजकारणात कुणाला नाहीये. अशा प्रकारे मलीन झालेल्या प्राचीन संमिश्र संस्कृतीच्या प्रतिमेची पुन्हा नव्यानं उभारणी करण्याची प्रबळ गरज निर्माण झालेली होती. ही संधी साधत आम्ही भारताच्या ‘संमिश्र संस्कृतीचे प्रवाह’ एकत्रित करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. धर्म, भाषा, संस्कृती, साहित्य, स्थापत्त्य, सुफीझम, कला, भारतीयत्व, मुस्लिमत्व आणि राष्ट्रीयत्वाची भावना एकत्रितपणे गुंफण्याचा प्रयोग या निमित्तानं आम्ही केलेला आहे.
भारताची बहुसांस्कृतिक जडणघडण कशी झाली याची मांडणी या ग्रंथातून करण्यात आली आहे. बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक देवाणघेवाणीवर आधारित बहुलवादी सभ्यता कशी विकसित झाली, याची अनेक उदाहरणं या ग्रंथातून समोर येतात. उदा. कला, साहित्य, स्थापत्य, पोशाख, खाद्य संस्कृती, संगीत, भाषांचे एकमेकांवर प्रभाव, सांस्कृतिक प्रतीकं या सर्वांमधून बहुसांस्कृतिक विचारांची, संकल्पनांच्या तत्त्वांची देवाणघेवाण कशी झाली, याचे प्रतिबिंब यातील लेखांतून उलगडेल. हा ग्रंथ वाचताना आध्यात्मिक चळवळ, सुफीझम आणि भक्ती चळवळ, प्रादेशिकता, भाषा व त्यांच्या समन्वयाचं चित्र आपल्यापुढे उभं राहील. द्वेषवादी राजकारणाच्या संघर्षात हरवलेल्या बहुसांस्कृतिक भारताचा शोध या निमित्तानं आम्ही घेतलेला आहे. ॲड. गाजियोद्दीन रिसर्च सेंटरच्या (सोलापूर) माध्यमातून आम्ही पाहिलेलं हे स्वप्न साकार होताना आम्हा सर्वांचा आनंद द्विगुणीत होत आहे.
बहुसांस्कृतिक भारताच्या विविधरंगी उपरोक्त घटक व मानदंड समाजात रूजावेत यासाठी तहहयात झटणारे आमचे आदरणीय गुरूवर्य प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांना हा बहुमोल ग्रंथ समर्पित केलेला आहे. या उपक्रमाला आम्ही ‘प्रा. फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथा’चं स्वरूप दिलेलं आहे. भारतात हिंदु-मुस्लिम सौहार्दतेची समृद्ध करणारी परंपरा फार जुनी आहे, या परंपरेवर निष्ठा ठेवून ज्येष्ठ प्रबोधनवादी विचारवंत प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी विवेकवादाला उभारी दिली आहे. त्यांनी मुस्लिमांच्या मराठी साहित्य चळवळीच्या एका अध्यायाचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी बुद्धिजीवी मुस्लिमांच्या इतिहासाचा वारसा पुढे नेला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करणं भारतीय गंगा-जमुनी संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या प्रत्येक धर्मनिरपेक्ष नागरिकांचं कर्तव्य आहे. हाच मानस डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा स्मृतिग्रंथ त्यांना समर्पित करत आहोत.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीत प्रा. बेन्नूर यांचे योगदान मोठं आहे. त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून मी व सरफराज अहमद प्रा. बेन्नूर सरांवर गौरव ग्रंथ काढण्याचं नियोजन करत होतो. चर्चेअंती ‘मराठी मुसलमानांचे सामाजिक समतेचे प्रवाह’ या विषयावर संदर्भ ग्रंथ काढावा अशी कल्पना सुचली. एका चर्चेत मी आणि सरफराज अहमद यांनी या ग्रंथाची संकल्पना ‘युनिक फाऊंडेशन’कडे मांडली. फाऊंडेशनचे विवेक घोटाळे व चंपत बोड्डेवार यांनी ही कल्पना प्रा. बेन्नूर सरांच्या प्रेमापोटी हातोहात स्वीकारली. लागलीच आम्ही प्रा. बेन्नूर सरांना ‘गौरव ग्रंथा’ची कल्पना कळवली. आमची संपूर्ण योजना ऐकून सरांनी समाधानाचे भाव चेहऱ्यावर आणले. नियोजित संकल्पनेनुसार लेखांची जुळवाजुळव सुरू झाली.
ग्रंथाची निर्मिती प्रक्रिया सुरू असताना प्रा. बेन्नूर सरांची प्रकृती वेगानं ढासळत गेली. त्यांचा किडनीचा विकार बळावला व सर अंथरुणाला खिळले. तेव्हा प्राप्त परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आम्ही सोलापुरात २० ऑगस्ट २०१८ला सरांचा गौरवसोहळा आयोजित करून त्यांना मानपत्र देण्याचा बेत आखला. कारण इतक्या कमी कालावधीत गौरवग्रंथ प्रकाशित करणं सर्वार्थानं अशक्य होते. त्यामुळे गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा नंतर घ्यावा आणि त्याआधी सरांना मानपत्र द्यावं असं नियोजन आखलं होतं. रिसर्च सेंटरनं आयोजित केलेल्या मानपत्र प्रदान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली होती आणि दुर्दैवानं सोहळ्याच्या तीन दिवस आधी १७ ऑगस्टला प्रा. बेन्नूर सरांचं देहावसान झालं. आमच्यासाठी हा फार मोठा आघात होता. दरम्यानच्या काळात संपादनाच्या कार्यात खंड पडला. सरांबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही हा ग्रंथ पूर्ण करण्याचे ठरवलं. २५ नोव्हेंबर २०१८ला प्रा. बेन्नूर सरांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आम्ही ग्रंथ प्रकाशित करण्याची योजना ठरली. इतक्या कमी कालावधीत लेखांची जुळवाजुळव करणं परिश्रमाचं काम होतं. पण लेखकमंडळीच्या सहकार्यानं आमचं कार्य सहज सोपं झालं.
मराठी मुस्लिमांवर लेख लिहून घेणं तसं जिकिरीचं काम होतं. पण सर्वांच्या सहकार्यानं ते काम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलं. या ग्रंथात अनेक महनीय व्यक्तींनी लेख देऊन आम्हाला उपकृत केलेलं आहे. त्यात गुरूवर्य डॉ. यू. म. पठाण यांनी आपला एक दुर्मीळ लेख आम्हाला या ग्रंथासाठी देऊ केला. या शिवाय या ग्रंथात असगरअली इंजिनीअर, यशवंत सुमंत, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, राम पुनियानी, फ. म. शहाजिंदे, डॉ. अलीम वकील, अब्दुल कादर मुकादम, अनवर राजन, नाजीर पठाण, मीर इसहाख शेख, डॉ. अक्रम पठाण, हयातमंहमद पठाण, राणा सफवी, दाऊद अश्रफ यांचे महत्त्वाचे लेख आहेत.
प्रा. बेन्नूर सरांच्या सोबतीनं अनेक चळवळी, आंदोलनं आणि संस्था चालवणाऱ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनानंतर मोठ्या आस्थेनं या ग्रंथनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवला. काहींनी सरांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखन उपलब्ध करून दिले. त्यामुळे बेन्नूर सरांवर आधारीत ग्रंथाचा तिसरा भाग समृद्ध होऊ शकला.
ग्रंथनिर्मितीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असली तरी सर्व सहकार्यांच्या मदतीनं हे भार सहज पेलता आलं. ग्रंथाच्या संपादन प्रकियेत मित्रवर्य हयातमहंमद पठाण, समीर दिलावर, साजिद इनामदार, कुणाल गायकवाड, राजरत्न कोसम्बी, अविनाश किनकर आणि माझी बेगम निलोफर यांचीही मोलाची साथ मिळाली. अल्ताफ कुडले यांनी या पुस्तकाचं सुरेख असं मुखपृष्ठ मोठ्या कष्टपूर्वक डिझाईन करून दिलं. डॉ. चैत्रा रेडेकर यांनी मलपृष्ठाकरीता बेन्नूर सरांचं वर्ध्याच्या गांधी आश्रमात काढलेलं अप्रतिम छायाचित्र उपलब्ध केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. युनिकचे गणेश मेरगू व पियुषा जोशी यांनी मुद्रितशोधनाची जबाबदारी कॉम्प्युटर ऑपरेटर रविंद्र जगताप यांच्या सहाय्यानं उत्तम हाताळली. आमची ही ग्रंथसंकल्पना युनिकचे प्रा. तुकाराम जाधव, विवेक घोटाळे आणि चंपत बोड्डेवार यांच्याविना पुर्णत्वास जाणं सर्वस्वी अशक्य होतं, याची आम्हाला जाणीव आहे. या सर्वांविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो.
.............................................................................................................................................
'सामाजिक समतेचा प्रवाह - प्रा. फकरुद्दीन बेन्नूर' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.
kalimazim2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 19 January 2019
कलीम अजीम, २०१४ नंतर 'हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक अल्पसंख्याकांच्या प्रार्थना व उपासनेच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणली गेली' या तुमच्या दाव्याला पुराव्याचा आधार आहे का? उगीच काहीतरी मोदींच्या विरुद्ध म्हणून ठोकून देताय? तुमच्यासारख्या शिक्षित व समंजस मराठी मुस्लिमाने मराठी संतांचा अभ्यास करून मुस्लीमांसमोर हिंदूंच्या सोबतीने एकोप्याने राहायचा संदेश ठेवायला पाहिजे. तसंच सौदी अरेबियाने खतपाणी घातलेल्या कट्टरतेची निंदा केली पाहिजे. पण तुम्ही उलट मोदींना दोष देत सुटला आहात. यांतनं तुमची तुमची विश्वासार्हता नाहीशी होईल. बाकी, हिंदूंच्या महिला व मुलींचं लैंगिक शोषणाचं सोडून द्या हो. आधी तीन तलाकच्या विरुद्ध ठामपणे उभं राहून दाखवा पाहू. त्यातूनही तुम्ही गायलेल्या रडगण्याप्रमाणे भारतातली परिस्थिती खरोखरीच इतकी वाईट असेल तर तुमच्या मते चांगली परिस्थिती असलेला देश दाखवा. मी तुम्हाला भारत सोडून तिथे स्थायिक व्हायला सांगत नाहीये. फक्त तुमच्यामते एक दृढमुद्रा ( = बेंचमार्क वा मासला ) म्हणून चांगला देश कोणता हे विचारतोय. आपला नम्र, -गामा पैलवान