अजूनकाही
माझा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. म्हणून मी जन्माने ब्राह्मण आहे, पण ते तसं अर्धसत्य आहे. म्हणजे असं की, माझी आई जातीने ब्राह्मण नव्हती. आम्ही मामाकडून पाठारे प्रभू या जातीचे (ही जात असल्याचं आजकाल बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण ही एक बऱ्यापैकी प्रसिद्ध जमात होती आणि आजकाल मुंबई-पुण्यामध्येच पाठारे प्रभू काय ते शिल्लक उरले आहेत). आपल्याकडे बापाची जात हीच मुलांची जात मानली जाते; अगदी कायद्याने सुद्धा; पण का ते नक्की सांगता येत नाही. असो. तर म्हणून मी जातीने ब्राह्मण. खरं तर माझं ब्राह्मण्य एवढ्यावरच संपतं. कारण सर्वसाधारणपणे ब्राह्मण्याचे किंवा ब्राह्मणांचे कोणतेही गुणधर्म मी अंगी बाळगून नाही. म्हणजे जानवं, संध्या वगैरे सोडा, मी साधे गुरुवार, शनिवार, चतुर्थ्या, एकादश्या, श्रावण वगैरेही पाळत नाही; पूजा सांगत नाही. मांसाशन (चिकन, मटण, मासे ते अगदी बीफ, पोर्क... जे आवडेल आणि पचेल असं काहीही) करतो. कधी-मधी दारूही पितो. बाकीच्या सर्वसाधारण धार्मिक रूढी-रीतीही पाळत नाही. फार कशाला, मी माझ्या आई-वडलांचे आणि बहिणीचे मृत्यूनंतर अग्निसंस्कारही केले नाहीत. त्यांचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांना अभ्यासासाठी दिले (देहदान) आणि डोळे दान केले. नंतरचे दहावे, बारावे श्राद्धादी संस्कार केले नाहीत हे वेगळ्याने सांगायला नकोच. मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलीचं बारसंही केलेलं नाही (म्हणजे मुलीला नाव ठेवलंय, पण बारसं केलेलं नाही). शाळेपासून ते कामाच्या ठिकाणापर्यंतचे माझे बहुसंख्य मित्र ब्राह्मणेतर आहेत. त्यामुळे एक जन्मतःच चिकटलेली जात म्हणून मी फक्त ब्राह्मण आहे, असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. मग मी आज या विषयावर काही का बोलतो आहे? त्याला काही विशिष्ट कारणं आहेत.
म्हणजे सहज जाता-येता किंवा कामाच्या ठिकाणी, जेवणाच्या वेळी, चहाच्या वेळी अवांतर गोष्टींवर गप्पा मारताना मी जे काही बोलतो किंवा आसपास घडणाऱ्या गोष्टींवर गप्पांच्या ओघामध्ये जी चर्चा होते, त्यात मी आणि माझे विचार यांना माझ्या जन्मजात ब्राह्मण्याशी जोडूनच पहिलं जातं. जणू मी सर्व ब्राह्मणांचा एक प्रतिनिधी आहे; आणि मग मला गोंधळल्यासारख होतं ( म्हणजे व्हायचं, आता सवय झालीये). उदाहरणार्थ, 'दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू होते का?' हा काही वर्षांपूर्वी झालेला वाद, जेम्स लेन-भांडारकर संस्था वाद किंवा बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचा वाद. खरं तर या प्रकरणांशी, या लोकांशी माझा काहीही संबंध नव्हता; नाही. या प्रकरणांबद्दल मला तेव्हा काही माहितीही नव्हती आणि यावर शिळोप्याच्या गप्पा मारणारे लोकही माझ्याइतकेच अनभिज्ञ असल्याची मला खात्री आहे. तरीही त्यांचा एकूण सूर हा मला एका प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारा असे. 'तुम्ही सगळे ब्राह्मण लोक असेच', 'ब्राह्मणांनी आपली कायमच वाट लावली'...अशा तुकड्यांनी सुरू होणाऱ्या वाक्यांनी मी गोंधळून जात असे.
यांच्यामध्ये इतकी वर्षं काढलेला मी अचानक मी न राहता कुणी तरी बाहेरचा होऊन जात असे. मग मी यावर वाचायला आणि माहिती गोळा करायला सुरुवात केली. आता मी गोळा केलेली माहिती आणि मला या एकंदर गोष्टीचं झालेलं आकलन हे अपूर्ण, चूक किंवा फारच वरवरचं असू शकतं किंवा बरोबर आणि अगदी मूलगामीही असू शकतं. ते कसं आहे, हे तुम्ही ठरवायचं.
इंग्रजांनी मराठी राज्य बुडवून त्यांचा अंमल कायम केला, तेव्हा पुण्यात तरी ब्राह्मण हेच सत्ताधारी होते (तसं पाहू जाता, ब्राह्मण ही काही राज्यकर्ती जात नव्हे. इतिहासात ब्राह्मणांनी राज्य कमावल्याची उदाहरणं कमीच. इ.स.पूर्व १५० मध्ये झालेला पुष्यमित्र श्रुंग सोडला, तर मला तरी ब्राह्मण राजे आठवत नाहीत. महाराष्ट्रातले सातवाहन सम्राट हे ब्राह्मण होते, असं मानलं जातं, पण यावर संशोधकांमध्ये मतभेद आहेत). त्यामुळे त्या काळात पुण्यात आणि त्याच्या आसपासच्या प्रांतात तरी ब्राह्मण ही साहजिकच प्रभावशाली आणि सत्तेशी हितसंबंध जुळवून असलेली जात होती हे निश्चित. आता सत्ताधारी म्हणून ब्राह्मण राज्यकर्ते हे फार न्यायी आणि समंजस होते, अशातली बात नाही. त्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या जमातीलाच झुकतं माप, अधिकार आणि सत्तेत वाटा दिला, हेही खरंच; पण सर्वसाधारणपणे सत्तेतली कुठलीही जमात किंवा वर्ग असाच वागतो. स्वकीयांचे हितसंबंध तो अधिक जपतो (असे न वागणारे लोक कमी, अपवादात्मक आणि नक्कीच प्रशंसनीय). छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेलं मराठी राज्य १८१८मध्ये इंग्रजांनी बुडवलं आणि महाराष्ट्रात स्वतःची सत्ता दृढमूल केली, त्या वेळी ब्राह्मण हेच सत्ताधारी होते आणि दिल्लीच्या नामधारी बादशाहच्या आडून तेच देशाच्या राजकारणाची सूत्रं हाकत होते. त्यामुळे त्यांच्यावर राज्य घालवल्याचा राग होताच. इंग्रज परकीय खरे, पण त्यांनी राज्यव्यवस्थेत सुसूत्रता आणली. त्याचबरोबर आधुनिक विचार, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान हेही आले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी म्हणून का होईना, पण त्यांनी नवीन शिक्षणपद्धती आणली, तेव्हा काही पिढ्यांपासून सत्तेला चिकटून असलेले ब्राह्मण पुन्हा जुनी लक्तरं टाकून नव्या व्यवस्थेत सत्तेचे भागीदार बनले. त्यांचे हितसंबंध फार बिघडले नाहीत (बऱ्याच ब्राह्मणांच्या, विशेषतः चित्पावनांच्या मनात इंग्रजांनी चित्पावनांचं राज्य बुडवल्याचा राग असला, तरी या नव्या शिक्षणाचं, विज्ञानाचं आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखणारेही बहुसंख्य ब्राह्मणच होते. त्यामुळे सुरुवातीला इंग्रजांविरुद्ध शस्त्र उपसणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, वगैरे जसे ब्राह्मण होते, तसेच आधुनिक शिक्षण आणि सुधारणेचा पुरस्कार करणारे लोकहितवादी, न्या. रानडे, आगरकर, कर्वे वगैरेही ब्राह्मणच होते). याचा राग इतर, विशेषतः मराठा जातीच्या मनात फार होता.
मराठा ही खरं तर अनेक पिढ्यांपासूनची राज्यकर्ती जमात होती. म्हणजे यादवांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, आदिलशहाचं किंवा मोगलांचं असं कुणाचंही राज्य असलं, तरी मराठा समाजाची सत्तेतली भागीदारी काही आटली नव्हती, पण शाहू महाराजांच्या काळात बाळाजी विश्वनाथाने अन नंतर पहिल्या बाजीरावाने पद्धतशीरपणे हे परंपरागत मराठा वर्चस्व मोडून काढलं. मराठ्यांचा सत्तेतला वाटा नाममात्र केला आणि होळकर, शिंदे यांसारखे नवे सरदार उभे केले; ब्राह्मण सरदार उभे केले. इंग्रजांच्या काळात तर परिस्थिती आणखीनच बिकट बनली. इंग्रजांनी वंशपरंपरेने कुणाला काही देणं बंदच केलं.
अशातच महात्मा ज्योतिबा फुलेंचा उदय झाला आणि त्यांनी बहुजन समाजाच्या या हीन-दीन परिस्थितीचं यथायोग्य मूल्यमापन करून त्यांच्या उत्थापनाचे प्रयत्न सुरू केले. त्यातून सत्यशोधक चळवळीची स्थापना झाली. दारिद्र्य, अज्ञान, भेदाभेद, विषमता हेच बहुजनांच्या मागासलेपणाचं कारण असल्याचं ओळखून या शोषक समाजव्यवस्थेचे संरक्षक असलेल्या ब्राह्मणांना फुलेंनी आव्हान दिलं. त्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक चळवळीला अभूतपूर्व यश मिळालं.
म. फुलेंच्या नंतर या चळवळीची सूत्रं मराठा समाजाच्या हाती गेली आणि लवकरच तिला ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचं रूप येऊ लागलं. सत्याशोधक चळवळ आधी ब्राह्मणेतर आणि नंतर ब्राह्मणद्वेषी कधी झाली, हे बहुजन समाजाला कळलंच नाही. या चळवळीच्या यशाने ब्राह्मणांची सर्व क्षेत्रांमधून पीछेहाट सुरू झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रौढ मतदानाच्या युगात संख्येने ३.५ ते ४ टक्के असणाऱ्या ब्राह्मणांना एक समाज म्हणून फारसं भवितव्य नव्हतंच आणि ते जात म्हणून एकही नव्हते. अशात गांधीजींचा खून झाला आणि तो एका ब्राह्मणाने केलेला असल्याने ब्राह्मणद्वेषाला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं. नथुरामला न्यायालयात शिक्षा झाली. तो फाशीही गेला, पण समस्त ब्राह्मण समाज या गुन्ह्याच्या अपराधी भावनेचा शिकार झाला.
आजही ब्राह्मणांना त्याबद्दल जबाबदार धरलं जातं आणि त्या घटनेशी काहीही संबंध नसलेले आजचे ब्राह्मण त्या अपराधाचं ओझं आजही डोक्यावर वाहताना दिसतात. या उलट नव्या लोकशाही समाजव्यवस्थेत संख्येने २७–३५ टक्के असलेला मराठा समाज पुन्हा एकदा सत्ताधारी झाला, त्याच्याकडे सत्ता कमावण्याचा, चालवण्याचा, टिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव तर होताच, पण त्याबरोबरच पुरेसं संघटित संख्याबळही होतं.
खरं तर ब्राह्मण आणि मराठा या दोन सवर्ण जाती पिढ्यानपिढ्या सत्तेतल्या भागीदार, पण ब्राह्मणेतर चळवळीत त्या एकमेकांविरुद्ध आल्या. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रातज्या दंगली उसळल्या (आमचे आजोबासुद्धा त्या दंगलीत घर जाळल्यामुळे नाशिकहून परागंदा होऊन पुण्यात आले). त्यामुळे खेडोपाडी थोडीफार जमीनदारी धरून असणारा ब्राह्मण समाज तिथून मुळापासून उखडला गेला आणि शहरात आला. खेड्यातला भिक्षुकी करणारा ब्राह्मण तर आधीच शहराकडे जाऊ लागला होता (आज खेडोपाडी ब्राह्मण समाज जवळपास नाहीच). विपरीत परिस्थिती माणसाला पर्याय शोधायला भाग पाडते. ब्राह्मणांनी स्वतःला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतलं. खरं तर सत्तेतले पिढ्यानुपिढ्या भागीदार असलेले मराठा आणि ब्राह्मण हे दोन समाज. ब्राह्मण हेही एकेकाळी अत्यंत कर्मठ, पण प्रबोधन आणि सुधारणेत आज ही जात अत्यंत अग्रेसर.
इतिहासदृष्ट्या पहिल तर ब्राह्मण स्त्री इतकी शोषित, वंचित स्त्री इतर कुठल्याही समाजात नसेल. इतर जातीतल्या स्त्रियांची अवस्था फार चांगली होती अशातला भाग नाही, पण ब्राह्मण स्त्री म्हणजे शोषणाची परमावधी म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. ब्राह्मण विधवांची स्थिती तर अत्यंत दयनीय, पण आज ब्राह्मण स्त्रियामध्ये शिक्षण, स्वातंत्र्य आणि स्वावलंबी असण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अशिक्षित/ निरक्षर ब्राह्मण स्त्री तर अपवादानेच आढळेल. आणि जात धर्म प्रांत वंश वगैरेचा विचार न करता, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, विचार यांचा विचार करून जातीबाहेर विवाह करणाऱ्या तरुणींमध्ये ब्राह्मण तरुणींचा टक्का लक्षणीय आहे. विशेष म्हणजे त्यांना घरून फारसा विरोध होत नाहीच, उलट बऱ्याचदा पाठिंबाच मिळतो. एवढंच कशाला आताशा ब्राह्मणाचं स्वतःला ‘ब्राह्मण’ म्हणून वेगळं मानणंही कमी कमी होत चाललं आहे. नवीन पिढीतल्या ब्राह्मण तरुणांमध्ये तर हे प्रमाण अधिकच आहे. त्यांना स्वतःच्या ब्राह्मण असण्याबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल फारसं काही माहित नसतं आणि माहिती करून घ्यायची इच्छा आहे असंही मला वाटत नाही. परंपरागत भिक्षुकी सोडून आधुनिक शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करणारे आणि पैसा कमावणारे ब्राह्मण अधिक. शहरात स्थिरावलेला ब्राह्मण समाज आज शहरेही सोडून परदेशी जाऊन स्थायिक होऊ लागला आहे. इतरही जातीतले लोक जातात, पण संख्याबळ पाहिले तर ब्राह्मणात हे प्रमाण खूपच जास्त आहे.
माझ्या माहितीतल्या एकूण एक ब्राह्मण कुटुंबातले कोणी न कोणी परदेशी स्थायिक झालेले असते आणि नवीन पिढी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तिकडे जायचे स्वप्न उराशी बाळगून असते. त्याचबरोबर ब्राह्मण तरुणांचा समाजकारणातला आणि विशेषतः राजकारणातला सहभाग लक्षणीयरीत्या घटत चालला आहे.
माझ्या एका नातेवाईकाच्या नुकत्याच इंजीनिअर झालेल्या आणि परदेशगमनाची तयारी करत असलेल्या मुलाला मी या बाबत सहज छेडलं. त्याला विचारला की, तू शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत येणार की नाही? तर तो म्हणाला, “इथं परत येऊन काय करणार? मी ब्राह्मण आहे. मला चांगली नोकरी इथं मिळणार नाही. त्यापेक्षा अमेरिकेत जास्त पैसा आहे.” “पण तुला या देशाकरता काही करावंसं वाटत नाही का? त्यागाची आणि निस्पृह सेवेची फार मोठी परंपरा ब्राह्मण लोकांनी मागे ठेवली आहे. हा देश घडवण्यात ब्राह्मणांचा वाटाही आहे,” मी त्याला म्हटलं. तो माझ्याकडे जरा संशयाने पाहू लागला. त्याला वाटलं मी त्याची चेष्टाच करतो आहे. मग म्हणाला, “कसला त्याग, सेवाभाव? या फालतू गोष्टी आहेत. माझा जन्म भारतात झाला म्हणून मी भारतीय, ब्राह्मणाच्या घरी झाला म्हणून ब्राह्मण, यापेक्षा याला काय अर्थ आहे? इतिहास, परंपरा वगैरे म्हणाल तर तो प्रत्येक देशाला असतोच. या देशात जन्मल्यापासून आमच्याकडे संशयानंच पाहिलं जातं. कुठे कोणी दलितांना मारहाण केली की, ब्राह्मणांना शिव्या देतात. २००-३००-१००० वर्षांपूर्वीच्या गोष्टी काढून आम्हाला धारेवर धरतात. भ्रष्टाचार, विषमता, अन्याय यांनी बरबटलेले लोक आम्हाला त्यांच्या अवस्थेकरता जबाबदार धरतात. हे म्हणजे स्वतः रस्त्यावर घाण करायची आणि अस्वच्छतेबद्दल बोंबलायचे तसे झाले. महाराष्ट्रात एवढ्या दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, त्यात एक तरी ब्राह्मण सापडला का? पण येता जाता आम्हाला टोमणे मारले जातात. आरक्षणाचे फायदे दशकानुदशके घेऊन मागास राहणारे समाज ब्राह्मणांना त्यांच्या मागासलेपणासाठी जबाबदार धरतात. १०००- १२०० वर्षांपूर्वी आलेले मुसलमान इथले, पण ५००० कि १०००० वर्षापूर्वी आलेले ब्राह्मण मूळचे आर्य, आणि म्हणून बाहेरचे, जरा कुठे खुट्ट झाले की, आम्हाला बाहेर फेकून द्यायची भाषा! तसं कशाला, आम्हीच बाहेर जातो की! दुसऱ्या देशात आम्ही उपरे असू कदाचित, पण मग इथं कोण आम्हाला आपलं मानतंय? इथं तरी आमची मूळ कुठे रुजली आहेत? ती उखडून फेकून दिलीच आहेत की, या समाजाने. आम्ही तर मूल नसलेले लोक आहोत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही राहा इथं. मला तर खरं असं काही वाटत नाही.”
हे त्याचे विचार सर्वथैव बरोबर आहे असं नाही. ते प्रातिनिधिकही नाहीत, पण अगदीच अपवादात्मकही नाहीत. मला भेटलेले बहुसंख्य ब्राह्मण तरुण असेच काहीसे विचार करणारे आहेत. हे फार भयावह आहे. मन उद्विग्न करणारं आहे. या देशात आमची पाळंमुळं नाहीत हे त्याचे उद्गार मला जास्त अस्वस्थ करून गेले. पण आहे हे असं आहे, त्याला कोण काय करणार? समाजातला एखादा वर्ग स्वतःला असं इतरापासून, या देशाच्या संस्कृती, इतिहासापासून तुटल्यासारखा/ दुरावल्यासारखा मानू लागला तर ते निश्चितच उद्वेगजनक आहे.
लेखक टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gitesh Sanvatsarkar
Sun , 18 December 2016
हे अगदी खरं आहे. आज तसं पाहीलं तर 'जात' ही गोष्ट काही ही अवश्यक नाही. आम्हाला काही फायदा हवा असेल तर जात पाहीजेच. नाही तर आम्ही फार पुढारलेले आहोत, जात-पात आम्ही मानत नाही असे म्हणणारे जास्त आहेत. एखाद्या ब्राम्हणाला कोणी ए बामना, भटा वगैरे काही म्हणाला तर नक्कीच तो तलवार काढणार नाही वा कोणत्याही प्रकारचा विरोधही करणार नाही हे त्या म्हणणा-याला चांगलंच ठाऊक असतं. खरंतर जाती वरून कोणी काही बोललं तर चिडणं म्हणजे राष्ट्र दोशाचं पातक लागेल कारण ह्यामुळे जर जातीयवाद भडकला तर संपूर्ण समाजाचं नुकसान आहे हे तो जाणतो. त्यामुचेच कदाचीत तो गप्प बसतो. ज्याच्या हाती सत्ता तो ताकदवान. खरं म्हणजे जो ताकदवान असतो त्याने केलेली क्रुती ही नेहमीच प्रशंशली जाते. पुर्वी ब्राम्हण ताकदवान होते. ते आता तितके उरलेच नाहीत. (हम दो हमारे दो अशा सारख्या सर्व योजनेत उत्स्फूस्फूर्त सहभाग, परदेश गमन) त्यामुळे आता १०००-१२०० वर्षापुर्वीचं उकरायचं आणि वाडवडीलांच्या संपत्तीचे कसे वारस होता मग त्यांच्या पापाचे पण वाटेकरी व्हा. असं म्हणत ब्राम्हणांना शिव्या घालायच्या. आम्ही तेव्हा बोलू शकत नव्हतो आता बोलतो. एकंदर काय जातीय द्वेश तसाच. पुर्वी ब्राम्हण अन्याय करी आता त्यांच्यावर होतोय. फरक ईतकाच त्यावेळी महात्मा फुलें बरोबर न्या. रानडे, गोखले, अगरकर वगैरे असंख्य ब्राम्हण दलीतांवर होणा-या अन्यायाविरूद्ध लढण्यास पुढे आले. तर आता त्यांचं त्यांनी पहावं असा विचार पुढे येतोय.... खरंय ब्राम्हण तरुणाने हे जाणावं आणि ह्या जातीत वादात पडूच नये. मिळेल तिथे, योग्य मार्गाने, नियमात राहून तो आपली प्रगती करण्याचा प्रयत्न तो करत राहणे. मग हे विश्व ची माझे घर आणि माणूस माझी जात अन् मानवता हा माझा धर्म.
Nilesh Sindamkar
Sat , 17 December 2016
वाह...
trupti soman
Sat , 17 December 2016
बरोबर आहे
Kumar Thoke
Fri , 16 December 2016
ब्राह्मण तरुणांच्या ह्या मानसिकतेला आपल्या समाजानेच खतपाणी घातले आहे. अगदी अशीच मानसिकता मुस्लिम तरुणांची सुद्धा होत असेल .
Rajendra Kulkarni
Fri , 16 December 2016
मी सहमत आहे विशेष करून ग्रामीण भगात अजूनही गांधी हत्या सारख्या (विषेश करुन खरी ऐतिहासिक पाश्र्वभूमी समजावून न घेता सर्व समाजास दोष देणे/)अजूनही काही प्रमानात आहे पण सर्व तरुण वर्ग पारीस्थितीमुळे परदेशात जाऊ शकतं नाही आणि जाऊं पण नये' (का जावे?)या जन्मभूमीची देशसेवेत्त आपल्या समाजाचा वाटा आधिक आहे हे सत्य कोणींही नाकारु शकत नाही
Prakash Ghatpande
Thu , 15 December 2016
चांगला लेख!
Amol Yadav
Thu , 15 December 2016
@ Aditya Korde सहमत
ADITYA KORDE
Thu , 15 December 2016
@ Amol yadav & Bhagyashree Bhagwat मी वर म्हटलेच आहे कि माझे जे निरीक्षण आहे ते मी इथे दिलेले आहे. निष्कर्ष चूक असू शकतात पण मी ठामपणे निष्कर्ष मांडलेले नाहीयेत, मला भेटलेल्या ब्राह्मण तरुणांना काय वाटते असे मला दिसले ते मी लिहिले आहे ते प्रातिनिधिक नाही असे हि म्हटलेच आहे फक्त त्यांचे विचार अगदीच अपवादात्मक आहे असेही मी म्हटले नाही.
Amol Yadav
Thu , 15 December 2016
काही प्रमाणात बरोबर निरीक्षण पण निष्कर्ष vague वाटतात.. जसे ब्राह्मणांना आरक्षणामुळे चांगल्या नोकऱ्या मिळणार नाहीत , राजकारणात ब्राह्मणांना कोणी विचारात नाही वैगेरे.. आरक्षण असले तरी 50% खुल्या जागामधून उच्च नौकरी मिळवणारे बहुतेक ब्राह्मण,मराठा वैगेरे जातीयच असतात.. मी स्वतः खुल्या प्रवगातील असूनही हि कारणे पटत नाहीत.. बाकी जातिकडे बघण्याचा stereotype view निषेध करण्यालायकच
Bhagyashree Bhagwat
Thu , 15 December 2016
निरीक्षण बरोबर निष्कर्ष चूक!