चार घटकांसाठी (कसोटीचे) तीन दिवस
पडघम - साहित्य संमेलन विशेष
विनोद शिरसाठ
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 11 January 2019
  • पडघम साहित्य संमेलन Sahitya Sanmelan नयनतारा सहगल Nayantara Sahgal

७ जानेवारीच्या पूर्वसंध्येला अतिशय वाईट, धक्कादायक आणि लाजीरवाणी बातमी पुढे आली आहे. यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी या काळात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण संयोजकांनीच मागे घेतले आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वात खळबळ माजली आहे, राग व संताप व्यक्त होत आहे, निषेध केला जात आहे, बहिष्काराचे अस्त्र उपसले जात आहे. त्यामुळे संयोजक संस्था, साहित्य महामंडळ आणि संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष हे काय भूमिका घेणार आहेत, याकडे मराठी विचारविश्वाचे लक्ष लागले आहे. आमंत्रण मागे घेतल्याची बातमी आल्यानंतरच्या २४ तासांत वरील तीनही घटकांकडून ठोस व निश्चित असा काही निर्णय आलेला नाही. साहजिक आहे. असे अनपेक्षितपणे काही घडते तेव्हा जबाबदारीच्या जागेवर असलेल्या व्यक्तींना सारासार विचार करावा लागतो आणि कमीत कमी नुकसानकारक पर्याय निवडावा लागतो.

आणि कोणताही पर्याय निवडला तरी त्याचे स्वागत व टीका वाट्याला येतच असते. त्यामुळे सद्सदविवेकाचा कौल आणि व्यापक समाजहित या दोहोंची सांगड घालणारा निर्णय घ्यावा लागतो. भल्याभल्यांसाठी ही कसोटी कठीण असते. परंतु व्यक्तीच्या व संस्थेच्याही आयुष्यात असे काही क्षण येत असतात की, त्याक्षणी त्यांचे वर्तन ऐतिहासिक दृष्टीने मोलाचे ठरत असते. त्या निर्णयाचा परिणाम, कर्तव्य बजावल्याचे समाधान किंवा कसोटीच्या क्षणी नापास झालो अशी भावना, त्या संस्थेच्या इतिहासात वा व्यक्तीच्या भावी आयुष्यात कायम रूतून बसते, कमी-अधिक प्रमाणात त्रास देत असते. भावी इतिहासकार त्या व्यक्तीचे वा संस्थेचे मूल्यमापन करताना त्या विशिष्ट क्षणी घेतलेल्या निर्णयाला विशेष महत्त्व देत असतात. असे मूल्यमापन मानवजातीच्या इतिहासात सर्वत्र होत आले आहे, यापुढेही होत राहणार आहे. कसोटीच्या क्षणी महान, थोर, बुद्धिवान, प्रतिभावान, चारित्र्यवान, धैर्यशील, तत्त्वनिष्ठ, सर्वगुणसंपन्न वगैरे समजली जाणारी माणसे नापास झाल्याची उदाहरणे सर्वत्र आहेत. आणि लहान, बारकी, साधी, लव्हाळी वाटणारी माणसे अशा कसोटीच्या क्षणी योग्य निर्णय घेऊन, प्रसंगी आहुती देऊन अजरामर झालेली आहेत.

तर अशा कसोटीची ही वेळ आहे. शहरी, मध्यमवर्गीय, पांढरपेशी, ब्राह्मणी इत्यादी विशेषणांनी अनेकांनी हिणवले असले तरी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातील मराठी जनांचे, मराठी मनाचे, मराठी विचारविश्वाचे, महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च विचारपीठ राहिले आहे. शतकभराच्या वारशातून, घणाघाती वादसंवादांतून या विचारपीठाला ते स्थान मिळालेले आहे. कितीही वादावादी झाली, कितीही कमी क्षमतेची माणसे साहित्य संस्थांमध्ये आली आणि कितीही चढउतार आले तरी ते स्थान अद्यापही अबाधित आहे.

या पार्श्वभूमीवर चार घटकांच्यावर आताच्या परिस्थितीची जबाबदारी आहे; ती पार पाडण्यासाठी तीन दिवसांचा वेळ हाताशी आहे.

१. संयोजक संस्था

नयनतारा सहगल यांना या संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलावण्याचा निर्णय कोणाच्याही सूचनेनुसार झालेला असला तरी, एकदा तो निर्णय झाल्यावर व तसे आमंत्रण पाठवले गेल्यावर आणि त्यांनी ते स्वीकारल्यावर, ते आमंत्रण मागे घेणे ही संयोजकांसाठी सर्वोच्च नामुष्की आहे. भले ते आमंत्रण अजाणतेपणाने दिलेले असो. आपण उद्घाटनासाठी ते नाव मान्य करण्यात चूक केली आहे असे वाटले म्हणून किंवा अंतर्गत वा बाह्य दबावाला बळी पडून, ते आमंत्रण यवतमाळच्या संयोजक संस्थेने मागे घेतलेले आहे. एक शक्यता अशी आहे की, यातून किती मोठी नामुष्की ओढवली जाणार आहे, याचा अंदाज त्यांना आलेला नसणार. मात्र ती बातमी बाहेर आल्यावर २४ तासांत आलेल्या प्रतिक्रिया आणि पुढील आठवड्यात काय घडू शकते याचा अंदाज पाहता, संयोजकांनी नयनतारा सहगल यांची माफी मागावी आणि संभाव्य परिणाम लक्षात घेऊन उद्घाटनाला येण्याचा आग्रह पुन्हा धरावा. त्या ‘आता येणार नाही’ असे म्हणाल्या, तर ते संपूर्ण भाषण संमेलनात वाचून दाखवावे आणि त्याच्या प्रती उपस्थित श्रोत्यांना वाटप कराव्यात. असे केले तर संयोजकांची उरलीसुरली इज्जत वाचेल. मात्र संयोजकांना यात स्वत:चा अहंकार दुखावला जाईल असे वाटत असेल किंवा आमंत्रण मागे घेण्याची कृती संयोजकांनी जाणीवपूर्वक केलेली असेल आणि ‘आहे त्याच परिस्थितीत संमेलन पार पाडायचे’ असे ठरवले असेल तर मग त्यांच्यासाठी काहीही सूचना वा सल्ला नाही.

२. साहित्य महामंडळ

मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), विदर्भ साहित्य संघ (नागपूर), मुंबई मराठी साहित्य संघ (मुंबई) या चार प्रमुख घटक संस्था आणि अन्य काही उपघटक असणार्‍या संस्था यांचे मिळून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही शिखर संस्था आकाराला आलेली आहे. दरवर्षी अ.भा.म. साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी संयोजक संस्थांची निवड करण्याचे काम साहित्य महामंडळ करत असते. अर्थातच, संयोजक संस्थेची भूमिका संमेलनाच्या आयोजनात मध्यवर्ती असते. पण साहित्य महामंडळाची मूलभूत चौकट, किमान आचारसंहिता व महत्त्वाचे संकेत यांचा त्या संमेलनावर प्रभाव असतोच असतो. त्यामुळे संयोजनातील त्रुटींच्या संदर्भात सर्वसाधारण परिस्थितीत महामंडळाची भूमिका ‘समर्थनीय नाही पण क्षम्य’ अशी असू शकते. मात्र जेव्हा मर्मावर घाव घातला जातो, मूलतत्त्वांनाच छेद दिला जातो, तेव्हा साहित्य महामंडळाने कठोरातील कठोर भूमिका घ्यायला तयार असले पाहिजे. तशी वेळ आता आली आहे. म्हणून साहित्य महामंडळाने तातडीने हालचाली करून, संयोजक संस्थेला त्यांनी केलेल्या गंभीर चुकीबद्दल स्पष्टपणे खडसावून, माघार घ्यायला सांगितले पाहिजे. जर संयोजक संस्था ते मान्य करणार नसेल तर महामंडळाने त्यांना कळवले पाहिजे- ‘तुम्हाला संमेलन देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने संमेलन पार पाडा, मात्र तुम्ही केलेली गंभीर चूक लक्षात घेता महामंडळ त्यात सहभागी होणार नाही.’

साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी, मोठी इच्छाशक्ती दाखवून मागील तीन वर्षांत काही मूलगामी बदल करण्याचे प्रयत्न साहित्य संमेलनांच्या आयोजनात व अध्यक्षीय निवडीच्या संदर्भात केलेले आहेत. म्हणून आता त्यांनी तातडीने सर्व घटक व उपघटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून (आपापल्या ठिकाणी राहून बैठक घेता येते) वरीलप्रमाणे निर्णय घेण्यासाठी पूर्ण ताकद लावली पाहिजे. परंतु त्यावर एकमत होत नसेल तर ‘साहित्य महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने अशा संमेलनाला मी उपस्थित राहू शकत नाही’ अशी भूमिका घेऊन ‘पुढील निर्णय साहित्य महामंडळाने घ्यावा’ असे ठामपणे सांगितले पाहिजे.

३. संमेलनाच्या अध्यक्ष

अरुणा ढेरे यांची ओळख मराठी साहित्यविश्‍वाला त्यांच्या सकस व विविधतापूर्ण साहित्यनिर्मितीसाठी जशी आहे, तशीच त्यांच्या सौजन्यशील व्यक्तिमत्त्वासाठीदेखील आहे. २००४ मध्ये ज्येष्ठ समीक्षक रा.ग.जाधव यांना बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडले गेले, त्यानंतर तशी योग्यता असलेल्या मोजक्या नावांमध्ये अरुणाताईंचे नाव अग्रभागी घेतले जात असे. आणि त्यामुळेच, या वर्षीपासून साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक रद्द करून, साहित्य महामंडळानेच अध्यक्षाची निवड करायचे ठरवले, तेव्हा पहिला मान अरुणा ढेरे यांना मिळालेला आहे. नयनतारा यांचे आमंत्रण रद्द झाले, त्याचदिवशी सकाळी महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी अरुणाताईंचा उल्लेख ‘गोड बोलणाऱ्या आणि करारी व्यक्तिमत्त्वाच्या’ असा केला आहे. आता त्यांना मोठीच संधी प्राप्त झाली आहे. विसाव्या शतकातील इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, सुनीता देशपांडे यांच्या करारीपणाचे प्रत्यक्ष दर्शन अरुणाताईंना घडलेले आहे. एकोणिसाव्या शतकातील करारी व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महिलांची ओळख (अभ्यास व संशोधन करून) अरुणाताईंनी मराठी वाचकांना करून दिलेली आहे. आणि मराठी साहित्यातील अनेक संत कवयित्रींचा करारीपणाही त्यांनी नव्याने प्रकाशात आणलेला आहे. हे सर्व लक्षात घेता, संयोजक संस्था व साहित्य महामंडळ यांना अरुणा ढेरे यांनी ‘तर मी उपस्थित राहणार नाही’ असे नम्रपणे कळवायला हवे. आज अरुणा ढेरे यांची नैतिक ताकद इतकी जास्त आहे की, त्या एका वाक्याने सर्व चित्र पालटू शकते आणि नाहीच पालटले तरी मराठी साहित्यविश्‍वासाठी तो प्रचंड मोठ्या आनंदाचा व अभिमानाचा विषय पुढील काही दशके तरी राहील.

४. राज्य सरकार : अखिल भारतीय मराठी साहित्य

संमेलनाच्या आयोजनात (५० लाख रुपयांची) देणगी विनाअट देणे, यापलीकडे महाराष्ट्र राज्य सरकारची काहीही भूमिका नसते (नसावीच!) मात्र आता नयनतारा यांना आमंत्रण नाकारण्याची परिस्थिती संयोजकांवर आली, त्याची दोन कारणे पुढे आलेली दिसतात. एक- सत्ताधारी पक्षाचे लोक किंवा सरकारशी संबंधित घटकांनीच अशी परिस्थिती आतून निर्माण केली. दुसरी शक्यता- अन्य संघटनांनी वा व्यक्तींनी दिलेली धमकी व आणलेला दबाव. वरील दोन्हींपैकी काहीही खरे असले तरी राज्य सरकारने ते दोन्ही प्रकार कठोरपणे हाणून पाडावेत, संयोजक संस्थेला पूर्ण आश्वस्त करावे आणि हे संमेलन नयनतारा सहगल यांच्यासह (त्या नाही आल्या तर त्यांच्या भाषणासह) पार पाडण्यासाठी आवश्यक ती सुरक्षितता द्यावी. असे करणे हे राज्य सरकारचे किमान कर्तव्य ठरते.

वरील चारही प्रमुख घटकांनी दुर्लक्ष केले आणि आहे त्या परिस्थितीत वरवरची मलमपट्टी करून संमेलन पार पाडायचे ठरवले तर समस्त मराठीजनांनी सनदशीर मार्गांनी आपापला निषेध नोंदवावा, बहिष्काराचे अस्त्र चालवावे. नयनतारा सहगल यांचे भाषण, त्यात मांडलेले विचार व केलेले भाष्य मागील तीन-चार वर्षांत सर्वत्र व्यक्त झालेलेच आहेत. काहींना ते पूर्णत: मान्य आहेत, काहींना अंशत: मान्य आहेत, काहींना पूर्णत: अमान्य आहेत. त्यावर वाद-चर्चा व टीका करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहेच!

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १९ जानेवारी २०१९च्या अंकातून)

.............................................................................................................................................

लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.

vinod.shirsath@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......