अजूनकाही
‘उंटाचा मुका घेणं’ या वाक्प्रचारात अनेक अर्थ दडलेले आहेत. म्हणजे आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट, उंटाची व आपली उंची आणि तिसरं म्हणजे या पद्धतीची सलगी!
सामान्य मानव उंचीला धरून हा वाक्प्रचार रूढ झालेला आहे. अशा वेळी ज्यांची उंची हाच आश्चर्याचा विषय, अशा लिलिपूट प्राण्यांनी असा प्रयत्न करणं म्हणजे उंदरानं पर्वती चढणं!
मराठी साहित्यिकांना ‘सारस्वत’ का म्हणतात याच्या तपशीलात जायला नको. कुणी तरी स्वत:ला काही संबोधन लावून घेत असेल तर घेवोत आपले! अलीकडे नाक्यानाक्यावर, चौकाचौकात ‘युवा नेतृत्व’ म्हणून जे दादा, भाई यांचे फ्लेक्स झळकतात, त्याकडे बघून कुत्सितपणे हसणारेच स्वत:ला ‘सारस्वत’ हे बिरुद लावून घेत आलेत!
तर या मराठी साहित्यिकांचा जो वार्षिकोत्सव असतो - म्हणजेच अ. भा. मराठी साहित्य संमेलन - त्यात या वर्षी अचानक काही घडामोडी घडल्या आणि तथाकथित खळबळ माजली. तथाकथित यासाठी कारण १२ कोटींच्या महाराष्ट्रात हे सारस्वत आणि त्यांच्या साहित्याचं वर्तुळ तळलेल्या कुरडयांपेक्षा फार मोठं नाही. तरीही अभिजात भाषा, अमृताच्या पैजा आणि लाभले भाग्य वगैरे अभिमान रडगाणी तेवढ्याच वर्तुळात ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ छापात चालू असतात. त्यात हे संमेलन म्हणजे मंगळागौर किंवा भोंडला मोठ्या मांडवातला!
दरवर्षी निवडणुकीनं संमेलनाध्यक्ष निवडला जात होता. यंदा निवडणूक रद्द झाली. आणि महामंडळानं सर्वसंमतीनं प्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड केली. आणि त्या मर्यादित वर्तुळातही समाधानाचा सूर उमटला. काहींना चिंता वाटली या हमामात ही कवयित्री आपलं निर्मळत्व कसं राखेल? कारण आयोजक, संयोजकांच्या सुरस कथा, कुरघोड्या नि कूपमंडूकता सर्वश्रुतच आहे.
मात्र अरुणा ढेरेंची संमेलनाध्यक्षपदी निवड होताच माध्यमांना जणू पान्हा फुटला! मराठी माध्यमं म्हणजे मराठी सारस्वतांचंच एक्सटेंशन. त्यामुळे सारस्वतांचा अभिजनवाद त्यांच्याही डीएनएत पुरेपूर उतरलेला. बोरुबहाद्दरांच्या हाती पदं आणि माध्यमसत्ता आली की, बगळ्यांचे राजहंस आणि तिरसिंगरावांचे उद्धटराव व्हायला वेळ लागत नाही. स्वयंभू नैतिक स्वामी होऊन इतरांना मर्त्य, तुच्छ लेखत, लेखणीतून पिंका टाकत, कशी उतरवली मस्ती म्हणत टाळी देत, खिदळत राहणं हा त्यांचा स्वभावधर्म!
तर अरुणा ढेरे संमेलनाध्यक्ष झाल्या झाल्या जो काही माध्यमपूर आला, जणू काही साक्षात शुभ्रवस्त्रांकित सरस्वतीच मोरावर बसून यवतमाळमध्ये अवतरणार आहे! यापूर्वीच्या संमेलनाध्यक्षांचा ‘काळे की गोरे?’ वगैरे म्हणून पराकोटीचा अहंगड आणि तुच्छताभाव दर्शविणाऱ्यांच्या लेखणीला पान्हा फुटला. जणू काही विटाळलेलं संमेलन गोमूत्र शिंपडून पुन्हा पवित्र झालं.
अरुणा ढेरे व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि अत्यंत संयमी असं व्यक्तित्व. त्यांची निवड निर्विवाद उत्तमच, पण त्यानिमित्तानं पुरवण्याचा पुरवण्या उमाळ्यानं भरल्या गेल्या. त्यातून जणू काही असं दर्शवलं गेलं, याला म्हणतात संमेलन, याला म्हणतात साहित्यिक, याला म्हणतात अध्यक्ष आणि यालाच म्हणतात सारस्वत!
एरवी भुक्कड, दळभद्री वगैरे विशेषणांनी सारस्वतांच्या मेळ्याला ठोकणाऱ्यांचा ढेरेंच्या निवडीनंतर नूरच बदलला आणि ‘लग्नाला यायचं हं’च्या तालावर जणू ‘संमेलनाला जायचं हं’ असा सुप्त संदेशच त्यातून दिला गेला.
अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखं फारसं काहीच नव्हतं. कारण असं ‘सिलेक्टिव्ह’ असणं ही मराठी माध्यमांची परंपराच आहे. ज्यांच्या नावानं टिळे लावून ही परंपरा जपली जाते, त्यांचा तुच्छतावाद आजही कौतुकानं स्मरला जातो. विशेष म्हणजे आणीबाणीत शेपूट घातलेल्या पत्रपंडितांचा ‘तेवढी एक गोष्ट सोडली तर’ म्हणून पुन्हा पाय धुणं सुरूच!
ताजी घडामोड काय? तर संमेलनाला उदघाटक म्हणून इतर भारतीय भाषेतील लेखकाला बोलावण्याचा पायंडा गेली काही वर्षं पाळला जातोय. त्यानुसार यंदा इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना उदघाटक म्हणून निमंत्रण दिलं गेलं. त्यांनी ते स्वीकारलं. गांभीर्यानं स्वीकारलं. गांभीर्यानं यासाठी कारण लगोलग त्यांनी आपलं इंग्रजी भाषण, भाषांतराच्या सोयीसाठी वेळेत पाठवूनही दिलं. आपल्याकडे संमेलनाध्यक्षांचं भाषणही अनेकदा इतक्या वेळेत येत नाही.
नयनतारा सहगल यांची पूर्वपीठिका आयोजकांना कितपत माहीत होती किंवा माहीत असली तरी त्यांना वाटलं असेल मराठी सारस्वतांना जसं महावस्त्र आणि श्रीफळ दिलं की ते जसे वाकतात, मूक होतात किंवा समन्वयवादी होतात, तशाच नयनताराही होतील. त्या आपली बंडखोरी दिल्लीला ठेवून इथं येऊन जिलेबी मठ्ठ्यासह चवीनं खात मंद मंद तेवत राहतील. इथंच घोळ झाला. नयनताराबाईंनी आपल्या भात्यातला एकही बाण शिल्लक न ठेवता उदघाटक म्हणून जे भाषण करायचं ते लिहून पाठवलं. ते भाषण म्हणजे लेटर बॉम्बच ठरला!
इथं सारस्वतांच्या लिलिपूटीय इतिहासाचा थोडा गोषवारा. ज्या आणीबाणीत पत्रपंडित मूगाची शेती करत होते, त्याच आणीबाणीत कराडला दुर्गाबाई भागवतांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झालं. त्यांनी दुर्गावतार धारण करत यशवंतराव चव्हाणांसकट सगळ्यांना व्यासपीठावरून खाली बसायला लावलं. यशवंतराव म्हणजे काही ठाकरे नव्हे की मोदी! ते बसले खाली. झालं! सारस्वतांची फत्ते झाली. मूगाची शेती बाळगून असणारेही दुर्गावताराचे तुतारीवादक झाले.
अशीच तुतारी आणखी एका पत्रपंडितांच्या नेतृत्वाखाली जनाब ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना समांतर संमेलन भरवून फुंकली गेली. सरकारी अनुदानाची भीक नको म्हणून लाथा झाडून झाल्या. महाकोषाच्या घोषणा झाल्या. राजकारण्यांना मंडपाबाहेर काढा वगैरे दंड थोपटून झाले.
महाकोष काही भरला नाही. त्याची आठवणही कुणाला राहिली नाही. त्यानंतर संमेलन कोटी कोटी खर्चाचं आणि स्वागताध्यक्ष हटकून राजकीय नेता असं जणू ठरूनच गेलं. पण आपल्या उर्वरित हयातीत याबद्दल ना दुर्गावतार प्रकट झाला, ना पत्रपंडितांची समांतर संमेलनं झाली. जणू काही त्या त्या वर्षापुरतं त्या त्या राजकारण्यापुरतं हे बंड होतं! आश्चर्य म्हणजे किंवा निर्लज्जपणा म्हणा, आता पूर्ण राजकारण्यांना शरण जाऊनही सारस्वतांना दुर्गावताराचं स्मरण आजही करावंसं वाटतं! तसं कुणी राहिलं नाही म्हणत, उसासे टाकत राजकारण्यांचा लाख लाख मुद्रांचा रमणा मनोभावे स्वीकारत ओशट हसत राहायचं. हे आमचे सारस्वत!
अशा सारस्वतांची तुलना लिलिपुटांशीच करता येऊ शकते. कारण त्यांची एकुणच उंची त्यातून योग्य प्रमाणात प्रकटते. अशा लिलिपुटांनी नयनतारा सहगल यांना बोलावणं म्हणजे उंटाचा मुका घेण्यासारखंच होतं. आता ज्याची चर्चा चालू आहे, त्या कुणाच्या राजकारणानं हा सर्व घटनाक्रम घडला याची चर्चा सुरू आहे. त्या अदृश्य हाताची शोधमोहीम सुरू आहे. मात्र सारस्वतांचा इतिहास बघता काहीतरी अदभुत नक्कीच घडणार नाही. आणि संमेलन सनई चौघडे आणि वैदर्भीय मांड्यांसह पार पडेल.
मात्र या निमित्तानं काहींना सिलेक्टिव्ह बंडखोरीची संधी मिळाली! ‘असं असेल तर आम्ही नाही येत ज्जा!’ असा विहिण किंवा वन्संचा तोरा लगेचच काहींनी दाखवला. यांच्या स्वत:च्या बंडखोऱ्या काय नि किती, हे पाहिलं तर हे तोतयांचं बंड ठरावं! २४ तास कमळाच्या शेतीचं बागायती उत्पन्न घेणारे आणि भावना दुखावल्या म्हणून पहिल्या पानावर माफी मागणारांनी यवतमाळकरांना निर्भिडतेचे डोस पाजावेत, हे म्हणजे नागड्यानं उघड्याला वस्त्रजाणीव करून देण्यासारखंच.
या सगळ्यात खरी गोची झालीय ती संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांची. त्यांना सन्मानानं मिळालेलं अध्यक्षपद त्या या तोतयांसारखं बंड करून भिरकावून देण्याइतक्या ‘सिलेक्टिव्ह’ नाहीत. त्यांची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’सारखी झालीय. त्या कवयित्री म्हणून जितक्या तरल, संवेदनशील आणि संयत आहेत, तशाच विचारीही आहेत. मात्र बंडखोर, विद्रोही नाहीत. समन्वयवादीच म्हणता येतील.
आयोजक, संयोजक आणि त्यातल्या राजकारण्यांनी जो काही खेळ केलाय, तो पाहता इथून पुढे अरुणा ढेरेंसारखे सारस्वत बिनविरोध निवडही स्वीकारतील की नाही असा प्रश्न उभा राहू शकतो. दै. ‘लोकमत’मध्ये आयोजकांनी तयार केलेलं एक दरपत्रकच प्रसिद्ध केलंय. त्यात सूत्रसंचालनापासून अनेक गोष्टींचे दर आहेत. उद्या बिनविरोध अध्यक्षपदाचा दरही जाहीर झाला तर आश्चर्य वाटायला नको.
बाकी लिलिपुटाचा ‘उंटाचा मुका’ घेण्याचा प्रयत्न तर सपशेल फसला. पण त्यावरून तडतडून उठलेले बंडोबा जेव्हा महाबळेश्वरला आनंद यादवांना धमकावलं गेलं आणि माध्यमांसह सर्व सारस्वतांनी अध्यक्षांची खुर्ची रिकामी ठेवून संमेलन उरकलं, तेव्हा गांधारीव्रत घेऊन का बसले होते?
ताठकण्यानं, निर्भीडतेनं, स्वाभिमानानं वगैरे संमेलन भरवण्याचा नैतिक अधिकार लिलिपूट साहित्यिक नि माध्यमांनी तेव्हाच गमावला होता.
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vividh Vachak
Thu , 17 January 2019
पवार, तुमच्या लेखात तथ्य असले तरी तुमची "उंटांचा मुका" ही उपमा पूर्णार्थाने पटली नाही. नयनतारा बाई "उंट" आणि बाकीचे मराठी साहित्यिक आणि संमेलन संबंधित ते लिलिपुट, म्हणजे खुजे, असे तुमचे म्हणणे दिसते -- पण ह्या साहित्यिकेची उंची तुम्ही कुठल्या निकषावर काढलीत बरे? त्यांच्या कादंबऱ्या तुम्ही वाचल्या आहेत का? त्या नक्की कुठल्या निकषावर "लिलिपुट" लोकानीं लिहिलेल्या साहित्यापेक्षा वरचढ आहेत हे सांगू शकाल का? एकुणात, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी नाटके घडली त्यात तुम्हीसुद्धा आपला अजेन्डा घुसवण्याची संधी साधून घेतलीत, असा हा संधीसाधू लेख वाटतो.
Prashant Jadhav
Tue , 15 January 2019
मस्तच