अजूनकाही
गेले काही दिवस इंग्रजीतील ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांच्यावरून मराठीमध्ये आणि भारतीय माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. परवापासून यवतमाळमध्ये ९२वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री-लेखिका अरुणा ढेरे यांची पहिल्यांदाच निवडणूक न होता एकमताने निवड जाहीर केली गेली. त्याचप्रमाणे या संमेलनाच्या उदघाटक म्हणून पंडित नेहरूंच्या भाची आणि इंग्रजीतील मान्यवर लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण दिलं गेलं. त्यांनीही ते स्वीकारलं.
सहगल यांचे वडील महाराष्ट्रातले, कोकणातले. त्यामुळे त्याही एका परीनं ‘महाराष्ट्रीयन’च. पण संमेलन अगदी तोंडावर आल्यावर सहगल यांच्यावरून साहित्य महामंडळ, आयोजक संस्था यांच्यावर दबाव आणला गेला. मोदी सरकारच्या असहिष्णू धोरणांचा निषेध म्हणून ‘पुरस्कार वापसी’ची मोहीम सुरू करणाऱ्या भारतीय लेखक-लेखिकांचं पुढारपण सहगल यांनी केलं होतं. पहिल्यांदा त्यांनीच साहित्य अकादमीनं दिलेला पुरस्कार परत केला होता. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधक असणाऱ्या सहगल यांनाा मराठी साहित्य संमेलनाला बोलावलं तर संमेलन उधळून लावू अशी धमकी काही समाजकंटकांनी दिली असल्याचं कारण देत महामंडळानं सहगल यांना ई-मेल पाठवून त्यांचं निमंत्रण रद्द करत असल्याचं कळवलं. साहित्य महामंडळाला सहगल यांच्या पूर्वपीठिकेविषयी माहिती नव्हती असं मानणं हे अडाणीपणाचं आहे. आणि माहीत असतानाही सहगल यांना बोलावण्याचा निर्णय धाडसीपणाचा आहे. पण यापैकी नेमकी कुठली गोष्ट खरी हे अजून गुलदस्त्यातच आहे.
सहगल यांनी आधीच आपलं भाषण महामंडळ व आयोजक संस्थेकडे पाठवलं होतं. त्यामुळे त्या आपल्या भाषणात काय बोलणार आहेत, याची कल्पना या दोन्ही संस्थांना होती. त्यामुळे त्यांच्या भाषणांनं या संस्थांची जी राजकीयदृष्ट्या अडचण होऊ शकते, याची त्यांना तशी आधीच कल्पना होती. पण सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यावर त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये अपेक्षित गदारोळ उडाला. अनेकांनी त्याचा निषेध केला. काही साहित्यिकांनी या घटनेचा निषेध म्हणून संमेलनात सहभागी होण्यास नकार दिला. सहगल यांना सन्मानानं परत बोलवावं अशीही टुम कुणीतरी काढली. ती चुकीची होती आणि तिला सहगल यांनी धूप घातली नाही. कारण त्या ताठ कण्याच्या आणि खंबीर बाण्याच्या साहित्यिक आहेत.
अखेर प्रसारमाध्यमांतून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यावर संमेलनाचे कार्याध्य॰ डॉ. रमाकांत कोलते यांनी या सगळ्या वादाला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हेच जबाबदार असून त्यांच्या सांगण्यावरूनच सहगल यांना बोलावण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचा गौप्यस्फोट काल केला. त्यांची पाठराखण आयोजक संस्था डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालयाचे पद्माकर मलकापुरे यांनी केली. त्यांनीही महामंडळाचे अध्यक्ष जोशी हे डिक्टेटर आहेत. हिटलर आहेत. त्यांनी संमेलनाच्या कार्याध्यक्षांना पापाचे धनी केले, अशी परखड टीका केली. त्याला कुठलेही संयुक्तिक उत्तर न देता महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा काही तासांपूर्वी महामंडळाकडे ई-मेलने पाठवला.
साहित्य महामंडळाची परंपरा अशी थोर आहे की, ते प्रत्यक्ष संमेलनाध्यक्षाशिवायही संमेलन घेऊ शकतात. त्यामुळे हे संमेलन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांशिवाय आणि उदघाटकाशिवाय पार पडले तरी नवल वाटायचे काहीच कारण नाही.
काही लोक, पत्रकार संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनीही आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत.
जोशी यांच्या निमित्तानं सहगल वादाची पहिली विकेट पडली आहे. अजून कुणाकुणाची विकेट पडते ते आज-उद्या दिसेलच.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment