एका न्यायमूर्तीची व्यथा : मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकण्याचा उद्योग करीत आहे. परंतु माझ्याही स्वभावाला औषध नाही. त्याला मी काय करू?
पडघम - सांस्कृतिक
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
  • न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (२० नोव्हेंबर १९२७ - ३ जानेवारी २०१९)
  • Wed , 09 January 2019
  • पडघम सांस्कृतिक न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी Chandrashekhar Dharmadhikari

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं नुकतंच म्हणजे ३ जानेवारी रोजी निधन झालं. त्यानिमित्तानं त्यांच्या एका लेखाचा हा संपादित भाग...

.............................................................................................................................................

नुकताच एक आगळावेगळा अनुभव आला. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने मंत्रालयात ‘अल्पसंख्याक दिन’ साजरा केला. मी तेथे पाहुणा म्हणून उपस्थित होतो. माझ्यापूर्वी बोलणाऱ्या व्यक्तींनी लोकशाहीच्या संदर्भात काही विचार मांडले. त्यानंतर बोलताना महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली रामराज्याची संकल्पना विशद करताना मी म्हटले की, “उमेदवारशाही म्हणजे लोकशाही नव्हे. रामराज्यात तर दशरथाचे सर्व पुत्र सिंहासनाचे हक्कदार होते; पण त्यातला एकही उमेदवार नव्हता. ज्या राज्यात हक्कदार उमेदवार नसतात, ते रामराज्य व जेथे सर्वच हक्कदार उमेदवार असतात ते हरामराज्य! रामाने स्वच्छेने तत्त्वासाठी राजत्याग करायचा, स्वेच्छेने सत्ता स्वीकारण्यास नकार द्यायचा आणि भरतासारख्या गादी प्राप्त झालेल्यांनी ती आपली हक्काची गादी नव्हे, आपण कुणाचे तरी केवळ प्रतिनिधी आहोत, असे मानायचे. भरताप्रमाणे संयमाचे व्रत स्वीकारून, सर्व सुखोपभोग वर्ज्य मानून, राज्य केले तरच रामराज्य अस्तित्वात येते. राम हे आदर्शाचे प्रतीक मानले गेले. भारतीय अस्मितेचे व सत्याचे ते प्रतीक आहे. आम्हाला रामराज्य हवे आहे. समजा उद्या प्रभू रामचंद्र स्वत: स्वर्गातून खाली उतरले व अयोध्येच्या भूमीवर उतरून त्यांनी म्हटले की, मीच तो रामराजा आहे, ज्याचे राज्य तुम्हाला हवे आहे. तर त्यांना बिनदिक्कत सर्वसंमतीने राज्य करू देऊ का? बदलत्या परिस्थितीत वंशपरंपरेने राज्य करता येत नाही. म्हणून त्यांना निवडणुकीत उभे राहावे लागेल? समजा, ते उभे राहिलेच तर अयोध्येत निवडून येतील का? तुम्ही सर्व बहुसंख्याक व अल्पसंख्याक त्यांना निवडून द्याल का? की तेथेही तुमचा धर्म, जातजमात आडवी येईल?” असे काहीसे मी बोललो.

ही संकल्पना माझे वडील जन्मभर मांडत होते. मीही अनेक वर्षे मांडत आहे. परंतु यावेळी मात्र काही धर्ममार्तंडांनी या कथनास तीव्र विरोध दर्शवला. त्यात प्रभू रामचंद्राचा अपमान झाला, त्यात प्रभू रामचंद्राचे विडंबन आहे असेही त्यांना वाटले. म्हणून ‘सनातन धर्म’ या नियतकालिकात मला पत्रे लिहून, फोन करून माझा निषेध करावा अशी सूचनावजा आज्ञा व तसा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर मला निषेधाचे, सर्व कुटुंब नेस्तनाबूत करून टाकू, घरावर चालून येऊ, अशा प्रकारच्या धमक्यांचे पंचवीस-तीस फोन आले. त्यातील काही पत्नीलाही आले. सौ. धर्माधिकाऱ्यांना धमक्या देताना त्यांनी भाषेत स्त्री-पुरुष समानता पाळली. स्त्री दाक्षिण्यही ते विसरले. भाषा तीच, धमक्याही त्याच! महाराष्ट्रातून सर्वदुरून धर्ममार्तंडांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. ‘हिंदू देवांचे नाव घेऊ नका. उदाहरण द्यायचे असेल तर अल्लाचे द्या’ असे सांगितले गेले. अर्थात पोलिसांना हे कळले. त्यांनी संरक्षण घ्यावे म्हणून सुचविले. मी व माझ्या कुटुंबियांनी नकार दिला. माझे वडील म्हणायचे की, लोकांपासून जर संरक्षण हवे असेल तर परलोकातच जाणे अधिक श्रेयस्कर आहे. संरक्षण असूनही भारताच्या पंतप्रधानांचा खून झालाच ना? तो तर त्यांच्या रक्षकांनीच केला ना?

यानंतर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या लोणारे (कोकण) येथील कार्यक्रमात मी प्रश्न उपस्थित केला की, “तेहतीस कोटी देव, इतर धर्मियांचे आणखी देव, एवढे साधुसंत, हजारो धार्मिक ग्रंथ पाठीशी असताना आपला देश इतिहासात कायम गुलामच का राहिला, याचा आत्मशोध घेणे अगत्याचे आहे. अध्यात्म व धर्म स्वातंत्र्याची शिकवण देतात. पण आपण धार्मिक अगर आध्यात्मिक होण्याऐवजी धर्मांध, अंधश्रद्धावादी व कर्मकांडी झालो. त्यामुळे गुलामी वृत्ती वाढली. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. याची कारणे शोधली पाहिजेत.”

यानंतरही धमकीची पत्रे व फोन आले. ‘हिंदूंच्या देवांचे नाव घेऊन उदाहरणे देऊ नका’ असे पुन्हा बजावण्यात आले. विशेष म्हणजे हिंदूच्या देवांची नावे घेण्यासाठी एका धर्माधिकाऱ्यांवर बंदी घातली गेली. आदर्श लोकशाहीची व रामराज्याची संकल्पना मांडताना प्रभू रामचंद्राचे नाव घ्यायचे नाही, तर दुसऱ्या कुणाचे घ्यायचे? इतरत्र असे आदर्श प्रतीक आहे का? या विधानात हिंदूंच्या देवांचे कोणते विडंबन सामावलेले आहे? हे समजणे माझ्या बुद्धीबाहेरचे आहे.

दुसरीकडे अल्पसंख्याक दिनाच्या भाषणात मी ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ या संविधानातील कलमांचा उल्लेख करून महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या, त्यांना अपमानित करतील अशा रूढी व परंपरा यांचा त्याग करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे असे सांगितले. जबानी तलाक व चार बायका करण्याची परवानगी देणारा कायदा बदलावा लागेल. स्त्रियांना समतेचा मूलभूत हक्क मिळावा म्हणून ‘समान नागरी कायदा’ करावा लागेल. सर्व प्रकारचे कायदे करण्याचा संसदेचा व न्यायालयाचा अधिकार मान्य करावा लागेल. इतर देशातील आपल्याच धर्मातील व्यक्तीपेक्षा भारतातील परधर्मीय नागरिक जवळचा आहे आणि तो आपल्या प्रेमाचा व सेवेचा अधिक अधिकारी आहे, हेही मान्य करावे लागेल. मुलींना शिक्षण द्यावे लागेल. मुस्लीम मोहल्ल्यांत व मदरशांत राष्ट्रध्वजांचे झेंडावंदन व्हावे लागेल. तेथे राष्ट्रगीत मानाने म्हटले गेले पाहिजे. थोडक्यात, भारतीय संविधानाचे सार्वभौमत्व मान्य करावेच लागेल, असे विचार मांडले.

या घटनेनंतर अल्पसंख्य समाजातील काहींनी निषेध नोंदवून धमक्या दिल्या. धर्मांध कुठल्याही धर्माचे असोत, त्यांना धर्मप्रचार म्हणजे धमक्या देणे, माणसाचा खून करून माणूस संपवून त्याचे तोंड बंद करणे हेच कळते. धर्माचे पालन करणारे सज्जन असतील; परंतु धर्माचे रक्षण करण्याचा ठेका धर्मांध दहशतवादी घेऊ पाहत आहेत. हे समाजाला अत्यंत धोकादायक आहे. पोलिस व इतर काहींच्या मते, या पत्रांचे व धमक्यांचे विश्लेषण केले तर त्यात उच्चवर्णीयच होते. अशा उच्चवर्णीयांना धर्म व देवता ही त्यांचीच मिरासदारी वाटते. धर्माचे रक्षण करण्यासाठी इतरांचे डोके छाटून टाकणे हेही त्यांना धर्मकृत्य वाटते. अशाच लोकांनी येशू ख्रिस्त, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्यूथर किंग व महात्मा गांधी यांचे खून केले. त्याच महामानवांच्या बिरादरीत मला सामील करून घेण्याची, दोन्ही धर्मांतील धर्मांध अनुयायांची इच्छा असावी. तसे असेल तर मी स्वत:ला भाग्यवान समजतो. अशा धमक्यांना भिऊन मी ‘सतीत्व’ का सोडायचे?

अशा व अशाच प्रकारच्या अन्य अनुभवांतून मला खूप शिकायला मिळाले. बहुसंख्य व अल्पसंख्याक या दोहोतही धर्मांधता व दहशतवाद वाढतो आहे. या मंडळींचा सौजन्यावर, साधनशुचितेवर विश्वास नाही. सत्य व अहिंसेवर तर नाहीच नाही. समाजाचे व राष्ट्राचे धर्म, जात, जमात, पंथ व संप्रदाय यांच्या आधारावर तुकडे करणे त्यांना महान धर्मकृत्य वाटते. ते धर्माची अस्मिता धर्मांधतेच्या निकषांवर जोपासू इच्छितात. त्यामुळे प्रत्येक गावी, शहरात, मोहल्ल्यात हिंदुस्थान व पाकिस्तान निर्माण होत आहे. समाज धर्माच्या नावावर विभागला जात आहे. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. याचाही संपूर्ण विसर पडतो आहे. आज धर्माला खरा धोका धर्मांध सनातन्यांपासून आहे. मग ते कुठल्याही धर्माचे असोत. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हेच ज्यांना मान्य नाही व ज्यांची धर्मकल्पना धर्मांधतेवर व हिंसक वृत्तीवर आधारित आहे, त्यांच्यापासूनच तर धर्माला मुक्ती हवी आहे.

एकूण काय, की साहित्यातील भाषा सभ्य, सौजन्यपूर्ण व सुसंस्कृत असावी असे ज्या अज्ञानी समजल्या जाणाऱ्या वर्गाला वाटते, त्याची जाणीव साहित्यिकांनी ठेवायला हवी. तशीच जाणीव धर्माच्या क्षेत्रात धर्ममार्तंडांनी ठेवायला हवी. आज जगात सर्वांत अधिक हिंसा, अत्याचार धर्माच्या नावावरच होत आहेत. खऱ्या अर्थाने, धार्मिक दहशतवाद हा प्रत्यक्षात अधर्मच आहे. अमेरिकेत जे एकदा घडले, ते भारतात रोज घडत आहे. धर्मात व साहित्यात बुद्धीचे तेज व हृदयाची उब प्रकट व्हावी. त्यात शुद्धसंकल्प, शुभसंकल्प, उत्कट भावना व ज्वलंत भावना असावी.

साहित्यिक हा संत नव्हे, त्याच्या वैयक्तिक चारित्र्याच्या आधारे त्याच्या साहित्याचे मूल्यमापन करू नये. तरी सामान्य माणसाला उगीच का होईना वाटते की, तो चारित्र्यवान असावा. साहित्याचे मूल्यमापन करताना, त्याला पुरस्कार देताना त्याच्या वैयक्तिक चारित्र्याचा लेखाजोखा मांडला जावा. त्याची भाषा व साहित्य यांच्याइतकेच त्याची भावना, वागणे, विचार, चारित्र्य आणि शीलाला महत्त्व असावे. साहित्यात फक्त करुणा अगर चीड नको, पण त्यात नवनिर्मितीचा पुण्यप्रकोप जरूर असावा. क्रांतीची विधायक आकांक्षा असावी. मजुरांनी, सामान्य लोकांनी नवीन जग निर्माण करण्याचा, श्रमिकांनी नवनवीन वस्तूंचे उत्पादन करण्याचा जो विडा उचलला आहे, त्यांच्या निर्मितीस साहित्यिकांनी हातभार लावावा.

त्याचप्रमाणे धर्मात धर्मांधता नसावी. परधर्माबद्दल फक्त सहिष्णूता नव्हे, तर आदर असावा. गुंडगिरीला धार्मिक कृत्य मानले जाऊ नये. गुंडांना धर्म, जात नसते. ते फक्त शुद्ध गुंड असतात. त्यांना धर्माचे रक्षण मिळू नये. सर्व धर्माची शाश्वत मूल्ये तर समानच आहेत. ईश्वरनिष्ठा, सत्यप्रियता, अहिंसा परायणता व सदाचार ही समान तत्त्वे वजा केल्यावर जे कर्मकांड व धर्मांधता उरते तो खरा धर्म नव्हे, असे मला या अनुभवांती वाटू लागले. धर्मांध शक्तीच्या विरुद्ध प्राणपणाने लढणे, हे आपले कर्तव्य आहे, असे मी या अनुभवांतून शिकलो.

आजही मी नव्या अनुभवांतून शिकतो आहे. न्यायमूर्ती म्हणून अनेक वर्षे काम केले. आज मी अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी निगडित आहे. त्या क्षेत्रातील आदर्श व महनीय व्यक्तींना पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग आहे. माझ्या हस्तेही पुरस्कार दिले जातात. समाजासमोर काही आदर्श असावेत म्हणून ते करावे लागते. पण त्या अनुभवांतून व चिंतनातून माझ्या मनात आजही अनेक प्रश्नांचे काहूर माजले आहे.

पहिला प्रश्न असा आहे की, माणसाचे दोन प्रकारचे चारित्र्य राहू शकते का? वैयक्तिक वेगळे व सार्वजनिक वेगळे असे चारित्र्याचे कप्पे करता येतील का? एका खेड्यात गेलो होतो. तेथे एका प्रतिष्ठित व्यक्तीला मरण आले होते. लोक त्यांची खूप तारीफ करीत होते. मृताच्या गळ्यात तुळशीची माळ होती. तो दरवर्षी पंढरपूरची वारी करीत असे. तो माणूस खूप धार्मिक वृत्तीचा होता. माझ्या वैयक्तिक माहितीनुसार मी काही लोकांना विचारले, “असे बोलले जायचे की, पत्नी जिवंत असतानाही त्यांनी परजातीच्या एका बाईला रखेली म्हणून ठेवलं होतं. हे खरंय का?” सामान्य माणूस तसा फार उदार असतो. त्यांनी मला उत्तर दिले की, “हे सारे खरे आहे, परंतु तो गृहस्थ इतका धार्मिक होता की, रखेलीच्या हातचे पाणीसुद्धा जन्मभर प्यायला नाही.” याचा अर्थ असा होतो की, तिच्या हातच्या पाण्याने तृष्णा भागवली नाही तर पत्नी जिवंत असतानाही रखेली ठेवल्याने धर्म बुडत नाही. धर्मक्षेत्रात अनेक पळवाटा आहेत. परंतु हे योग्य म्हणता येणार नाही.

असे निकष इतर क्षेत्राला लावता येतील का? निवडणुकीला उभा राहू इच्छिणारा राजकीय पक्षाचा उमेदवार चारित्र्यवान असावा म्हणून त्याच्या चारित्र्याची माहिती त्याने निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्जात जाहीर करावी असा कायदा करण्यात आला आहे. मग साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी हाच निकष का लावण्यात येऊ नये? हाच नियम धर्मक्षेत्रे, न्यायालये, शिक्षणक्षेत्र व अन्य सामाजिक क्षेत्रांतही का असू नये? सामान्य माणसाची तशी जर अपेक्षा असेल तर त्याचे चुकते का? कमीत कमी याचा विचार संदर्भहीन नसावा, हे मी अनुभवातून शिकलो. प्रभू रामचंद्राचे सिनेमात अगर नाटकात काम करणाऱ्या नटाच्या प्रत्यक्षात एकापेक्षा अधिक बायका आहेत, तो व्यक्तिगत जीवनात असत्य बोलणारा, व्यसनी व खोटारडा आहे, हे माहीत असताना त्याचे फोटो म्हणजे जणू प्रभू रामचंद्राचा फोटो म्हणून घरी लावणे आणि त्याची पूज्यभावनेने पूजा करणे संदर्भहीन आहे का? कलावंत, साहित्यिक व धर्मगुरू यांचा राष्ट्रीय सन्मान करताना, त्यांना पुरस्कृत करताना त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक चारित्र्याचा विचार नेहमी अप्रस्तुत का मानावा? पुरस्कार हा कृतज्ञतेचा नमस्कार असतो, असे कुसुमाग्रज म्हणत. असा नमस्कार करण्यायोग्य ती व्यक्ती आहे की नाही, याचा विचार कधीही होणारच नाही का, हाच माझा प्रश्न आहे. तो मला विचारार्ह वाटतो.

महात्मा गांधी जेव्हा राउंड टेबल कॉन्फरन्ससाठी लंडनला राजप्रासादात गेले, तेव्हा त्यांनी त्यांचा पोशाख बदलला नाही. नेहमीचे तोकडे व लुंगीसारखे धोतर, अंगावर फाटलेली पण हाताने शिवलेली शाल याच पेहरावात ते गेले. विलायतेत अन्य लोकांना अशी परवानगी नव्हती. फक्त गांधींसाठी हा अपवाद करण्यात आला होता. तेव्हा काही लॉर्डनी – सरदारांनी – प्रश्न उपस्थित केला की, हा फाटका माणूस, याच्याजवळ ना संपत्ती आहे, ना शस्त्रे आहेत. याच्याजवळ असे काय आहे की, असा अपवाद करण्यात आला?

या संदर्भात लॉर्ड मरे यांनी उदगार काढले होते, “हा असा माणूस आहे की, ज्याला बंदुकीची भीती दाखविता येत नाही. ज्याला पैशाने विकत घेता येत नाही. किंवा मेनका पाठवून याची तपश्चर्या भंग करता येत नाही.” अशा शंभरी नंबरी चारित्र्यवान माणसासमोर एवढ्या अफाट साम्राज्याची शस्त्रे, संपत्ती बेकार किंवा निष्काम ठरली. म्हणून खरा प्रश्न आहे की, चारित्र्य हे काही क्षेत्रांत संदर्भहीन मानणे उचित ठरेल का?

कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असो, वयस्क व तरुण मुली ज्या कुटुंबात आहेत, त्या घरात पाहुणा म्हणून त्याचे स्वागत करताना मनात संकोच उत्पन्न होऊ नये असे सामान्य माणसाला वाटते.

आज धार्मिक क्षेत्रांतही हा विवेक दिसून येत नाही. मग साहित्य, कला, खेळ ही क्षेत्रे तर सोडूनच द्या. सामान्य माणसाच्या औदार्याचा कितपत, कोठवर व किती काळ फायदा घेत राहायचा? त्याच्या औदार्याचे शोषण किती दिवस चालणार आहे? असे काही प्रश्न माझ्या मनात उपस्थित होतात. प्रत्येक प्रश्नाचे तयार उत्तर नसते. परंतु प्रश्न उपस्थित झाला आणि तो समजावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली की, प्रश्नांची उकल होण्यास सुरुवात होते, हेही मी अनुभवातूनच शिकलो आहे. हीच तर माझी खरी कमाई आहे. ती सदैव वृद्धिंगत व्हावी हीच माझी इच्छा आहे.

अर्थात मला हे कळते की, मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकण्याचा उद्योग करीत आहे. परंतु माझ्याही स्वभावाला औषध नाही. त्याला मी काय करू? लहानपण मी महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या व मंतरलेल्या वातावरणात घालविले. हिमालयाच्या उंचीच्या व्यक्ती बघितल्या. आता पंगू व ठेंगण्या व्यक्ती बघत आहे. त्यांच्यासोबत जगतही आहे. मीही त्यांच्यातला एक आहे. तरीही मन मानत नाही. समझोते करू इच्छित नाही. त्याला माझा नाईलाज आहे.

(‘सत्याग्रही विचारधारा’च्या २००३सालच्या दिवाळी अंकातून)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 09 January 2019

न्यायमूर्ती धर्माधिकारी परलोकवासी झालेत. त्यामुळे त्यांना उद्देशून संदेश लिहिता येत नाही. मात्र वाचकांची दिशाभूल होऊ नये म्हणून एक टिपणी करावीशी वाटते. ती म्हणजे न्या. धर्माधिकारी यांनी रामायण मुळातून वाचलेलं दिसंत नाही. दशरथ राजाला अनेक बायका होत्या. त्यांपासनं त्यास अनेक मुलेही झालेली असावीत. मात्र या बायका राजस्त्रिया नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या संततीस राज्यारोहणाचा अधिकार नव्हता. दशरथाचा प्रत्येक वारस न्या.धर्माधिकारी म्हणतात त्याप्रमाणे राज्याचा हक्कदार कधीच नव्हता. कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या राजस्त्रियांकडून अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. राज्याचा हक्कदार त्याचा थोरला मुलगा राम आणि रामंच होता. उगीच स्वत:ची कल्पनेची कबुतरे उडवून लोकांना उदाहरणे देऊ नयेत. अशाने लोकं वैतागतीलच ना? लोकभावनेचा आदर ठेवायला हवा ना? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......