अजूनकाही
अमृता फडणवीस हे नाव २०१४ पासून प्रकाशझोतात आलं आहे. त्यामागे खास कारण आहे. कारण त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे त्यांनी अगदी साधी सेल्फी काढली तरी बातमी होते. आणि त्या बातमीवर काही लोकांकडून अर्वाच्च भाषेत टीकाही केली जाते. त्या प्रतिक्रिया बघून असं वाटतं की, माध्यमं/लोक वाटच बघत असतात की, कधी एकदा अमृता फडणवीस यांची बातमी येते आणि आम्ही त्यांच्यावर टीका करतो.
२०१४ साली महाराष्ट्रात सत्तापालट होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला तरुण मुख्यमंत्री मिळाला. त्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम सुरू झाले. जे ज्या पक्षाचे व संघटनेचे प्रतिनिधी आहेत, त्यावरून त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जाते. ती बऱ्याचदा रास्तही असते. या टीकाकारांमध्ये विविध राजकीय पक्ष, त्या त्या पक्षांचे राजकीय कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि सामान्य लोकही असतात. पण काही काळापासून ही वाट थोडीशी चुकत आहे. म्हणजे लोक मुख्यमंत्री, त्यांचा पक्ष, त्यांची विचारधारा यांवर टीका करण्याच्या नादात त्यांच्या पत्नीवरही विनाकारण टीका करतात. हे जास्त करून होते सोशल मिडियावर. मला व्यक्तिशः हे अन्यायकारक वाटते. मुख्य म्हणजे अमृता फडणवीस यांच्यावर टीका करताना राजकीय निकष लावले जातात. त्यांची स्वतःची वेगळी अशी ओळख आहे. त्या अॅक्सिस बँकेत उच्चपदावर, म्हणजे पश्चिम विभागाच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्याचबरोबर त्या गायकसुद्धा आहेत. तेही गेल्या १४ वर्षांपासून म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरपासून. ज्या स्त्रीचं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व आणि कर्तृत्व आहे, तिच्यावर फक्त ती ‘मुख्यमंत्र्यांची पत्नी’ आहे, म्हणून टीका कशी काय केली जाऊ शकते?
आजवर महाराष्ट्रात एकूण १८ मुख्यमंत्री झाले. त्यातल्या किती मुख्यमंत्र्यांच्या पत्नींची नावं आपल्याला माहीत आहेत? त्यातल्या किती मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर इतक्या मोठ्या प्रमाणात टीका केली गेली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ‘वर्किंग वूमन’ आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी. त्या राज्यातल्या मुली-महिल्यांसाठी आदर्श असायला हव्यात. त्यांचे पती जी राजकीय विचारधारा मानतात, तिचं प्रतिनिधित्व करतात, ती स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी नाही. उलट स्त्रियांवरील बंधनं लादण्याचं काम करणारी आहे किंवा त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारीच आहे. शबरीमालाच्या मंदिरात महिलांना प्रवेशाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने देऊनही प्रत्यक्षात ती परवानगी नाकारण्याचं काम तेथील जो पक्ष करत आहे, तो देवेंद्र फडणवीस यांचाच पक्ष आहे. हे लक्षात घेता आपल्या मुख्यमंत्र्यांचं निदान त्यांच्या पत्नीबाबतच्या निर्णयाबद्दल अभिनंदनच केलं पाहिजे.
जे लोक अमृता फडणवीस यांनी साधं गाणं म्हटलं तरी ‘मुख्यमंत्र्यांच्या बायकोला हे शोभतं का?’ असा मूर्ख प्रश्न विचारतात, त्यांनी जरा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. राज्यात रोज काही ना काही होतच राहतं. त्याचं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कमी-अधिक प्रमाणात टेन्शन येतच असणार. अमृता फडणवीस त्यांचं हे टेन्शन समजून घेऊन एक पत्नी, एक आई म्हणून घर सांभाळतात. घरातला पुरुष टेन्शनमध्ये असेल तेव्हा घरातलं वातावरण आनंदी ठेवणं, हे किती जिकिरीचं काम आहे, हे जवळजवळ सर्वांना माहीतच असेल.
दुसरा मुद्दा असा आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे व संघटनेचे प्रतिनिधित्व करतात, ते स्त्री-स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत, असं सर्वसाधारण जनमानस आहे. अशा वेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी त्याच्या अगदी विरुद्ध क्षेत्रात यशस्वी होते आणि मुख्यमंत्री तिच्यासोबत असतात, हे इथल्या स्त्रीवादी व पुरोगामी चळवळीसाठी दिलासादायक आहे. आजघडीला देशातील किती भाजप मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याप्रमाणे कार्यरत आहेत?
राज्यातली मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमंसुद्धा या गोष्टीचं भान ठेवत नाहीत. अमृता फडणवीस यांनी काही जरी केलं तरी त्याची लगेच बातमी होते. खासकरून इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा कल असा असतो की, अमृता फडणवीस यांच्याकडून काही चूक व्हावी आणि आपल्याला दिवसभर ब्रेकिंग न्यूज लावता यावी. एलिफंटा बघायला जाताना कितीतरी लोक सेल्फी घेतात. त्याची बातमी कोणी करत नाही. प्रसारमाध्यमांनी अमृता फडणवीस यांना ‘मुख्यमंत्र्यांची पत्नी’ म्हणून कायम टार्गेट करणं सोडलं पाहिजे. (ब्रेकिंग न्यूजच लावायच्या तर ‘तैमूर’ आहेच की!)
पुढे-मागे अमृता फडणवीस जर राजकारणात आल्या, तर त्यांच्यावर बिनधास्त टीका करावी. पण ज्या वेळी त्या स्वतःच्या मेहनतीवर यशस्वी होत आहेत, त्या वेळी त्यांच्या प्रत्येक कृतीला ‘मुख्यमंत्र्यांची पत्नी’ हाच निकष लावून टीकाटिपणी करणं चुकीचं वाटतं.
आता शेवटचा मुद्दा. फेसबुकवरून बरेच जण विविध गोष्टींबद्दल मत मांडत असतात. त्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक विषयांवर मतं मांडतात. विविध बातम्यांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. काही लोक अमृता फडणवीस यांच्या बातमीवरही अशीच टीका करतात. (मागे एकदा मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचं फेक अकांऊट उघडून असाच मूर्खपणा देव गायकवाड नावाच्या व्यक्तीनं केला होता. त्याला शिक्षा झालीच)
सांगायचं तात्पर्य असं की, आपलं राज्य पुरोगामी आहे. मुख्यमंत्र्यांना राजकीय अथवा सामाजिक विरोध आहे म्हणून त्यांच्या पत्नीवर केवळ ‘मुख्यमंत्र्यांची पत्नी’ म्हणून सातत्यानं टीका करणं गैर आहे. आणि जेव्हा टीका रास्त कारणांसाठी केली जाते, तेव्हाही ती सौम्य भाषेतच असली पाहिजे. केवळ त्या ‘मुख्यमंत्र्यांची पत्नी’ आहेत, म्हणूनच जर टीका करायची असेल तर त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या चांगल्या गोष्टींची दखल घेऊन त्याचंही कौतुक केलं पाहिजे.
अमृता फडणवीस या त्यांच्या कर्तृत्वानं मोठ्या झाल्या आहेत. त्यांच्या त्या मेहनतीचा आदर आपण केला पाहिजे. तरच आपण स्वतःला जिजाऊ, सावित्री, रमाईचा लेक/लेकी म्हणवून घेऊ शकतो.
.............................................................................................................................................
लेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.
milindkamble.rd@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
????? ????
Thu , 10 January 2019
ओ कांबळे साहेब, अमृता फडणवीस यांच्यावर टीका झाल्यावर आपण इतके कळवळता, मग त्या बिचाऱ्या 'तैमूर'चे नाव कंसात नोंदवून उपहास कशाला करता? ते लहान बाळ असताना त्याला अशा माध्यमांसमोर बळी द्यायला आपली तयारी आहे, पण अमृताजींच्या कृतींवर टीका मात्र करायला नको, असे कसे ओ साहेब? आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अशा पद्धतीने माध्यमांसमोर वारंवार येत नव्हत्या, त्यामुळे त्यांना टीकेचे धनी व्हायला लागले नाही. अमृताजी विविध प्रसंगी माध्यमस्नेही असल्याचे दाखवतात, त्याची दुसरी बाजू त्यांना सहन करावी लागते, इतक्या साध्यासरळ मुद्द्यांना उगीच मोठमोठ्या शब्दांनी भोदू विश्लेषित करीत राहू नका. अक्षरनामाचे संपादक काय वाट्टेल ते छापतात, आपल्यासारखे लोक असल्यावर लेखांना कसला तोटा!
Gamma Pailvan
Wed , 09 January 2019
सौ. अमृता यांच्यावर अनाठायी टीका होणे याचा अर्थ श्री. देवेंद्र आपलं काम चोख बजावताहेत असा होतो. कारण की या अनाठायी टीकेचं खरं लक्ष्यं श्री. देवेंद्र फडणवीस आहे. हे पतीपत्नी उभयता चांगलेच जाणून आहेत. -गामा पैलवान