जेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...
अर्धेजग - कळीचे प्रश्न
हिनाकौसर खान-पिंजार
  • भोर तालुक्यातील नायगाव या गावच्या सरपंच सुरेखा रामचंद्र कुंभार
  • Tue , 08 January 2019
  • अर्धेजग कळीचे प्रश्न आशा वर्कर Aasha Worker सरपंच Sarpanch सुरेशा रामचंद्र कुंभारSurekha Ramchandra Kumbhar

गावखेड्यातल्या कुठल्या घरात दुखणं-खुपणं आहे, कुणाच्या घरची बाई गरोदर आहे, कुठली मुलं कुपोषित आहेत, कुणाच्या मुलांच्या लसीकरणाची वेळ जवळ आलीये, कुण्या नवमातेला स्तनपान कसं द्यायचं शिकवायचंय... अशी सगळी इत्यंभुत माहिती ‘आशा वर्कर’कडे असते. गावातल्या प्रत्येकीच्या माजघरात तिला प्रवेश असतो. वेळी-अवेळी आलेल्या बोलावण्याला ती धावून जाते. कधी पदरमोड करून ती एखाद्या अडलेल्या बाईला घेऊन प्रसूतिगृह गाठते. आता ‘आशा वर्कर’च ती. तिचं कामच हे, पण जर एखाद्या गावची ‘आशा वर्कर’च सरपंच असेल तर!

आरोग्य सेवा पुरवताना येणाऱ्या अडीअडचणी, बायकांची आरोग्याबरोबरच इतरही गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी लागणारा कनवाळूपणा इथपासून ते आशा वर्करच्या वेतनवाढीसाठीची निर्दशनं, आंदोलनं हे तर आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. पण एखाद्या आशा वर्करला तिच्या कामातील सचोटीमुळे गावकऱ्यांनी थेट तिला सरपंचपदी बिनविरोध निवडणं हे खचितच आश्चर्याचं आहे. भोर तालुक्यातील नायगाव या चारशेक लोकसंख्येच्या गावच्या सरपंच सुरेखा रामचंद्र कुंभार असं या आशा वर्करचं नाव.

सुरेखाताई यांची भेट झाली तेव्हा गावातील महिलांसाठी रक्ततपासणी शिबीर सुरू होतं. शाळेच्या प्रांगणातच बायका जमल्या होत्या. आरोग्य अधिकारी आणि त्यांचे इतर कर्मचारी रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यानं काय होऊ शकतं हे सांगत होते. तपासणीचा रिपोर्ट आल्यावर ज्यांना रक्तवाढीच्या गोळ्यांची गरज भासेल त्यांनी नियमित गोळ्या घ्याव्या, हेही सुचवत होते. सकाळी अकरा साडेअकराची वेळ होती. प्रांगणात सुरुवातीला तीसेक बायका जमल्या होत्या आणि हळूहळू करत त्यांना आणखी तीस-पस्तीस जणी येऊन मिळाल्या. यातल्या बहुतांश महिला रोजंदारीवर जाणाऱ्या आहेत. त्यांचा दिवसाचा रोज २०० रुपये असतो. तासाभराच्या रक्ततपासणीसाठी या बायकांनी तो रोज बुडवला होता. गावात रोजंदारीवर भल्या सकाळीच जावं लागतं. मात्र रक्ततपासणीची वेळ अकराची असल्यानं बायकांना तो बुडवण्याखेरीज पर्याय नव्हता. मात्र दिवसाचे २०० रुपये बुडित करण्यास त्या तयार झाल्या ते केवळ सुरेखा कुंभार यांच्या शब्दाखातर. सुरेखाताईंनी हे शिबीर घेतलं आहे म्हणजे ते निश्चितच आपल्यासाठी फायद्याचं आहे. या एवढ्याश्या विचारानं या महिला तिथं जमल्या होत्या. सुरेखाताईंच्या सातत्यपूर्ण कामाची ती पावतीच होती.

सुरेखाताई या २००७ पासून आशा वर्कर म्हणून काम करत आहेत. २०१४ मध्ये जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक होती, त्यावेळेस त्यांच्या भागासाठी ओबीसी आणि महिलेसाठी जागा आरक्षित होती. अशा स्थितीत गावकऱ्यांनी एकमुखानं सुरेखा कुंभारे हे नाव पक्कं करायचं ठरवलं. आशा वर्कर म्हणून त्या करत असलेलं काम, नियुक्त कामांपलिकडे जाऊन प्रत्येकीची मदत करण्याची वृत्ती गावकऱ्यांनी पाहिली होती. त्या कामातील तळमळ, सेवावृत्ती पाहता सुरेखाताईंनाच सरपंच पद देण्यात आलं. एकाअर्थी एखाद्या आशा कार्यकर्तीला तिच्या कामाची दिलेली ही पोचपावतीच.

सुरेखाताई वर्ष २००० पासून रचना संस्थेसोबत बालहक्कासाठी काम करू लागल्या होत्या. त्या सांगतात, “गरीब, गरजू घरातल्या मुलींचं आम्ही लेझीम पथक तयार केलं आणि त्या पथकाच्या माध्यमातून उभे राहणारे पैसे त्याच मुलींच्या शिक्षणासाठी वापरू लागलो. बालहक्काची माहितीच या पथकातून देत होतो. त्यामुळे ही कल्पना फारच लोकप्रिय झाली. हा उपक्रम पाच वर्ष राबवला. २००७मध्ये आशा वर्कर म्हणून नियुक्त झाले. जननीसुरक्षा योजना, दारिद्रयरेषेखाली महिलांसाठीच्या योजना महिलांना सांगू लागले. अडल्या नडल्या बायकांसाठी मदतीला धावू लागले. अगदी सुरवातीच्या काळातली एक घटना सांगते. गावात दिवस भरलेली गर्भवती होती. तिच्या पोटात दुखू लागलं म्हणून तिला घेऊन प्रसूतीगृहात गेले. पण ती लघवीसाठी बाहेर गेली आणि तिथंच तिचं बाळ अर्ध बाहेर आलं. मी धावत जाऊन ते बाळ हातात घेतलं. ती बाई कातकरी समाजातील होती. तो समाज आणि गावकरी एकमेकांत फारसे मिसळत नसत. तरीही मी त्या बाईला मदत केली आणि बाळ वाचवलं. यामुळे गावकऱ्यांच्याही मनात माझ्याविषयी एक विश्वास निर्माण झाला की, सुरेखा मदतीला धावून येणार.”

यानंतर त्यांची आशा कार्यकर्ती म्हणून ओळख निर्माण झाली ती आजतागायत. त्या सरपंच ही आहेत आणि गावच्या आशा कार्यकर्तीसुद्धा. सरपंचपदानं त्यांना महिलासक्षमीकरणासाठी इतरही उपक्रम करण्याची संधी मिळाली. त्यानुसार महिलांना शेगड्या, तांब्याची हंडे-कढई, ताडपत्री, शेवई मशीन्स वाटल्या. साच महिला बचत गट तयार करून खेळतं भांडवल उपलब्ध करून दिलं. ग्रामीण महिलांनी पुढाकार घेऊन आरोग्य, कृषी विकास कसा साधला याचं प्रात्याक्षिक दाखवण्यासाठी त्यांनी ५० महिलांना सहलीसाठी नेलं. त्यातून महिलांची समज वाढली आणि आता त्या आपल्या भागात काय करता येईल यासाठी एकत्र येत आहेत. सुरेखाताई सांगतात, “गावातल्या मुलीदेखील आता शिकताहेत. गावात बालविवाह होत नाहीत. उलट मुली पदवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. हळूहळू चित्र बदलत आहे. आता गावाला अॅनिमियामुक्त करायचं आहे.” सुरेखाताई आणि त्यांच्या कामात सतत सोबत असणारे उपसरपंच तानाजी खुटवड दोघांच्याही डोळ्यांत गावकऱ्यांसाठी स्वप्न दिसत होतं.

शिबिरात आलेली एक तेवीस वर्षीय तेजश्री खुटवड सांगत होती की, तिचं एचबी ९ होतं. मागच्यावेळेस जेव्हा अशी चाचणी झाली, तेव्हाच तिला ते समजलं होतं. त्यामुळे यावेळेस ती अगदी नेटानं आली होती. पल्लवी शिंदे या गावाच्या पोलिस पाटलीणीचंही हेच मत होतं की, महिलांना केवळ घरच्यांसाठी कष्टायचं माहीत असतं, पण थेट चाचणी झाली आणि त्यातून सत्य समोर आलं की त्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतील आणि म्हणून अशी शिबिरं व्हायला हवीत. गाव त्यासाठी पुढाकार घेतंय हेही महत्त्वाचं. त्यांच्यासारख्याच इतरही महिला तेवढ्यासाठीच तर खाडा करून आल्या होत्या.

एकूणच सुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे. संपर्काचं साधन न मिळणाऱ्या गावात जर वेळीच महिलांना स्वत:चं आरोग्य आणि आरोग्याची काळजी आणि पर्यायानं कुटुंबाच्या आरोग्याची काळजी याची ओळख होणार असेल तर त्याचं महत्त्वं कशात मोजणार? एक आशा कार्यकर्ती सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात, तेव्हा गावाचा आरोग्य विकास होणं फार दूरची गोष्ट राहत नाही.

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......