फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी सामान्य माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी सत्तेच्या व शोषणाच्या विरोधात असणारे लोक डाव्या बाजूला आणि माणसांचे शोषण करून सरंजामी जीवन जगू पाहणारे सत्तेचे समर्थक उजव्या बाजूला होते. जगात प्रचलित असणारी डावी-उजवी संकल्पना याच घटनेवर आधारित आहे. जगात माणसांच्या बाजूची जितकी तत्त्वज्ञाने आहेत, ती सारी डावी आहेत, अशी भूमिका जगातल्या जवळपास सर्वच विचारवंतांनी घेतली आहे. मार्क्सची माणसांच्याविषयीची मतं ही त्याच्या आधीच्या इतर तत्त्वज्ञानाच्या मानवी जाणिवांना पुढे रेटणारी होती. जगातील बहुतांश डावे, आर्थिक समता हे ध्येय प्रतिपादतात.
जगाच्या गती-प्रगतीचे नियमन अर्थव्यवस्थेतून होते. ही अर्थव्यवस्था समाजाच्या हाती असली की त्यातून मानवी हित साधले जाते. आणि हीच अर्थव्यवस्था समाजातील भांडवलदारी वर्गाच्या हाती असली की, त्यातून संपूर्ण समाजाचे शोषण होते. या कारणानेच मार्क्स सत्तेच्या व संपत्तीच्या विकेंद्रीकरणाचे समाजवादी सूत्र सांगतो. त्यामुळेच जागतिक पातळीवर नैसर्गिक साधन संपत्ती आणि सामाजिक उत्पादन व्यवस्थेचे आर्थिक नियमन डाव्या अंगाने व्हावे, हा आग्रह माणसांच्या बाजूचा मानला जातो.
मार्क्सच्या पूर्वी इस्लामी तत्त्वज्ञानाने नैसर्गिक साधनांच्या केंद्रीकरणाला विरोध केले आहे. ‘कुरआन’मध्ये याविषयी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे, ‘‘इश्वराने प्रदान केलेल्या संपत्तीचे केंद्रीकरण करून, त्याचा वापर कंजुशीने करणे. त्यातून फक्त स्वतःचे हित साधणे गैर आहे. त्या संपत्तीपासून संपूर्ण मानवजातीला वंचित ठेवणे योग्य नाही.’’ (सूरह अल इम्रानच्या १८० क्रमांकाच्या आयतीचे सार)
इस्लामने श्रममूल्याचे नियम सांगितले आहेत. तर मार्क्सने श्रमाची व्याख्या केली आहे. तो श्रमाच्या अभिव्यक्तीतून मिळणाऱ्या समाधानाचे स्वरूप स्पष्ट करतो. ‘सरप्लस नफा’ ज्याला मार्क्सवादी विचारवंत ‘वरकड’ म्हणतात. त्या वरकडीचे प्रमाण वाढवण्यासाठी माणसांना शोषण्याशिवाय भांडवलदारांकडे पर्याय नसतो. शोषणाचे माध्यम ठरणाऱ्या या वरकडीला विरोध करून मार्क्सने भांडवलदारांच्या नफ्यात श्रमिकांचा हिस्सा सांगितला. मार्क्सचा एल्गार हा अत्यंत साधा आहे. आणि तो साध्या माणसांसाठी आहे. या एल्गाराचे नाते हे साध्या माणसाचे तत्त्वज्ञान असणाऱ्या आणि कोणत्याही वरकडीला समाजात स्थान नाकारणाऱ्या इस्लामी तत्त्वज्ञानाशी आहे.
टेरी इगल्टन मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ शब्दावडंबर न माजवता सादर करतात. इकबाल इस्लामच्या जाणिवांची हीच डावी असामान्य उकल समोर ठेवतात. दोन डाव्या प्रवाहांच्या समांतर जाणीवा या दोन विचारवंताच्या लिखाणाआधारे स्पष्ट होऊ शकतील.
श्रमिकांच्या श्रमाचा मोबदला नफ्याच्या प्रमाणात असावा, ही धारणा इस्लामी तत्त्वज्ञानाचीदेखील आहे. नफ्याचे प्रमाण सांगितल्याने अल्पमजदूरीतून होणारे शोषण व वरकडीला मिळणारे स्थान आपोआप नाहीसे होते. त्यामुळे श्रममूल्याचा हा इस्लामी सिद्धान्त मानवी श्रमाच्या अभिव्यक्तीला न्याय देणारा विचार आहे. या दोन्ही तत्त्वज्ञानाच्या साम्यस्थळांची चर्चा करण्याआधी आपण त्यांच्या भूमिका समजून घेऊ या.
इस्लामचे तत्त्वज्ञान पुढे रेटणारा नास्तिक कॉम्रेड
‘दास कॅपिटल’ हे मार्क्सने निर्माण केलेले श्रमिकांच्या मुक्तीचे तत्त्वज्ञान मानले जाते. त्यामध्ये मार्क्स उत्पादन व्यवस्थेवर चर्चा करतानाच उत्पादनाची साधने, त्याचे सहसंबंध स्पष्ट करतो. सृष्टीतील घटकांचा मानवी समाजासाठी करावयाचा वापर याविषयी मार्क्स म्हणतो, ‘‘कोणताही संपूर्ण समाज, एखादे राष्ट्र वा अगदी अस्तित्वातले सर्व समाज मिळूनदेखील या पृथ्वीचे मालक नसतात. ती केवळ त्यांच्या ताब्यात असते, ती त्यांना भोगवट्यासाठी वापरायला दिलेली असते. आणि चांगल्या पित्याप्रमाणे त्यांनी ती सुधारून पुढील पिढीकडे सुपूर्द करावयाची असते.’’
प्रेषित मुहंमद (स) यांनी नैसर्गिक साधन संपत्तीच्या विनियोगाचे सांगितलेले सूत्रही असेच आहे. प्रेषितांच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. गोड्या पाण्याची एकच विहीर होती. प्रेषितांनी ती विहीर विकत घेऊन सार्वजनिक करण्याचे आवाहन केले. त्यानुसार हजरत उस्मान यांनी ती विहीर विकत घेतली व प्रेषितांच्या आदेशाचे पालन केले. नैसर्गिक साधनांच्या विकेंद्रीकरणाची सूत्रे स्पष्ट करताना ‘कुरआन’ने मानवी हिताचा पहिला डावा अभिप्राय व्यक्त केला. ‘‘जे लोक सोने व चांदी (आणि इतर द्रव्य संपत्ती) जमा करून ठेवतात आणि इशमार्गात (मानवजातीच्या भल्यासाठी) खर्च करत नाहीत. त्यांना कधीही नष्ट न होणाऱ्या इश्वरी कोपाची वार्ता द्या.’’ (सुरह तौबा, ३४)
साधनांच्या विकेंद्रीकरणाची संहिता सांगितल्यानंतर साधनांना जपण्याची गरज इस्लामने प्रतिपादित केली. प्रेषित मुहंमद (स) यांनी व ‘कुरआन’ने नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस करण्यास मनाई केली आहे. इस्लामी राज्य निर्माण केल्यानंतर प्रेषितांनी माणूसकेंद्री व्यवस्था निर्मितीचे कार्य आरंभले. माणसाच्या गरजा ओळखून त्याची रचना केली. निसर्गाभिमुख जगणे प्रमाण मानले.
उत्पादन व्यवस्थेतल्या पुनरुत्पादनाच्या तत्वाच्या सबलीकरणासाठी निसर्ग जपण्याची हाक दिली. संरक्षित वनक्षेत्राची घोषणा केली. त्यासाठी ‘हरम’ व ‘हीमा’ हे प्रतिबंधीत नैसर्गिक क्षेत्र निर्धारित करण्यात आले. या क्षेत्रात प्राण्यांना त्रास देण्यास व वृक्षतोडीस प्रतिबंध घालण्यात आला होता. वाढत्या लोकसंख्येनुसार उत्पादनव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे. हे विचार प्रेषितांनी कृतीतून व्यक्त केले. इस्लामी राजवटीत प्रेषितांनी उत्पादन व्यवस्थेचा विकास करण्याचा प्रयत्न केला. उत्पादनाचे नैसर्गिक सहसंबंध ओळखून साधनांच्या वृद्धीचे प्रयत्न केले. त्यासाठी जलसंवर्धनाच्या योजना आणल्या.
प्रेषितांनी जगलेल्या तत्त्वज्ञानाला किंवा कृतीतून मांडलेल्या तत्त्वज्ञानाला मार्क्स पुढे ‘दास कॅपिटल’मध्ये व्यक्त करतो. ‘‘माणसाची चिरंतन सामुदायिक मालमत्ता म्हणून मातीचे विवेकनिष्ठ संवर्धन करणे मानववंशाच्या एकामागून एक येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाची आणि पुनरुत्पादनाची अमीट गरज आहे.’’
प्रेषितांनी केलेल्या संविर्धित क्षेत्राची निर्मिती हे मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचे मार्क्सवादापूर्वीचे कृतीशील स्वरुप होते. पुढे मार्क्सने त्याचे लिखित स्वरूप समोर ठेवले. मार्क्सने समाजाच्या ताब्यात शासनव्यवस्था आल्यानंतरच्या समाजाची संकल्पना मांडली आहे. ती आदर्श अशी आहे. इस्लामने सांगितलेल्या लोकराजवटीच्या संकल्पनेत मार्क्सने आधुनिक मानलेल्या सर्व विचारांचा समावेश होता.
अरबी समाजातील उत्पादन व्यवस्था
अरबी समाजाच्या उत्पादन व्यवस्थेला आलेले हिडिस स्वरूप इस्लामपूर्व अरबी समाजाच्या इतिहासाच्या साधनांच्या अभ्यासातून स्पष्ट होते. भांडवलदार वर्गाच्या अतिरिक्त नफ्याचे तंत्र तत्त्कालीन अरबी उत्पादन व्यवस्थेत आजच्यापेक्षा भिन्न होते. एककेंद्री आर्थिक साधनांचा ठराविक वर्गाकडून होणारा वापर विकेंद्रीत करण्यासाठी इस्लामने पर्यायी अर्थव्यवस्था दिली.
इस्लाम समाजाच्या उत्पादनव्यवस्थेत कालांतराने विकसित झालेल्या शोषणाच्या मूल्यांना नाकारतो. त्या शोषणामुळे मागास राहिलेल्या वर्गांना आर्थिकदृष्ट्या प्रगत करण्यासाठी इस्लाम त्याच्या वर्गस्तरातील वरच्या अनुयायांना निम्नस्तरीय गरिबांशी समन्वय साधण्यास सांगतो. त्यासाठी ‘जकात’ हे नीतिमूल्य देतो. फक्त समतेचे समन्वयवादी आर्थिक तत्त्वज्ञान मांडून इस्लामने समाजाला खुली सूट दिली नाही. व्याजविरहीत अर्थवव्यस्थेची संकल्पनादेखील मांडली.
जकात आणि व्याजविरहित अर्थव्यवस्था ही इस्लामने जगाला दिलेली समन्वयशील समतावादी अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेला माणसांशी जोडण्याचे महान कार्य महान इस्लामी तत्त्ववेत्ते इब्ने खल्दून यांनी केले आहे. जगातले बहुतांश मार्क्सवादी इब्ने खल्दुन यांना आर्थिक समतेचे तत्त्वज्ञान देणारा पितामह मानतात. मात्र मुस्लिमांनी मार्क्सवाद म्हणजे पाखंड किंवा कुफ्र समजून त्याला आंधळा विरोध केला. उलट ‘खल्दुनिझम’च्या मूळ प्रेरणा इस्लाममध्ये आहेत, हे तत्त्वज्ञानीय दृष्टिकोनातून मुसलमानांनी स्पष्ट केले असते, तर जागतिक पातळीवर इस्लामच्या विरोधात जोरकस प्रचार करणाऱ्या भांडवली सैतानांना रोखणे शक्य झाले असते. अखिल डाव्या विचारांच्या एकीकरणाच्या प्रयत्नांनाही गती आली असती. मुस्लिम राष्ट्रांविरोधात सुरू असलेल्या उजव्या दडपशाहीला रोखता आले असते.
घडल्या चुकांची ही विवेकी जाणीव असली तरी भूतकाळ तितका सुखावह नाही. दुसरीकडे मार्क्सवादाच्या नावाखाली साम्राज्यवादी धोरण राबवणाऱ्या काही सैतानी शक्तींनी मुस्लिम राष्ट्रातील साधनसंपत्ती घश्यात कोंबण्यासाठी जो रक्तपात केला. त्यामुळे मुसलमान जे मूलतः माणासांच्या बाजूने असणाऱ्या डाव्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी होते, त्यांनी आर्थिक समतेच्या इतर डाव्या चळवळींशी फारकत घेतली. त्यातही काही बावळट पोथिनिष्ठ मार्क्सवाद्यांनी ‘मार्क्सिस्ट’ असण्याची पूर्वअट तो नास्तिक असणे गरजेचे असल्याचा केलेला प्रचार आस्तिक डाव्या जाणिवांना दूर लोटणारा ठरला.
आमच्या डाव्या जाणिवा या इब्ने खल्दून यांच्या ‘इस्लामच्या समन्वयशील समतावादी अर्थव्यवस्थे’च्या तत्त्वाशी नाते सांगणाऱ्या आहेत. खल्दून यांच्या प्रेरणा मी मागे स्पष्ट केल्याप्रमाणे इस्लामी अर्थव्यवस्थेच्या प्रेरणा प्रमाण मानणाऱ्या आहेत. मार्क्स म्हणजे डावेपणा असा जो एकांगी प्रचार जगात सुरू आहे, त्याला जागतिक पातळीवर मुस्लिमद्वेषी ‘यहुदी’ आणि भारतात ‘ब्राह्मणी कॉम्रेड्स’च्या षडयंत्राची किनार आहे. हे मार्क्सवादाअंतर्गत असणारे हे दोन्ही छुपे उजवे प्रवाह मूळ डाव्या प्रवाहाचा विक्षिप्त अर्थ प्रस्तुत करतात. त्याला प्रमाण मानून आपण संपूर्ण डाव्या धारणांना थेट ‘मार्क्सवादी’ आणि ‘नास्तिक’ हा शिक्का मारून मोकळे होतो.
इस्लामी समतेच्या तत्त्वांना उचलून त्याला दिलेले साम्यवादी स्वरूप हे इस्लामविरोधातील एक षडयंत्र होते, हे आपण समजून घेतले पाहिजे. जगात इस्लामसारखे डावे तत्त्वज्ञान नाही. पण त्याला उजवे भासवण्यासाठी सुरू असलेल्या सर्वच पातळीवरील षडयंत्राला आपण उघडे पाडले पाहिजे. त्यासाठी मूळ डावा प्रवाह समजून त्याने इस्लामपासून घेतलेल्या प्रेरणा कशा आहेत, हे जाणून घेणे स्वतः मुस्लिमांचे कर्तव्य आहे. खल्दुन यांच्या या सर्व प्रेरणा इकबाल यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानातून स्पष्ट केल्या आहेत. त्या समजून घेतल्या की इस्लामी समतेच्या अप्रक्षिप्त मूल्यांचे खरे स्वरूप स्पष्ट होईल.
इस्लाममधील अर्थव्यवस्थेची सूत्रे
समाजाच्या इतिहासात आर्थिक घटकांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. इस्लाम या आर्थिक घटकांसाठीची नीतितत्त्वे सांगून त्यांच्या भांडवलदारांच्या शोषणाच्या आसूयेला आवर घालतो. सामाजिक दर्जा, सामाजिक विषमता, कौटुंबिक नाती, शासकीय हितसंबध यांच्या सहसंबधांवर ‘कुरआन’चे भाष्य मौलिक आहे.
स्वातंत्र्य हे परस्परांच्या विवेकशील देवघेवीतून आकाराला येते. घेणाऱ्या एकाच गटाला हे प्रमाण निर्धारीत करण्याचा आधिकार असेल तर ज्या समाजात ही पद्धत आहे, त्याला स्वतंत्र म्हणता येत नाही. इस्लाम देवेघेवीचे विवेक देतो. श्रमिकांच्या मोबदल्यासाठी कराराची गरज प्रतिपादतो. ‘‘प्रेषितांनी आदेश दिलाय की, कामगारांची मजुरी निश्चित केल्याशिवाय त्याला कामावर ठेवणे योग्य नाही.’’ (अत्तालिकात अर्रजिया/४४०).
स्वतःचे हक्क, मोबदला निर्धारित करण्याचा मिळालेला हा अधिकार मौलिक आहे. मार्क्स ‘दास कॅपिटल’मध्ये वेगळे काही सांगत नाही. ‘‘श्रम माणसाच्या गरजांशी जोडलेले असतात तो वर स्वातंत्र्याचा प्रदेश सुरू होत नाही. त्यामुळे भौतिक उत्पादनाचे क्षेत्र ओलांडल्यानंतरच स्वातंत्र्याचा प्रदेश सुरू होतो. आपल्या गरजा भागवण्यासाठी रानटी अवस्थेतील माणसाला निसर्गाशी झगडावे लागते, तसेच सुसंस्कृत माणसालाही झगडावे लागते. सर्व उत्पादन पद्धती आणि समाजव्यवस्थांमध्ये असे झगडण्यावाचून त्याला गत्यंतर नसते.’’
इथे इस्लामने श्रममूल्य निर्धारीत करण्याचा दिलेला अधिकार ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी करणारा आहे. प्रत्येकाचे हक्क मान्य करणारा इस्लामी सामाजिक व्यवस्थेच्या संकल्पनेला आपण डाव्या बाजूला मानणार आहोत की, शोषणाच्या उजव्या कंपूत त्याला ढकलणार आहोत.
इकबाल यांची वस्तुवादी मीमांसा
डॉ. मुहंमद इकबाल हे महान विचारवंत आणि तत्त्ववेत्ते आहेत. त्यांनी इस्लामच्या धार्मिक चिंतनाची पुनर्मांडणी केली आहे. ‘रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट इन इस्लाम’मध्ये ते इश्वर, विश्व आणि माणूस यांच्या सहसंबंधांना दृढमूल करणाऱ्या ज्ञान या चौथ्या इस्लामी सूत्राविषयी इकबाल माहिती देताना म्हणतात, ‘‘इस्लाममध्ये बौद्धिक अधिष्ठानाची सुरुवात स्वतः पैगंबर हजरत मुहंमद (स) यांच्यापासून समजावयास हवी. ते सातत्याने प्रार्थना करत, ‘हे ईश्वरा! मला वस्तूच्या मुळ प्रकृतीचे ज्ञान प्रदान कर.’’ वस्तूंच्या मूळ प्रकृतीविषयक ज्ञानातून मानवी हिताचे ध्येय साध्य करता येऊ शकेल ही भौतिक धारणा यामागे होती. मानवी समाजाच्या हितासाठी मानवी प्रज्ञेच्या विकासाचा मुद्दा जो इस्लामी तत्त्वज्ञानाने चौथ्या सूत्राच्या द्वारे मांडला आहे, ज्याकडे प्रा. फकरुद्दीन बेन्नूर निर्देश करतात, त्याला इकबाल यांच्या प्रतिपादनाने वैधता प्राप्त होते. प्रेषितकार्याचा केंद्रच मुळी माणूस आणि त्याचे हित आहे.
मानवाच्या अहिताचा इतिहास तपासून हिताचे अनुभूती मूलक तत्त्वज्ञान उभे राहते. डॉ. मुहंमद इकबाल अनुभूतीमूलक तत्त्वज्ञान म्हणून इस्लामचे वास्तववादी विश्लेषण करताना म्हणतात, ‘‘यामध्ये कोणतीही शंका नाही की, या अनुचिंतनात्मक पर्यवेक्षणात मनुष्यात त्या बाबीची चेतना जागृत करणे ‘कुरआन’चा तात्कालिक उद्देश आहे, ज्याची प्रकृती एक प्रतिबिंब मानली जाते. ‘कुरआन’च्या सामान्य अनुभूतीमूलक दृष्टिकोनाने त्याच्या अनुयायांमध्ये वास्तवाच्या प्रती एका श्रद्धेच्या भावनेला जन्म दिला आणि अंततः त्यांना एका आधुनिक विज्ञानाचे संस्थापक बनवले.’’
हिसेंचे दोन साथी
इस्लाम आणि मार्क्सच्या आर्थिक व सामाजिक तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी माणूस आहे. इस्लाम आणि मार्क्स दोघेही माणसांसाठीच्या क्रांतीची भाषा करतात. परंतु दोहोंवर जगातील सर्वाधिक नरसंहाराचे तत्त्वज्ञान निर्माण केल्याचा आरोप होतो. उदय नारकर याविषयी मार्मिक मांडणी करतात. ‘मार्क्स काय म्हणाला’ या ग्रंथात ते म्हणतात, ‘‘मार्क्सवादाच्या छोट्याशा इतिहासात खूप हिंसा झाली आहे. स्टॅलिन आणि माओ दोघांच्याही नावावर अकल्पित प्रमाणावर हत्याकांड केल्याची नोंद आहे. त्या हत्याकांडाचे समर्थन करणारे फार मार्क्सवादी आज आढळायचे नाहीत. पण हिरोशिमाचे हत्याकांड आणि आता इराक-अफगाणिस्थानामधले हत्याकांड, याचे समर्थन करणारे कित्येक बिगर मार्क्सवादी मात्र आढळतात. स्टॅलिनसारखे लोक असे हत्याकांड करू शकले, ते पुन्हा होऊ नये यासाठी काय करता येईल, याची प्रभावी मांडणीदेखील मार्क्सवाद्यांनीच केलेली आढळून येते? पण भांडवलशाहीच्या गुन्ह्याचे काय? पहिल्या महायुद्धात युरोपचे अंगण रक्ताने माखून निघाले. कुणी सांडले ते रक्त? ’’
इस्लामच्या इतिहासात विविध प्रदेशात घडलेल्या सामाजिक क्रांतीच्या अनेक नोंदी आढळतील. पण तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन केलेल्या नरसंहाराचे एकही संदर्भ सापडणार नाहीत. युनानी तत्त्वज्ञानाच्या मानवी जाणिवांना नवा आधार देण्याचे मुस्लिम तत्त्वचिंतकांनी केलेले प्रयत्न इतिहासात नोंदवलेले आहेत. भारतात वैदिक विचारांच्या जुलमी जोखडातून इथल्या अनार्यांना मुक्त करण्यासाठी सुफींनी केलेला संघर्ष असेल, त्याच्या नोंदी इतिहासलेखनात घेतल्या जात नाहीत. राज्यकर्त्यांनी केलेल्या राजकीय कारवायांना इस्लामच्या इतिहासात स्थान देणे गैर आहे.
भौतिक उत्पादनांच्या दैवतीकरणाला मार्क्स असो वा इस्लाम दोघांनी त्याज्य मानले आहे. भौतिक घटक माणसांसाठी आहेत. माणूस त्यांच्यासाठी नाही हे दोन्ही तत्त्वज्ञानांत स्पष्ट केले आहे. त्यामुळे भौतिकतेला अग्रक्रम देऊन सुरू असलेला भांडवली संघर्ष आपोआप दोन्ही बाजूने निकाली काढला जातो.
इस्लाम आणि मार्क्समध्ये एक विरोधास म्हणजे तो इस्लाम आस्तिक असण्याचा मूळ पाया आणि मार्क्स नास्तिक असण्याचे वास्तव. त्यामुळे इकबाल यांनी मार्क्सला ‘‘बिना जिब्राईलचा पैगंबर’ म्हटले आहे. ‘जावेदनामा’तील याविषयीचे इकबालांचे विवेचन इस्लाम आणि मार्क्सविषयीच्या आकलनाला गती देऊ शकेल.
समारोप
प्रस्तुत विवेचनाचे एकूण सार स्पष्ट आहे. इस्लामी तत्त्वज्ञानाची प्रवृत्ती डावी आहे. त्याच्या मूळ धारणांचा नैसर्गिक अन्वयार्थ डावा आहे. त्याने दिलेली अर्थव्यवस्था, त्पादनव्यवस्थेविषयी मांडलेली मते सारे काही ‘कुरआन’मधील डाव्या जाणिवांचे पडसाद आहेत. माणसाच्या समग्र अस्तित्वाविषयी काळजी वाहणारे कोणतेच तत्त्वज्ञान उजवे असू शकत नाही. ज्यांनी आपल्या भांडवली अंगणात श्रमिकांचे रक्त शिंपडून स्वतःच्या महालांचे सौंदर्य वाढवले, ते इस्लामच्या डाव्या विचारांना हिणवत आहेत. सारी प्रचारयंत्रणा काबीज करून एका निकोप तत्त्वज्ञानाचे ‘दानवीकरण’ सुरू आहे.
माणूस कसा असावा? त्याविषयी ‘कुरआन’चे विवेचन, इस्लामचे एकूण तत्त्वज्ञान आणि त्याच्या धारणांना मान्यता दिल्याशिवाय माणसांचा आदर्श समूह म्हणजे समाज विकसित होऊ शकत नाही. इस्लामचा सामाजिक अन्वयार्थ हा उन्नत भौतिकाच्या निर्मितीसाठी गरजेचा आहे. मध्ययुगातील काही सरंजामी राज्यकर्त्यांनी लावलेला इस्लामचा ‘हुकूमशाही अर्थ’ त्याच्या मूळ प्रेरणांना छेद देणारा आहे.
प्रेषितांनी ज्या पद्धतीने अरबी समाजात जाऊन त्याच्या उत्पादन व्यवस्थेतवरील शोषणाची कीड बाजूला केली, तीच पद्धत भारतात सुफींनी अवलंबली. सुफी भारतीय समाजात गेले. त्यांनी भारतीय समाजाच्या शोषणाची केंद्रे शोधली. आणि त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शोषणव्यवस्थेविरोधात इस्लामी मूल्यांचा सामाजिक अन्वयार्थ सादर केला. या अन्वयार्थाचा बरेलवी चळवळीने काढलेला गैरअर्थ आज इस्लामी तत्त्वज्ञानाच्या अस्तित्वावर आघात करत आहे. आणि दुसरीकडे उलेमांनी निर्माण केलेली सरंजामी व्यवस्था सामाजिक इस्लामचा गळा घोटणारी आहे.
सरंजामी जीवन जगण्याची सारी साधने ताब्यात असताना, सैनिकांना घोड्यावर बसवून, घोड्याची नाळ पकडून पायी चालणारे खलिफा हे इस्लामाच्या सामाजिक अन्वयार्थाचे वाहक होते. भारतातील सुफी हे त्याच प्रवाहातील आहेत. आणि या प्रवाहात उलेमांचे योगदान किती हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. उलेमांना जर कोणत्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व द्यावयाचे झाल्यास, त्यांना मध्ययुगातील सरंजामी राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या प्रवाहाचे वाहक ठरवावे लागेल.
(४, ५ आणि ६ जानेवारी दरम्यान पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये १२वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाची स्मरणिका ‘काफला’मध्ये संपादित स्वरूपात प्रकाशित झालेला लेख मूळ स्वरूपात.)
.............................................................................................................................................
लेखक सरफराज अहमद हे इतिहास संशोधक आणि टिपू सुलतानचे गाढे अभ्यासक आहेत.
sarfraj.ars@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 07 January 2019
सरफराज अहमद, इस्लामला डाव्या रंगात रंगवणं आम्हां हिंदूंसाठी सावधगिरीचा इशारा आहे. उद्या इस्लामी आक्रमकांनी हिंदूंवर केलेले अत्याचार साम्यवादी रंगाखाली झाकोळले जातील. शिवाय लेखातली लागोपाठची ३ वाक्ये अशी आहेत की : >> इस्लामी समतेच्या तत्त्वांना उचलून त्याला दिलेले साम्यवादी स्वरूप हे इस्लामविरोधातील एक षडयंत्र होते, हे आपण समजून घेतले पाहिजे. जगात इस्लामसारखे डावे तत्त्वज्ञान नाही. पण त्याला उजवे भासवण्यासाठी सुरू असलेल्या सर्वच पातळीवरील षडयंत्राला आपण उघडे पाडले पाहिजे. >> यांतलं पाहिलं व तिसरं वाक्यं परस्परविरोधी आहेत. आधी धडपणे ठरावा इस्लाम डावा की उजवा ते. बाकी, इस्लामला डाव्या रंगात रंगवतांना एक गोष्ट विसरलात. ती म्हणजे खिलाफत. ओथमन खिलाफत डावी की उजवी? विचार ऐकायला आवडतील. आपला नम्र, -गामा पैलवान जाताजाता : एक सावधगिरीचा इशारा. लेखात तुम्ही मार्क्सला बिन जिब्राईलचा पैगंबर म्हणताहात. यावरून मार्क्स हा महंमदोत्तर प्रेषित तर ठरणार नाही ना, अशी शंका येते. असं काही झालं तर अहमदियांना जसं गैरइस्लामी ठरवून निर्वंश व निर्वासित करण्यात आलं तेच तुमचंही होईल. कारण तुम्ही इस्लाममध्ये एका बाजूने मार्क्सरूपी नास्तिकता घुसवीत आहात तर दुसऱ्या बाजूने महमंद पैगंबरांचं स्थान इतरास देऊ पाहताहात. तेव्हा जरा सांभाळून.