दरवर्षी मराठीत काही हजार पुस्तकं प्रकाशित होतात. त्या सगळ्यांची परीक्षणं वा त्यातील संपादित अंश छापणं तर सोडाच पण नुसती त्यांची यादीही कुणा एका प्रसारमाध्यमाला छापणं शक्य नाही. मात्र २०१९मध्येही वाचायलाच हवीत अशा २०१७-१८ या दोन वर्षांतील काही निवडक पुस्तकांची ही ओळख. अमूक पुस्तक या यादीत का नाही, यांसारखे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यावर एवढंच म्हणता येईल की, अर्थात ही यादी अपुरी आहे...
.............................................................................................................................................
‘सेपिअन्स’ : मानवी इतिहासाची रंजक सफर घडवून आणणारं पुस्तक - उत्पल व. बा.
युव्हाल नोआ हरारी या सध्या चर्चेत असणाऱ्या अभ्यासकानं आपल्या पहिल्या पुस्तकाला दिलेलं ‘सेपिअन्स’ हे नाव लक्षणीय आहे. माणूस हा भावनिक-बौद्धिकदृष्ट्या व वर्तनदृष्ट्या एक ‘गुंतागुंतीचा प्रकार’ असला तरी ज्या एका अंशतः आकलनीय-अंशतः अनाकलनीय, निरंतर चालणाऱ्या ‘वैश्विक प्रक्रिये’चा तो एक हिस्सा आहे, त्या प्रक्रियेच्या दृष्टीनं त्याची ओळख, त्याचं स्थान ‘सेपिअन्स’ हेच आहे. हे नामाभिधान माणसाला ‘पृथ्वीवरील विशेष महत्त्वाची, बुद्धिमान प्रजाती’ या श्रेणीतून काढून ‘जीवशास्त्रीय जमिनी’वर आणते. हरारीचं ‘सेपिअन्स’ हे पहिलंच पुस्तक.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4406/Sapiens-
.............................................................................................................................................
‘भंगार’मध्ये पानोपानी ऊर्जा भरली आहे; ती कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही - डॉ. सुनीलकुमार लवटे
अशोक जाधव यांचं ‘भंगार’ हे रूढ अर्थांनी त्यांचं आत्मचरित्र आहे; पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे. पत्रा, लोखंड, बाटल्या, प्लास्टिक असं लोकांनी नको म्हणून उकिरड्यात टाकलेलं गोळा करणं, ते भंगारवाल्याला विकणं आणि त्यावर गुजराण करणारे हे लोक. या समाजाच्या स्त्रिया नि मुलं खांद्याला ‘खंदाडी’ - म्हणजे मोठी झोळी - पोतं अडकवून, कचरा-कोंडाळे उपसत विकाऊ वेचण्याचं काम करतात. मुलं भंगार वेचून शिवाय भीकही मागतात आणि पुरुष मात्र पालात दारू ढोसत शिवीगाळ करत, लोळत दिवस काढतात.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4301/Bhangar#
.............................................................................................................................................
वीरा राठोडचं लेखन अधिक आश्वासक व प्रसन्न करणारं आहे - संजय पवार
‘हस्तक्षेप’ शीर्षकांतर्गत या ग्रंथात वेळोवेळी लिहिलेल्या एकूण २९ लेखांचा हा संग्रह आहे. हे सर्व लेखन पूर्वप्रसिद्ध आहे. या २९ लेखांत वीरा राठोड यांनी डॉ. गणेश देवी यांची घेतलेली मुलाखत आणि त्यांनी अग्निपंख युवा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं केलेल्या अध्यक्षीय भाषणाचाही समावेश आहे. वीरा राठोड हे साहित्य अकादमीच्या युवा साहित्यिक पुरस्काराचे मानकरी जसे आहेत, तसेच याच पुरस्कार वापसीतले एक सक्रिय नावही आहे. जे अनेक अर्थांनी लक्षणीय आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4399/Hastkshep
.............................................................................................................................................
‘चित्रभास्कर’ : चंदावरकरांच्या लेखनाचं भाषांतर करताना - आनंद थत्ते
साधारण २०११-२०१२ च्या सुमारास जयप्रकाश सावंत यांनी भास्कर चंदावरकरांच्या लेखांचा अनुवाद करणार का, अशी विचारणा केली होती. पंडितजींनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन आणि संपादन करून पुस्तक करण्याची कल्पना होती. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण हे सर्व लेख सिनेमा, नाटक आणि त्यातलं संगीत या विषयीचे होते. या तीनही कलांविषयी मला आत्मीयता आहे आणि त्यात रसही आहे. पंडितजींचा या तीनही कलांमधला व्यासंग आणि सखोल अभ्यास याची कल्पना होतीच. त्यांच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीचं मराठीत केवळ एकच पुस्तक असावं ही काही चांगली गोष्ट नव्हती. पंडितजी परफॉर्मिंग आणि प्रॅक्टिसिंग कलावंत होते. शिवार त्यांचा तात्त्विकविचारही पक्का होता. प्रत्यक्ष कार्यरत राहिलेल्या कलावंताने संगीताविषयी तात्त्विक विचार मांडणं हे फारच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्यक्ष कार्यरत राहिलेले असे कलावंत फारच कमी आहेत, जे संगीतीविषयी तात्त्विक मांडणी करू शकतात. संगीतात तर अशा लेखनाची वानवाच आहे. म्हणून मी अनुवाद करण्यास आनंदाने होकार दिला.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4288/Chitrabhaskar#
.............................................................................................................................................
करण जोहरनं या पुस्तकात जे सांगितलंय, ते खरं सांगितलंय! जे नाही, ते नाही! - आसावरी चिपळूणकर
आज ‘नेपोटिझम’सारख्या त्याच्या एखाद्या पवित्र्यामुळे (स्टँड घेण्यामुळे) तो काहीसा टीकेचा धनी झाला असला, तरी पुस्तकातून डोकावणारा त्याचा प्रामाणिकपणा कुणीच नाकारू शकत नाही. कुठे काय बोलायचं नाही, हेही त्याला चांगलंच कळतं. ती कला त्यानं पुस्तकातही अर्थातच जपली आहे. त्यामुळे जे सांगितलंय, ते खरं सांगितलंय; पण म्हणून स्वत:बद्दल सगळं काही सांगितल्याचा दावा स्वत: करणचाही नाही.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4370/khara-sangayacha-tar#
.............................................................................................................................................
नाना पाटेकर : लार्जर इन लाइफ - मुकेश माचकर
‘नाना : वळलं तर सूत...’ हे हरहुन्नरी, अष्टपैलू अभिनेता नाना पाटेकर यांच्याविषयीचं पुस्तक. नानाविषयी अनेक मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश असलेल्या या पुस्तकाचं संपादन व शब्दांकन श्रीकांत गद्रे यांनी केलं आहे. हे पुस्तक पुण्याच्या इंद्रायणी साहित्यनं प्रकाशित केलं असून या पुस्तकाला राजहंस प्रकाशनाद्वारा दिला जाणारा उत्कृष्ट निर्मितीसाठी रेखा ढोले पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4445/Nana---Valal-tar-soot
.............................................................................................................................................
‘नाटकी नाटकं’ हे पुस्तक अतिशय रंजक आहे. समीक्षाग्रंथ असूनही त्यात अभिनिवेश नाही. - रत्नाकर मतकरी
एक म्हणजे ‘नाटकी नाटकं’ हे पुस्तक अतिशय रंजक झालेले आहे. समीक्षाग्रंथ असूनही त्यात कसला अभिनिवेश नाही. कुठे उगाच परिभाषेचा वापर नाही की, कुठे जडजंबाल शब्दयोजना नाही. हसतखेळत, आठवणीतल्या गमतीजमती सांगत, आख्यायिका सांगत, विनोदाची पखरण करत ही समीक्षा पुढे जाते. कुठेही आत्मगौरव नाही. स्वतःच्या अभिनयाविषयी सांगतानादेखील भूमिका केवळ माहिती देण्याची आहे. बऱ्याच वेळा तर स्वतःची खिल्ली उडवलेली आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4433/Nataki-Natak---chakoritil-aani-binchakoritil
.............................................................................................................................................
जगातली पहिली रहस्यकथा : मॉर्ग रस्त्यावरचे खून - एडगर अॅलन पो
एडगर अॅलन पो (१८०९ - १८४९) हा अमेरिकन कथाकार गूढकथांचा जनक मानला जातो. ‘मॉर्ग रस्त्यावरचे खून’ ही एडगरची रहस्यकथा जगातली पहिली रहस्यकथा मानली जाते. या कथेचा सर आर्थर कॉनन डॉयलचा सुप्रसिद्ध नायक शेरलॉक होम्स आणि अगाथा ख्रिस्तीचा नायक हर्क्युल पायरो यांच्यावर मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. एडगर अॅलन पोच्या साहित्याचा प्रभाव केवळ अमेरिकी साहित्यावरच नाही, तर जगभरातल्या साहित्यावर पडला!
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4446/Kali-Manjar---Selected-short-stories-of-Edgar-Allen-Poe
.............................................................................................................................................
परकीय जीवसृष्टीशी संवाद साधता येईल का? - डॉ. जयंत नारळीकर
एका दृष्टीनं परकीय जीवसृष्टीचं हे चित्र फारसं कल्पक नाही. आपल्याला माहीत असलेल्या एकमेव जीवसृष्टीवरून ते रेखाटलेलं आहे. एखादी वस्तू हरवली तर ती शोधताना प्रकाशित जागेतच पाहायला हवी; कारण अंधारात पाहणं शक्य नाही! यासंदर्भात आपल्या शोधावर सुरुवात करताना मर्यादा येत असली, तरी सुरुवात करताना सोपं आणि मर्यादित लक्ष्य असलेलं बरं.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4442/Vidnyanvishwatil-Vedhak-aani-Vechak
.............................................................................................................................................
‘देशीवादा’च्या दुश्मनांविरुद्ध आम्हास फुले-जेधे-जवळकरांच्या शब्दांत लेखनी चालवावी लागते आहे! - सुशील धसकटे
प्रसिद्ध कादंबरीकार, ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा ‘देशीवाद’ हा सिद्धान्त सुरुवातीपासूनच मराठी साहित्यात वादाचा विषय झालेला आहे. आजवर त्याच्या बाजूनं आणि विरोधात बरंच काही लिहिलं-बोललं गेलं आहे. प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘देशीवाद : समाज आणि साहित्य’ हे पुस्तक लिहून नेमाड्यांवर आणि त्यांच्या देशीवादावर टीका-टिपणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देणारं ‘देशीवादाचे दुश्मन’ हे अशोक बाबर यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच हर्मिस प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4443/Deshiwadache-Dushman
.............................................................................................................................................
जग सेक्युलर होत असताना भारत एका धर्माचे राष्ट्र बनेल, हा विचार नुसता प्रतिगामीच नाही, तर उथळही आहे. - सुरेश द्वादशीवार
जग सेक्युलर होत असताना भारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार नुसता प्रतिगामीच नाही तर उथळही आहे. तो नव्या जाणिवांच्या व काळाच्या मानसिकतेचा विरुद्ध जाणारा आहे. विषमता हा अन्याय आहे आणि तो धर्मांनी माणसांवर लादला आहे. त्याला नवी नावे देण्यात अर्थ नाही. परंपरांहून त्याचे गोडवे गाणे हे तर तद्दन मागासलेपण आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4461/Sanghache-Hindurashtrache-Swapn-Sakar-Hoil-Ka
.............................................................................................................................................
‘अत्त दीपो भव!’ हा अब्राह्मणी परंपरेने पुरस्कारिलेल्या स्वातंत्र्याचा मॅग्नाचार्टा आहे! - प्रा. यशवंत सुमंत
आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटले की, ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीपासून शिकलो आहे असे कोणी समजतात ते चूक होय. ही मूल्ये मी माझा गुरू बुद्ध, त्याच्यापासून शिकलो आहे.’ आंबेडकरांचे हे विधान पुरत्या गांभीर्याने घेतले तर अब्राह्मणी विचारपरंपरेतून येणारी ही मूल्ये वा आधुनिक पश्चिमी संस्कृतीतून येणारी ही मूल्ये यातील गुणात्मक फरक लक्षात येईल.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4502/Vicharsarnichya-Vishwat
.............................................................................................................................................
‘पाकिस्तान’ हा तुमचा आदर्श आहे का? - संजय आवटे
‘अल्ला, आर्मी आणि अमेरिका’ हेच पाकिस्तान चालवतात, असं म्हटलं गेलं, ते त्यातून. एकदा आधाराची सवय लागली की, मग तो आधार कधी अमेरिकेकडे, तर कधी चीनकडे मागितला जातो. पण त्यातून ‘फेल्ड स्टेट’ असणं अधिकच अधोरेखित होत जातं. धर्माच्या पायावर आक्रमक राष्ट्रवाद उभा राहिला की, हे असं होत जातं. मग धर्म कोणता आहे, हा प्रश्न गैरलागू आहे. धर्मांध शक्ती देशाची संस्कृती ठरवू लागल्या की, अनर्थ अटळ असतो.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4505/We-the-Change---amhi-Bharatache-lok
.............................................................................................................................................
‘घाचर-घोचर’ आता फक्त पाच लोकांनाच माहीत आहे. आणि त्यात मी एक आहे. - विवेक भानभाग
कन्नड-इंग्रजी लेखक विवेक शानभाग यांची ‘घाचर घोचर’ ही बहुचर्चित कादंबरी. तिचा मराठी अनुवाद अपर्णा नायगांवकर यांनी केला असून तो नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालाय. मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय, सुरक्षित घरात जाण्याचं एका एकत्र कुटुंबाच स्वप्न साकार होतं, पण नवीन घरात गेल्यावर भावनिक समीकरणं बदलतात.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4468/Ghachar-Ghochar
.............................................................................................................................................
एकूण सर्व गांधींविचार ‘हिंद स्वराज्य’मधील तीस हजार शब्दांत सामावलेले आहेत! - डॉ. सूर्यनारायण रणसुभे
१९०९ पासून ‘हिंद स्वराज्य’ची प्रशंसा आणि टीका सुरू आहे. १९३८ मध्ये मिल्टन मुरे यांनी ‘अध्यात्मावरील अभिजात ग्रंथ’ म्हणून याचा गौरव केला. यात त्यांना आध्यात्म कोठे आढळले तेच जाणो. कदाचित त्यांचा अध्यात्माचा आशय वेगळा असावा. तर लॉर्ड लोथियन यांनी ‘एकूण सर्व गांधींविचार’ हिंद स्वराज्यमधील तीस हजार शब्दांत सामावलेले आहेत, असे म्हटले आहे. हा निकष किती योग्य आहे, हे प्रा. बेन्नूर या पुस्तकातून सिद्ध करून दाखवतात.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4504/Hind-Swarajya---Ek-Anvayartha
.............................................................................................................................................
संपतराव नेते न झाल्यामुळे त्यांनी लोकांना ‘उपकृत’ करण्याचा प्रश्नच आला नाही! - प्रा. सुहास पळशीकर
भाई संपतराव पवार यांची जिद्द समजून घेण्यासाठी या आत्मकथनातील सूत्रे लक्षात घेतानाच प्रस्थापिताच्या चिवटपणाची दखल घेणे आवश्यक आहे. कारण या आत्मनिवेदनातून जशी पुरोगामी कार्यकर्त्यांची जिद्द सामोरी येते, तशीच प्रस्थापित शक्तींची टिकून राहण्याची कुवत एक आव्हान म्हणून पुढे येते. त्या आव्हानाचे स्वरूप समजल्याखेरीज या आत्मकथनाचे महत्त्व लक्षात येणार नाही.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4512/Mi-Lokancha-Sangati
.............................................................................................................................................
या पुस्तकात बाष्कळ, मॅड विनोदाचा ‘बडा ख्याल’ आळवलेला आहे. हे ज्युनियर ब्रह्मे यांचं कर्तृत्व 'अजब' आहे! - मुकुंद टाकसाळे
ब्रह्मे कुटुंबातील एकाहून एक बावळट पात्रं - म्हणजे सम्राट, खडकू, व्लादिमिर, एलिझाबेथ, जंबो, चारू अशा चमत्कारिक नावाच्या ब्रह्मे कुटुंबातील एकेका पात्राच्या तेवढ्याच चमत्कारिक गोष्टी वाचताना आपण अगदी रमून जातो. या पात्रांना हाताशी धरून ज्युनियर ब्रह्यम्यांनी अक्षरशः पुस्तकभर दंगा केलेला आहे. पुस्तक वाचत असताना आपण या कुटुंबविश्वाचेच एक भाग बनून जातो. ज्युनियर ब्रह्म्यांना भाषा प्रसन्न आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4511/Brahmeghotala
.............................................................................................................................................
गांधी, विनोबा आणि जयप्रकाश लडिवाळ महापुरुष होते. त्यांच्या कडेवर बसून आपण भावी जग पाहू या! - मिलिंद बोकील
गांधींमुळे हे समजलं की, केवळ राजकारणच नाही तर कोणतीही गोष्ट ही आपण प्रेमानंच केली पाहिजे. प्रेम असलं की मन आपोआप निर्वैर होतं; त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. विनोबांकडून हे कळलं की, आपलं चित्त शांत असलं पाहिजे आणि जगातल्या सगळ्या घडामोडींकडे आपण समत्व भावानंच पाहिलं पाहिजे. जेपींकडून ही शिकवण मिळाली की, आपण कधीही सत्तेची आणि सत्ताधीशांची तळी उचलता कामा नये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4525/Gandhi-Vinoba-ani-Jayprakash
.............................................................................................................................................
नातेसंबंध कसे जपावेत हे गुलज़ारांकडून शिकण्यासारखं आहे! - अरुण शेवते
खरं तर एका अर्थानं मला हे तुमचं कवितेतून मांडलेलं काही अंशी आत्मचरित्रच वाटतं. एका पत्रकारानं तुम्हाला विचारलं, ‘‘तुम्ही आत्मचरित्र का लिहीत नाही?’’ त्यावर तुम्ही म्हणालात, ‘‘माझं सगळंच आयुष्य तुम्हाला माहीत आहे!’’ पण प्रत्यक्षात तसं कुठे आहे? या कवितांमधून तुमचं मन, तुमची प्रतिभा, तुमच्यातला माणूस, तुमच्यातला कलावंत पानोपानी पाहायला मिळतो. तो सच्चा आहे. कारण तुम्ही स्वत:च हा नातेसंबंध उलगडून दाखवला आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4523/Sagesare
.............................................................................................................................................
हृषीकेशची कथेवर असलेली पकड कधीही सैलावत नाही. त्याच्या कथा चिरेबंद बंदिशीच्या असतात! - निखिलेश चित्रे
‘घनगर्द’मधून हृषीकेशच्या कथेनं एक उंबरठा ओलांडला आहे. ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे. भय आणि अद्भुताचा मार्ग तिने सोडलेला नाही. मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत. त्या नेमक्या कुठे जाणार हे कुणीही सांगू शकणार नाही. पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्त्वाचं.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4522/Ghangard
.............................................................................................................................................
वस्तुस्थिती आणि परंपरेने लादलेल्या नियमांपलीकडे मी घडत होते, ही या रानभाज्यांची खूप मोठी देण आहे! - नीलिमा जोरवर
मला जबरदस्त आशा आहे की, हे रानभाज्यांवरचे आकर्षक पुस्तक अशा प्रयत्नांची नांदी आहे, आणि पुढील काही वर्षांत सर्व राज्यभरातून मोठ्या प्रमाणावरील लोकसहभागातून अशी माहिती संकलित होऊन ती सर्वांना सहज उपलब्ध होईल, व त्यातून प्रेरणा घेऊन ही जैविक संपत्ती सांभाळण्याचे, तिचा सुयोग्य वापर करण्याचे लोकाभिमुख प्रयत्न उभारले जातील. रानभाज्यांबद्दल बोलताना तज्ज्ञ किंवा त्यावर काम करणारे लोक म्हणतात की, या भाज्या खाल्ल्या जात नाहीत म्हणून संपत आहेत किंवा इतरांना त्यांची माहिती व्हावी म्हणून स्पर्धा-प्रदर्शने आयोजित करणारे खूप लोक आहेत; परंतु एवढ्याने त्याचे संवर्धन होणार नाही. गावपातळीवरच यांचे संवर्धन होणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एक महत्त्वाची जैव बँक किंवा बियाणे बँक म्हणूनही या भाज्या अस्तित्वात राहणे, हे महत्त्वाचे आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4524/Bakhar-Ranbhajyanchi
.............................................................................................................................................
भाषा सर्वांचा सारखा हक्क मानणारी सामाजिक संस्था असते. भाषेइतकी लोकतांत्रिक संस्था दुसरी नाही. ह्यामुळेच राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होतो! - भालचंद्र नेमाडे
भाषा ही कोण्या एका आजच्या किंवा पूर्वीच्या, कोण्या एका वंशाची, जातीची, अभिजनांची मालमत्ता नसून लहानांपासून थोरांपर्यंत, गरीब-श्रीमंत, अडाणी-विद्वान, सर्वांचा सारखा हक्क मानणारी एक सामाजिक संस्था असते. भाषेइतकी लोकतांत्रिक संस्था दुसरी नाही. ह्यामुळेच राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होताना दिसतो.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4268/Bhashetun-Bhashekede%E2%80%A6-aani-bhashantarakade
.............................................................................................................................................
विल्यम शेक्सपिअर : इंग्लंडचं वैभव आणि जागतिक रंगभूमी, जगाचंही! - राजेश हेन्द्रे
‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक नुकतेच विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात चॉसर, शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, टेनिसन, येट्स, इलियट, स्पेन्सर, रॅले, सिडनी यांसारख्या कवींची आयुष्य, त्या वेळची परिस्थिती आणि तत्कालिन वातावरणात फुललेली त्यांची कविता यांची ओळख करून दिली आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4548/Shekspearechya-Deshatil-Kavi
.............................................................................................................................................
‘या कविता अरेबिक वाचकांसाठी नाहीत, कारण त्यांना त्या पटणार, भिडणार नाहीत’ - आनंद थत्ते
डोळ्यासमोर सतत होणारे गोळीबार, कत्तली, अत्याचार, वाहणारे रक्ताचे पाट, अन्नधान्याचा तुटवडा, प्राथमिक सोयींसुविधांचा अभाव या अशा काळोखी, दुःस्वप्नवजा वातावरणात या कवयित्रीची जडणघडण झाली. आणि त्याचा समग्र परिपाक त्यांच्या कवितांमधून उफाळून येतो. अशा निराशेनं भरलेल्या उद्वेगजनक वातावरणातदेखील त्यांची कविता नुसतीच टिकून राहिली नाही, तर तिला धार येत गेली.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4586/Maram-Al-Masri-:-Nivdak-Kavita
.............................................................................................................................................
प्रेषित मुहम्मद (स) - अरबांचाच नव्हे तर अखिल मानवजातीचा ‘तारणहार’! - डॉ. जयसिंगराव पवार
जनाब सय्यद इफ्तिखारसाहेब यांचे आम्ही पुनश्च अभिनंदन करतो ते एवढ्यासाठी की त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, संशोधनपूर्ण असे मुहम्मद पैगंबरसाहेब यांचे चरित्र मराठीत आणले आहे. त्यासाठी त्यांनी ५० हून अधिक साधनग्रंथांचा आधार घेतला आहे. त्यांच्या प्रतिपादनात कुठेही अभिनिवेश नाही. अत्यंत सोप्या शैलीत रसाळ भाषेत त्यांनी पैगंबरसाहेबांचे हे चरित्र लिहून केवळ इस्लामचीच नव्हे तर मराठी भाषेचीही सेवा केली आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4615/Preshit-Muhammad-Navyugache-Pranete
.............................................................................................................................................
समाजशास्त्राचा अवलंब न करता एखादी जात सामाजिकदृष्ट्या मागासलेली, असा निष्कर्ष काढणे सर्वस्वी चुकीचे!
- डॉ. बाळासाहेब सराटे । अॅड. श्रीराम पिंगळे
आरक्षणात सामाजिक मागासलेपणाची अट सांगितली जाते. पण सामाजिक मागासलेपण म्हणजे काय? त्याचे निकष कोणते? त्याची शास्त्रीय संशोधनपद्धती कशी असावी? मूलत: सामाजिक मागासलेपण ही एक गुणात्मक, तुलनात्मक व सापेक्ष अशी समाजशास्त्रीय संकल्पना आहे. यांसारख्या विविध प्रश्नांची चर्चा करणारे ‘सामाजिक मागासलेपणाचे समाजशास्त्रीय विश्लेषण’ हे डॉ. बाळासाहेब सराटे, अॅॅड श्रीराम पिंगळे यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4614/Samajik-Magasalepanache-Samajshastriya-Vishelshan
.............................................................................................................................................
हे पुस्तक मध्यमवर्गाने ‘हिंदू’चा कसकसा अर्थ लावला यातील मैलाचा दगड ठरेल! - डॉ. प्रकाश पवार
भारतीय समाजकारण आणि राजकारणात भारतीय संकल्पना आणि हिंदू संकल्पना यांच्यामध्ये मोठे वादक्षेत्र उभे राहिले, त्यास दोन शतके पूर्ण झाली आहेत. ‘भारतीय’ म्हणजे काय हा गुंतागुंतीचा प्रश्न १८१८ नंतरच्या मध्यमवर्गीय हिंदू पुढे दिसतो. त्या प्रश्नांची ही एक कथा या पुस्तकाच्या रूपाने रमेश चव्हाणांनी विकसित केली आहे. ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन’ हे पुस्तक रा. ना. चव्हाणांच्या विखुरलेल्या लेखांचे संकलन आहे. यामध्ये मुख्य असे विवेचन पुस्तकाच्या नावामध्ये संपादकांनी आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे सर्व लेख जवळपास स्वातंत्र्योत्तर काळात लिहिले गेले आहेत.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4640/Hindu-Hindutva-ani-Hindu-Sanghatan
.............................................................................................................................................
‘हायकू’ हा काव्यप्रकार मराठी मातीत रुजवण्याचं श्रेय शिरीष पै यांचंच! - उषा मेहता
मराठी मातीत ‘हायकू’ हा काव्यप्रकार रुजवण्याचं श्रेय शिरीष पै यांच्याकडे जातं. शिरीष पै यांचे १९७९ ते २०१५ या कालावधीत एकूण दहा हायकू-संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेले प्रकाशित-अप्रकाशित असे सर्व हायकू आता एकत्रितपणे प्रसिद्ध होत आहेत. मराठी भाषेत जपानी हायकू प्रकार रुजवणाऱ्या, बहराला आणणाऱ्या कवयित्री शिरीष पैंचं मराठी साहित्यजगत सदैव ऋणी राहील.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4644/Haiku-Haiku-Haiku
.............................................................................................................................................
असेही विद्वान : मार्मिक, रंगतदार, बहारदार, उमदे, खिळाडू... - प्रभाकर पाध्ये
ज्येष्ठ संपादक, लेखक प्रभाकर पाध्ये यांचं ‘असेही विद्वान’ हे जगभरातल्या काही निवडक विद्वानांची ओळख करून देणारं पुस्तक नुकतंच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकात भारतातील ३३, आशियायी देशांत २०आणि पाश्चात्य देशांतील २२ विद्वानांविषयीच्या मार्मिक, रंगतदार, बहारदार आणि उत्तम आठवणी आहेत.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4624/Asehi-Vidwan
.............................................................................................................................................
हे लेख सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत ह्या दोन्हींच्यामध्ये आंदोलित होणाऱ्या मनासाठी आहेत! - गणेश देवी
या छोट्याशा पुस्तकात मराठी वाचकांसमोर माझ्या मनात गेले अनेक वर्षे पिंगा घालणारे काही प्रमुख विचार मांडले आहेत. पुस्तकात प्रस्तुत केलेल्या लिखाणास ‘लेख’ हे सन्माननीय नाव देणे योग्य नाही. लेखांना स्वत:ची काही शिस्त असते. त्यामागे काही संकल्पना-संदर्भ असतो. तो या लेखनाच्या मागे नाही. त्यातील काही, मी स्वत:पुरता विचार करत असताना केलेल्या त्रोटक नोंदी आहेत. काही फक्त विचारांचे पुसटसे धागे आहेत. काही जाहीर व्याख्यानात उच्चारलेले तात्पुरते विचार आहेत. पण जे आहे, ते सगळे एका विस्तृत विचारपटलावरचा सुस्पष्ट नकाशा आहे. हा नकाशा थोडासा, मध्ययुगातील खलाशांनी बनवलेल्या दर्याच्या नकाशासारखा.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4709/Trijya
.............................................................................................................................................
‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या विषयावर सखोल विवेचन करणारे पुस्तक - डॉ. मेघा पानसरे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे, ज्येष्ठ संशोधक व कन्नड लेखक प्रा. एम.एम.कलबुर्गी आणि निर्भीड, शोषितांच्या मानवी हक्कांसाठी लढणारी पत्रकार गौरी लंकेश अशी यांचे निर्घृण खून अद्याप लोक विसरलेले नाहीत. त्यांच्या खुनांचे सूत्रधार व खुनी यांना कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी लोक शासनाकडे करतच आहेत. परंतु न्यायासाठी अजून दीर्घकालीन संघर्ष करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर १ ते ७ डिसेंबर २०१७ या कालावधीत शाहू स्मारक भवन, कोल्हापूर इथं १५व्या व्याख्यानमालेतून ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या विषयाचा विविध अंगांनी वेध घेण्याचा प्रयत्न झाला. त्यात सर्वच व्यासंगी अभ्यासकांनी ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही व जमातवाद’ या विषयावर अतिशय सखोल विवेचन केले.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
https://www.booksnama.com/book/4710/Darmnirpeksh-Lokshahi-ani-Jamatwad
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nikkhiel paropate
Tue , 26 February 2019
वेळोवेळी अशाच उत्तम पुस्तकांची आम्हास आपण ओळख करुन द्यावी.. आमच्या पिढीस त्याची गरज आहे