विशाल भारद्वाज शोकांतिकेला वेगळे आयाम देतो, तेव्हा शेक्सपिअरकडे आपण नव्याने बघतो!
ग्रंथनामा - झलक
वंदना भागवत
  • ‘स्त्रीवाद, साहित्य आणि समीक्षा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि विशाल भारद्वाज व हैदर, ओंकारा आणि मकबूल या चित्रपटांची पोस्टर्स
  • Fri , 04 January 2019
  • ग्रंथनामा झलक स्त्रीवाद साहित्य आणि समीक्षा Streevad Sahitya ani samiksha वंदना भागवत Vandana Bhagwat विशाल भारद्वाज Vishal Bhardwaj हैदर Haider ओंकारा Omkara मकबूल Maqbool

समीक्षक वंदना भागवत यांचं ‘स्त्रीवाद, साहित्य आणि समीक्षा’ हे पुस्तक नुकतंच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात पाश्चात्य स्त्रीवादाच्या आणि भारतीय स्त्रीवादाच्या जडणघडणीचा आढावा घेतला आहे. तसंच स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणता येईल आणि साहित्याची समीक्षा करण्यासाठी स्त्रीवादी निकष असू शकतील काय, याचाही शोध घेतला आहे.या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

आज जागतिकीकरणाच्या यंत्रणेत आणि लोकशाही शासनव्यवस्थेत मानवी इच्छाशक्तीची जागा कशी बघायची यासाठी विशाल भारद्वाजचे ‘मकबूल’, ‘ओंकारा’ आणि ‘हैदर’ हे तीनही चित्रपट फार महत्त्वाचे वाटतात. विशाल भारद्वाजला शेक्सपिअरच सापडला का, असे विचारणारे मला भेटले आहेत. मी या प्रश्नाने थोडी संकोचते, पण तरीही जरा हट्टाने त्या चित्रपटांना घट्ट धरून ठेवते. कारण पाश्चात्त्य अर्थनिर्णयनाचे किंवा शेक्सपिअरच्या सादरीकरणाच्या इतिहासाचे दडपण न घेता, भारताच्या भूमीवर उभे राहून ठामपणे त्याचा अर्थ लावण्याची त्यातील प्रक्रिया मला महत्त्वाची वाटते. तसे प्रयोग यापूर्वी झालेले असू शकतात. पण मुख्य प्रवाही चित्रपटांच्या बाजाने शेक्सपिअरला मोठ्या पडद्यावर आणणे, हे शेक्सपिअरला खऱ्या अर्थाने अभिजात बनवणे आहे, असे मला वाटते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिग्दर्शकाने यातील तीन स्त्रियांना मिळवून दिलेला रिकाम्या अवकाशाचा फायदा. साहित्यकृतीतील ओळींच्या मधल्या रिकाम्या जागेचे वाचन महत्त्वाचे असते. शेक्सपिअरच्या नाटकांतील लेडी मॅकबेथ, इयागोची बायको एमिलिया आणि हॅम्लेटची आई गट्रूड या तीनही स्त्रियांना विशाल भारद्वाजने जी कृतिशीलता आणि स्वतंत्र प्रज्ञा देऊ केली आहे, त्यासाठी हे चित्रपट मला फार मोलाचे वाटतात. व्यवस्थेने स्त्रियांना देऊ केलेले दुय्यमत्व, तरीही त्या वापरत असलेली त्यांची स्वतंत्र निर्णयक्षमता आणि त्यांनी स्वतःच्या अनुभवांतून केलेली कृती व त्याचे परिणाम भोगायची त्यांची तयारी; हे इतके ताजे आणि परिणामकारक आहे की, आपण या तीनही चित्रपटांचा स्वतंत्रपणेही विचार करू शकतो. आत्ताच्या आपल्या काळात या मांडणीचे महत्त्व मोठे आहे.

शेक्सपिअरच्या ४००व्या जयंतीनिमित्त अनेक लेख वाचनात आले. शेक्सपिअर किती मोठा आहे आणि तो आपल्याला किती मोलाचे काय काय देऊन गेला असा सूर सामान्यतः सगळ्याच लेखांचा आहे. अनेक थोर दिग्दर्शकांनी आणि अभिनेत्यांनी तो कसा सादर केला याविषयीच्या आठवणी त्यात आहेत. पण शेक्सपिअर आपण आपल्या भूमीवरून कसा समजून घेतला, असा विचार मला अधिक रोचक आणि प्रस्तुत वाटतो. आपल्या वासाहातिक पार्श्वभूमीवर, आपण त्याला निव्वळ ब्रिटिश विचारवंतांनी आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गौरवलेला लेखक मानतो की, एक भारतीय म्हणून आपण त्याच्या साहित्याला भिडतो, त्या अनुभवांचे आणि त्यातील मर्मदृष्टींचे भाषांतर करतो हे तपासणे महत्त्वाचे आहे.

आज संवाद-माध्यमांमुळे आणि तंत्रज्ञानामुळे जागतिक विचारसंचित तसे सहजी उपलब्ध होते आहे. त्यामुळे व्हर्चुअल वैश्विक होण्याला फारसे अडसर आज नाहीत. पण तरीही स्थानिकतेची मुळे नसतील तर त्या वैश्विक होण्याचे आविष्कार जाणते होऊ शकत नाहीत. भाषांतर करत असताना आपल्याला आपली स्वतःची भाषा लागतेच. ती कोणती? आधुनिकतेच्या सगळ्या चर्चाविश्वांना आपलेसे करत आज आपल्या सामाजिकतेची वाटचाल सुरू आहे. अगदी देशीवादासारखे चर्चाविश्व मांडले जाताना इंग्रजीत उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा, सामाजिक शास्त्रांचा अभ्यास आत्मसात करूनच ते मांडले गेले आहे. तेव्हा आजची आपली भाषा सामाजिक शास्त्रे, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान अशासारख्या विचारविश्वांचा प्रभाव असणारी भाषा आहे. जातिअंताच्या आणि वर्ग अंताच्या लढ्यांनाही त्यांनी योगदान दिले आहे. तरीही वैश्विकतेचा परिणामकारक विचार करायचा तर स्त्रीवादाची भाषा ही खरी संवादभूमी राहील. कारण स्त्रीवाद हे चर्चाविश्व स्त्री आणि पुरुष अशा पायाभूत एककातील नातेसंबंधात समतेचा आग्रह धरते आणि अनेक विषयांचे संदर्भ त्यासाठी गरजेचे मानते. ही मागणी स्त्रियांकडून झालेली आहे. कोणत्याही सत्तासंघर्षांच्या लढ्यात स्त्रीची भूमिका कळीची ठरू शकते, असे संकेत आजच्या राजकीय संदिग्धतेत मिळत आहेत. साहजिकच स्त्रियांना आपापल्या चर्चाविश्वाचा भाग बनवण्याचे प्रयत्नही चालू आहेत. मात्र स्त्रीला स्वतंत्रपणे काही म्हणण्याची, भूमिका घेण्याची जागा त्यात नाही. ती निर्माण करण्याचे प्रयत्न हे सगळ्यात प्रागतिक प्रयत्न असतील.

शेक्सपिअरची आठवण काढताना स्त्रीवादाचा संदर्भ कदाचित जाचक वाटण्याचा संभव आहे. पाश्चात्त्य स्त्रीवादी समीक्षेने शेक्सपिअरवर बरेच लिहिलेही आहे. स्त्रीवादी दृष्टीतून शेक्सपिअरकडे बघणे हे अनैतिहासिकही आहे; पण शेक्सपिअरने देऊ केलेल्या नाट्यानुभवात स्त्रीचे स्थान ठरवण्यामध्ये काही संदिग्धता नक्कीच आहेत. त्यांचा अर्थ लावण्याचे प्रयत्न करता येतात. म्हणजे हॅम्लेटची आई दिराशी लग्न करण्याची घाई का करत असेल? तिला मारू नकोस, असे हॅम्लेटच्या बापाचे भूत हॅम्लेटला का सांगत असेल? याचा विचार आपण करायला हवा. तत्कालीन राजकीय व्यवस्थेत त्याची उत्तरे मिळू शकतील. बहुसंख्य गोऱ्या सत्ताव्यवस्थेत अल्पसंख्य काळ्या, मूर, जिप्सी, ज्यू लोकांचे स्थान काय होते? याचा अभ्यास केला तर ऑथेल्लोची असुरक्षितता समजू शकेल. एकूणच राजकीय सत्तासंघर्षात सत्ताधारी आणि सत्तेबाहेरचे हा संघर्ष शेक्सपिअरच्या अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी आहे. तिथे सत्तेच्या परिघाच्या बाहेर असणारे किंवा जाणारे का जातात याचा अभ्यास त्यातून करता येतो. शिवाय जोडीने मानवी स्वभावाची अंधारी बाजूदेखील त्यात एक भूमिका करताना दिसते. पण प्रामुख्याने अनेक वर्षांच्या सांस्कृतिक आणि राजकीय चिन्हव्यवस्थेने अंकित असणारे माणूसपण शोकांतिकांमध्ये संपताना तो दाखवतो.

शोकांतिका ही तिच्या काळातल्या मूलभूत धारणा आणि ताण तिच्याकडे खेचून आणत असते. शोकांतिकेचे तत्त्वज्ञान एवढ्यासाठी महत्त्वाचे असते की, त्याच्यातून त्या त्या संस्कृतीचा आकार आणि धारणा कमालीच्या गांभीर्याने आणि सखोलतेने व्यक्त होत असतात. दुःख हे कमकुवतपणे स्वार्थ, विरोधाभास, अशक्य परिस्थिती, चुकीचे निर्णय, नियती या सगळ्यात गुंतलेले असतेच; पण त्याही पलीकडे संपूर्ण समाजाच्या श्रेयसाच्या शोधाची प्रक्रिया तिथे असते. विशेषतः समाज जेव्हा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात असतो, राजकारणाचे स्थित्यंतर होत असताना नव्या आकाराच्या शोधात सगळी समष्टी असते; तेव्हा स्वयंभू, कधीच न ढळणारी मूल्ये त्याच्या तळाशी असावीत अशी ओढही असते आणि त्याचबरोबर आयुष्याने बदलावे, झडझडून उठावे आणि आजवरचे सगळे वेदनादायी अनुभव बदलून टाकावेत, बदल घडावा; असेही वाटत असते. बदलाची किंमत मोजावी लागते, हे जेव्हा लक्षात येत नाही, तेव्हा शोकांतिका घडते. त्यापेक्षाही अधिक शोकात्म गोष्ट म्हणजे बदलाची किंमत मोजूनही बदल घडत नाही ही. तिथे चिंतनाला खरे तर बराच वाव असतो. बदल का घडतात अथवा घडत नाहीत याची कारणे शोधायचा कलाकृतीचा ध्यास म्हणूनही आपण जपला आणि जाणला पाहिजे.

शेक्सपिअर समजून घेऊन पुढे बदलाच्या दिशेने शेक्सपिअरला वापरणे शक्य आहे का, याचा विचार आपण करतो तेव्हा विशाल भारद्वाजच्या शेक्सपिअरच्या रूपांतरांचा विचार करावा लागतो. तो निवळ कथानक उचलत नाही. कथेच्या ढाच्यात भारतीय नावांची माणसे बसवत नाही, तर तो शेक्सपिअर चित्रपटात आणतो, तेव्हा संपूर्ण व्यवस्थादेखील भाषांतरित करतो. समकालीनतेचे ताण ऐतिहासिक भानासकट मांडतो. ‘मकबूल’ हे ‘मॅकबेथ’चे रूपांतर बघितले तर काय दिसते? राजेशाही व्यवस्था इथे लोकशाही व्यवस्थेत बदलते. साहजिकच एकापेक्षा जास्त सत्ताकेंद्रे तयार होतात. एक बुद्धिबळाचा पट समोर मांडला जातो. ‘मॅकबेथ’मधली ओसाड युद्धभूमी मकबूलमध्ये गर्दीचे मुंबई शहर होते. मॅकबेथचे भविष्य वर्तवणाऱ्या चेटकिणी इथे संपूर्ण मुंबईची कुंडली मांडणारे भ्रष्ट पोलीस अधिकारी होतात. लोकशाही यंत्रणेतील एकमेकांवर मात करण्याचे व्यापक राजकारण सगळ्याच मोहोऱ्यांना कर्तेपण देते. त्यामुळे भविष्य वर्तवण्याची कृती ही निव्वळ काही दुष्ट चेटकिणींची राहत नाही, तर जो जो व्यवस्थेच्या चक्रात आहे, त्याच्या प्रत्येक छोट्यामोठ्या कृतीने भविष्य घडत जाते. मोहोरे एकमेकांविरुद्ध खेळवणे हे काम कमालीच्या नैपुण्याने करणारे पोलीस अधिकारी अंतिमतः ती व्यवस्था ताब्यात ठेवतात; पण तिला आव्हान देणारी मानवी इच्छाशक्ती ते संतुलन काही काळ का होईना पण बिघडवते.

विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’मध्ये फक्त मकबूललाच नाही तर सर्वच व्यक्तिरेखांना एक नेमकी कृतिशीलता आहे. शोकांतिकांमध्ये शेक्सपिअर अंतिमतः व्यवस्था मूळ पदावर आणून बसवतो हे खरे. पण ती राजकीय व्यवस्था एकखांबी असल्याने त्यात संतुलन साधणारे घटक अनेकदा अतिमानवी किंवा योगायोग असण्याच्या शक्यता असतात. लोकशाही व्यवस्थेत अनेक मोहोरे जिवंतपणे सक्रिय होतात, तेव्हा त्यांच्यातला नातेसंबंधांचा कार्यकारणभाव पटेल अशा पद्धतीने मांडण्याचे आव्हान फारच रोचक आहे. ते विशाल भारद्वाज उत्कृष्टपणे पेलताना दिसतो. त्यातूनच मुंबई नावाच्या भारतीय स्थानाला भावविवश आवाहनांचा, कल्पितांचा किंवा भ्रांतिकांचा विषय न ठेवता; ठोस व्यवहारातील कृतिशीलतेचा विषय बनवतो.

आधुनिक लोकशाहीच्या पटावर शेक्सपिअरचा ‘मॅकबेथ’ मांडणे हे आव्हान विशाल भारद्वाज घेतो. त्याही पुढे जात भारतीय भूमीवर निर्माण झालेल्या राजकीय व्यवस्थेवर त्याला तो मांडतो. जहांगिरचे गुन्हेगारी कुटुंब आणि स्वतःचे व्यक्तिगत कुटुंब, मुंबईच्या राजकारणाची गुंतागुंत आणि गुन्हेगारी जगाची मदत घेऊन निवडून आलेले नेते, त्यांचे गुन्हेगारी जगाशी असणारे संगनमत आणि त्याला जाणतेपणाने खेळवणारी यंत्रणा यात नायकपद किंवा नायिकापदाची मोहोर कशी उमटणार? तिथे स्त्रीने पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्वतःची इच्छाशक्ती वापरण्याचे महत्त्व विशाल भारद्वाज दाखवून देतो. जहांगिरची रखेल म्हणून राहायला नाकारणारी निम्मी तिच्या नकारातून अनेक घटनांना वेग देते आणि अंतिमतः त्या घटनांचा बळी ठरते. निम्मीची व्यक्तिरेखा लेडी मॅकबेथच्या व्यक्तिरेखेसारखी गडद महत्त्वाकांक्षी केलेली नाही; पण ठामपणा आणि कृतिशीलता असणारी स्त्री म्हणून निम्मी उभी राहते. अतिशय आकर्षकपणे उभी राहते. जहांगिर, मकबूल, मुख्यमंत्री यांच्या करोडो रुपयांच्या राजकारणात ती फक्त रखेल म्हणून राहण्याचे नाकारते आणि तिथून व्यवस्था हादरायला सुरुवात होते.

‘ओंकारा’मध्ये इंदू स्वतःच्या दुष्ट नवऱ्याचा खून करून आत्महत्या करते, जे ‘ऑथेल्लो’तील एमिलिया करू शकत नाही किंवा ‘हॅम्लेट’वर आधारित ‘हैदर’मध्ये हैदरची आई गझाला नवऱ्याने अतिरेक्यांना घरात आश्रय देण्याच्या कृतीला विरोध करते. दीर त्याला परावृत्त करू शकेल अशा खात्रीने ती दिराला सांगते; पण त्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी तो भावाला अडकवतो. पण तरीही गझाला शेवटपर्यंत हिंसा आणि हिंसा करणाऱ्यांना विरोध करत राहते, प्रसंगी स्वतःचा बळी देऊन. ऑफेलियाचे भाषांतर असणारी आर्शिया हीदेखील स्वतंत्रपणे निर्णय घेणारी, धाडसी पत्रकार आहे. म्हणजे तिलाही स्वतंत्र मत आणि कृतिशीलता विशाल भारद्वाज देऊ करतो. शेक्सपिअरच्या राजकीय वातावरणातल्या हतबल, पुरुषसत्ताकतेची मूल्ये आत्मसात केलेल्या स्त्रियांच्या समोर या स्त्रिया उठून दिसतात. साहजिकच स्वतंत्र आत्मभानातून केलेली ही भाषांतरे एक स्वतंत्र कलाकृती म्हणूनही उभी राहू शकतात.

शेक्सपिअरचा लेखनकाळ राष्ट्र ही संकल्पना आकार घेण्याचा काळ होता. त्याची मुळे मुळात विस्तारत चाललेल्या जागतिक व्यापारात होती. परक्या देशाशी व्यापार करायचा तर स्वदेशाची संकल्पना निश्चित करणे गरजेचे असते. कारण व्यापार व्यवहाराला लागणारे कायदेकानून तयार करायचे, तर आपले आणि बाहेरचे ठरवणे हे सत्ताकांक्षी राजकारणाच्या गरजेचा भाग असते. शेक्सपिअर लिहीत होता आणि त्या काळाचा ताण त्याच्या सगळ्या नाटकांमधून, विशेषतः अखेरच्या नाटकांमधून स्पष्टपणे दिसतो. सामंती व्यवस्थेतून आधुनिक लोकशाही व्यवस्थेकडची वाटचाल सुरू होण्याच्या या कालखंडात सामंती मूल्यांवरची ढासळती निष्ठा वेगवेगळ्या घटनांतून दिसून येते.

१६०१मध्ये एलिझाबेथ राणीच्या अत्यंत निकटच्या सरदाराने अर्ल ऑफ इसेक्सने तिच्या राजवटीविरुद्ध बंड केले आणि परिणामतः त्याचा शिरच्छेद करण्यात आला होता. तर व्यापारातून धनवान झालेल्या वर्गाची म्हणजे ब्रिटिश संसदेची कणखर होत जाणारी पकड, या दोन काळांच्या दरम्यानची त्याची अखेरची नाटके किती जबरदस्त राजकीय उलथापालथींचे संचित घेऊन येतात, ते इतिहासाच्या जोडीने तपासण्याची गरज आहे. इतिहासाच्या ओघात राजेशाही नियंत्रित करताना धर्माचा सहभागही लक्षणीय होता. पण धर्मसत्तेला आव्हान देणारी राज्यव्यवस्था धार्मिक संवेदनांना पूर्णपणे बाजूला ठेवू शकली नाही. जन्म, मृत्यू आणि आपले मूळ, आपली निर्मिती या रहस्यांचा निरास होण्याची इच्छा; या धर्माने हाताळलेल्या संकल्पना राज्यसत्तेनेही उचलल्या. त्या समूर्त केल्या. साहजिकच सत्ताकारणात धर्माचा हस्तक्षेप होत राहिला. वेळोवेळी धार्मिक सत्ता आणि राजकीय सत्ता यांची हातमिळवणीसुद्धा होत राहिली. त्यातून राष्ट्र नावाचे कल्पित उभे राहण्याची प्रक्रिया सुरू झाली.

एक उदाहरण द्यायचे झाले तर, १५१७मध्ये इंग्लंडमधील एका चर्चच्या धर्मगुरूने त्यांच्या परगण्यातील लोकांच्या गरिबीला बाहेरील लोकांच्या लोंढ्याबद्दल केलेले भाषण, त्याच वर्षी ‘परकीय’ कारागिरांविरुद्ध झालेले दंगे, १५९६मध्ये एलिझाबेथ राणीने काढलेले परकीय नागरिकांविरुद्धचे फतवे हे सगळे राष्ट्र उभारणीचेच परिणाम होते. त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला लागेल की, त्या वेळेस इंग्लंडमधून विविध व्यापारी कंपन्या जगभरात फिरत होत्या. त्यांच्या नफ्यावर अधिकार सांगायचा झाला, तर मग आक्रमक साम्राज्यवादाला राष्ट्रवादाचा आधार लागतो, आणि राष्ट्रवादाला अत्यंत मर्यादित अस्मितांचा आधार लागतो हेही स्पष्ट झाले. यांच्या सहाय्याने कार्यरत होणाऱ्या सर्वच यंत्रणा हातात हात घालून चालत असतात. तिथे सद्सद्विवेकाचा, अन्यायाच्या प्रतिकाराचा एक आवाज सगळ्याच यंत्रणांना अस्वस्थ करत असतो.

शोकांतिकांमध्ये म्हणूनच प्रस्थापित यंत्रणांचे दर्शन फार नेमके आणि सखोल असते. त्यांना विरोध करणाऱ्या आवाजाचे आपल्याला महत्त्व वाटते, कारण त्याची व्यवस्थांची सर्वव्यापी ताकद अनेकदा विरोध करणाऱ्यालाही माहिती नसते. त्यामुळे तिथे निखळतेचा, तात्त्विक भूमिकेचा पराभव मनाला जास्त भिडतो. विरोधाचा हा आवाज आणि त्यांचे परिणाम शेक्सपिअरच्या शोकांतिकांमधून समोर येतात. विशाल भारद्वाजने हा आवाज त्याच्या तीनही रूपांतरांमध्ये बाईला दिला आहे. आज राष्ट्रवादाची चर्चा आपल्या भूमीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणली जाते आहे, तेव्हा अशा भाषांतरांचे महत्त्व लक्षात येते.

राजकीय सत्ता आणि भांडवलशाही यांची वाटचाल जेव्हा हातात हात घालून होते, तेव्हा कला आणि साहित्य या सर्जक मूलगामी प्रेरणा ताब्यात घेऊन त्यांचा संकोच करण्याचा, त्यांना खुजे बनवण्याचा किंवा हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न होतो. इतिहास बदलण्याचा प्रयत्न होतो. अनेकदा भोवतालचे वातावरणही त्याला कारणीभूत ठरत असते. म्हणजे मुळात कोणताही प्रतिभावंत जाणून घेण्यासाठी किंवा नव्याने काही घडवण्यासाठी आपली सांस्कृतिक प्रगल्भता किती आहे, यावर बऱ्याच वेळा कलाकृतीचा अर्थ लावण्याच्या क्षमतेचा पोत ठरत असतो. त्याचबरोबर ती क्षमता मुक्तपणे फुलू नये यासाठी सत्तेतील चतुर विचक्षणही प्रयत्नशील असतातच. व्यावसायिकतेचा बडिवार माजवत सामान्य वकुबाच्या, बटबटीत कलाकृतींना उचलून धरणे; माध्यमांच्या ताकदीवर पुन्हा पुन्हा प्रेक्षकांवर त्या लादत राहणे, यातून स्वतंत्र विचारशक्ती व अभिरुची विकसित होण्याच्या शक्यता संपवल्या जातात. त्यातील सवंगतेची आणि हिंसाचाराची आपल्याला इतकी सवय होते की, मग त्यामागील राजकारण दुरुस्त करता येण्याजोगे आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.

या आपल्या परिस्थितीचे वाचन करताना विशाल भारद्वाजचा शेक्सपिअर नक्कीच उपयोगी पडतो. विशेषतः त्याने उभ्या केलेल्या स्त्रियांच्या व्यक्तिरेखांमधून. लोकशाही मानणारा नागरिक म्हणून अशा कलाकृतींच्या वाचनाची जबाबदारीही आपली असते. राष्ट्र ही ‘चर्चात्मक भूमी’ आहे; फुको म्हणतो त्याप्रमाणे ‘discursive formation’ आहे. हे आपणच सांभाळायला हवे.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शेक्सपिअरचा अन्वयार्थ आपण आपल्या भूमीवर उभे राहून पुरेशा आत्मविश्वासाने लावतो का आणि लावत असू तर कसा? त्यातून काही वेगळ्या मर्मदृष्टी, तौलनिक दृष्टी लाभतात का? भावविवशतेच्या पलीकडे जात शेक्सपिअरने मांडलेल्या मूल्यभावाचा विचार आपण कसा करतो? हा आजचा प्रश्न आहे.

दोन उदाहरणे देता येतील. ‘किंग लिअर’चे स्वैर रूपांतर म्हणून आपण ‘नटसम्राट’कडे बघतो. पण राजाने आपल्या भौतिक साम्राज्याची केलेली वाटणी आणि एका नटाने आपल्या व्यक्तिगत संपत्तीची केलेली वाटणी यांत मोठा फरक आहे. कॉर्डेलियाने तिचे सगळे प्रेम राजाला देऊ करण्याचे नाकारणे म्हणजे सामाजिक जबाबदारीचे भान राखणे असे मला वाटते. निवळ लहर आली म्हणून कोणी राजा आपल्या राज्याची विभागणी करू शकणार नाही, तीसुद्धा स्वतःच्या मुलींनी त्यांच्या बापावरील प्रेमाचा उच्चार करून, जिंकण्याचा प्रस्ताव मांडून. साहजिकच माझ्या डोळ्यांसमोर उभी राहणारी कॉर्डेलिया राजाला त्याच्या राजधर्माचं भान देऊ करणारी आहे, निवळ आपल्या प्रेमावर आपल्या नवऱ्याचा आणि मुलांचाही हक्क आहे एवढेच सांगणारी नाही. ‘लिअर’मधले ताण जेव्हा टोकाला जातात, तेव्हा त्यातील घटना खरोखरच वैश्विक शक्तींची उलथापालथ ठरतात. प्रामाणिक चांगुलपणा आणि व्यापक कर्तव्यभावना संपवली गेली तर संपूर्ण राज्यातल्या लोकांवर दहशत राज्य करते. सर्व मूल्यांचा ऱ्हास होतो. लिअरला आपण राजा म्हणून किती मोठी चूक केली आहे हे कळते, तेव्हा आकाश फाटते. त्याची शिक्षा त्याला त्याच्याच दोन मुलींनी त्याच्या धाकट्या मुलीला मारून मिळते. त्यामानाने ‘नटसम्राट’ केवळ एका आत्ममग्न म्हाताऱ्या नटाची करुण कहाणी बनते.

दुसरे उदाहरण घ्यायचे तर ‘मॅकबेथ’मधल्या चेटकिणींच्या बाबतीतही बरेच काही म्हणता येण्याजोगे आहे. स्त्रियांना चेटकीण ठरवून जाहीर मारण्याचा प्रकार जगभरातील संस्कृतींमध्ये आढळतो. अदृष्टाची भीती आणि वेगळ्या प्रकारे वागण्याचे धाडस करणाऱ्या स्त्रियांविषयीचा तिरस्कार या कृत्याला यांतून त्यांना समाजमान्यता मिळत असावी. पण त्यांना राजकीय भविष्यवाणीशी जोडण्यातून अनेक अन्वयार्थ आणि त्याच्याशी जोडलेल्या दृश्यता शेक्सपिअर तयार करतो. हा क्षण जाणायला इतिहासाचे आणि मानवी संस्कृतींचे सजग वाचन करावे लागेल.

‘मकबूल’मध्ये पोलिसांनी केलेल्या भविष्यवाणीला निम्मी आत्मसन्मानाच्या अर्थाने निर्माण करू पाहते, तेव्हा गूढतेचे वलय काढून त्याला मानवी कृतिशीलता विशाल भारद्वाज देतो; शोकांतिकेला वेगळे आयाम देतो. भाषांतराची मौलिक मर्मदृष्टी या वाचनातून मिळते. विशाल भारद्वाज ती देतो, तेव्हा शेक्सपिअरकडे आपणही नव्याने बघतो.

.............................................................................................................................................

या पु्स्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4712/Streevad-Sahitya-ani-samiksha?fbclid=IwAR328DimEQuGD9Hq-jax3Dqxo-3lb-6PoCj9PhLkZ0kQhAU7nLqnkPJxdRo

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......