धर्माधर्मांतील विटाळ आणि स्त्री-पुरुष समानता
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 03 January 2019
  • पडघम सांस्कृतिक शबरीमाला Sabarimala चर्च Church मशिद Mashid अग्यारी Agiary गुरुद्वारा Gurudwara

श्रीरामपुरात आम्ही राहायचो तो परिसर मिश्र जातीधर्मांच्या संस्कृतीचा होता. चार बैठी घरे एका लाईनीत आणि समोरच्या लाईनमध्ये दीड-दोन गुंठ्यांच्या जागांवर बांधलेली सहा-सात स्वतंत्र घरे होती. आमच्या लाईनमधील घरांच्या कुडाच्या भिंती सामायिक होत्या. आमच्या ख्रिस्ती कुटुंबाशेजारी एका बाजूला मुसलमान कुटुंब होते, तर दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंब होते. आणि त्यांच्या शेजारी दुसरे एक मुसलमान कुटुंब होते. समोरच्या लाईनीत प्रशस्त जागेवर एक मुसलमान संयुक्त कुटुंब होते. आणि त्यांना लागून माळी कुटुंबांची सलग स्वतंत्र तीन घरे होती. बाकीचे घरे आणि इमारती लांब अंतरावर असल्याने ही सात-आठ घरांतील माणसे एकमेकांशी विशिष्ट नात्यांनी घट्ट बांधली गेली होती. प्रत्येक घराच्या चालीरीती, श्रद्धा, सणवार, आहार वेगळ्या होत्या.

आमच्या ख्रिस्ती आणि शेजारच्या मुसलमान घरांत अमुक वारी चुलीवर काय शिजते, याची इतरांना कल्पना असायची. तरीसुद्धा या घरांतील निदान बायांचे तरी दुसऱ्या घरातील थेट स्वयंपाकघरांपर्यंत जाणे-येणे असायचे. ते विशिष्ट वार वगळून इतर दिवशी भाजी-कालवणाची देवाणघेवाण व्हायची. या सर्व घरांतील पुरुषांचे कपडे सारखेच असले तरी महिलांची वेशभूषा मात्र पूर्णतः वेगळी होती. मुसलमान महिला कुंकू लावत नसायच्या, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नसायचे, मात्र इतर बायांप्रमाणे पायांच्या बोटांत चांदीचे जोडवे असायचे. माळी कुटुंबातल्या बाया कपाळावर आडवे कुंकू लावायच्या, तर माझी आई आणि शेजारची मराठा बाई गोल कुंकू लावायची. वेगवेगळ्या जातीधर्माच्या असल्या तरी या सर्व बाया डोक्यावर पूर्ण पदर घ्यायच्या. दिवाळीला हिंदू कुटुंबांतून सर्व शेजाऱ्यांना फराळाचे ताट जायचे, ईदला मुसलमान घरांतून शिरकुर्माच्या वाट्या आणि कटोऱ्या जायच्या आणि नाताळाला आमच्या घरातून सर्वांना फराळाचे ताट जायचे. त्यात दिवाळीसारखेच म्हणजे करंज्या, अनारशे शेव वगैरे पदार्थ असायचे.

दर महिन्यातून काही दिवस शेजारच्या माळी-मराठा घरांतील बाया ‘बाहेर बसायच्या’, म्हणजे तसे त्या एकमेकींना सांगायच्या तेव्हा ते कानावर पडायचे. त्या दिवसात त्या बाया घरांत स्वयंपाक करत नसत. सर्व घरकामांतून त्यांना सुट्टी मिळत असे. कारण त्या ‘विटाळशी’ आहेत असे सांगितले जाई. आमच्या घरात आणि शेजारच्या मुस्लीम कुटुंबांत मात्र असा प्रकार नसायचा. आमच्या घरात दोन वहिनी, थोरली बहीण होती. मात्र विशिष्ट दिवसांत जुन्या सुती रंगीबेरंगी पातळांपासून बनवलेल्या मोठ्या रुमालाच्या आकाराची फडकी दोरीवर उन्हात वाळायला टाकली जायची. अमुक मुलीला ‘पदर आला’ असे संभाषण यायचे. त्या काळात शाळांत लैगिक शिक्षण हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे मी दहावीच्या परीक्षेनंतर घर सोडले, तेव्हापर्यंत हा काय प्रकार आहे, हे कळालेच नव्हते. नंतरची अनेक वर्षे म्हणजे लग्न होईपर्यंत सडाफटिंग असताना मुलांच्या हॉस्टेलात, लॉजमध्ये कॉट बेसिसवर किंवा इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर भाड्याचे घर शेअर करताना महिलांचे काही विशेष प्रश्न असतात याची कल्पनाच नव्हती.

औरंगाबादमध्ये ‘लोकमत टाइम्स’मध्ये रुजू झालो, तेव्हा माझा एक बातमीदार सहकारी आलम मुस्तफा याच्याबरोबर दर शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान शहरातील मशिदीत नमाज पढण्यासाठी जात असे. क्राईम रिपोर्टर असलेला आलम तसा खूपच बेडर आणि तितकाच आक्रमक असल्यामुळे माझ्यासारखी परधर्मी व्यक्ती मशिदीत आल्यामुळे कुणी काही गडबड केली, तर तो परिस्थिती योग्य प्रकारे हाताळेल याची मला पूर्ण खात्री होती. मात्र तसा प्रसंग कधीही आला नाही. मशिदीत गेल्यावर तिथल्या वाहत्या नळावर आलम हातपाय धुई, तसे मीही करत असे. नंतर डोक्यावर रुमाल पांघरून आलमकडे पाहत नमाजाच्या सर्व कृती मी करत असे. हे करताना आपण काही धर्मद्रोह करतो आहे किंवा कुणाच्या भावना दुखावतील असे करतो आहोत, असे आलमला किंवा मला चुकूनही कधी वाटले नाही.

त्यावेळी आलमबरोबर नमाज पढताना मला एक गोष्ट खटकायची. ती म्हणजे त्या मशिदीत शंभर-दीडशे भाविकांमध्ये एकही महिला नसायची! चर्चमध्ये वेगवेगळ्या वयोगटाच्या महिला अगदी अपरिचित पुरुषांबरोबर बाकांवर दाटीदाटीने बसत असतात. त्यामुळे मशिदीतील महिलांची ही अनुपस्थिती मला प्रकर्षाने जाणवायची.

आपल्यापैकी बहुतेकांना दुसऱ्यांच्या, अगदी आपल्या मित्रांच्या धर्मस्थळांबद्दल, तेथील रीतीरिवाजाविषयी काहीच माहिती नसते. या धर्मस्थळांत इतरधर्मियांना किंवा महिलांना प्रवेश असतो की नाही, प्रवेश असल्यास काय रीतीरिवाज पाळायचे याची माहिती नसते. महिलांना धर्मस्थळांत प्रवेश आहे का, असल्यास, पुरुष आणि महिला शेजारीशेजारी बसू शकतात की, नाही याची माहिती नसते. बहुतेक धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये चपला, बूट बाहेर काढावे लागतात, मात्र जिथे बसण्यासाठी बाके असतात, त्या चर्चमध्ये हा नियम नसतो. मशिदीत आणि गुरुद्वारात शिरताना बोडक्या डोक्याने न जाता डोक्यावर रुमाल व टोपी असावी लागते. याउलट पाश्चिमात्य शिष्टाचारानुसार चर्चमध्ये शिरताना टोपी, हॅट वगैरे काढावी लागते. 

मला आठवते, माझ्या लहानपणी ग्रामीण महाराष्ट्रात ख्रिस्ती भाविक मोठे पागोटे वा गांधी टोपी घालून चर्चमध्ये शिरायचे. त्यावेळी इतर लोक करत असलेल्या टोपी, पागोटे काढून ठेवण्याच्या खाणाखुणामुळे त्यांचा मोठा गोधळ उडत असे.

माध्यमिक शाळेत असताना रविंद्रसिंग धुप्पड नावाचा माझा एका जिवलग मित्र होता. त्या कारा वर्षांत आम्हा दोघांचेही एकमेकांच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. त्यांच्याकडे दुधदुभते भरपूर असायचे. त्यामुळे दर आठवड्याला त्याची आई आमच्याकडे ताकाचे मोठे पातेले पाठवत असे. मात्र धुप्पडबरोबर गुरुद्वारात जाण्याचा कधी योग आला नाही. 

युएनआय वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी जाल खंबाटा यांची दिल्लीहून गोव्यात बदली झाली, तेव्हा आमची चांगली गट्टी जमली होती. तेव्हा गोव्याचे नायब राज्यपाल के. टी. सातारावाला हे पारशी असले तरी पणजीत आगियारी नव्हती. त्यामुळे पारशी मंदिराची फारशी माहिती मिळाली नाही. नंतर कळाले की, केवळ पारशी असलेल्या व्यक्तींनाच आगियारीत प्रवेश असतो.

बुद्धविहारात जाण्याचा, नातेवाईक आणि सहकारी पत्रकार मित्रांचे बुद्ध धर्मपद्धतीने होणाऱ्या लग्नसमारंभात हजर राहण्याचा योग अनेकदा लाभला आहे. पुण्यातील अनेक पत्रकारमित्रांनी माझ्या लग्नाच्या वेळी पहिल्यांदाच चर्चमध्ये प्रवेश केला होता आणि तेथील प्रार्थना कशा होतात हे पाहिले होते.

महाराष्ट्रीयन, मल्याळी आणि तामिळ महिला चर्चमध्ये डोक्यावर पदर किंवा दुपट्टा, ओढणी घेतात, मात्र ख्रिस्ती चर्चमध्ये भिन्नभिन्न संस्कृतीचे भाविक असल्याने हे बंधनकारक नसते. नाताळ सणाच्या वेळी आणि नूतन वर्षारंभाच्या मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनेला अनेक बिगरख्रिस्ती लोक मोठ्या संख्येने चर्चमध्ये कुतूहल वा औत्सुक्य म्हणून हजर असतात. त्याबद्दल कुणाचा काही आक्षेप नसतो. यावेळी धर्मगुरू फक्त जाहीर करतात की, कम्युनियन हे सांक्रामेंत (स्नानसंस्कार) किंवा ख्रिस्तप्रसाद हा केवळ ख्रिस्ती भाविकांसाठीच आहे, इतरांनी कृपया पुढे येऊ नये. तरीही कुणी पुढे आल्यास धर्मगुरू त्यांच्या कपाळावर आशीर्वादाची खूण करून पुढच्या भाविकास ख्रिस्तप्रसाद देतात.

औरंगाबादमध्ये असताना एका ज्येष्ठ धर्माचार्यांच्या एका धार्मिक समारंभास आणि पत्रकार परीषदेला मी हजर होतो. कार्यक्रम संपल्यानंतर धर्माचार्यांच्या शिष्यांनी तेथे जमलेल्या महिलांनी त्यांच्याजवळ येऊ नये, त्यांना स्पर्श करू नये धर्माचार्यांभोवती कडे केले होते. अशा कडेकोट बंदोबस्तात स्वामीजी आपल्या गाडीपाशी आले आणि मार्गस्थ झाले. महिला म्हणजे मोक्ष मार्गातील धोंड ही यामागची एक भावना. 

यासंदर्भात एका बोधकथा आठवते. एक स्वामीजी आपल्या शिष्यपरिवाराबरोबर नदीकाठी आले, तेव्हा एका सुंदर तरुण स्त्रीने त्यांना नदीच्या दुसऱ्या काठावर नेण्याची विनंती केली. स्वामींनी तिला खांद्यावर घेऊन नदीपार केली आणि आपल्या मार्गाने चालू लागले. तेव्हा एका शिष्याने त्यांना म्हटले की, एक संन्यासी असताना तुम्ही त्या तरुणीला खांद्यावर कसे घेतले? स्वामीजी हसले आणि म्हणाले, “त्या तरुणीला मी खांद्यावरून कधीच जमिनीवर ठेवले आणि विसरलोसुद्धा. तुझ्या मनातून मात्र ती अजूनही गेलेली दिसत नाही.”

विश्वामित्राच्या कठोर तपस्येचा भंग मेनका या अप्सराने केला ही गोष्ट आपण विसरू शकत नाही. दुसऱ्या एका धर्माचार्याच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेली त्यांची व्रते आणि नियम मला अजूनही आठवतात- “कुठल्याही वयाच्या महिलांना आम्ही कधीही स्पर्श करत नाही. अगदी नुकतेच जन्मलेले बाळ मुलगी असेल तरीही आम्ही त्या अर्भकाला हात लावत नाही. ब्रह्मचर्याचे इतके कठोर व्रत आम्ही पाळतो.”

पंतप्रधान इंदिरा गांधींनाही कुठल्याशा प्रार्थनास्थळांत शिरण्यास परवानगी नाकारण्यात आली होती असे आठवते. मात्र त्यांनी या प्रकरणाचा फारसा बाऊ केला नव्हता. ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक पंथांतही धार्मिक व्रत स्वीकारलेल्या महिलांना म्हणजे नन्सना पौराहित्याचे म्हणजे चर्चमध्ये मिस्साविधी करण्याचे, बाप्तिस्मा करण्याचे, लग्न लावण्याचे कुठलेही अधिकार नसतात. पाश्चिमात्य देशांत ख्रिस्ती धर्मगुरूंची संख्या वेगाने रोडावत असली तरी नन्सना पौराहित्याचे अधिकार नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता कमीच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मांत असलेल्या विटाळासंबंधीच्या शिवाशिवीविषयी आपल्या ‘बहिष्कृत भारत’मध्ये लिहिले आहे. मासिक ऋतूच्या काळात स्त्रियांना यहुदी आणि पारशी धर्मांत अस्पृश्य किंवा विटाळशी मानले जात असे त्यांनी म्हटले आहे. मात्र ही अस्पृश्यता तात्पुरती, तात्कालिक असते, हिंदू धर्मातील अस्पृश्यतेच्या प्रथेप्रमाणे जन्माधारित आणि कायम स्वरूपाची नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले आहे. ‘बायबल’मध्येही बारा वर्षे रक्तस्त्रावाचा विकार असलेल्या आणि त्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या स्त्रीने येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या काठाला गुपचूप स्पर्श केला आणि ती तत्क्षणी बरी झाली असा उल्लेख आहे.

सध्या केरळच्या शबरीमाला मंदिरात मासिक पाळी येण्याच्या वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यावरून रणकंदन माजले आहे. गेल्या शतकांत पुण्यातील पर्वती मंदिरात आणि नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे आंदोलन, सत्याग्रह झाले होते. अमेरिकेत १९५०च्या दशकांपर्यंत आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांना बसमध्ये गोऱ्या लोकांबरोबर प्रवास करता यावा, मतदानाचे आणि इतर समान नागरी हक्क मिळावेत यासाठी रेव्ह. डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांच्या नेतृत्वाखाली लढा द्यावा लागला होता. त्यात किंग यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. पंढरपुरातील विठोबाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साने गुरुजींना उपोषण करावे लागले होते, याची यानिमित्ताने आठवण झाली. जगातील सर्वच समाजांत लिंगनिरपेक्ष वा इतर कुठलेही भेद नसलेली समानता गाठण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे निश्चित.

.............................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 04 January 2019

कामिल पारखे, चर्चमध्ये गेल्यावर पाश्चात्य रीतीप्रमाणे टोपी काढायला लागते हे वाचून आयशप्पत जाम आश्चर्य वाटलं. खरंतर येशू मध्यपूर्वेत जन्मला तिथं डोक्यावरून वस्त्र घेण्याची प्रथा आहे. येशूपिता जोसेफच्या डोक्यावर कधीकधी वस्त्र नसतं, पण माता मेरीच्या डोक्यावर असतंच. चर्चला कधी गेलात तर तिथल्या पाद्र्यास विचारून पहा. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......