गांधींकडून… आंबेडकरांकडे!
सदर - गांधी @ १५०
वनश्री वनकर
  • लेखिका आपल्या स्वातंत्र्यसेनानी आजोबांसह
  • Wed , 02 January 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar

चालू वर्षं हे म. गांधी यांचं १५०वं जयंती वर्ष आहे. त्यानिमित्तानं २०१७पासून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींबद्दलचा एक लेख प्रकाशित केला जातो. ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे लेख प्रकाशित होतील. या मालिकेतला हा पस्तिसावा लेख...

.............................................................................................................................................

पांडुरंग गोसावी हे माझे आजोबा स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांचा जन्म १९२४चा. त्यांचं संपूर्ण आयुष्य सेवाग्राममध्ये गेलं. तेच ते, जिथं गांधींचा आश्रम आहे. १९३६ ते १९४८ या काळात गांधीजी तिथं वास्तव्याला होते. संपूर्ण वर्धा जिल्हाच तसा गांधीवादी आहे. त्यामुळे या शहराची बांधणी, रचना व राहणीमान यावर गांधीविचारांचा प्रचंड पगडा आढळतो.

सेवाग्राममधील बापूकुटीत अनेक उपक्रम चालतात. अजूनही नित्यनियमानं त्या सर्व दिनचर्या पाळल्या जातात, ज्या कधी काळी गांधींनी सुरू केल्या होत्या. अनेक विदेशी अभ्यासक व विचारवंत तिथं रहिवासी म्हणून येतात. नेत्यांचं व अभिनेत्यांचं आगमन सतत होत असतं. पण या पलीकडची सेवाग्रामची खरी माहिती सद्यस्थितीत कुठेही उपलब्ध नाही. आश्रमापासून केवळ २०० मीटर अंतरावर सेवाग्रामातल्या सामान्य लोकांची वस्ती आहे. जिथं गांधींचा गंध नाही, जिथं गांधी आढळत नाहीत, आढळतात ते आंबेडकर!

यामागे एक हृदयस्पर्शी इतिहास आहे. माझे आजोबा ९५ वर्षांचे आहेत. सहा फूट उंची, पाठीचा ताठ कणा आणि आजही त्यांची शबनम बॅग घेऊन रुबाबात चालतात. भारत सरकारनं त्यांना स्वातंत्र्यसेनानी व राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित केलंय. पण गांधींच्या आश्रमात जडणघडण होऊनही गांधीवाद नाकारून आंबेडकर उराशी घेणारा ही कदाचित पहिलीच व्यक्ती असावी!

आजोबांना गांधी, कस्तुरबा, नेहरू, राजेंद्रप्रसाद, जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधी, जमनालाल बजाज यांचा सहवास लाभला, मात्र आंबेडकरांविषयी बोलताना ते आजही इतिहासात रमतात. दलितांच्या घरी जन्माला आल्यानं सावकाराची गुरं रानात चरायला नेणं आणि मित्रांसोबत संपूर्ण रान पालथं घालणं हा त्यांचा नित्यनियम होता. त्यातच एकदा एका टांग्यानं त्यांना आश्रमाकडे जाण्याचा रस्ता विचारला. त्यात जयप्रकाश नारायण बसलेले होते. ती भेट आजोबांना आश्रमाशी जोडणारी साखळी ठरली. आणि त्यांची तालीम सुरू झाली. चरख्यावर सूत कातणं, स्वयंसेवी बनणं, प्रार्थनासभा घेणं ही कामं आश्रमात चालत असत. सूत कातण्याच्या स्पर्धेसाठी आजोबांना राजेंद्रप्रसादांच्या हातून सन्मानदेखील प्राप्त झाला होता.

त्या दरम्यान, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार एक वळण आलं. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची सेवाग्राममधील वस्तीला भेट! दिवस होता १ मे १९३६. गांधीजींनी बाबासाहेबांना सेवाग्राम भेटीचं आमंत्रण दिलं होतं. या भेटीच्या मागे काही उद्दिष्ट होतं, ते जाणून घेण्यासाठी इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. दलितांच्या प्रश्नासंदर्भात बाबासाहेबांचा आणि गांधींचा दृष्टिकोन एकमेकांपासून पूर्णतः विभिन्न होता. १८८५ मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्या वेळच्या काँग्रेसचे दोन मुख्य विभाग होते. एक राजकीय सुधारक व दुसरा समाजसुधारक. पण कालांतरानं पक्षातील उच्चवर्णीय कार्यकर्त्यांमुळे ‘समाजसुधारक’ हा विभाग गाळून टाकण्यात आला. त्या कार्यकर्त्यांपैकी एक होते बाळ गंगाधर टिळक. १९२० पर्यँत समाजपरिवर्तनाचे कुठलेही प्रयत्न पक्षाकडून झाले नाहीत. टिळकांच्या मृत्यूनंतर काँग्रेसची संपूर्ण सूत्रं गांधींच्या हातात आली, परंतु दलितांच्या विषयावर लक्ष देण्याची गरज गांधींना तीन गोलमेज परिषदांनंतर वाटली... जेव्हा १९३२ मध्ये रॅमसे मॅकडोनल्ड यांनी जातीय निवाड्याची घोषणा केली. या प्रसंगानंतर गांधींनी दलितांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघायला सुरुवात केली. देशातील लोकसंख्येचा खूप मोठा तपका - ज्याला ते ‘हरिजन’ म्हणत - आता दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही, याची त्यांना जाणीव झाली.

त्यानंतर गांधींची पुण्यातील येरवडा तुरुंगात रवानगी झाली. त्यादरम्यानच बाबासाहेबांना स्वतंत्र मतदार संघाऐवजी जातीय आरक्षणावर तडजोड करावी लागली. बाबासाहेबांनी ‘पुणे करारा’वर सह्या केल्या, मात्र ते दलितांच्या हक्कांचा विषय सोडणार नाहीत, हे गांधी जाणत होते.

बाबासाहेब हिंदूंच्या धार्मिक संकल्पनांच्या विरोधात होते, कारण भारतातील धर्म संस्था हीच वर्णव्यवस्था व जातीनिर्मित शोषणाला कारणीभूत आहेत, असं त्यांचं परखड मत होतं. गांधीही हे उघडपणे मान्य करत, की बाबासाहेब हिंदू धर्माची अडचण निर्माण करताहेत. या वैचारिक मतभेदांना कुठे तरी विराम मिळावा, या दृष्टिकोनातून गांधींनी आंबेडकरांना सेवाग्राम भेटीचं आमंत्रण दिलं होतं.

गांधींच्या आमंत्रणाचा मान राखून बाबासाहेब सेवाग्रामाला आले, मात्र आश्रमात जाण्याआधी त्यांनी दलितांच्या वस्तीला भेट दिली. बाबासाहेबांच्या येण्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणांत सारा गोतावळा त्यांना ऐकायला जमा झाला. बाबासाहेबांचं वर्णन करताना आजोबा सांगतात, गावातील दलित-शोषित वर्गाला असं वाटत होतं की, बाबासाहेब आता त्यांच्या दुःखाचं सांत्वन करतील, सहानुभूती देतील. मात्र चित्र काही वेगळंच होतं. टांग्यातून उतरणारा तो माणूस प्रचंड वेगानं लोकांपर्यंत चालत आला. विठ्ठलाच्या मंदिरासमोर निंबाच्या झाडाखाली एका दगडावर बसला. ताठ कणा, स्वच्छ कपडे, डोळ्यात विद्वत्तेचा प्रखर आत्मविश्वास, बोलण्यात कणखरपणा व चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज असणारा तो क्रांतिसूर्य म्हणाला, “तुमच्या मुलांना शाळेत घाला, ही माझी विनंती नाही तर हट्ट आहे. ही लढाई सोपी नाही. आपल्याला खूप संघर्ष करावा लागणार आहे. लाचारीचं जगणं सोडा, स्वाभिमानानं जगा. स्वतःचे उद्धारकर्ते स्वतःच व्हा. इथं कुणीही तुम्हाला सावरायला येणार नाही.” हे सर्व बोलताना दगडावर बसलेल्या त्या प्रज्ञासूर्याचा रूबाब एखाद्या राजालाही लाजवेल असा होता!

या प्रसंगानंतर आजोबांवर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा वाढत गेला. आश्रम सुटलेला नव्हता, तालीम सुरूच होती. मात्र बाबासाहेबांच्या विचारांचा ज्वालामुखी मनात खदखदत होता. गांधींची विचारधारा दान, सेवा व सहानुभूती या मार्गानं जाणारी होती. याउलट आंबेडकरांचा कल स्वाभिमान, जातिउच्चाटन व बुद्धाच्या मार्गानं जाण्याचा होता. दान व सहानुभूती यांचा बाबासाहेबांनी प्रखर विरोध केला. या विचारांतूनच आजोबांना टीकात्मक विचार करण्याचा दृष्टिकोन मिळाला. जातिनिर्मूलन व जातिउच्चाटन यातला फरक त्यांना कळू लागला. तालमीची सुरुवात जयप्रकश नारायण यांच्यापासून झाली असली तरीही आंबेडकरांनी जयप्रकाशांची ‘धर्मादाय संस्था’ (Charitable trust) ही संकल्पना का नाकारली, हे आता त्यांना समजू लागलं. या वैचारिक परिवर्तनामुळे आजोबांनी आश्रमातील ‘हरिजन पेटी’ काढून फेकली आणि त्या जागी नवीन पेटी बसवली. तिला ‘दानपेटी’ असं नाव दिलं. आता त्यांच्या कल तालमीकडून शिक्षणाकडे वळू लागला होता.

लहानपणापासून तारुण्यापर्यंत गांधींच्या तालमीत वाढलेली व्यक्ती, सहानुभूती नाकारून स्वाभिमान पत्करेल, एवढं सामर्थ्य केवळ बाबासाहेबांच्याच शब्दांत असू शकतं. त्यांना पूर्णपणे स्वीकारण्याच्या एक महत्त्वाचा प्रसंग आजोबांच्या आयुष्यात घडला. या प्रसंगानं संपूर्ण सेवाग्रामचाच पुनर्जन्म झाला, असं म्हणायला हरकत नाही. १९५६ ला बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि इकडे आजोबांनी ज्या मंदिरासमोर बाबासाहेबांनी शिक्षणाचा संदेश दिला, त्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती काढून रातोरात बुद्धाची मूर्ती बसवली. ते प्रबुद्ध भारताकडे जाण्याचं सेवाग्रामचं पहिलं पाऊल ठरलं. संपूर्ण जगभरात गांधींचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राममध्ये गांधी नसून आंबेडकर वसतो, याची नोंद सध्यातरी कुठेही मिळणार नाही. 

त्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात…

सहानुभूतीकडून... स्वाभिमानाकडे!

तालमीकडून... शिक्षणाकडे!!

गांधींकडून… आंबेडकरांकडे!!!

 

लेखिका वनश्री वनकर TISS (मुंबई) या संस्थेत दलित आणि आदिवासींचा अभ्यास या विषयांत एम.ए. करत आहेत.

vanshree.vankar111@gmail.com

 

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 04 January 2019

काय हो बनुताई, तुम्ही म्हणता की लोकमान्य टिळक व काही उच्चवर्णीयांनी काँग्रेसमधला समाजसुधारक हा विभाग गाळून टाकला. तर मग काँग्रेसमधले मवाळपंथी टिळकांना तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणून का बरं हिणवीत होते? टिळकांच्या नावाने बोंबा मारण्यापूर्वी जरा इतिहास चाळून घ्यायला शिका. आणि काय हो, टिळकांनी जसा इंग्रजांविरुद्ध राजकीय संघर्ष केला तसा आंबेडकरांनी केला नव्हता. आंबेडकर एक मिनिटभरही स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी नव्हते. याउलट गांधींनी तोंडदेखला का होईना इंग्रजांशी संघर्ष केला. तर मग गांधीटिळकांसोबत आंबेडकरांची तुलना करणे सर्वथैव चुकीचं आहे. दोन्ही कंपूंची उद्दिष्ट विभिन्न होती. त्यांना ठोकळेबाज पद्धतीने मापून काय थोर निष्कर्ष निघणार आहे? शिवाय आंबेडकरांच्या दैवतीकरणाचा मुद्दा एका वाचकाने उपस्थित केला आहेच. तेव्हा नक्की काय सांगायचंय ते नीट ठरवा, आणि मगंच लेख लिहा. आपला नम्र, -गामा पैलवान


Satya K

Wed , 02 January 2019

मनुवादी विचारसरणीला एका कोपऱ्यात रेटायचे असेल तर आंबेडकरी विचारसरणी शिवाय पर्याय नाही. गांधीवाद हा नेहमीच मनुवादाला पोषक ठरलाय.


Samar Vaidya

Wed , 02 January 2019

Thanks we got new knowledge That's true dignity and pride is always better than pity, compassion.


ranjeet chavan

Wed , 02 January 2019

सुनील आपण आणि आपल्या मनोवृत्ती फक्त शब्द चा किस काढणे हा आहे पण काय करणार आपली पोटदुखी समझु शकतो


?? ??????????

Wed , 02 January 2019

मी काही दलित चळवळीचा अभ्यासक नाही, पण डाॅ. आंबेडकर हे व्यक्तिपूजा व दैवतीकरणाच्या विरोधात होते असे मी एेकले आहे. या लेखात लेखिकेने, आंबेडकर बसलेल्या दगडाचे जणू सिंहासनच झाले असे म्हणले आहे. सिंहासन म्हणजे देवांचें आसन. म्हणजे एक प्रकारे हा दैवतीकरणाचा प्रकार नाही का ? लेखिकेला गांधिजी ( father of the nation) आणि टिळक (father of indian unrest) यांच्याबद्दल विशेष ज्ञान नाही हे कळलेच पण जेव्हा तिने सिंहासन वगैरे शद्ब वापरले तेव्हा तिला डाॅं. आंबेडकरांचे विचार तरी कळले आहेत की नाही अशी शंका येते.... असो या लेखाबद्दल विशेष काही बोलण्यासारखे नाही. लेखाचे शिर्षक तर misleading आहे. शिर्षक वाचून लेख गांधीवाद/ आंबेडकरवाद याबद्दल काही चांगले वाचायला मिळेल असे वाटले. पण प्रत्यक्षात मात्र लेखिकेने आपले आजोबा कित्ती...कित्ती ग्रेट आहेत हेच दाखवायचा प्रयत्न केला आहे असे वाटले आणि हे करतानासुद्धा लोकमान्य टिळकांवर बिनबुडाचे आरोप करून कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले. आपल्या आजोबांनी स्वांतंत्र्यसेनानी म्हणून काय कामगिरी केली, दलितांच्या उद्धारासाठी काय केले हि माहीती वगैरे लेखिका देतील असे वाटले. पण लेखात मात्र आजोबांनी पेटी काढून कशी फेकली, रातोरात मंदिरातील मूर्तीं कशी काढली याचीच उदा. दिली आहेत. मागे १९५० च्या आसपास VHPने पण अयोध्येला रामलल्लाची मूर्तीं वादग्रस्त जागेत आणून बसवली होती, त्याची आठवण झाली. व मनात प्रश्न आला की लेखिका रामलल्लाची मूर्तीं बसवणारया त्या VHP कार्यकर्त्याला पण ग्रेटनेस सर्टिफिकेट देतील का ? कि संप्रदायवादी म्हणून त्याचा निषेध करतील ?


Sunil Gamre

Wed , 02 January 2019

Great


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......