अजूनकाही
कितीही उदार दृष्टिकोन ठेवला तरी २०१८ या वर्षाचा लसाविमसावि काही फारसा चांगला नाही. हे वर्ष १९४७, १९७५, १९८४, २००२ या वर्षांसारखे सामान्य भारतीय माणसांच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर घाला घालणारे नसले तरी, या वर्षांतही काही सामान्य माणसं, विशेषत: अल्पसंख्याक माणसं मारली गेलीच. सामान्य माणसांच्या भावी पिढ्या ज्या शिक्षणसंस्थांच्या जोरावर उद्या शिकल्या-सवरल्या असत्या, त्या संस्थांमध्ये अनागोंदी माजवली गेली. त्यातल्या काहींना बदनाम ठरवले गेले, तर काहींचा इतिहास व अभ्यासक्रम विकृत करण्याचे प्रयत्न केले गेले. त्यामुळे असे वर्षं भारतीय जनतेच्या वाट्याला पुन्हा येऊ नये. ते त्याच्या मानगुटीवर बसू नये, यासाठी या वर्षाचा लवकर ‘दहावा’ घातलेला चांगला. भारतीय संस्कृतीमध्ये माणसाचा दहावा कसा घालावा, याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. ती आधी समजून घेऊन नंतर या वर्षाचा त्यानुसार दहावा घालायला हरकत नाही.
.............................................................................................................................................
१. दशक्रिया विधी करण्यामागील हेतू
व्यक्ती मृत्यु पावल्यानंतर तिचे आप्तबांधव पिंडदान करतात. या विधीला दशपिंडविधी, दशक्रियाविधी वा सामान्य लोक ‘दहावा’ म्हणतात. आप्तबांधवांनी पिंडदान केल्याने व पिंडदान न केल्याने काय होते ते जाणून घेताना प्रभु श्रीरामचंद्र म्हणतात, की आप्तबांधवांनी पिंडदानादि क्रिया केल्यामुळे यमलोकांत जाण्यासाठी जीवाला एक नवा पांथदेह प्राप्त होतो. त्यानंतर, मला पिंड देण्यात आला आहे अशी ज्या जीवाची भावना झाली असेल, त्याला जरी पिंड देण्यात आलेला नसला तरीही त्याला पिंडदानाचे फल जो पांथदेह तो प्राप्त होतो, असेही श्रीवसिष्ठांनी म्हटले आहे. (श्रीयोगवासिष्ठ, भाग १, पृष्ठ क्र. २८२, प्रथमावृत्ति, यशवंत प्रकाशन, पुणे ३०) पांथदेहाने यमलोकात गेल्यानंतर जीवाने केलेल्या कर्मांचा परिपाक म्हणून त्यास वृक्ष, जलचर, किडा, पक्षी, पशु व मानव यांपैकीचा कोणता जन्म वा देह मिळणार याचा निर्णय होत असतो. अशा प्रकारे त्या जीवाचे लक्षावधी जन्म व मृत्यु होत राहतात. अर्थात, तो जीव मुक्त होत नसतो.
मुक्त होऊन राहणे व जाणे हे मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय होय. या ध्येयाचे स्मरण रहावे म्हणून दशक्रियाविधी या और्ध्वदेहिक संस्काराची रोजना समाजात चालू आहे.
२. आपला दशपिंडदान विधी आपणच करावयाचा असतो
प्रत्येक मनुष्याला दशपिंड म्हणजे दहा देह असतात. त्यांच्याविषयीचे मी-माझेपण सोडून दिल्यानंतरच व्यक्ती मुक्त होत असते, असे ‘जोंवरि निरसिला नाही देहें । तोंवरी अवघे संसारिक ॥’, या अभंगचरणातून श्रीतुकारामांनी सूचित केले आहे. अर्थात, आपल्या दहाही देहांचे निरसन केलेले नसते, तोपर्यंत व्यक्ती संसारिक असते. याउलट, आपल्या दहाही देहांचे निरसन केले की, व्यक्ती संसारपाशातून म्हणजे जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होत असते.
दश देहांपैकीचा प्रत्येक देह म्हणजे ‘मी नव्हे’, त्यांचे आहे तसे माझे स्वरूप नाही (न इति) अशी क्रमश: खात्री होते, तेव्हा त्या सर्व नाशिवंत देहांबद्दलची आसक्ती लय पावते म्हणजे, श्रीतुकारामांच्या भाषेत, त्यांचे निरसन होते. अशा प्रकारे, आपल्या दश देहांचे निरसन करणे म्हणजे दशपिंडदानविधी वा दशक्रियाविधी करणे होय. अर्थात. आपला दशक्रियाविधी आपण स्वत:च करून मुक्त व्हावयाचे असते; आणि, देव पहावयासी गेलेले श्रीतुकाराम जसे देवच होऊन राहिले व गेले तसे आपणही देवच होऊन राह्यचे व जायचे असते.
म्हणूनच, काही आत्मतत्त्वज्ञानी सत्पुरुषांनी (उदा. श्रीरामदासस्वामी, श्रीदिनकरस्वामी व आद्यकवी श्रीमुकुंदराज यांनी अनुक्रमे ‘दासबोध’, ‘स्वानुभवदिनकर’ व ‘विवेकसिंधु’ या ग्रंथांमध्ये) आपल्या दहा देहांचे स्वरूप व त्यांचे निरसन करावयाची सानुभव ज्ञानयुक्त रीत सांगून ठेवली आहे. ती क्रमश: थोडक्यात पाहूयात.
३. मनुष्याचे दहा देह व त्यांचे निरसन करण्याची रीत
मनुष्य-शरीराचे दोन भाग आहेत. पायाच्या अंगठ्यापासून भूमध्यापर्यंतच्या भागाला ‘पिंड’ म्हणतात, तर भूमध्यावरच्या मस्तकाला ‘ब्रह्मांड’ म्हणतात. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे पिंडातील चार देह आणि विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळमाया हे ब्रह्मांडातील चार देह होत. हेतुक हा नववा देह, तर निर्हेतुक हा दहावा देह होय.
अ) पिंडातील चार देहांचे स्वरूप व त्यांचे निरसन
पिंडातील स्थूलादि चारही देह पंचभूतात्मक असतात.
स्थूल देहाचे स्वरूप
आपले औट म्हणजे साडेतीन हात लांबीचे शरीर म्हणजे आपला स्थूल देह होय. हा देह पृथ्वी, आप, तेज, वायू व गगन या पंच महाभूतांपासून निर्माण झालेला असतो. पंचमहाभूतांचे विशिष्ट प्रमाणात एकत्रीकरण म्हणजे पंचीकरण होऊन स्थूल देहाच्या ठिकाणी अस्थि, मांस, त्वचा, नाडी व रोम; लाळ, मूत्र, वसा (अंत:त्वचा), रक्त व मज्जा; क्षुधा, तृषा, आळस, निद्रा व मैथुन; चलन, वलन, प्रसारण, आकुंचन व निरोधन आणि काम, क्रोध, शोक, मोह व भय ही पंचवीस लक्षणे निर्माण झालेली असतात.
सूक्ष्म देहाचे स्वरूप
आपला सूक्ष्म देहदेखील पंचमहाभूतांच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त व अहंकार; व्यान, समान, उदान, प्राण व अपान; श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा व नाक; वाचा, हात, पाय, शिश्न व गुद आणि शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या एकूण पंचवीस तत्त्वांचा झालेला असतो.
कारण देहाचे स्वरूप
स्थूल व सूक्ष्म हे देह म्हणजेच मी असे समजणे हे अज्ञान होय. स्वरूपविषयक अज्ञान म्हणजेच कारणदेह होय. कारणदेह हा स्थूल व सूक्ष्म या दोन्ही देहांचे कारण होय. अज्ञानस्वरूप कारणदेहाच्या ठिकाणी मद, मत्सर, दंभ, कृत्रिमत्व व अनित्य; उन्माद, वासना, वांछा, चिंता व चेष्टा; निद्रा, मरण, अभिलाष, भ्रम व विस्मरण; करुणा, कल्पना, भ्रांती, प्रमाद व अनर्थ आणि अवकाश, अज्ञान, अविवेक, वंचन व मुर्च्छा या पंचवीस लक्षणांचा अनुभव येत असतो.
स्थूल, सूक्ष्म व कारण या तिन्ही देहांचे निरसन
स्थूलादि तिन्ही देहांच्या उपरोक्त सर्व लक्षणांमध्येच जाणीव गुंतून राहिल्याने म्हणजे ‘हे देह म्हणजेच मी’ असे म्हणत सुखदु:ख अनुभवत राहिल्याने ‘मी आत्मा आहे’ असे ज्ञान होत नाही. म्हणून, कारणदेह हा अज्ञानात्मक होय. कारणदेहाची सुषुप्ती ही अवस्था होय; तर, स्थूलदेहाची जागृती व सूक्ष्मदेहाची स्वप्न ही अवस्था होय. योगसाधना म्हणजे ध्यान करीत जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे गेल्यावर जीवाला तुर्या अवस्था प्राप्त होते व तिन्ही देहांचे निरसन होते. परिणामी, ‘मी महाकारण देह आहे’, असे अनुभवास रेते.
महाकारण देहाचे स्वरूप
महाकारण हा पिंडातील चौथा देह होय. मी स्थूलादि तिन्ही देहांहून वेगळा म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, असे जे सानुभव स्मरण ते महाकारण देहाचे स्वरूप होय. महाकारण देहाची तुर्या ही अवस्था होय. श्रीसद्गुरुकृपेने साधकाला ज्ञानदृष्टी लाभली, की गीतेत म्हटल्याप्रमाणे, जीवरूपी मी अज, अदाह्य, अक्लेद्य, अशोष्य; असंग, अछेद्य, ज्योतिर्मय, अमर आहे, असा अनुभव येतो.
महाकारण देहाचे निरसन
श्रीसद्गुरुकृपेमुळे साधकास सोऽहंभावयुक्त महाकारण देहाचे ज्ञान होते. नंतर तो सोऽहं-भावही केवळ साक्षीभावाने, नाऽहंभावाने निरसिला जातो.
अशा प्रकारे, जीवाच्या ठिकाणी स्थूलादि चार ‘देह म्हणजेच मी’ असा जो भ्रम असतो, तो ‘मी आत्मा आहे’ वा ‘मी ब्रह्म आहे’ या साक्षीभावयुक्त ज्ञानामुळे लय पावतो. परिणामी, पिंडातील चारही देहांचे निरसन होते.
ब) ब्रह्मांडातील चार देहांचे स्वरूप व निरसन
विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व महामाया हे ब्रह्मांडातील चार देह होत. अर्जुनाला लाभली तशी श्रीसद्गुरुकृपेने साधकाला दिव्य ज्ञानदृष्टी प्राप्त होते. परिणामी, ब्रह्मांडातील देहांचे ज्ञान व निरसन शक्य होते.
आत्माच पिंडातील ‘स्थूलादि देह म्हणजेच मी’ या भावाने जीव झालेला असतो. तोच ब्रह्मांडातील ‘विराटादि देह म्हणजे मी’ या भावाने ईश्वरत्व पावतो. (ईश्वराला ‘शिव’ असेही संबोधिले जाते.) ईश्वरत्व पावलेला आत्मा ब्रह्मांडातील देह म्हणजेच मी, असे जे समजत असतो, ते स्वरूपविषयक खरे ज्ञान नसते, म्हणजे अज्ञान असते.
विराट देहाचे स्वरूप
श्रीकृष्ण-परमात्म्याने अर्जुनास दाखवलेले विश्वरूप म्हणजे ईश्वरत्व पावलेल्या आत्म्याचा (आपला) विराट देह होय, असे श्रीसद्गुरुकृपेमुळे स्पष्ट होते. मी आत्म्याने हे विश्वरूप धारण केले आहे, असा दिव्य अनुभव सत्शिष्यास येऊ लागतो.
विराट देहाचे निरसन
विश्वरूप किंवा विराट देहदेखील दिव्यज्ञानदृष्टीचा विषय होत असतो. म्हणून तो स्थूल व सगुण होय. जे चर्मदृष्टीने वा ज्ञानदृष्टीने दिसते ते सर्व पंचभौतिक असते, ते स्थूळ असते, ते सावयव म्हणजे साकार असते. विराट देह हे ईश्वराचे मूळ स्व-रूप नसून ते म्हणजे देवकृत अष्टधाप्रकृतिमय एक अवस्था असते. जसे विश्वरूप हे परमेश्वराचे स्वरूप नाही, तसेच परमेश्वराचे अंश असलेल्या आपलेही ते स्वरूप नाही, या ज्ञानाने म्हणजे ‘न इति’भावाने त्याचे निरसन करावयाचे असते. ते करून स्व-रूपप्राप्तीसाठी करावयाच्या प्रवासातील पुढील टप्पा गाठला जातो. अर्थात, मी हिरण्यगर्भ देह आहे, असे जाणवू लागते.
हिरण्यगर्भ देहाचे स्वरूप
हिरण्यगर्भ हा ब्रह्मांडातील दुसरा व आपला सहावा देह होय. आपल्या स्वरूपाविषयी अतिशय सावध व शुद्धभावयुक्त झाले की हिरण्यगर्भ देहाचे ज्ञान होते. विराट देहात जे विविध घटक असतात ते लय पावून देवाची मूर्ती त्याहून विशाल, सुंदर असल्याचा अनुभव येतो. त्याचे मस्तक सुवर्णात्मक असून त्याच्या शरीरात वारू, सूर्य, वरुण, अश्विनीकुमार, अग्निदेव, इंद्र, त्रिविक्रम, प्रजापती व नैऋत्यनाथ या देवता, तसेच शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पंचविषय आणि दहा प्राणही असल्याचे उमगते.
हिरण्यगर्भ देहाचे निरसन
हिरण्यगर्भदेहात गुण, प्राण व महाभूते असतात. त्याला त्यांच्यामुळे स्थिती असते. ज्याला स्थिती असते, त्याला विशिष्ट आकृती असते. हिरण्यगर्भ देह हीदेखील एक सूक्ष्म देहाकृती असल्याचे योगसाधकाला जाणवते. कोणतीही देहाकृती ही मर्यादित व एकदेशीय असते आणि जे एकदेशीय असते ते आत्मरूप नव्हे, म्हणजे ‘मी असा मर्यादित व एकदेशीय नाही’, असे त्यास स्पष्ट होते. परिणामी, हिरण्यगर्भाविषयीचे ममत्व लय पावते म्हणजे त्याचे निरसन होते.
अव्याकृत देहाचे स्वरूप
जिथे त्रिगुण, त्रिगुणांचे भान व पंचभूतेही नाहीत अशी जी सर्व विश्वाची मूलभूत विकृतीरहित (विकाररहित) अवस्था (जी विश्वाच्या आदि व अंतीं अनुभवास येते) तिला अव्याकृत देह म्हणतात. ब्रह्मांडातील शिवस्वरूप आत्मा अष्टधा-प्रकृतिमध्ये बिंबभूत होऊन स्वस्वरूपाला विसरतो आणि ‘अष्टधाप्रकृती म्हणजेच मी’ असे समजू लागतो. असे समजत राहणे हे अज्ञान होय.
अव्याकृत देहाचे निरसन
या स्वरूपविषयक अज्ञानामुळे तमोगुण उद्भवतो. त्यामुळे ‘अव्याकृत देह म्हणजेच मी’ हा भाव शिल्लक असतो. परिणामी अव्याकृत देहाचे ठिकाणी काम, क्रोध, शोक, मोह, मद, लोभ, व भय हे अति सूक्ष्म सात विकार संभवतात. हे विकार अज्ञानस्वरूप असतात. अज्ञान हा आत्म्याचा स्वभाव नाही, असे स्मरण झाले की अव्याकृत देहाचे निरसन होते आणि आपण यानंतरचा ब्रह्मांडातील ‘मूळमाया’नामक आठवा देह आहोत, असे जाणवू लागते.
मूळमाया देहाचे स्वरूप
‘अहं ब्रह्म’ असे स्मरण करणारा ईश्वर हा मूळ पुरुष होय. (हा मूळ पुरुष हे आपले निजरूप वा स्वरूप होय.) स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी ‘अहं ब्रह्म’ असे जे अखंड स्मरण असते, ते मूळमाया या देहाचे स्वरूप होय. ब्रह्मांडातील आत्म्याच्या या अवस्थेला ‘मूळमाया’ देह म्हणतात.
मूळमाया देहाचे निरसन
‘मी ब्रह्म’ या स्फुरणाने किंवा स्मरणाभासामुळे ईश्वर (मूळपुरुष) मूळमायेला अधिष्ठानभूत होतो म्हणजे त्रिगुण व पंचभूते यांना अतिसूक्ष्मरूपाने (अव्यक्तरूपाने) प्रसवण्यास कारणीभूत होतो. त्यामुळे मूळपुरुषही अभिमानी होतो. श्रीसद्गुरुकृपेमुळे ‘अहं ब्रह्म’ हे स्मरणही निःशेष लय पावते, मूळमाया देहाचे निरसन होते आणि मूळपुरुष व मूळप्रकृती हे आपल्या निर्गुणस्वरूपीं मायिक ठरतात. परिणामी ‘मी ब्रह्म’ ह्या स्मरणाचे कारणही उरत नाही, ते मिथ्या ठरते.
क) नवव्या हेतुक व दहाव्या निर्हेतुक देहाचे स्वरूप व निरसन
हेतुक देह व निर्हेतुक देह या दोन विशेष अवस्थांचे निरसन कसे होते ते श्रीरामदास स्वामी यांनी सूचित केले आहे. त्यांच्या ‘दासबोधा’तील त्या काही ओव्यांचा व अभंगांचा भावार्थ थोडक्यात असा आहे -
ब्रह्मांडातील अव्याकृत व मूळमाया (मूळप्रकृति) या देहांवर आपली वृत्ती जाऊन बसते. (म्हणजे ‘ते म्हणजे मी’ असे वाटत राहते.) या मुळात राहिलेल्या वृत्तीची निवृत्ती व्हावी म्हणून नित्यानित्यविवेक केला जातो. त्यामुळे हे अनेक देह अनित्य असून एक आत्माच नित्य आहे, असा निवाडा होतो. पण निवृत्तिरूपाने निर्विकार असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हेतू म्हणजे जाणीव उरते. जाणीव चंचल असते, म्हणून ती सगुण ठरते. याउलट, जे निर्गुण वा निविकार असते ते निश्चल असते, असे लक्षात येते. म्हणून तो हेतुही समूळ सोडून देऊन निर्हेत म्हणजे आपण, संत श्रीज्ञानदेवांनी ‘हरिपाठात’ म्हटल्याप्रमाणे, जाणीवनेणीवरहित (भगवंत) होतो, निर्विकल्प होतो. निर्विकल्प देह हा कल्पनेरहित असून तसे होणे हेच आपले स्वहित म्हणजे स्वस्वरूप होय.
ही अवस्था प्राप्त झालेले महात्मे ‘देहीं असूनही विदेही’ असल्याचे अनुभवीत असतात. तथापि, प्रारब्धावशेषगतिमुळे किंवा परमेश्वराच्या ‘इच्छेमुळे’ त्यांच्या ठिकाणी देहधारी राहण्याचा व भविष्यात देह धारण करण्याचा हेतु शिल्लक राहतो. अशा महात्म्यांची इच्छा असेल तर ते जनोद्धारणार्थ सदेह राहतात; (उदा. ‘उरलो उपकारापुरता’ हा संत श्रीतुकारामांचा अभंग त्यांच्या ‘हेतुक देहाचा’ सूचक आहे.) अन्यथा, पूर्णत: हेतूरहित म्हणजे निर्हेतुक होऊन ते महात्मे परमात्मस्वरूपीं लय पावतात.
सारांश
आपले दहाही देह विश्वनिर्मितीपूर्वीच्या त्या मूळ देवस्वरूपात लय पावले आहेत, देवाला दान करून झाले आहेत, असे अनुभवणे म्हणजे स्वत:च स्वत:चा दशक्रियाविधी वा दशपिंडदानविधी करणे होय. हेच वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, ‘निरसोनी दशदेह । होऊनी राहणे देव ॥’ हा दशक्रियाविधीचा खरा म्हणजे परम अर्थ होय.
.............................................................................................................................................
लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
vijaymaher@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 31 December 2018
सुंदर व अचूक वर्णन! -गामा पैलवान