अजूनकाही
सोमवारी वरदा हे वादळ उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर थडकले. रविवारी संध्याकाळी ते चेन्नईपासून ३३० किलोमीटरवर होते, पण सोमावरी दुपारी ते चेन्नईमध्ये पोहचले, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. त्यानुसार सीमावर्ती भागात रेस्क्यूसाठी नेव्ही आर्म्ड फोर्सेसला तैनात करण्यात आले आहे.
या चक्रीवादळाने या दोन्ही राज्यांत बरेच नुकसान केले आहे. कालपर्यंत त्यात दहा लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पुढे आल्या आहेत. या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाला आहे. दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात अवकाळी पाऊस पडला. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी १४० किलोमीटर प्रती तास होता.
हे वादळ चेन्नईपासून नेल्लोरपर्यंत म्हणजे ९० किलोमीटरपर्यंत पसरले.
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे या भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळाने अनेक झाडे मुळापासून उखडली गेली आहेत. घरांवरील पत्रे, जाहिरातींचे फलक, विजेचे खांब कोसळ्याने वाहतूक ठप्प झाली, तसेच स्थावर मालमत्ता म्हणजे वाहने, इमारती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
किनारपट्टीजवळच्या गावांतून हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुढील ४८ तास मच्छिमारांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असे सरकारने सांगितले आहे. उपनगरी रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. विमानतळ बंद करण्यात आला. आज रेल्वे, रस्ते आणि विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
१९९४नंतर चेन्नई किनारपट्टीवर थडकलेले हे पहिलेच भीषण वादळ होय. या वादळाचा वादळाचा केंद्रबिंदू चेन्नई शहरापासून २० किलोमीटरवर असल्याचे सांगितले जाते.
या वादळाने आतापर्यंत दहा जणांचा बळी घेतला आहे. मृतांच्या नातेवाईकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. खबरदारी म्हणून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
या वादळाचे ‘वरदा’ हे नाव पाकिस्तानने ठेवले. भारताच्या सागरी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वादळांना नाव देताना भारतीय हवामान खातं उपखंडातील आठ देशांशी संपर्क करते. सर्वांच्या संमतीने नाव ठरवले जाते. ‘वरदा’ हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ ‘गुलाब’ असा होतो. National Hurricane Center (NHC) आणि The World Meteorological Organization (WMO) या दोन संस्था १९५३ पासून वादळ, चक्रीवादळ यांची नावे ठरवतात. NHCचे कार्यालय अमेरिकेतील मियामीमध्ये आहे, तर WMOचे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात आहे. WMO ही संयुक्त राष्ट्र संघाची एक शाखा आहे. पण उत्तर हिंद महासागरामध्ये उठणाऱ्या चक्रीवादळांना कुठलेच नाव ठेवले गेले नव्हते. जातीय विविधता असणाऱ्या प्रदेशात बरीच सावधगिरी आणि निष्पक्षता पाळण्याची गरज असल्याने लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून बरीच काळजी घ्यावी लागली.
२००४मध्ये WMOचे मंडळ रद्द करून त्या त्या देशांना आपापल्या प्रदेशात उठणाऱ्या वादळांना नाव देण्याची मुभा दिली गेली. त्यानंतर भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, मालदिव, ओमान, म्यानमार, श्रीलंका, तायलंड या आठ देशांनी एक बैठक घेतली. त्यात त्यांनी ६४ नावांची यादी तयार केली. प्रत्येक देशात येणाऱ्या वादळांसाठी आठ नावे सुचवली गेली. ही यादी प्रत्येक देशाच्या वर्मानुक्रमानुसार आहे. जून २०१४मध्ये आलेल्या वादळाचे ‘नानुक’ असे नाव म्यानमारने ठेवले होते. सदस्य देशही नाव सूचवू शकतात. २०१३मध्ये भारताच्या दक्षिण-पूर्व तटावर आलेल्या वादळाचे ‘पायलॉन’ हे नाव थायलंडने ठेवले होते. याच भागात आलेल्या आणखी एका वादळाचे नाव नीलोफर हे नाव पाकिस्तानने ठेवले होते. या सूचीत भारताने ‘मेघ’, ‘सागर’, ‘वायू’ अशी साधी नावे सुचवली आहेत. २०१३मध्ये श्रीलंकेकडून ठेवल्या गेलेल्या ‘महासेन’ या नावावरून श्रीलंकन राष्ट्रवादी मंडळींनी आक्षेप घेतल्याने ते बदलून ‘वियारु’ असे केले गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार राजा महासेन यांनी श्रीलंकेत शांती आणि समृद्धी प्रस्थापित केली होती. त्यामुळे त्यांचं नाव एखाद्या वादळाला देणं चुकीचं आहे.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment