‘सिम्बा’ : सामाजिकतेचा अट्टाहास आणि मांडणीतील समस्या यांनी ग्रासलेला चित्रपट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘सिम्बा’चं एक पोस्टर
  • Sat , 29 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie सिम्बा Simmba रणवीर सिंग Ranveer Singh सारा अली खान Sara Ali Khan सोनू सूद Sonu Sood रोहित शेट्टी Rohit Shetty

रोहित शेट्टीचा चित्रपट सुरू असताना तर्क वगैरे गोष्टींचा विचार करण्यात अर्थ नसतो. कारण बरीच विस्तृत फिल्मोग्राफी आणि बहुतेक सर्वच चित्रपटांमध्ये तार्किकतेला वाऱ्यावर सोडण्याचा अलिखित नियम, यातून त्याचा चित्रपट तयार होतो. हे चित्रपट ‘हाय ऑन अॅक्शन्स’, तर त्यातील हिरो ‘हाय ऑन स्टेरॉइड्स’ असतात. अशा वेळी तार्किकता बाजूला पडून, समोर दिसणारी मारधाड दृश्यं मनोरंजक असतील तर त्यांचा आनंद लुटणं अपेक्षित असतं. तसं पाहता ‘सिम्बा’ याहून वेगळा नाही. किंबहुना पूर्वार्धातील बहुतांशी भाग हा त्यात शोभून दिसणारा, अगदीच चीअरफुल आणि केवळ ‘आपण रोहित शेट्टीच्या चित्रपटातील हिरो आहोत’ या जाणिवेनेच उत्सुक, उत्साही बनलेल्या रणवीर सिंगच्या परफॉर्मन्समुळे रंजक झालेला आहे.

लहानपणापासूनच त्याच्याच भाषेत सांगायचं तर ‘कमीना’ असलेल्या संग्राम भालेराव ऊर्फ सिम्बाला (रणवीर सिंग) पोलीस अधिकारी बनल्यानं आपल्याला आदर, पैसे आणि एकूण सर्वच सुखसुविधा प्राप्त होतील याची जाणीव झाल्यानं आपल्या डाव्या हातावर ‘पोलीस’ असं गोंदवून तो पोलीस बनतो. सुरुवातीलाच भ्रष्टाचाराच्या हिशोबानं सोन्याची खाण असलेल्या मिरामार पोलीस ठाण्यात त्याची बदली होते. आपला ‘ओव्हर द टॉप’ वावर, व्यावसायिक चित्रपटात शोभतील असे कडक पंचेस या सर्वांच्या मदतीनं तो सगळा माहौल आपलासा करतो. ‘सिंघम’च्या अगदीच विरुद्ध व्यक्तिमत्त्व असलेला आणि सिंघमचं अस्तित्व आहे त्याच विश्वात ‘सिम्बा’ येताच दुर्वा रानडेशी (सोनू सूद) हातमिळवणी करत आपली सोय करतो. तर दुसरीकडे शगुनच्या (सारा अली खान) प्रेमात पडत सेटल होण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करतो.

आकृती दवे (वैदेही परशुरामी) या आपल्या मानलेल्या बहिणीच्या निमित्तानं दुर्वा रानडेचे भाऊ चालवत असलेलं ड्रग रॅकेट, नंतर घडणाऱ्या बऱ्याचशा अपेक्षित घटना वगैरे बऱ्याच किचकट प्रकरणानंतर भ्रष्टाचारी ‘सिम्बा’मधील कर्तव्यदक्ष अधिकारी जागृत होतो. कारण आत्मभान किंवा तत्सम गोष्टी बॉलिवुडमधील पात्रांना सहसा माहीत नसतात. मग इथूनच सिम्बा रेप, निर्भया प्रकरण अशा त्याच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींना हात घालत जातो. परिणामी ‘सिम्बा’ बऱ्यापैकी अतार्किक तरीही मनोरंजक असलेला पूर्वार्ध ते अतर्क्य, गोंधळलेला आणि प्रॉब्लेमॅटिक उत्तरार्ध असा टोकाचा प्रवास करतो. ज्या दरम्यान त्याचा बॉलिवुडचा प्रभाव असलेला, भरपूर बडबड करणारा, ओव्हर द टॉप आणि आपण हे सगळं कॅमेऱ्यासाठी करतोय याची जाणीव असल्यानं डायलॉगबाजीवर भर देणारा ‘लार्जर दॅन लाइफ’ हिरो तात्काळ काहीसा रटाळ, धीरगंभीर ‘नायक’ बनतो आणि चित्रपटाचा सगळा सूरच बदलून सगळं काही बिघडू लागतं.

‘सिम्बा’च्या उत्तरार्धात रेपचा मुद्दा पुढे येऊन चित्रपटाला कशी सामाजिकतेची जाणीव आहे आणि शेट्टीचं हे तर्क आणि वास्तववादी दृष्टिकोनापासून मैलो दूर असलेलं सिनेमॅटिक जग मुळात कसं वास्तववादी आहे, असं सांगण्याचा प्रयत्न होऊ लागतो. ज्यामुळे चित्रपटातील निर्बुद्ध मनोरंजक टोन नकारात्मकरित्या बदलते आणि चित्रपटाचा हा सामाजिकतेचा उसना आव त्यात सुरुवातीपासून दिसणाऱ्या गोष्टींच्या अगदीच विरोधाभासी असलेल्या कृतींमध्ये परिवर्तित होतो. परिणामी त्याला कोर्टरूम ड्रामाचं स्वरूप प्राप्त होतं. मात्र ही सगळी पार्श्वभूमी ‘पिंक’ किंवा ‘जॉली एलएलबी’ किंवा तत्सम चित्रपटात शोभणारी आणि कुशलतेनं रचलेली असली तरी इथं शेट्टीच्या जगात ती फारच विनोदी वाटते. बरं हा विनोदही ‘जॉली एलएलबी’मधील न्या. त्रिपाठीला समांतर असलेला नसून आपल्याला कळत नसलेल्या गोष्टी, इंडियन पीनल कोड्स वगैरे बाबी बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या अभिनेत्यांमुळे निर्माण झालेला असल्यानं एव्हाना त्याला पॅरडीचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं.

चित्रपटानं इतका वेळ ‘मी गंभीर काहीतरी सांगतोय, त्याकडे तितक्याच गंभीरतेनं पहा’ असा कांगावा केलेला असल्यानं आपण चित्रपटाकडे गंभीर दृष्टीनं पाहू लागतो, पण त्याला हा आभास कायम ठेवणं काही जमणार नसतं. कालांतरानं त्याला ‘सत्यमेव जयते’चं (२०१८) स्वरूप प्राप्त होतं. ‘सिम्बा’मधील सगळी पात्रं वारंवार ‘रेप हुआ, रेप!’ असं ओरडत असतात, कायद्याच्या चौकटीत राहून कसा न्याय मिळणार नाही, हे म्हणत असतात, एकामागून एक अपेक्षित घटना घडतच असतात आणि भरपूर लांबलेला चित्रपट काही संपायचं नाव घेत नाही. स्त्रीवादी (?) विचारसरणीचा पुरस्कार करत असतानाच ‘देशातील स्त्रियांना आपण (म्हणजे आम्ही पुरुषांनी बरं का) सुरक्षित ठेवायला हवं’ असे काहीतरी संवाद असलेली दृश्यं समोर घडत असतात. एकूणच ‘सिम्बा’ अनेकविध विचारसरणींविषयी लेखक-दिग्दर्शकाच्या मनात असलेल्या चुकीच्या संकल्पनांचं तितकंच चुकीच्या पद्धतीनं चित्रण करत राहतो. ज्यामुळे शेवटी आधीच्या सदोष तरीही रंजक पूर्वार्धातील ‘लार्जर दॅन लाइफ’ हिरो बरा असं म्हणायची वेळ येते.

अर्थातच समस्या इथंच संपत नाहीत, अजूनही आहेत. ट्रेलरमध्येच दाखवून झालं तसं ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’ यांचं विश्व एकच आहे, अगदी चित्रपटात ते एकत्रही दिसणार आहेत. मग अशा वेळी बाजीरावची (अजय देवगण) सासू आणि कॉन्स्टेबल मोहिलेची (आशुतोष राणा) पत्नी या दोन्हीही स्त्रिया (सुचित्रा बांदेकर) एकच कशा आणि का असू शकतात? याखेरीज ‘सिंघम’मधील गुन्हेगार शिवा आणि ‘सिम्बा’मधील वकील जोशी (अशोक समर्थ); ‘सिंघम रिटर्न्स’मधील हवालदार आणि इथला वकील (गणेश यादव); त्यातील पत्रकार आणि यातील न्या. परुळकर (अश्विनी काळसेकर) हेही एकसारखेच का दिसत असावेत? इतर वेळी ही समस्या मोठी नसते, कारण चित्रपटांची युनिव्हर्सेस एकच नसतात. इथं मात्र हा चित्रपट वर उल्लेख केलेल्या चित्रपटाचा स्पिन ऑफच नाही, तर त्यातील मुख्य पात्रही इथं उपस्थित असताना ही समस्या महत्त्वाची ठरते. पण या सगळ्यानं शेट्टी युनिव्हर्सला काहीच फरक पडणार नाही. कारण जोवर तो प्रेक्षकांना गृहीत धरत या सर्व बाबी करत आहे, आणि जोवर प्रेक्षक त्याला सकारात्मक प्रतिसादही देत आहेत, तोवर हे लूपहोल कायम राहणार आहे. बाकी त्यानं या चित्रपटाच्या शेवटी पुढील वर्षी अपेक्षित असलेला वेगळ्या अभिनेत्यासोबतचा आणखी एक नवा पोलीसपट घोषित केला आहे. त्यातही हे सगळे अभिनेते रिपीट होतील.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख