२०१८ : सजग आणि संकल्पनात्मक दृष्टिकोनातून वैविध्यपूर्ण अशा चित्रपटांचं वर्ष
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • २०१८मधील १० सर्वोत्कृष्ट सिनेमांची पोस्टर्स
  • Sat , 29 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie वर्षाखेर विशेष

वैविध्यपूर्ण आशय आणि त्याची तितकीच वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी अशा गोष्टींमुळे या वर्षी भारतीय प्रेक्षकांना चित्रपटांच्या पातळीवर बरेच उत्तम चित्रपट पहावयास मिळाले. तमाम सुपरस्टार्सच्या चित्रपटांना काहीशा रटाळ कथानकांमुळे मिळालेलं अपयश आणि छोटेखानी चित्रपटांचं समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोन्हींकडून झालेलं कौतुक अशा दुहेरी यशामुळे हे वर्ष बॉलीवुड आणि त्याचे प्रेक्षक दोन्हींच्याही लक्षात राहणार, हे नक्की. या वर्षांतील सर्वोत्कृष्ट अशा हिंदी चित्रपटांची ही यादी.

१०. ‘मंटो’

खर सांगायचं झालं तर, ‘मंटो’ हा सिनेमॅटिक परिभाषा आणि मूल्यांच्या परिमाणातून पाहण्याचा चित्रपट नाही. कारण एका पिरियड फिल्मच्या माध्यमातून तो मांडू पाहत असलेला विषय हा सध्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर कलाकाराचं स्वातंत्र्य आणि हक्क जोपासले जाणं, अतिरेकी राष्ट्रवादाच्या भावनेतून कलात्मक दृष्टिकोनावर निर्बंध न लादणं, या आणि अशाच इतर महत्त्वाच्या बाबींशी निगडित आहे. जे समकालीन वास्तव आहे. आणि गरजही. त्यामुळे तो सदोष असला तरी त्यातील मुद्दे तितकेच महत्त्वाचे राहतात, जे नवाजुद्दीन सिद्दिकी, रसिक दुग्गल अशा अनेकविध कलाकारांच्या दखल घ्यावी अशा कामगिरीतून पडद्यावर मांडले जातात. नंदिता दासचा हा चित्रपट महान नसला तरी त्याच्या मुळाशी असलेली भावना, त्यातील कलाकारांची कामगिरी आणि निर्मिती यांसाठी दखल घ्यावा असा आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/2542

०९. ‘राझी’

पारंपरिक हेरपट किंवा युद्धपटांमधून ओसंडून वाहणारी देशप्रेमाची भावना इथं बॅकफुटवर जाऊन तिची जागा राष्ट्रप्रेमाकडे आणि परिणामी राष्ट्रवादाकडे संवेदनशीलपणे पाहण्याची भावना घेते. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांकडे इतक्या प्रामाणिक आणि प्रौढ दृष्टिकोनातून पाहणं खचितच एखाद्या चित्रपटानं साध्य केलं असेल. आलिया भट आणि इतर सहाय्यकी कलाकारांच्या अभिनयानं नटलेला हा एक सुंदर चित्रपट आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/2063

०८. ‘बधाई हो’

‘आपले पालक अजूनही सेक्स करतात ही भावनाच किती विचित्र आहे’ एक पात्र दुसऱ्या पात्राला उद्देशून म्हणत असलेलं हे वाक्य कुठल्याशा अभारतीय ‘कमिंग ऑफ एज’ चित्रपटातील वाटत असेल तर त्यात वाचकांचा दोष नाही. कारण गेली अनेक वर्षं मुख्य प्रवाहातील चित्रपट सोज्वळतेचं रूप पांघरून घेऊन वावरताना दिसायचे. परिणामी हे असं वाक्य चित्रपटातील आहे, यावर प्रथमदर्शनी कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण खरंच, हे एका नितांतसुंदर अशा पद्धतीनं लिहिलेल्या, तितक्याच तरलतेनं अभिनय केलेल्या आणि हाताळलेल्या चित्रपटातील एका मध्यवर्ती पात्राच्या तोंडी असलेलं वाक्य आहे. गजराज राव, नीना गुप्ता, आयुष्मान खुराना अशा अनेक लोकांच्या कामगिरीमुळे आवर्जून पहावा असा बनलेला ‘बधाई हो’ भारतीय चित्रपटसृष्टीतील सकारात्मक बदलांचं प्रतीक आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/2659

०७. ‘स्त्री’

साधारण दशकभरापूर्वी भारतात निमशहरी किंवा ग्रामीण भागात ‘स्त्री’मध्ये दिसते, तशा प्रकारच्या भुताटकीच्या कथा हमखास प्रत्येक चौकात चर्चेत असायच्या. हॉरर-कॉमेडी या  जॉन्रच्या रूपात समोर येणार ‘स्त्री’ त्याच्या केंद्राशी प्रबळ स्त्रीवादी, सामाजिक मुद्दे घेऊन वावरतो. असं करताना तो हॉरर आणि कॉमेडी या आपल्या दोन्ही उपप्रकारांकडेही तितकंच लक्ष देत, भय आणि विनोद यांचं वैचित्र्यपूर्ण पण परिणामकारक मिश्रण तयार करतो. शिवाय भारतीय चित्रपटांमध्ये सहसा न दिसणारा हा चित्रपट प्रकारही प्रभावीपणे हाताळतो.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा

https://www.aksharnama.com/client/article_detail/2470

०६. ‘मुल्क’

‘मुल्क’मधील भावनेला शब्दांत मांडायचं झाल्यास हसन मिन्हाजच्या ‘नेटफ्लिक्स’वरील एका ‘स्टॅन्ड अप-स्पेशल’मधील वाक्य आठवतं. ते असं : ‘देशावर (अमेरिका) कुठलंही संकट उद्भवलं की अल्पसंख्याक आणि निर्वासितांचं राष्ट्रप्रेम हा मुद्दा ऐरणीवर येतो’. किती अचूक शब्दांत मांडली आहे ही भावना! ‘मुल्क’मध्येही काहीसा असाच प्रश्न केंद्रस्थानावर आहे. कुटुंबातील एका व्यक्तीच्या दुष्कृत्यांमुळे संपूर्ण कुटुंबाकडे नेमक्या अशाच चष्म्यातून पाहिलं जातं. देशातील सध्याच्या राजकीय-सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट अधिकच महत्त्वाचा ठरतो.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा

https://www.aksharnama.com/client/article_detail/2362

०५. ‘तुंबाड’

‘तुंबाड’ आपल्या कथानकात अतिमानवी घटक गुंफून एक चांगल्या दंतकथेचं जग आपल्यासमोर उभं करतो. असं करत असताना तांत्रिकदृष्ट्या सफाईदारपणे त्यात संकल्पनात्मक पातळ्यांवर भय, साहस, लालसा आणि इतर भावनांचं अस्तित्व जाणवेल हे पाहतो. नितांतसुंदर असं रंगपटल, हॉन्टिंग साऊंड डिझाइन, सुरेख अभिनय या सर्व गोष्टींच्या माध्यमातून समोर उभं राहिलेलं हे जग दखल घ्यावं असं आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/2632

०४. ‘भावेश जोशी सुपरहिरो’

सुपरहिरो या संकल्पनेकडे काहीशा वास्तववादी, व्हिजलांटी प्रकारच्या चष्म्यातून पाहत, कुठलीही आदिभौतिक शक्ती नव्हे, तर मुळातच चांगलं काहीतरी करण्याची ऐहिक प्रवृत्ती माणसाला ‘सुपरहिरो’ बनवते, असं म्हणत विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ‘भावेश जोशी सुपरहिरो’ हा चित्रपट समोर येतो. तो सदोष असला तरीही त्यातील स्पिरीट, त्याच्या चित्रणाच्या पातळीवरील परफेक्शन या बाबी त्याला उजवा बनवतात.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/2141

०३. ‘अंधाधुन’ :

श्रीराम राघवनचा हा ब्लॅक कॉमेडी जॉन्रमधील थ्रिलर चित्रपट या प्रकारातील सगळी वैशिष्ट्यं (आणि वैचित्र्य), पूर्ण घटक एकत्र आणत काहीशा कंट्रोल्ड वातावरणात गोंधळ माजवण्याचं (किंवा किमान तसा आभास निर्माण करण्याचं) काम यशस्वीपणे पार पाडतो. अमित त्रिवेदीचं संगीत चित्रपटाच्या ‘रोलर कोस्टर राइड’समान मांडणीत तितक्याच सहजतेनं एकमेव होत चित्रपटाला एखाद्या सांगीतिकेसारखं बनवतं. तब्बू आणि आयुष्मान खुराना यांचे परफॉर्मन्स या वर्षातील काही उत्तम कामगिरींपैकी एक ठरतात.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/2604

०२. ‘मुक्काबाज’

‘प्रेमात यशस्वी तर व्हाल हो, पण पुढे काय?’ असं म्हणत ‘मुक्काबाज’मध्ये श्रवणकुमार (विनीत कुमार सिंग) वास्तविकता, सामाजिक चौकटी अशा एक अन् अनेक गोष्टींशी लढताना दिसतो. याखेरीज सामाजिक, राजकीय समकालीन वास्तवावर केलेली टिप्पणी आणि लगावलेली चपराक यांमुळे ‘मुक्काबाज’ या निकषांनुसारही महत्त्वाचा ठरतो. बाकी यातील गाणी किती भन्नाट आहेत, हे वेगळं सांगण्यापेक्षा ती थेट ऐकणंच उत्तम. मुख्य भूमिकेतील विनीत कुमार सिंग त्याच्या कारकिर्दीतीलच नव्हे, तर एकूणच या वर्षातील सर्वोत्तम परफॉर्मन्स देतो.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा

https://www.aksharnama.com/client/article_detail/1685

आता यादीतील शेवटच्या चित्रपटाकडे वळण्यापूर्वी या यादीतील निवडींव्यतिरिक्त उल्लेख करावेत असे इतर काही चित्रपट

‘परी’

सविस्तर लेखासाठी क्लिक करा

https://www.aksharnama.com/client/article_detail/1841

‘ऑक्टोबर’

सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/1980

‘पॅडमॅन’

 सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/1776

‘लव्ह पर स्क्वेअर फूट’

सविस्तर लेखासाठी क्लिक करा 

https://www.aksharnama.com/client/article_detail/2109

०१. ‘मनमर्जियाँ’

पारंपरिक तऱ्हेच्या प्रेमत्रिकोणाच्या कथेला त्यातील पात्रं, त्यांचे समोर वाढून ठेवलेल्या समस्येकडे पाहण्याचे दृष्टिकोन, प्रेमाच्या आणाभाका घेत असताना एरवीच्या प्रेमकथांमध्ये पात्रं विसरतात त्या वास्तववादी नजरेचा अभाव नसणं या सर्व गोष्टी चित्रपटाला उजवा ठरवतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘पॅशिनेट लव्ह’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यात ‘मनमर्जियाँ’ यशस्वी ठरतो. प्रेमकथा असली तरीही हा चित्रपट  कश्यपच्या इतर कुठल्याही चित्रपटाइतकाच गडद आहे. यातील संगीतकार अमित त्रिवेदी-गीतकार शेली यांची गाणी अगदीच टोकाच्या, एरवी शब्दांत मांडता येणार नाहीत, अशा भावना सांगीतिक स्वरूपात समोर आणतात. एकूणच ‘मनमर्जियाँ’ या वर्षीच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मोडतो.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा

https://www.aksharnama.com/client/article_detail/2522

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख