अजूनकाही
१. उद्योगपतींनी कर्जे बुडवल्यामुळे देशातील बँका डबघाईला आल्या आहेत. या बँकांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी मोदींना सामान्य जनतेचे पैसे सहा ते सात महिन्यांसाठी बँकांमध्येच अडकवून ठेवायचे आहेत. त्यामुळेच नोटाबंदीचा निर्णय घेऊन सामान्य जनतेचा पैसा बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप
अरे देवा, हाच तो बहुचर्चित, बहुप्रतीक्षित भूकंप होता की काय? मग कठीण आहे. अहो, ही माहिती आता देशातल्या पहिलीत जाणाऱ्या मुलांनाही तोंडपाठ झालेली आहे. बँकांची थकबाकी, उदयोगपतींनी बुडवलेली कर्जं वगैरे सगळे आकडे तोंडपाठ बोलून दाखवतील ती मुलं. तुम्ही किमान दुसऱ्या इयत्तेतलं तरी काही तरी बोला!
………………………….
२. डॉक्टरांच्या अनाकलनीय अक्षरामुळे केमिस्टला औषधयोजना न समजल्याने जगभरात दरवर्षी एकूण सात हजार लोक मरण पावतात. डॉक्टरांचं खराब हस्ताक्षर न समजल्याने केमिस्ट चुकीचं औषध देतात आणि पेशंट दगावतो.
सगळ्या गोष्टींकडे इतक्या नकारात्मक पद्धतीने पाहणं बरोबर नाही. डॉक्टरांच्या खराब अक्षरामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचत असतील, त्याचं काय? डॉक्टरांनी काय प्रिस्क्रिप्शन दिलंय, हे केमिस्टला न कळल्याने त्याच्याकडून चुकून योग्य औषध दिलं गेल्याचं प्रमाण अधिक असेल ना!!!
………………………….
३. नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षाच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्यांची तंबी. मुंढे यांचे कौतुक कराल तर वाईट परिणाम होतील, असा इशारा.
बरोबर आहे. सर्वपक्षीय नेते आणि नगरसेवकांचे गैरधंदे, बेकायदा बांधकामं, विविध प्रकारची 'दुकानं' वाचवण्यासाठी तिकडे नेते मुंढेंना हटवण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत असताना या नगरसेवकांनी मुंढे यांचं कौतुक करणं हा एकप्रकारचा पक्षद्रोहच आहे. आपल्या पक्षाची धोरणं काय आहेत, याचंही भान ठेवायचं नाही म्हणजे टू मचच!
………………………….
४. पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी व गोरेगाव स्थानकांदरम्यान ओशिवरा येथे होऊ घातलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव ‘राम मंदिर’ ठेवण्यावरून वादाचे मोहोळ उठलेले असताना राम मंदिराच्या आवारातले शिवमंदिर राम मंदिराच्या किमान आठ शतकांपूर्वीचे असल्याचे पुरावे समोर आल्याने आता स्थानकाला ते नाव द्यावे, अशी अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.
या परिसरात या दोन्ही मंदिरांपेक्षा प्राचीन दगड नक्कीच सापडतील. स्टेशनला त्यांच्यावरून काही नाव देता आलं तर, त्याने असली नामकरणं करणाऱ्यांचाही 'गौरव' होऊन जाईल.
………………………….
५. बँका आणि एटीएमच्या रांगेत उभे राहणाऱ्यांना दिल्ली भाजपतर्फे लाडू वाटले जाणार. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल कृतज्ञता म्हणून प्रत्येक कुटुंबाला लाडवांचे वाटप केले जाणार.
हे तहानलाडू किंवा भूकलाडू असतील का? त्यांची अधिक गरज असेल ना नागरिकांना? पक्षाच्या देशभरातल्या नेत्या-कार्यकर्त्यांकडे रोज सापडत असलेल्या नव्या नोटांमधल्या बेहिशोबी रोख रकमेचं एटीएमबाहेर वाटप करण्याचीही आयडिया बेस्ट राहील. त्यात संतापलेल्या नागरिकांकडून रिटर्न गिफ्ट म्हणून धम्मकलाडू मिळण्याचा धोका नाही!
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment