अजूनकाही
पाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसं या वर्षांत खूप काय काय घडलं. खूप विषय चर्चेत आले, खूप विषयांवर वाद झाले. काही विषय चर्चेयोग्य असूनही चर्चेत आले नाहीत आणि काही वादग्रस्त विषय असूनही ते पुरेसे पुढे आले नाहीत. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा एप्रिल २०१८मधला चौथा लेख...
............................................................................................................................................
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 'काँग्रेसमुक्त भारता'बद्दल काय बोलले, ते एव्हाना सगळ्यांनाच समजलं असेल. डॉ. भागवत हवेत बोलत नाहीत. पण हवा बघून मात्र नक्की बोलतात. त्यामुळे त्यांचं विधान हे बदललेल्या हवेचं चिन्ह आहे अशीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. पण, या विधानाचं याहून अधिक महत्त्व आहे. आणि डॉ. भागवतांच्या निमित्तानं ते समजून घ्यायला हवं.
हे काही पहिलंच असं विधान नाही. ज्यांनी 'काँग्रेस मुक्त भारता'ची घोषणा २०१४ साली केली, त्या दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापासून थोडीशी फारकत घेतलेली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनीच "मी कुठल्या एका पक्षाबद्दल नाही तर काँग्रेसनं आणलेल्या संस्कृतीबद्दल बोलत होतो. जातीयवाद, भ्रष्टाचार आणि इतर अशा गोष्टी ही काँग्रेसची देण आहे. आणि काँग्रेसनंही यापासून भारताला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवा," अशी भूमिका मांडली होती. (मुलाखत घेणाऱ्यांच्या लाळघोटेपणामुळे या मुलाखतीची चर्चा ‘हुजूर-ए-आलम’ समोर बंदे कसे वाकून उभे होते एवढ्यापुरतीच झाली आणि त्यामुळे मोदींनी आपल्याच घोषणेवर घेतलेली स्ट्रॅटेजिक माघार अनेकांच्या लक्षात आली नाही.) लक्षात घ्या, मोदींचं हे पहिलं विधान हेच मुळात गुजरात विधानसभा निवडणुकांत काठावर उत्तीर्ण झाल्यावर आलेलं होतं. डॉ. भागवतांनी मात्र मोदींपासून फारकतच घेऊन टाकली!
२०१४ चा माहोल वेगळा होता. तो २०१० पासूनच बनत आला होता. अशोक चव्हाणांना 'आदर्श'मध्ये राजीनामा द्यावा लागला आणि काँग्रेसवर प्रेशर टाकलं तर आता नेतृत्व माघार घेऊ शकतं हा संदेश गेला. त्यातून मग एकापाठोपाठ एक आरोप सुरू झाले. चारही वाटांनी - म्हणजे 'कॅग'सारख्या संस्था, मीडिया, बहुतांशी कॉर्पोरेट जग आणि 'सिव्हिल सोसायटी'च्या नावाखाली काँग्रेसला बदनाम करणारे संघी - अशा चारी वाटांनी काँग्रेसला घेरलं गेलं. याच वातावरणात काँग्रेस २०१३ ला राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथं अशा काही फरकानं हरली की, २०१४ ला मोदींनी 'काँग्रेसमुक्त भारत' हीच आपल्या प्रचाराची मध्यवर्ती घोषणा करून टाकली.
एक किस्सा सांगतो. मोदींनी ज्या दिवशी ही घोषणा केली त्या दिवशी देशाच्या राजकारणातला एक बडा नेता आपल्या दोन तरुण सहकाऱ्यांसोबत प्रवासात होता. एक सभा आटोपून गाडीत बसल्यावर त्या नेत्याच्या कानावर एका तरुण सहकाऱ्यानं ही घोषणा टाकली. त्यावर तो नेता शहारला. अस्वस्थ झाला. गाडीच्या खिडकीतून बाहेर एकटक बराच वेळ बघत राहिला. आणि मग म्हणाला, "चूक केली मोदींनी. काँग्रेस कधीच संपवता येणार नाही. पण आपण काय बोलून बसलो याची त्यांना जाणीव नाही."
हे अशासाठी सांगितलं की, काँग्रेसचं भारतीय जीवनातलं महत्त्व या नेत्याला माहीत आहे. आणि निव्वळ या नेत्यालाच नाही तर अनेकांना माहीत आहे. माझ्या पिढीला म्हणजे साधारण आता पस्तिशीत असणाऱ्या पिढीला इतिहासाचं भान थोडं कमी आहे म्हणता येईल. यातूनच २०१४ ला ही पिढी 'मोदीयुगा'त गेली. पण, अवघ्या चार वर्षांतच तिचा भ्रमनिरास झालाय. अजून ती काँग्रेसकडे वळलेली नाहीये. पण, मोदीयुगासोबत गेलो ही चूक झाली हे मात्र तिला - भलेही जाहीररीत्या मान्य करत नसेल तरीही - आपल्या मनाशी कबूल आहे.
काँग्रेस ही एकमेव अशी संघटना आहे कि, जी आजही देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. देशातल्या सगळ्या वर्गांचे, घटकांचे प्रतिनिधी काँग्रेसमध्ये आहेत. इथं तुम्हाला हिंदुत्ववादी दिसतील, तसे कडवे मार्क्सवादी दिसतील, आपल्या सात पिढ्यांची सोय करून ठेवायची इच्छा असलेले नागडे भ्रष्टाचारी दिसतील, तसे आयुष्यभर नि:स्वार्थपणे राजकारण केलेले ध्येयवादीही दिसतील. समाजाच्या सगळ्या परस्परविरोधी घटकांचे प्रतिनिधी काँग्रेसमध्ये असतात. त्यांची टोकाची भांडणं चालतात. आजही. त्यातून काँग्रेस अडचणीत येते. आजही. पण, भारतीय जीवनातलाच हा पॅराडॉक्स आहे अशा व्यापक हेतूने काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व याकडे बघत असतं. आजही!!
पण काळाच्या ओघात या पक्षात एक शैथिल्य आलं होतं. पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाला होता. राहुल गांधींवर वेगवेगळ्या 'प्रचारकां'च्या माध्यमातून तीव्रतम हल्ला चढवला गेला होता आणि त्यातून काँग्रेसमध्ये एक भयंकर अस्वस्थता होती. ही अस्वस्थता, हा तणाव काँग्रेसच्या अगदी गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अनेकांशी बोलताना जाणवत होता. त्यामुळे ही परिस्थिती निवळण्यासाठी वेळ द्यावा लागणार हे काँग्रेसच्या नेतृत्वाला दिसत होतं. १३१ व्या वर्धापन दिनादिवशी योगेंद्र यादव यांनी एक ट्विट केलं होतं- "काँग्रेस १३१ वर्षांची झाली ही समस्या नाहीये. तिचं ते वय दिसू लागलंय हा खरा प्रश्न आहे." अशा काळात परत कात टाकणं हे काँग्रेस नेतृत्वासमोर आव्हान होतं.
भारतीय जीवनाची स्वतःची अशी एक गती आहे. पंडित नेहरू जेव्हा भारताला "पाच हजार वर्षांचे सातत्य" म्हणायचे, तेव्हा त्यांना त्या गतीचं भान होतं. बरा असेल किंवा वाईट, पण हा वेग भारतीय आयुष्याचा एक भाग आहे. (नेहरू आणि आंबेडकर यांची हिंदू कोड बिलाबद्दलची भूमिका अभ्यासून बघा. बाबासाहेबांनी राजीनामा देऊ नये याची कारणं सांगताना नेहरूंनी दिलेला तर्क बघा. मग लक्षात येईल) हाच वेग, हीच गती काँग्रेसचीही आहे. हा पक्ष बदल स्वीकारतो, पण आपल्या गतीनं. साधं उदाहरण देतो. शशी थरूर यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. एका ट्विटचं निमित्त झालं. केवढी टीका झाली होती तेव्हा त्यांच्यावर. सतत ट्विटरवर असतात म्हणून. सात वर्षं झाली या घटनेला. आज काय स्थिती आहे? भाजपपेक्षा मोठी फौज काँग्रेसनं ट्विटर आणि सोशल मीडियावर उभी केलीय आणि भाजपचा हा गड नेस्तनाबूत केलाय! मी गती म्हणालो ती ही. काँग्रेस वेळ घेते. परिस्थितीला आपल्या 'लाईन'मध्ये मोल्ड करते आणि मग पुढे सरकते.
आता काँग्रेस पुढे सरकलीय. नव्या अध्यक्षाला 'पप्पू' म्हणून हिणवणं आता फारसं कुणाला अपील होतं नाही. ज्या काँग्रेसींना राहुलबद्दल शंका होती तीही आता दूर झालीय. हळूहळू काँग्रेसमध्ये जे बदल दिसू लागलेत, तेही राहुलबद्दल विश्वास निर्माण करणारे आहेत. अनेक पैसेवाले राज्यसभा मिळवण्यासाठी बॅगा घेऊन उभे असताना आणि पक्षाला आज पैशाची गरज असतानाही राहुल गांधी कुमार केतकरांसारख्या पैशानं कफल्लक, पण विचारांनी श्रीमंत संपादक-पत्रकाराला राज्यसभेवर आणतो, ही एक सूचक घटना आहे. काँग्रेस संस्कृतीत मुरलेला अशोक गेहलोत सारखा माणूस दिल्लीत पूर्ण वेळासाठी आणून बसवला गेलाय, हा काँग्रेसमधला मोठा बदल आहे. राजीव सातव ते सुश्मिता देव यांच्यासारख्या तरुणांना देशभर संधी दिली जातेय. ही बदलाच्या प्रक्रियेनं वेग पकडल्याची उदाहरणं आहेत. गुजरातमध्ये जे झालं ती एक झलक होती. काँग्रेसनं मोठा डाव मांडलाय, हे राजकारण समजणाऱ्या प्रत्येकाच्या ध्यानी आलंय.
दुसऱ्या बाजूला भ्रमनिरास झालेले भारतीय मतदार परत एकदा पर्यायाच्या शोधात आहेत. त्यांना संभ्रमित करण्यासाठी "मोदी नाही तर कोण?" हा प्रचार सुरू झालाय. त्याचवेळी बंगाल - बिहार - ओडिशा इथं हिंदू-मुस्लिम दंगली करण्यासाठी राक्षसी यंत्रणा पूर्ण कामाला लागली आहे. २०११ ला ज्या रामीलालावर काँग्रेसच्या विरोधाचा स्वर तीव्र केला गेला होता, तिथं परत एकदा तसाच शो लावायचा प्रयत्न झाला. पण, तो फेल गेला ! आणि या सगळ्यातून काँग्रेसनं गमावलेली पकड परत हळूहळू मिळवायला सुरुवात केलीय, याचे संकेत जिथं जायची गरज होती तिथे गेले.
संघाला एक सवय आहे. जुनी. म्हणजे राजीव गांधींना ४२४ जागा मिळाल्या, तेव्हा तो इंदिरा यांच्या खुनाचा तमाम भारतीयांनी दिलेला जबाब होता हे संघ मान्य करतो. आणि मग हळूच पुडी सोडतो की, "संघानंही तेव्हा राजीव यांना मदत केली होती." किंवा २००४ ला 'इंडिया शायनिंग'चा फुगा फुटला. तुम्हाला असे अनेक संघस्वयंसेवक मिळतील जे सांगतील की, "आम्ही भाजपचा प्रचार तेव्हा केला नव्हता". बरं, संघ हेही सांगतो की, आपण राजकारण करत नाही. पण त्रिपुरा जिंकल्यावर संघानं कशी तिथं २०-२० वर्षं मेहनत केली आहे, हे सांगणाऱ्या फेसबुक पोस्टी फिरवण्यात हेच माहीर!! यावर प्रश्न विचारला की, या २० वर्षांत तुम्हाला स्वतःचे २० चांगले उमेदवार उभे करता येऊ नयेत? याही निवडणुकीत जिंकलेल्यापैकी दोन-चार सोडले तर बाकी सगळे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसचे लोक तुम्ही घेतलेत. तर त्याला हे 'आपदधर्म' म्हणणार!
सांगायचा मुद्दा हा की, संघाची एक विशिष्ट ताकद भारतीय समाजात आहे. अगदीच उगाच संघाला काडी पहेलवान म्हणण्यात हशील नाही. थेट संघाचे नसले तरी मनुवादी विचारधारा मानणारे अनेक जण समाजात जवळपास सगळ्याच क्षेत्रात काम करताना दिसतील. आणि आजकाल ते आहेत तिथून संघाला आपला प्रेरणास्रोत मनू लागले आहेत हेही खरं. पण संघ काही सर्वशक्तिमान आहे वगैरे मानणं भंपक. अशी काही स्थिती नाही.
या सगळ्यातून संघाला हवेचा अंदाज आलेला आहे. लोकं मोदींवर चिडलीत. ‘ग्रामीण भारत’ तर संतापलाय. शहरी गरीब, निम्न मध्यमवर्गाच्या मोदींच्या 'आली लहर केला कहर' आर्थिक धोरणांमुळे भरडून गेलाय. अशा काळात हे मोदी सरकार संघाचा अजेंडा राबवत आहे, ही गोष्टसुद्धा या सगळ्या वर्गांच्या ध्यानी येऊ लागलीय. याचा राजकीय फटका जसा भाजपला बसेल, तसा संघालाही बसेल. संघाबद्दल एक नकारात्मक भावना व्यापक समाजात तयार होण्याची चिन्हं आहेत.
या पार्श्वभूमीवर संघाला मोदींपासून अंतर ठेवणं भाग आहे. डॉ. भागवत एक मोठी संघटना सांभाळतात. "मैं क्या, फकीर हू, झोला उठाके चला जाऊंगा" असलं काही त्यांना बोलता येणार नाही. आणि मोदींनी ज्या ज्या टोकाच्या भूमिका घेतल्या आहेत, त्यांना आपलं समर्थन कायम ठेवता येणार नाही. "काँग्रेसमुक्त भारत ही राजकीय भूमिका झाली. संघ सगळ्यांना सोबत घेऊन राष्ट्रनिर्माणाचं काम करता येतं या विचाराचा आहे," असं म्हणणं हे त्यातून आलेलं आहे.
मी असं म्हणणार नाही की, पुण्यात डॉ. भागवतांनी २०१९ चा निकाल सांगितला. (काही लोकांनी तसं म्हटलंय म्हणून खुलासा). उलट्या बाजूनं काँग्रेसलाही ही लढाई आजही अवघड आहे. खूप मेहनत करावी लागणार आहे. २०१९ लाही संघ स्वयंसेवक मोदींचाच प्रचार करणार आणि गड वाचवायचा प्रयत्न करणार हेही नक्की आहे. पण, डॉ. भागवतांनी एक संकेत दिलाय. त्यांच्या स्वयंसेवकांसाठी. ‘हवा तेज चल रही है, अपनी टोपी संभालो’वाला!!
.............................................................................................................................................
लेखक अमेय तिरोडकर 'द एशियन एज' या इंग्रजी वर्तमानपत्रात 'विशेष प्रतिनिधी' म्हणून काम करतात.
ameytirodkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment