मोबाईल गेम्स आणि ऑनलाईन गेम्स : डोकी भ्रष्ट करणारी निर्मिती
पडघम - सांस्कृतिक
कलीम अजीम
  • ऑनलाईन गेम्सविषयीच्या वेबसाईटसचं एक प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 24 December 2018
  • पडघम सांस्कृतिक मोबाईल गेम्स Mobile Games ऑनलाईन गेम्स Online Games

दोन वर्षांपूर्वी ‘ब्लू व्हेल’ गेमनं जगभरात हाहाकार माजवला होता. भारतात या गेमच्या आहारी जाऊन अनेकांनी आपला जीव गमावला. परिणामी सर्वोच्च न्यायालयापासून ते केंद्र सरकार, मानसोपचार तज्ज्ञ आणि पालकदेखील यातून आपली सुटका करून घेण्यासाठी उपाययोजना आखत होते. या आपत्तीचं गांभीर्य इतकं होतं की, सरकारची त्याविरोधात कायदा करण्याची तयारी सुरू होती. तात्पुरती उपाययोजना म्हणून सरकारनं इंटरनेटवरील गेम्सच्या लिंक हटवण्याचे आदेश दिले, तर तिकडे अमेरिकेत गेम बनवणाऱ्या संचालकाला अटक झाली. त्यामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली, पण हा धोका टळलेला नव्हता.

टाईमपास व कामाच्या ताणातून हलकं होण्यासाठी विरंगुळा म्हणून खेळ खेळणं नवीन नाही. पूर्वी पत्त्यांचा खेळ, कॅरम, बुद्धिबळ असे बैठे खेळले जायचे. तसंच मैदानी खेळाचंही चलन होतं. ग्रामीण भागात विटीदांडू, सूर पारंब्या, लपंडाव, कबड्डी आदी खेळ प्रचलित होते. जेवणानंतर व मधल्या वेळेत वरील सर्व खेळांना प्राध्यान्य दिलं जायचं. पण संगणक क्रांतीनंतर असे खेळ, हळूहळू करत संपुष्टात आले. परिणामी मैदानी खेळांची जागा डिजिटल व आभासी खेळांनी घेतली. बैठे खेळही डिजिटल स्वरूपात आले. त्यामुळे समूह किंवा संघटनात्मक पद्धतीनं खेळले जाणारे खेळ बंद झाले.

आज इंटरनेटच्या माध्यमातून खेळल्या जाणाऱ्या आभासी (व्हर्च्युअल) खेळांचं प्रमाण वाढलं आहे. कॉम्प्युटर व मोबाईलच्या मदतीनं असे गेम्स खेळले जातात. लोकल ट्रेनमध्ये, बसमध्ये उभं राहून, एका हातानं हँडल पकडून आणि दुसऱ्या हातानं मोबाईल गेम खेळताना अनेक तरुण दिसतात. पायी चालताना, बँकाच्या लाईनमध्ये, हॉटेलमध्ये चहा घेताना, वेळ मिळेल तिथं अगदी ट्रॅफिक सिग्नलच्या काही सेकंदातही गेम्स खेळले जातात. एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर पोहोचेपर्यंत ही मंडळी गेमची एक लेव्हल पार करतात.

डोकी भ्रष्ट करणारी निर्मिती

मोबाईल गेमचं वेड इतकं भयानक असतं की, गेम खेळणारे अगदी खाणं-पिणंसुद्धा विसरून जातात. एखाद्याला व्यसन लावण्याइतपत निर्मिती प्रक्रिया गेम तयार करताना राबवली जाते. मानवी मेंदूंवर ताबा मिळवणं किंवा त्याला मुठीत ठेवण्याइतका गहन विचार या गेम्सच्या निर्मितीत केला जातो. मार्केट आणि ग्राहक कसे आहेत? त्यांच्या आवडीनिवडी नेमक्या काय आहेत? त्यांना कोणत्या प्रकारच्या गेमची आवड आहे? याचा रितसर आढावा घेऊन कंपन्या गेम्स तयार करतात.

व्हिडिओ गेम्सच्या निर्मितीत बेस्ट सेलर उत्पादनासारखा विचार केला जातो. गेम तयार करण्यासाठी उत्कृष्ट ग्राफिक्स व डिझायनिंगचा आधार घेतला जातो. गेम्सच्या निर्मितीपूर्वी मानवी मेंदूचा व व्हर्च्युअल हालचालींचा प्रचंड अभ्यास केला जातो.

गेम नेमका कोणासाठी आहे? कोणत्या लोकांना गेमकडे आकर्षित करून घ्यायचं आहे? त्यांनी गेमकडे वारंवार परत यावं असे अनेक विचार केले जातात. थोडक्यात, लोकांची मानसिकता आणि त्यांची विचारप्रवणता या गोष्टींचा विचार गेम तयार करताना केला जातो. वरील टप्प्यांचा सखोल विचार केल्यानंतरच कंपन्या गेमच्या प्रत्यक्ष निर्मितीकडे वळतात. त्यानंतर तयार झालेले गेम साहजिकच लोकांचं लक्ष आपल्याकडे वळवतात.

मानवी मेंदूचा सूक्ष्म विचार करून तयार केलेले हे विविध गेम्स इंटरनेटवर ग्राहकांचा खासगी माहिती (डेटा) चोरून त्यांच्यापर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचवले जातात. त्यानंतर गेम ॲडिक्शनचं चक्र सुरू होतं. सर्वसामान्यांसाठी गेम म्हणजे निव्वळ करमणूक किंवा विरंगुळा असतो, पण कंपन्या त्यातून कोट्यवधींचं उत्पन्न मिळवतात. मोबाइल गेमवर होणारी उलाढाल तब्बल १३७ बिलियन डॉलरच्या घरात आहे. या उत्पन्नासाठी ग्राहकांना व्यसन लावणं गरजेचं असतं. त्यानुसार कंपन्या ग्राहकांसमोर गेम्सचं वस्तुकरण करतात.

आज लाखो व्हिडिओ गेम्स एका क्लिकवर अगदी सहज उपलब्ध होतात. आकर्षक डिझाईन, जिवंतपणाचा देखावे, क्षणिक व भौतिक सुखाचा आनंद देणारे गेम तासनतास खेळले जातात. आठ-दहा तास मनसोक्त खेळूनही मन भरत नाही. खेळण्याच्या नादात कुठलंही भान राहत नाही. सतत मोबाईल गेम्स खेळतच राहावंसं वाटतं. बॅटरी संपून मोबाईल बंद झाला की वैताग येतो, चिडचिड होते. पुन्हा-पुन्हा गेमकडे वळावंसं वाटतं. जोपर्यंत गेम पुन्हा सुरू करत नाही, तोपर्यंत करमत नाही.

बाजारात नवा आलेला गेम साधारण आठ ते दहा महिन्यांच्या काळापुरताच टिकून राहतो. सतत नवनवे गेम विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असते. सुरुवातीला ठराविक देशांमध्ये नवे गेम उपलब्ध करून दिले जातात. या देशांमध्ये मिळणाऱ्या प्रतिसादातून अन्य देशात मार्केट तयार केलं जातं. ५० रुपयांपासून पाच हजारांपर्यंत गेमच्या किमती आहेत. एखाद्या गेमचं मार्केटिंग करून तो काळ्या बाजारात हजारोंमध्ये विकला जातो. एका गेमसाठी भारतात साधारण २० ते २५ लाख डाउनलोड्स मिळतात. तज्ज्ञांच्या मते ही संख्या फार मोठी आहे.

खेळ की व्यसन?

मोबाईल गेम खेळण्याचं प्रमाण सगळ्याच वयोगटांमध्ये दिसून येतं. लहान मुलं आणि तरुणाई यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. किंबहुना हा वर्ग मोबाईल गेमच्या अधिकच आहारी गेल्याचं चित्र आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या टप्प्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन गेम खेळणं थ्रिल म्हणून विकसित होत आहे.

साधारण: टास्क, मारधाड व ॲडिक्शनच्या गेम्सना जास्त पसंती दिली जाते. प्रसिद्ध सिनेमा, त्याचे नायक, एखादा सुपरव्हिलेन गेमचा नायक असतो. लादेन, रा-वनपासून ते आयसिसपर्यंत नायक-खलनायकांची पात्रं घेऊन गेम तयार केले जातात. हिंसा व क्रूरता असे घटक अनेक गेम्समध्ये पाहायला मिळतात. मोबाईल गेम खेळणाऱ्या व्यक्ती हिंसक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अलीकडे शाळेकरी मुलांमध्ये हिंसेचं प्रमाण वाढलं आहे. तज्ज्ञाच्या मते त्याचं एक कारण मोबाईल गेम्स हे आहे.

जर्मनीच्या संशोधकांनी गेम्समुळे हिंसेचं प्रमाण कमी होत आहे असंही निरीक्षण नोंदवलं आहे. हिंसेची बळावलेली भावना हिंसक गेम खेळल्यामुळे कमी होते, म्हणजे रागाचा गेममधून निचरा होतो, असं संशोधन जर्मनीच्या गेम बनवणाऱ्या कंपन्यांकडून जारी करण्यात आलं आहे. मात्र परिस्थिती यापेक्षा नेमकी उलटी असल्याचं दिसतं.

मोबाईल गेममध्ये एकमेकांना मारावं लागतं. एखाद्याला जीवे मारल्याशिवाय जिंकता येत नाही. म्हणजे नायक किंबहुना खेळणारा व्यक्ती अप्रत्यक्षपणे हिंसा करत सुटतो. रक्तपात, मारधाड, बंदुका, गोळ्यांचा वापर करून तो समोरच्याला संपवतो. क्षणोक्षणी समोर आलेल्यांना मारावं लागतं. एखाद्याचा जीव घेणं तिथं टास्क म्हणून पुढे येतं. त्यामुळे वारंवार हिंसा करावी लागते. ही हिंसा काल्पनिक असली तरी त्याचा परिणाम खेळणाऱ्यांच्या मनावर होतो. सतत गेम खेळणाऱ्या व्यक्तीमध्ये कालांतरानं बदल घडून येतो. म्हणजे तो अधिक प्रमाणात रागीट व चिडचिडा होतो. हेच कारण आहे की, व्हिडिओ गेममुळे मुलांच्या स्वभावात लक्षणीयरित्या बदल होत आहे.

युनिसेफच्या २०११च्या एका अहवालानुसार जगभरात १० ते १९ वयोगटातील १२० कोटी किशोरवयीन मुलं आहेत. भारतात ही संख्या जवळपास २४.३ कोटी आहे. जगभरात सर्वाधिक किशोरवयीन मुलं विकसनशील देशांमध्ये राहतात. युनिसेफच्या या अहवालात मुलांना किती राग येतो, हे त्यांच्या वयावर अवलंबून असतं, असं निरीक्षण नोंदवलं आहे.

२०१४ला ‘जर्नल सायकोलॉजिकल मेडिसीन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अन्य रिसर्चनुसार मुलींपेक्षा मुलांमध्ये रागाचं प्रमाण अधिक असतं. हे संशोधन भारतातील सहा वेगवेगळ्या शहरांत करण्यात आलं होतं. यात बंगळुरू, केरळ, दिल्ली, जम्मू, इंदूर, राजस्थान आणि सिक्कीम इथल्या ५६४७ अल्पवयीन आणि युवकांनी यात सहभाग घेतला होता. या संशोधनानुसार ९ ते १९ वर्षं वयोगटातील मुलांमध्ये रागाचं प्रमाण अधिक असतं, तर २० ते २६ वयोगटात रागाचं प्रमाण कमी असतं. म्हणजेच किशोरवयीन मुलं जास्त रागीट असतात. या संशोधनात असंही आढळून आलं आहे की, १२ ते १७ वयोगटातील १९ टक्के मुली शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या भांडणात सहभागी झालेल्या होत्या. मुलांच्या हिंसक प्रवृत्तीची कारणं रागात आढळतात. बऱ्याच संशोधनात मोबाईल गेम्स हे रागामागचं प्रमुख कारण म्हणून पुढे आलं आहे.

२०१२ साली एसोचैमनं एक अहवाल जारी केला. त्यानुसार गेम खेळणाऱ्या व्यक्ती जास्त प्रमाणात हिंसक होत जातात. या अहवालानुसार मेट्रो शहरातील लहान मुलांच्या मेंदूवर व्हिडिओ गेम्स ताबा मिळवत आहेत. परिणामी मुलं केवळ चिडचिडी होत नाहीत तर ती अधिक प्रमाणात आक्रमक स्वभावाची झाली आहेत. या कारणामुळे मुलांमध्ये गुन्हे प्रवृत्ती वाढल्या आहेत, अशी नोंद या अहवालामध्ये आहे. एसोचैमनं हे सर्वेक्षण पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, कोचीन,चेन्नई, हैदराबाद, इंदूर, पाटणा, चंडीगड, देहरादून आणि अहमदाबाद शहरातील ५ ते १७ वयोगटात केलं होतं. या सर्वेक्षणात पालकांशीदेखील चर्चा करण्यात आली होती.

या सर्वेक्षणात असंही सांगण्यात आलं आहे की, मेट्रो शहरातील पालक नोकरीत व्यस्त राहतात. त्यांच्या बिझी लाइफ स्टाइलमुळे त्यांना मुलांकडे लक्ष देता येत नाही. परिणामी मुलं आपला बराचसा वेळ हिंसक व्हिडिओ गेम्स खेळण्यात व्यतित करतात. याचा परिणाम मुलांच्या मेंदूवर होत आहे. त्यातून मुलं अधिक एककल्ली व आक्रमक झालेली आहेत. मेट्रो शहरातील जवळ-जवळ ६६ टक्के मुलं एकटे गेम खेळतात, तर ३२ टक्के मुलं आई-वडील किंवा घरातल्या कुटुंबाच्या उपस्थितीत गेम्स खेळतात.

मानसिक आजार

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, अनेक कारणांमुळे मुलं हिंसक होत आहेत. अलीकडे त्याचं प्रमाण वाढत आहे. शहरांमधले पालक आपल्या मुलांवर पूर्णपणे लक्ष ठेवू शकत नाहीत. म्हणून ते मुलांच्या हाती फोन देतात. मोबाईलवर मुलं असे गेम्स खेळतात, ज्यातून हिंसक प्रवृत्तींना चालना मिळते. त्यातून अश्लील वेबसाईटचा शोध लागून त्यांच्याकरवी लैंगिक गुन्ह्याचे प्रकारही घडतात.

दररोज तीन-चार तास मोबाईल गेम खेळणाऱ्यामध्ये रागाचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आलं आहे. हिंसा किंवा लैंगिक हिंसा असलेले व्हिडिओ गेम मुलांना खेळू देऊ नका, असा महत्त्वपूर्ण निकाल २०१० साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. या निर्णयाआधी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनी एक कायदा केला होता, ज्यानुसार १८ वर्षांची होईपर्यंत मुलांना हिंस्र व्हिडिओ गेम खेळता येणार नाहीत. (११ ऑगस्ट, बीबीसी हिंदी)

सतत ऑनलाईन गेम खेळणं मानसिक आजार असल्याचं निरीक्षण डब्लुएचओनं जून २०१८मध्ये नोंदवलं आहे. डब्लुएचओनं जाहीर केलेल्या ‘इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस’मध्ये ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनाला एक मानसिक आजार म्हटलं आहे. सतत व्हिडिओ गेम खेळल्यामुळे आयुष्यातील इतर प्राधान्याच्या व महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचंही निरीक्षण यात नोंदवलं आहे. या निष्कर्षातून ऑनलाइन गेम खेळण्याच्या प्रवृत्तीवर व त्यातून होणाऱ्या दुष्परिणामांवर आळा घालण्याचा उद्देश जागतिक आरोग्य संघटनेचा होता.

डब्लुएचओनं ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन असल्यास वागण्यात दिसून येणाऱ्या बदलांचे तपशील दिले आहेत-

१) दैनंदिन महत्त्वाच्या कृतींपेक्षा ती व्यक्ती गेम खेळण्यास जास्त पसंती देते.

२) किती वेळ गेम खेळावं यावर त्या व्यक्तीचं नियंत्रण राहत नाही.

३) आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाला तरी ती व्यक्ती गेम खेळणं सोडत नाही.

४) वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आयुष्यातील इतर भागांवर गेम खेळण्याचा परिणाम होत असल्यास त्याला ‘व्यसन’ म्हणता येईल.

५) ही लक्षणं वर्षभरापासून दिसून आल्यास त्याला ‘मानसिक आजार’ म्हणता येईल.

डब्लुएचओकडून ‘इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस’ प्रकाशित केलं जातं. २७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९० साली ही आकडेवारी अपडेट केली होती. या नियमावलीची ११वी आवृत्ती जून २०१८मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यात गेमिंग डिसऑर्डरला ‘सतत वाढणारी आरोग्य समस्या’ म्हणून नोंदवण्यात आलं आहे. संघटनेच्या मते याला पुरेशा देखरेखीची गरज आहे.

वाढते धोके

तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर मानवी जीवन कमालीचं बदललं आहे. सतत नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीनं माणसाचं अवघं जीवनच व्यापून टाकलं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत तंत्रज्ञानाशी आपला वारंवार सबंध येतो. सहज उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता वाढून कार्य अधिक गतिशील झालं आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं व्यापार-उदिम वाढला आहे. इंटरनेट क्रांतीनं व्यापारी बाजारपेठेला अधिक गतिमान बनवलं आहे. कामाचा दर्जा वाढला आहे. परिणामी तंत्रज्ञानामुळे शरीराला धोके उत्पन्न झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक गॅझेटमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गानं मानवाला असाध्य आजाराला घेरलं आहे. इलेक्ट्रॉनिक चीप, सीएफएल, एलईडी, एलसीडी इत्यादींमधून मानवी शरीराला घातक असे रेडिएशन बाहेर पडत आहेत. या रेडिएशनमुळे मानवी समाज धोक्यात आल्याचं निरीक्षण अनेक नव्या संशोधनातून पुढे आलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सनं कबुली दिली की, सेमीकंडक्टर फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या २४० कामगारांना कॅन्सर झाला आहे. या संदर्भात सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सनं त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची माफी मागितली. एकूण कामगारांपैकी ८० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कामगारांच्या कुटुंबाकडून दक्षिण कोरियातील एका न्यायालयात हा खटला सुरू होता. या सुनावणीदरम्यान सॅमसंगनी आपली चूक मान्य केली. कंपनीनं प्रत्येक व्यक्तीला १.३३ लाख डॉलर म्हणजे ९५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलेली आहे. (२३ नोव्हेंबर, फायनान्शियल एक्सप्रेस).

इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे मुलांना अनेक आजार चिकटले आहेत. पाठदुखी, डोळ्यात जळजळ, डोळ्यात पाणी येणं, डोकेदुखी, भूक न लागणं, मळमळणं, बोटं बधीर होणं, झोप न येणं, हाताची बोटं अकडणं, अचानक चक्कर येणं, स्मरणशक्ती कमी होत जाणं, कामात लक्ष न लागणं, चिडचिडेपणा, सतत एकटं राहावंसं वाटणं, पालकांशी न पटणं, अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

गेमशिवाय जगात दुसरं काहीच शाश्वत नाही हा विचार लहान मुलांमध्ये बळावला आहे. मोबाईल गेम आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याची भावना अल्पवयीन मुलांमध्ये रूढ झाली आहे. पालकांनी गेम खेळू नको, असं बजावलं की मुलं आत्महत्या करण्यासदेखील मागे-पुढे पाहत नाहीत, असं अनेक निरीक्षणातून समोर आलं आहे. कारण गॅझेटला आपला सर्वांत जवळचा व प्रिय मित्र म्हणून मुलं बघू लागले आहेत. गेमशिवाय आयुष्याचा ‘गेम ओव्हर’ होईल, अशी भावना लहान मुलांमध्ये तीव्र झाली आहे.

अलीकडे थ्री-डी गेम खेळण्याची प्रवृत्ती लहान मुलांमध्येही बळावली आहे. नव्या संशोधनातून असे गेम्स लहान मुलांसाठी हानिकारक असल्याचं दिसून आलं. मोठ्या शहरात तासनतास थ्री-डी गेम खेळणाऱ्या मुलांना लवकर डोळ्याचे आजार होण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे. थ्री-डीचा थ्रील अनुभवण्यासाठी डोळ्यावर विशिष्ट चष्मा धारण केला जातो. त्यामुळे व्हिजन सिंड्रोम आणि मोशन सिकनेससारखे आजार होत असल्याचं दिसून आलं आहे. हा आजार व्यक्तीची दृष्टी कमकुवत करतो.

जास्त काळ व्हिडिओ गेम्स खेळत राहिल्यानं लहान मुलांमध्ये हा आजार बळावत चालला आहे. नुकतीच मोबाईलमुळे तिरळेपणा येत असल्याची लक्षणं दिसून आली आहेत. सलग चार तास मोबाइल वापरल्यानं मुलांमध्ये तिरळेपणा वाढत आहे, असं निरीक्षण चंदीगडच्या पीजीआय हॉस्पिटलनं केलेल्या अभ्यासात दिसून आलं. न्यूरो ऑप्थोमोलॉजी जर्नलमध्ये या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. डोळे कोरडे पडणं किंवा डोळ्यांतून पाणी येणं या समस्यांसह डोळ्यांचा आणखी एक नवा आजार उद्भवला आहे.

उपाययोजना

शहरी जीवन धकाधकीचं झालं आहे. आई-वडील दोघंही नोकरी करत असल्यानं मुलांसाठी त्यांना वेळ काढणं कठीण झालं आहे. आई-वडिलांचं आपापसांत कसं नातं आहे, यावरही मुलांची वर्तवणूक अवलंबून असते. आई-वडिलांतील संबंधाचा मुलांवर कसा परिणाम होतो, या संदर्भात बीबीसीवर एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात असं म्हटलं होतं की, ‘मुलांना शांत राहण्याचा आणि सभ्य वर्तणुकीचा सल्ला देणारे आई-वडीलच जेव्हा आपसात भांडतात, तेव्हा अशी मुलं राग आला की, अधिक हिंसक बनतात. आपल्या मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे, अशी भावना मुलांमध्ये असते. जेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध होतं, तेव्हा ती वेगळ्या प्रतिक्रिया देतात.

याच लेखात पुढे असं म्हटलं होतं की, पौगंडावस्थेत मुलांच्या हॉर्मोनमध्ये बदल होतो, या वयात मुलांच्या मेंदूचा विकास फार वेगानं होत असतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते या काळात तर्क लावणारा मेंदूचा लॉजिकल सेन्सचा भाग वेगानं विकसित होतो. पण भावना समजणारा इमोशनल सेन्सचा भाग विकसित झालेला नसतो. अशा वेळी मुलं निर्णय घेताना भावनिक होतात. त्यामुळे या वयातील मुलांवर आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे मुलं रागीट होणं किंवा हिंसक होणं स्वाभाविक आहे.

अशा परिस्थितीत डॉक्टर मुलांशी संवाद साधण्याचा सल्ला देतात. मुलांना बाहेर घेऊन जाणं, त्याच्यांशी मोकळेपणानं बोलल्यानं बराच फायदा होऊ शकतो. संवाद साधल्यानं मुलांच्या व्यवहारात बराच बदल घडतो. आज कुटुंबातील व्यक्तीशी संवाद तुटल्यानं नातेसंबंधांत वितुष्ट निर्माण झालं आहे. त्यामुळे हरवलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

प्रत्येक वेळी मुलांच्या चुका काढणं चुकीचं आहे. वाढत्या वयाबरोबर त्यांचं व्यक्तिमत्त्व घडत असतं. त्यामुळे त्यांना समजून घेणं फार आवश्यक आहे. लहान मुलं घरात असली की, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळावेत. त्यांना कोणत्या तरी ॲक्टिव्हीटीमध्ये गुंतवून ठेवावं. त्यांना चित्रं काढायला सांगावं. त्यासाठी त्यांना साहित्य आणून द्यालं. त्यांच्या कल्पक वृत्तीला चालना देण्यासाठी त्या प्रकारचं क्रिएटिव्ह वातावरण तयार करावं. त्यांच्या बुद्धीला चालना देणारी एखादी गोष्ट त्यांना सांगावं. डोक्याला ताण देणारी आणि त्यासोबत त्यांचा विकास होईल अशी एखादी गोष्ट केल्यास ती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. वेळेप्रसंगी शिस्त लावण्यासाठी मुलांना छोटीशी शिक्षा करावी, पण ती करताना आई-वडिलांपैकी एकानं मुलांशी प्रेमाची वागणूक द्यावी. म्हणजे आई रागावत असेल तर वडिलांनी मुलांशी आपुलकीनं वागावं. दोघांनीही रागावणं सुरू ठेवलं तर मुलांच्या वर्तुणुकीत फरक पडतो.

लहान मुलांच्या विकासामध्ये खेळण्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. आई-वडील सोबत नसतात, त्यावेळी ही मुलं त्यांच्या खेळण्यांसोबत खेळत मोठी होतात. मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल अशा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्यांना घेऊन द्यावीत. ते त्यांच्यासोबत खेळण्यात गढून जातील.

लहानवयातच मोठे-मोठ्या आकृत्या, चित्रं, रिंग, बॉक्स, अल्फाबेट द्यायला सुरुवात करावी. खेळ कसे खेळायचे हे शिकवलं तर मुलं मन लावून ते शिकतात. चित्रांतून व आकृत्यांमधून त्यांची बुद्धिमत्ता वाढीस लागते. मुलांची जास्तीत जास्त शारीरिक हालचाल होईल अशा कृतींना प्राधान्य द्यावं. शक्य होईल तेवढं लहान मुलांना मोबाईल व इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून लांब ठेवालं. लहान मुलांसमोर पालकांनीदेखील वारंवार मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन बसू नये. मुलं मोठ्यांचं इथंही अनुकरण करतील. घरात सर्वांनी पुस्तकांचं सामूहिक वाचन करावं. लहान मुलांसाठी चित्रकाला वही, छान-छान गोष्टींची पुस्तकं आणून द्यावीत. मुलांसोबत पालकांनीदेखील खेळावं. शक्य होईल तेवढा वेळ पालकांनी मुलांसोबत घालवावा. जेवताना मुलांसोबत गप्पा माराव्यात. सवय किंवा नियम आपण स्वत: आणि मुलांनाही लागू केल्यास मुलांचं मोबाइल आणि गेमवरचं लक्ष उडायला नक्की मदत होईल. इलेक्ट्रॉनिक खेळणी त्यांना लहान वयात देऊ नयेत. मुलांना बंदूक, तलवार यांसारखी खेळणी कदापी देऊ नयेत. मुलं त्याप्रमाणे अनुकरण करून त्यांच्यात हिंसक मानसिकता तयार होते.

शहरात मुलांना खेळण्यासाठी मोठी मैदानं नाहीत. त्यातून मार्ग काढण्यासाठी मुलांना पार्कमध्ये घेऊन जावं. तिथं मुलं खेळतात. मैदानी खेळातून त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता वाढते. त्यांच्या कलागुणांचा विकास होतो. मोबाइलवर खेळले जाणारे गेम्स हे अभासी असतात, हे मुलांना पटवून द्यावं. मुलांना त्यामधला फोलपणा पटवून द्यावा. मोठ्या मुलांना मोबाईल देताना त्याचं वेळापत्रक बनवावं. मुलांसाठी मोबाइल, मैदानी खेळ, अभ्यास याचं वेळापत्रक पाळणं बंधनकारक करावं.

गेल्या महिन्यात मलेशियाच्या एका पालकांनी १० वर्षांच्या आपल्या मुलीला मोबाईल घेऊन देताना तिच्याशी लिखित करार केला. यात तिनं मोबाईलमध्ये जास्त वेळ गंतून राहू नये असा सल्ला होता. पालकांनी तिला शाळेत मोबाईल नेण्यास बंदी केली आहे. हा लिखित करार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पालकांनी मुलांना मोबाईल देताना अशा प्रकारचा प्रयोग करायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......