अजूनकाही
गेल्या पंधरा वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता होती. भाजपच्याच कारकिर्दीत इंदूर आणि भोपाळ या दोन शहरांनी लागोपाठ दोन वर्षं ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत ‘भारतातली सर्वांत स्वच्छ शहरं’ असण्याचा बहुमान मिळवला होता. मध्य प्रदेशमधल्या रस्त्यांना महाराष्ट्रातले लोक हिणवायचे, ‘मध्य प्रदेश की सीमा जब प्रारंभ होती है, तो लिखा रहता है, मध्य प्रदेश सीमा प्रारंभ. सडक समाप्त’! अशा स्थितीतून आज महाराष्ट्रापेक्षाही मध्य प्रदेशमधले रस्ते चांगले झाले आहेत. वीज चोवीस तास मिळतेय. आयआयटी आणि आयआयएम इंदूरला आले आहेत. मग तरीही हा सत्ताबदल का झाला?
‘काँग्रेस और जीत के बीच में शिवराजसिंग चौहान खडे़ हैं’ असं म्हटलं जात असताना काँग्रेसनं इतकी जोरदार मुसंडी कशी मारली? मूळच्या मध्य प्रदेशमधल्या पण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई-पुण्यात स्थायिक झालेल्या मध्य प्रदेशवासीयांची मतं याबद्दल जाणून घेतली. ही सगळी आयटी, ऑटोमोबाईल्स क्षेत्रांत काम करणारी तरुण मंडळी आहेत. यात काही तरुण लेखिका आणि कलाकारही आहेत.
मूळचे इंदूरचे आणि गेल्या १० वर्षांपासून पुण्यात मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करत असलेले अभिजित भागवत म्हणतात, ‘‘मध्य प्रदेशचे निकाल चांगले वा वाईट असं मी म्हणणार नाही, पण आश्चर्यकारक नक्की म्हणेन. शिवराजसिंग चौहान यांनी निश्चितपणे चांगलं काम केलं होतं. शिवाय पाच वर्षांत काँग्रेसनं निवडणुकीसाठी काही शिस्तबद्ध, नियोजनबद्ध तयारी केली, मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा समोर ठेवला असं काहीही नव्हतं. त्यामुळे भाजपचा मध्य प्रदेशमधला पराभव मला केंद्र सरकारच्या कामाची आणि निर्णयांची (नोटबंदी आणि जीएसटी) प्रतिक्रिया वाटतो. शिवाय काँग्रेस या यशासाठी तयार नव्हती आणि काँग्रेसनं या यशाची अपेक्षाही केली नव्हती, असं माझं मत आहे. Big opportunity lost by congress. आता त्यांनी अधिक प्रगल्भतेनं काम करण्याची गरज आहे असं मी म्हणेन.’’
अनिता दुबे मूळच्या भोपाळच्या. त्या चित्रकार आणि लेखिका असून गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहत आहेत. त्यांच्या मते “लोकांना मंदिर-मशीद यांच्याशी काही घेणंदेणं नाही. लोकांना रोजगार हवाय. स्वच्छ पाणी-वीज-आरोग्य सुविधा हव्या आहेत. भाजप सरकारनं अनेक योजना मोठ्या उत्साहात सुरू तर केल्या, पण पूर्णत्वास नेल्या नाहीत. भोपाळ-इंदूर इथली कायदा-सुव्यवस्था खराब आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालीय. लोकांना बदल हवा होता.”
आयटीमध्ये काम करणारे संजीव प्रधान मूळचे इंदूरचे. ते म्हणतात, “जे सत्ता परिवर्तन झालं आहे ते गरजेचं नव्हतं. पण लोकांना प्रश्नांची उत्तरं हवी होती, जी पंतप्रधानांनी समोर येऊन द्यायला हवी होती. ती न मिळाल्यामुळे हा पराभव झाला आहे. राफेल प्रकरणात पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. शिवराजसिंग चौहान यांनी निश्चित चांगली कामं केली आहेत, पण पंधरा वर्षांनंतर स्वाभाविकपणे येते, तशी सत्तेची दादागिरी आली होती. काही प्रश्नांबाबत सरकारनं योग्य भूमिका घेतली नाही, असा रोष लोकांच्या मनात निर्माण झाला.”
लेखिका आणि कथक नृत्यांगना असलेल्या स्वरांगी साने म्हणतात- “व्यापम घोटाळा, शेतकरी आंदोलन, सवर्ण-दलित संघर्ष या कारणांमुळे भाजप पिछाडीवर गेला. ये सब सपने टूटने का मामला है... ‘अच्छे दिनों’ के सपने और उम्मीदें टूट गयी...” हे त्यांना पराभवाचं प्रमुख कारण वाटतं.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या अभिजित दास यांचं मत मात्र वेगळं आहे. त्यांच्या मते, दिग्विजय सिंग यांचं सरकार हे अत्यंत worst होतं. आज रस्ते, वीज, स्वच्छता, शिक्षण या बाबतीत मध्य प्रदेशची जी प्रगती झाली आहे, ती निर्वीवाद शिवराजसिंग चौहान यांच्या भाजप सरकारमुळे आहे. जर काँग्रेस सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरली तर मध्य प्रदेश परत विकासाच्या बाबतीत मागे पडेल असं दास यांना वाटतं. शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यात भाजप सरकार कमी पडल्यामुळे काँग्रेसनं यश मिळवलं असं दास यांचं मत आहे.
पुण्यात असिस्टंट प्रोफेसर असलेल्या रेणुका भंडारींचं मत वेगळं आहे. त्यांना शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारचा पराभव झाला याचं दु:ख झालं. त्यांच्या मते स्वच्छता, विकास, शिक्षण या सर्वच क्षेत्रांत भाजप सरकारनं लक्षणीय कामगिरी केली होती. कदाचित जनतेच्या अपेक्षा फारच उंचावल्या होत्या. त्यामुळे शिवराजसिंग यांचा पराभव झाला असं त्यांना वाटतं.
पुण्यात मागील सहा वर्षांपासून आयटीमध्ये काम करणारे आशिष तिवारी म्हणतात, “जे झालं ते छानच झालं. भाजप सरकारनं काम केलं होतं. पण मध्यंतरीच्या कालखंडात भाजपवाले राज्य आणि देश जणू काही आपली जहागीर आहे असं समजू लागले होते. ‘मेरे रहते कोई माई का लाल आरक्षण हटा नहीं सकता’ हे शिवराजसिंग चौहानांचं वाक्य हेच दर्शवतं की, भाजपच्या अंगी सत्तेचा मद चढला होता.”
मध्य प्रदेशमधून अनेक तरुण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी महाराष्ट्रात विशेष करून पुणे आणि मुंबईत येतात. मध्य प्रदेशमध्ये अजूनही आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांचा फारसा विकास झाला नाही. त्यामुळे तरुणांना हे स्थलांतर करावं लागतंय का? असा प्रश्न आम्ही या तरुणांना विचारला. त्यावर अभिजित भागवत म्हणाले, “आज मध्य प्रदेशमध्ये आयआयटी आणि आयआयएम यासारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. पण उच्च शिक्षण घेतल्यावर त्या दर्जाचा पगार आणि पद देणाऱ्या रोजगार क्षेत्राचा विकास झालेला नाही. त्यामुळे नाईलाजानं तरुणांना बाहेर जावं लागतं.”
पुण्यात गेल्या १० वर्षांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करणारे, मेकॅनिकल इंजिनिअर असलेले गौरव भंडारी म्हणाले की, ‘इंदूरमध्ये पीथमपूरला काही काळ मी बजाजमध्ये काम केलं, पण पगार मिळत नव्हता म्हणून मग नाईलाजानं पुण्यात आलो. परत जायची इच्छा आहे, पण जो पगार इथं मिळतो, तो तिथं मिळत नाही. म्हणून जाता येत नाही.’ अभिजित दास यांचंही हेच म्हणणं आहे. ते म्हणाले, ‘मी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल क्षेत्रांत काम करतो. याच्या संधी पुणे, बंगलोर, दिल्ली आणि मुंबई येथे आहेत.’’
लेखिका आणि चित्रकार असलेल्या अनिता दुबेंनी सांगितलं की, त्यांचे भाचे-पुतणे पुण्यात टिसीएस-अॅक्सेन्च्युअर इथं काम करतात. इंदूरला आमची स्वत:ची घरं आहेत. आयटी क्षेत्राचा तिथं विकास झाला तर आम्ही आमच्या घरी राहू शकू. शिवाय इथं जो भाडं किंवा इएमआयचा खर्च होतो तो वाचेल.’
सध्या इंदूरला टिसीएसनं जागा विकत घेतली असून इमारतीचं बांधकामही झालं आहे, पण अजून प्रत्यक्ष काम सुरू व्हायला वेळ आहे. बघूयात बाकी उम्मीद पे दुनिया कायम है, असंच मध्य प्रदेशवासी म्हणताहेत.
.............................................................................................................................................
लेखिका वसुंधरा काशीकर आय ट्रान्सफॉर्म या संस्थेच्या संचालक आहेत.
vasu.rubaai@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment