अजूनकाही
पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या, सर्वत्र चर्चा झडल्या, विश्लेषणं लिहून/बोलून झाली, आडाखे बांधून झाले, भविष्यवाण्या वर्तवून झाल्या... अतिकंटाळा यावा इतकं हे सर्व अजीर्ण होतं! लक्षात आलं, सध्या देशातले वाघोबा माध्यमांत गाजताहेत (टी-१ उपाख्य अवनीला ‘कॉल हिम डॉग अँड किल’ असं क्रूरपणे मारून टाकलं गेलं, असल्याचा अहवाल नुकताच आला असल्याची बातमी वाचली.). त्या बातम्या वाचता/पाहताना मलाही वाघोबांची एक बातमी आठवली. तीच इथं शेअर करतोय. देशमुख आणि कंपनीच्या वतीनं लवकरच प्रकाशित होत असलेल्या ‘डायरी’ या पुस्तकातील हा एक अनुभव आहे.
घटना आहे २००७ सालातली. कतार एअरवेजची सर्व्हिस असल्यानं व्हाया दोहा असा हा इंग्लंडचा प्रवास होता. दोहा येथील प्रस्तावित भव्य विमानतळाच्या कामाची पाहणी हा ‘व्हाया दोहा’चा हेतू होता. इंडिया टू इंग्लंड व्हाया कतार जाणं-येणं असा हा प्रवास आणि तोही थेट नागपूरहून होता. परतीच्या प्रवासात बर्मिंगहॅम एअरपोर्टवर अगदी नेमकं सांगायचं तर, १ नोव्हेंबरच्या पहाटे, वेळेच्या बरंच आधी पोहोचलो. परतीच्या प्रवासाच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर साहजिकच लक्ष वृत्तपत्रांकडे गेलं. भारतातल्या विमानतळावर असते तशीच त्या विमानतळावरही बरीच वृत्तपत्रं नि:शुल्क वितरणासाठी ठेवलेली होती. दोन-तीन वृत्तपत्रं मी आणि दोन-तीन प्रदीप मैत्र या पत्रकार मित्रानं उचलली. एकेकाळी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये सहकारी असलेला प्रदीप मैत्र आता ‘हिंदुस्थान टाईम्स’ला आहे. चांगला वाचक, बोलघेवडा स्वभाव आणि तरीही वायफळ बडबड न करणारा असल्यानं आणि असल्यानं वयानं तरुण असूनही संघाच्या वृत्तसंकलनात आमच्या सोबत १९८२-८३ पासून असल्यानं आमच्या पिढीतल्या पत्रकारांशी त्याचे सूर अजूनही चांगले जुळतात.
माझ्या हातातली वृत्तपत्रं चाळून ठेवली आणि प्रदीप वाचत असलेल्या ‘द इंडिपेंटन्ट’च्या अंकाकडे लक्ष गेलं. या टॅब्लॉलाईड वृत्तपत्राची ‘फर्स्ट लीड’ पूर्ण पान बातमी होती- ‘जगात उरले आहेत फक्त तीन हजार आठशे वाघ.’ उत्सुकता ताणली गेली. कारण आम्ही विदर्भात म्हणजे वाघांच्या प्रदेशातले! कान्हा-खिसली, ताडोबा ही वाघांसाठीची प्रख्यात अभयारण्ये नागपूरपासून हाकेच्या अंतरावर आहेत. मेळघाट, नागझिरा या वाघासाठी नसलेल्या अभयारण्यातही वाघांचा मुक्त संचार आहे. जंगलात फिरण्याची हौस आणि पत्रकारितेची निकड म्हणूनही वाघ हा जिव्हाळ्याच्या बातमीचा विषय. दरवर्षी होणार्या वाघांच्या गणनेकडे (खरं तर, वाघांची ‘गणना’ होते, पण ‘जनगणना’ हा शब्द आता रूढ झाला आहे!) जातीनं मी लक्ष ठेवत असे. त्यासंबंधीच्या बातम्या देण्याची प्रथा वैदर्भीय पत्रकारितेत असे आणि आजही आहे. ‘इथं वाघ दिसला’, ‘तिथं दिसला’, ‘वाघाचं कुटुंब फिरताना दिसलं,’ ‘वाघ वाढले’, अशा अनेक बातम्या वन खात्यातल्या अधिकार्यांनी वर्षानुवर्षं दिल्या आणि आम्ही छापल्या.
प्रदीपकडून तो अंक घेऊन ती बातमी वाचली तर, ‘जगात कोणत्या देशात सध्या किती वाघ उरले आहेत, १९०० साली जगात दहा लाख वाघ होते आणि आता ३८०० उरले आहेत, २०२५ मध्ये वाघ नामशेष झालेले असतील’ वगैरे वगैरे खूप सारे तपशील त्या बातमीत होते. त्यातील एक महत्त्वाचा तपशील असा होता, ‘गेल्या पाच वर्षांत भारतातील वाघांची संख्या पाच हजारांवरून कमी होत होत फक्त १३०० इतकी झाली आहे.’ वनखात्याचे विदर्भातील अधिकारी सातत्यानं वाघांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दावे करत असताना ‘द इंडिपेंटन्ट’मधून समोर उभं राहिलेलं चित्रं वेगळं आणि इशारादायक होते. वाघ आणि बिबटे यांच्यात सरमिसळ करून आकड्यांच्या बाबतीत कायम संभ्रम ठेवणार्या वन अधिकार्यांचं पितळच या आकडेवारीनं उघड झालेलं होतं. तो अंक सॅकमध्ये टाकून नंतर तीन दिवसांनी मी भारतात परतलो.
नागपूरबाहेर कुठेही गेलं तर तेथील मिळतील तेवढी वृत्तपत्रं आणायची आणि सहकार्यांना दाखवायची, हा शिरस्ता मी गेली अनेक वर्षं पाळतो आहे. त्याप्रमाणे ‘द इंडिपेंडन्ट’चा तो अंक ‘लोकसत्ता’तील माझा ज्येष्ठ सहकारी विक्रम हरकरे याला दिला. वन, पर्यावरण, पक्षी, प्राणी वगैरे मध्ये विक्रमला इंटरेस्ट असल्यानं इंडिपेंडन्टला कोट करून एक चांगली बातमी करता येईल, असं सुचवलं. तोपर्यंत भारतातील वाघांची संख्या इतकी चिंताजनक कमी झाली आहे, ‘सेव्ह टायगर’सारख्या मोहिमा हाती घेतल्या पाहिजेत, सरकारनं वाघ कमी झाल्याची गंभीर दखल घेऊन विशेष उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत वगैरे वगैरे अशी कोणतीही चाहूलसुद्धा भारतातील कुणालाही लागलेली नव्हती.
‘इंडिपेंडन्ट’मधील त्या वृत्ताच्या आधारे भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील वाघांची नेमकी आकडेवारी किती आहे, ती अलीकडच्या पाच वर्षांत किती आणि कशामुळे कमी झाली वगैरे अधिकचे तपशील विक्रमनं जमा केले. अनेक वर्षं असंख्य हालअपेष्टा सहन करत वाघांच्या जनगणनेत सहभागी होण्याचा अनुभव त्याला होता. वाघांच्या संख्येबाबत वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात मतभेद कसे आहेत, हे प्रत्येक जनगणनेनंतर तो सांगत असे. वाघ संवर्धनाबाबत वन अधिकारी किमानही गंभीर नाहीत, अशी विक्रमची खंत साधार होती.
साहजिकच ही बातमी करताना त्याची इनव्हॉलमेंट जास्त होती आणि त्याच्याकडच्या माहितीला पुराव्याचा आधार होता. या अतिरिक्त माहितीसाठी जवळजवळ एक आठवडा खर्ची पडला आणि ११ नोव्हेंबर २००७च्या ‘लोकसत्ता’च्या सर्व आवृत्त्यांत ‘जगात फक्त ३८०० वाघ’ ही विक्रमची बातमी ‘द इंडिपेंडन्ट’ला कोट करून प्रकाशित झाली. ‘चांगली बातमी दिली विक्रमनी’, ‘बरं झालं वनखात्याला उघडं पाडलं,’ असं म्हणणारे अनेक फोन आले. वाघाशी संबंधित असणार्या महाराष्ट्राच्या वर्तुळात त्या बातमीची भरपूर चर्चा झाली, पण ‘अरेरे, वाईट झालं’, यापुढे ती चर्चा सरकलीच नाही.
थोडक्यात, बातमी महाराष्ट्रापुरतीच गाजली आणि तिची ज्या गांभीर्यानं दखल घेतली जायला पाहिजे होती, त्या गांभीर्यानं राष्ट्रीय पातळीवर तर सोडाच, महाराष्ट्र पातळीवरही दखल घेतली गेली नव्हती. माणसाविषयीही किमान संवेदनशील नसणार्या राज्य सरकार आणि प्रशासनाकडून यापेक्षा वेगळी काही अपेक्षाही बाळगण्यात हशील नव्हतं. ‘बातमी गाजते, पण वाजत नाही’ असे जे सिनियर्स सांगत त्याचा अनुभव आला. महाराष्ट्राच्या जंगलात काम करणार्या काही स्वयंसेवी संस्थांच्या मित्रांनी मात्र संपर्क साधून कमी झालेल्या वाघांच्या संदर्भातील तपशील मागवून घेतले. आपण काहीतरी करायला हवं, ही त्यांची भावना होती, पण त्यांची ही संवेदना आकाशाला टाचणीनं भोक पाडण्यासारखी होती.
आता नेमकं आठवत नाही, पण ‘लोकसत्ता’तली बातमी प्रकाशित झाल्यावर चार-एक आठवड्यांनी हीच बातमी भाषांतर करून आणि ‘रिलायबल सोर्सेस’चा हवाला देऊन एकाच वेळी दिल्लीच्या दोन-तीन इंग्रजी वृत्तपत्रांत प्रकाशित झाली आणि खळबळ उडाली. वाघ कमी झाल्याची दखल दस्तुरखुद्द तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच घेतल्याचीही बातमी दुसर्या दिवशी प्रकाशित झाली आणि देशाच्या वनखात्यात अक्षरश: धावपळ उडाली. ‘अमुक इम्पॅक्ट’, ‘तमुक इम्पॅक्ट’ अशा बातम्या दिल्लीच्या मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात झळकल्या. घाम पुसत वरिष्ठ अधिकारी आणि राज्याचे वनमंत्री राजधानी दिल्लीत पोहोचले.
पंतप्रधानांनी ‘वाघ वाचलेच पाहिजेत,’ असे आदेश सर्व संबंधितांच्या बैठकीत दिले. या विषयाचं गांभीर्य दिल्लीच्या मीडियाच्या जसं लक्षात आलं तसंच ते चाणाक्षपणे काम करणार्या स्वयंसेवी संस्थांच्या हायफाय नेत्यांच्याही लक्षात आलं. या विषयावर भरपूर ‘लोणी’ खाता येऊ शकतं, याची जाणीव या स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांना झाली. दोन-चार दिवसांतच ‘वाघ तज्ज्ञ’ नावाची जमात उदयाला आली! या स्वयंसेवी संस्थांनी लगेच एक टास्क फोर्स स्थापन करून संपूर्ण देशातल्या व्याघ्र प्रकल्पांची पाहणी करून या माहितीची खातरजमा करण्याची मोहीम जारी केली. प्रशासकीय यंत्रणेचा प्रदीर्घ कटु अनुभव असणार्या पंतप्रधानांनी बहुधा दगडापेक्षा वीट मऊ, या न्यायाने देशातल्या वाघांची मोजणी करण्याची जबाबदारी या स्वयंसेवी संस्थांच्या या टास्क फोर्सवर सोपवली. वेगानं सूत्रं हलू लागली. ठिकठिकाणी वाघ वाचवण्याच्या गर्जना वाघाच्या डरकाळीपेक्षा मोठ्या आवाजात सुरू झाल्या. हरहुन्नरी पुढार्यांनी लगेच वाघ वाचवणं म्हणजे मनुष्य वाचवणं कसं आहे, अशी पत्रकबाजी सुरू केली. एखादी बातमी गाजायला लागल्यावर जसे पडसाद उमटतात तसे उमटू लागले... हे सगळं बघणं एकूणच मनोरंजक होतं.
पुढच्या दोन-तीन महिन्यांत या टास्क फोर्सचा अहवाल पंतप्रधानांना सादर झाला. पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून वाघ वाचवण्यासाठी काहींशे कोटी रुपये मंजूर केले. या काळात एक हौशी महिला वाघांबाबत राष्ट्रीय तज्ज्ञ झाली, (तसे उल्लेखच तिचे माध्यमांत होऊ लागले, म्हणून हे कळलं!) तिच्या एनजीओला दिल्लीत जागाही मिळाली! एका राष्ट्रीय प्रकाश वृत्तवाहिनीनं बिग बीपासून सर्वांना हाताशी धरून एक मोहीम राबवली आणि जाहिरातींच्या रूपात भरपूर कमाई केली.
उरलेल्यापैकी किती रक्कम भारतातल्या वाघोबांपर्यंत पोहोचली, हे विचारण्याचं काहीच कारण नाही. कारण ही जबाबदारी देशातील विविध राज्यांच्या वनखात्यातील अधिकार्यांवर सोपवण्यात आली होती. वनअधिकारी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे प्रशासन तोपर्यंत जसे वाघांविषयी असंवेदनशीलपणे वागत होते तसेच पुढेही वागले. फार लांबचे कशाला, मेळघाट आणि ताडोबात वाघांची उन्हाळ्यात तृष्णा भागावी, यासाठी उभारण्यात आलेले जवळजवळ सर्वच पाणवठे गळके उभारले गेले. टँकरनं पाणी ओतल्यावर ते हौद अर्ध्या तासात रिकामे होतात.. .इथपासून वाघ वाचवण्याच्या प्रयत्नांना गळती लागली. २०१० च्या उन्हाळ्यात तर चार वाघ आणि साडेतीनशेपेक्षा जास्त माकडं पाण्याअभावी तडफडून मेली...
केवळ राजा चांगला असून चालत नाही, त्याचं दलही तितकंच चांगलं असावं लागतं. एखादी बातमी गाजते त्यावर सरकार हलते, उपाययोजना हाती घेते, पण त्या गरजूंपर्यंत पोहोचतच नाही, मग तो गरजू माणूस असो की, वन्यप्राणी; हाही वाघोबाच्या या बातमीचा आणखी एक अर्थ आहे.
शिकार झालेल्या एका काळवीटांनं सलमान खान नावाच्या सुमार, पण लोकप्रिय नटाचा अजून पिच्छा सोडलेला नाही. हत्या झालेली टी-१ उपाख्य अवनी किती जणांना भोवते एवढाच आता उत्सुकतेचा विषय आहे...
(मजकुरातील सर्व छायाचित्रे वन्य जीव छायाचित्रकार, अभ्यासक, लेखक हर्षद शामकांत बर्वे यांच्या सौजन्याने. या छायाचित्रांचे हक्क हर्षद बर्वे यांच्याकडे राखीव आहेत.)
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Shashank
Mon , 24 December 2018
Vidarak chitra