अजूनकाही
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन महत्त्वपूर्ण राज्यांमध्ये सत्ता मिळाल्यानंतरही काँग्रेसला त्या त्या राज्यांत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी निरीक्षक पाठवणं, आमदारांचं मन व मत जाणून घेणं आणि शेवटी सर्वाधिकार पक्षाध्यक्षांना अशा एक ओळीचा प्रस्ताव पारित करणं, हा नेहमीचा काँग्रेसी खेळ झाल्यावर, दिल्लीस्थित हायकमांड व पक्षाध्यक्षांना दावेदारांसह चर्चेच्या फेऱ्या मागून फेऱ्या पार पाडाव्या लागल्या. आणि सरतेशवेटी जे ठरलं ते हेच की, गांधी घराण्याचा अपवाद वगळता वय, अनुभव या गोष्टी पक्षात आजही महत्त्वाच्या ठरतात!
स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली काँग्रेस, स्वातंत्र्योत्तर भारतात राजकीय पक्ष म्हणून काम करू लागली, तेव्हाच तिच्या नेतृत्वाचं वय सरासरी ५०च्या पुढे होतं! साहजिकच काँग्रेसमध्ये राजकीय उत्कर्ष हा पन्नाशी-साठीच्या पुढे ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगवळणी पडलीय. काँग्रेसमध्ये घराण्यामुळे राजीव गांधी कमी वयात पंतप्रधान झाले. याउलट बंडखोरी केल्यामुळे शरद पवार चाळीशीच्या आत मुख्यमंत्री झाले! त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व पहिल्यापासून बुजुर्गांच्या हाती राहिलंय. काँग्रेस सेवा दल, महिला आघाडी, दलित सेल हे सगळं पक्षीय धोरण घटनात्मक बाबी म्हणून पाट्यांसह ठिकठिकाणच्या काँग्रेसभवनात असतं. पण ती निव्वळ सोय असते. नाही म्हणायला सत्तरच्या दशकात एनएस-युआय आणि युवक काँग्रेस यांनी बऱ्यापैकी धुमाकूळ घातला. पुढे संजय गांधीसारखा झंझावात येऊनसुद्धा बुजुर्गांचे गड फारसे हलले नाहीत. यात बुजुर्गांनी गांधी पुत्राच्या चपला उचलण्याच्या बातम्या चवीनं पसरवल्या गेल्या. ही काँग्रेस संस्कृती आता शिवसेनेत आदित्य ठाकरेंच्या रूपानं दिसते. तेव्हा सत्तेपुढे शहाणपण नसतं, हा धडा पक्षीय सीमा ओलांडून गेलाय हे कळतं.
काँग्रेसमध्ये संघ, भाजपसारखी सक्तीची निवृत्ती अथवा मार्गदर्शक मंडळाच्या नावाखाली वृद्धाश्रम स्थापण्याची पद्धत नाही. उलट काँग्रेसमध्ये वय जितकं जास्ती, तेवढा उपद्रव अधिक हाच अनुभव येतो. अगदी अलीकडे राहुल गांधींनी वयोवृद्ध मोतीलाल व्होरा यांना खजिनदार पदातून मुक्त केलं. पण संघटनेत सरचिटणीस वगैरे पद दिलंच!
८५ साली राजीव गांधींनी सत्तेच्या दलालांवर भाष्य केलं होतं. ते सत्तेचे दलाल म्हणजे श्रेष्ठींची सर्व प्रकारची मर्जी सांभाळून त्यांच्या हौसामौजा पुरवणारे दलाल जसे अभिप्रेत होते, त्याचप्रमाणे राज्याराज्यांतील ही जुनी खोडंही अभिप्रेत होती. राजीव गांधींनाही आपलं मंत्रिमंडळ सरासरी तरुण ठेवता आलं नाही.
काँग्रेसमध्ये तरुण तुर्कांना थेट सत्तापदाची संधी ही तशी दुर्मीळ, अपवादात्मक गोष्ट. हा प्रवास निवडणुकीच्या तिकीट वाटपापासूनच सुरू होतो. काँग्रेसच्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात आता सूत्रं तरुणांनी हाती घ्यावीत असं जोशात म्हटलं जातं, पण ते तेवढंच, तिथंच टाळ्या मिळवण्यापुरतं. काँग्रेसमधल्या तरुण तुर्कांना पक्षात राहून काम करणं कठीण होतं किंवा त्यांना काम करणं कठीण केलं जातं. त्यामुळे आणीबाणीत मोहन धारिया व चंद्रशेखर या तरुण तुर्कांना बाहेर पडावं लागलं, तर शरद पवारांना बंडखोरी करावी लागली! महाराष्ट्रात विजय सावंतांचं काय झालं? हेच!
या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य सिंधीया किंवा सचिन पायलट यांची मुख्यमंत्रीपदावरची दावेदारी प्रत्यक्षात येणं कठीणच होतं. शेवटी सोनिया गांधी, प्रियंका गांधी(ही) निवड प्रक्रियेत शिरल्या. रॉबर्ट वड्रा होते की नाही कल्पना नाही. एकुणात असं दिसलं की, राहुल गांधींची इच्छा असली तरी आपल्या तरुण सहकाऱ्यांच्या हातात ते सत्ता सोपवू शकले नाहीत. छत्तीसगडची स्पर्धा समवयस्कांत असल्यानं ती फारशी रंगली नाही.
ज्योतिरादित्य सिंधीया आणि सचिन पायलट यांच्यात काही साम्यं आहेत. दोघं तरुण, उच्चशिक्षित तर आहेतच, पण दोघांचेही वडील अपघातात गेले. त्यांची जागा यांनी घेतली. थोडक्यात सहानुभूतीच्या वारसाहक्कानं ते राजकारणात आले. आणि हेच कारण राहुल गांधींच्या राजकारण प्रवेशामागेही आहे! फरक उतकाच की, राहुल गांधी थेट पंतप्रधानपदी बसू शकतात, यांना कर्तृत्व सिद्ध करूनही वेटिंग लिस्टवर राहावं लागलं. कारण काँग्रेस संस्कृती!
काँग्रेसमध्ये (गांधी घराण्याचा अपवाद) नेतृत्वाची संधी मिळायलाच वयाची किमान पन्नाशी सरायला लागते, तिथं ८०-९० वर्षांचा नेताही नेतृत्वाच्या स्पर्धेत असू शकतो. आणि काँग्रेस आज जी तरुणांना, मध्यमवयींना कालबाह्य वाटते त्याचं कारण हेच आहे. काँग्रेसचे ४४ खासदार निवडून आल्यावरही संसदीय नेतेपदी त्यांना ज्योतिरादित्यपेक्षा मल्लिकार्जुन खरगे यांची निवड करावी लागते. यामध्ये अनुभव, प्रादेशिकता, जात हे घटक असले तरी मुख्य घटक असतो, तो गांधी घराण्याला स्पर्धा ठरू शकणारा, आव्हान देणारा किंवा प्रकाशझोतात राहणारा कुणी नको.
त्यामुळे काँग्रेसमधले बुजुर्ग अनेक वर्षांच्या पक्षीय सेवेनंतर मिळणारी पदं सहजासहजी सोडायला तयार नसतात. आजही राहुल गांधींची पत्रकार परिषद पहा. ते स्वत: वगळता सगळे जुनेजाणते बुरुज! राहुल गांधी इच्छा असूनही काँग्रेसला तरुण करू शकत नाहीत. कारण काँग्रेसमधले हे बुजुर्ग देशभर वडाच्या पारंब्यांसारखे खोलवर रुजलेत. त्यांना उखडायचं म्हटलं तर पक्षाचा डोलाराच कोसळेल. आणि बुजुर्गांना हात लावला की, ते आपली पत्नी, मुलगा, सून, जावई, मेव्हणा पुढे करतात. म्हणजे पुन्हा तेच.
यामुळेच ज्योतिरादित्य सिंधीया आणि सचिन पायलट यांचा राज्याच्या राजकारणात(च) राहण्याचा प्रयत्न होता\आहे. कारण राष्ट्रीय राजकारणात राहुल गांधींचे मनसबदार म्हणून(च) राहावं लागणार. अगदी सत्ता आली तरी मंत्रीपद मिळेल, तेही तुलनेनं कमी महत्त्वाच्या खात्याचं. त्यापेक्षा राज्यात मुख्यमंत्रीपद मिळालं तर किमान दोन टर्म काढून मग निवृत्तीवयात केंद्रात जायला हरकत नाही, असाच विचार त्यांनी केला असणार! त्यामुळेच शेवटी उप-मुख्यमंत्री पदाचा शिरपेच त्यांनी पत्करला. यातून पक्षीय राजकारणात श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला खुर्चीखाली सुरूंग पेरूनच खुर्चीत बसवलाय.
राहुल गांधींनी धाडस दाखवून या दोघांना मुख्यमंत्रीपदी बसवलं असतं तर काँग्रेससह देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलला असता. आज देशात सर्वाधिक युवकांची संख्या असताना त्यांना काँग्रेसच्या निष्ठावान, बुजुर्ग, अनुभवी, विषय पारंगत नेत्यांशी कनेक्ट होता येत नाही. कारण त्यांच्या देहबोलीपासून ‘बोली’पर्यंत ते ओल्डवन आणि आऊटडेटेड, इनथिंग वाटत नाहीत.
भाजपनं निदान पक्षाचं सरासरी वय ५०पर्यंत तरी आणलंय. त्यांचे नेते नवी वेशभूषा, नवं तंत्रज्ञान, नवी भाषा बोलतात. त्यामुळे ते विद्वेषी, विखारी बोलले तरी पहिल्या फटक्यात नव्या पिढीला आपले वाटतात. काँग्रेसच्या राहुल गांधींसह कुणाबद्दलच असं वाटत नाही. २०१४ साली प्रियंका गांधींबद्दल मात्र भयंकर उत्सूकता सर्वच स्तरांत होती. पण बहुधा भाऊरायासाठी (आणि नवऱ्याच्या उपदव्यापापायी) त्या पडद्यामागेच राहिल्या.
राहुल गांधींना काँग्रेसच्या बुजुर्गांसोबत सत्ता गाठायची आणि टिकवायची असेल तर त्यांना खूप मर्यादा तरी पडतील किंवा त्यांना अकाली प्रौढ व्हावं लागेल! राजीव गांधी अशाच चक्रव्यूहात सापडले होते आणि व्ही. पी. सिंगांनी नेम साधला. तिथून जो काँग्रेसचा डोलारा गडगडला तो आजतागायत सावरलेला नाही. नरसिंहराव, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी काही काळ इतर पक्षांसोबत नेतृत्व केलं, पण त्यांना ठसा उमटवता आला नाही. नव्या पिढीशी पक्ष जोडता आला नाही. ते काम त्यांनी प्रियंका, राहुल यांना युवक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय करून करता आलं असतं. ते टाळून राहुलना थेट खासदारकी, मग उपाध्यक्षपद आणि नंतर थेट अध्यक्षपद! इतर काँग्रेसी नेत्यांप्रमाणे ते तळापासून वरपर्यंतच्या प्रवासातले टक्केटोणपे अनुभवूच शकले नाहीत. त्यामुळे खासदार ते पक्षाध्यक्ष हा त्यांचा प्रवास अत्यंत बेभरवशाचा, अपरिपक्व आणि सातत्य नसलेला असा झाला. त्यामुळे मोदींसारखे ते फर्स्ट इंप्रेशन पाडू शकले नाहीत. अगदी तरुणांनीही त्यांची खिल्ली उडवली. आता गाडी थोडी रुळावर आलीय (महाराष्ट्रात आपल्याला असा फरक राज ठाकरेंमध्ये दिसतो.). आता राजकारण हे पूर्ण वेळ करण्याचं क्षेत्र आहे, हे त्यांना मनोमन पटल्याचं दिसतंय. विनम्रताही दिसतेय. थोडी सहमतीसाठी माघारीची तयारीही दिसतेय. पण तीन राज्यांच्या विजयानंतर कोंडाळी सक्रिय होतील. त्यात ते अडकले तर मग काही खरं नाही.
ज्योतिरादित्य सिंधीया, सचिन पायलट आणि राहुल गांधी यांनी बुजुर्गांना कुशलतेनं हाताळून पक्षाला नवं रूप दिलं, तरच काँग्रेस पूर्वपदी येईल!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment