अजूनकाही
पुलंनी कथा म्हणावी असं फार काही लिहिलं नाही. तसं पाहिलं तर ‘म्हैस’ ही त्यांची अगदी ठळकपणे आठवणारी एकच कथा. मात्र परवा अचानक पुण्यातल्या एका फुटपाथवर पुलंचं एक पुस्तक दिसलं - ‘भावगंध’. (हे पुस्तक जून २०१२ मध्ये प्रकाशित झालं आहे.) माझ्या बाबतीत हे जरा व्यसनासारखं आहे. जीव हल्लक करणारं स्मरणरंजन, अत्यंत लोभस व्यक्ती, हळुवार चिंतन अशा अनेक घटकांमुळे पुल हे कायम आमच्या वस्तीला आले आहेत. हा समृद्ध खजिना आयुष्यभर पुरून उरणार आहे. साधारण चाळल्यासारखं करून मी ते पुस्तक उचललं. या पुस्तकात पुलंच्या दोन कथा सापडल्या. पहिली, ‘उरलेला घास’ आणि दुसरी, ‘राघव आणि ‘तारका स्वर्गीच्या’ ’.
‘उरलेला घास’
या कथेतील संगीताचं वातावरण, संगीताबद्दलची निष्ठा आणि सर्व झुगारून संगीतापायी आयुष्य पणाला लावणारे खांसाहेब हे सगळं साहजिकपणे या कथेत येतं. पुलंनी कथा डेकोरेट करण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही. मात्र तो काळ माहिती असणाऱ्या वाचकाला ही कथा खूप भावूक करणारी आहे. इतके दिवस ही कथा अज्ञातवासात होती. त्याची कारणं वेगळी आहेत. एकतर कथा हा प्रकार नेमका कुठल्या संग्रहासाठी निवडावा ही अडचण होती. पुलंच्या निधनानंतर त्यांच्या अप्रकाशित साहित्याची ‘उरलं-सुरलं’, ‘पुरचुंडी’, ‘गाठोडं’, ‘भावगंध’ अशी संकलनं येत आहेत. त्यासाठी कसल्या चौकटीची तितकी गरज नसावी. त्यातून अचानक ही कथा समोर आली. पुल-प्रेमींसाठी हे ‘गुप्तधन’ आहे.
तपस्वी म्हणाव्या अशा एका गवैय्याची ही कथा आहे. गायनाच्या दुनियेत खूप बदल झाले आहेत. खांसाहेबांच्या वैयक्तिक जीवनातदेखील तशी वाताहतच झाली आहे. जुनं सगळं आठवतं आहे, पण दाद देणारे ते रसिक, आश्रयदाते, त्या सगळ्या रागरागिण्या आज अस्पष्ट झाल्यासारख्या फक्त आठवणीत आहेत. सदैव संगीताच्या आराधनेत आपल्या खेडेगावी राहणारा हा तपस्वी मुंबईला रेडिओ स्टेशन हुडकत पोहोचला आहे. सुदैवानं त्यांची साथ करणाऱ्या सारंगी वादकाचा मुलगा त्यांना ओळखतो. स्टेशन डायरेक्टरची भेट घालून देतो. आकाशवाणीचा अधिकारीदेखील त्यांना सुयोग्य असा मान देतो. त्यांचं गाणं रेकॉर्ड होतं. आता हे सगळं न झेपणारं हा गवैया का करतो?
त्याच्या मनात एक खंत असते की, मालकंसची एक जागा आपली मुलगी नीट घेत नाही. हा एक अपुरा घास त्याला आपल्या कन्येला भरवायचा आहे. सगळा जीव त्यासाठी व्याकूळ झाला आहे, अस्वस्थ आहे. काही कौटुंबिक कलहामुळे प्रत्यक्ष तर भेट नाही होऊ शकत. रेडिओवरून आपला मालकंस ती ऐकणार आणि तो परिपूर्ण राग तिच्याकडून नंतर (रेडिओवरच) ऐकायचा हेच एक जगायचं साधन बनून जातं. खेडेगावी रेडिओ एकाच्याच... त्या इनामदाराच्या घरी. त्याच्या घराच्या पडवीत बसून रात्री रोज ते मुलीचे सूर ऐकायला मिळावेत म्हणून हा ऐकायला बसायचा. आणि एक दिवस तो मालकंस त्याला ऐकायला मिळतो. त्याच रात्री तो तिथंच कोसळतो. रसिक हळहळतात. कुणालाच समजत नाही की, हा प्रतिभावंत त्या हवेलीच्या पडवीत रोज रात्री असा का बसलेला दिसायचा. मालकंसचं ते पूर्ण-स्वरूप म्हणजे किती प्रदीर्घ तपस्या होती, किती काळाचं ते वाट पाहणं होतं, याचा अंदाज घेत त्या परिसरात आज एकदेखील आख्यायिका ऐकू येत नाही.
भारतीय संगीत कलेच्या अभिजातपणासाठी आयुष्य वेचलेल्या गवैय्यांची गाथा अनेक लोकांनी आपल्या पुढे ठेवली आहे. या कथेत असाच एक गवैय्या त्याच्या निर्दोष सादरीकरणाबद्दल आग्रही राहून आयुष्यभर त्याचा वेध घेत राहतो. पत्नी आक्रस्ताळेपणानं घर सोडून जाते आणि मुलीची शिकवणी अर्धीच राहते. त्याच्या कानावर तो अर्धवट ‘मालकंस’ कायम आघात करत राहतो. आयुष्य उतरणीला लागलेलं, जगावं कशासाठी यासाठीचं प्रयोजन कमी-कमी होत जातं. केवळ हा मुलीच्या गळ्यातून येत असलेला अर्धवट ‘मालकंस’ ही एक बेचैनी. रेडिओच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा तपस्वी धडपडतो आणि अखेर तो परिपूर्ण मालकंस ऐकल्या क्षणी तो कोसळतो.
एका अभूतपूर्व विद्यादानाची ही सांगता आज कदाचित दंतकथा वाटेल. पुलंच्या जाणीवेला ती स्पष्ट दिसली होती. संगीतावर पहिलं प्रेम होतं त्यांचं. कदाचित हे अलौकिक बुवा त्यांनी अनुभवलेदेखील असतील.
पुलंनी ही कथा एखाद्या पोवाड्याप्रमाणे सादर केली आहे. कथेचा म्हणून कसला फॉर्म सांभाळणं असा काही आग्रही अभिनिवेश घेतला असता तर ही वेगळीच झाली असती. पण ती कदाचित पुलंची म्हणून वाचली गेली नसती. ओघात येणारे उर्दू-हिंदी शब्द सोडले तर कथेत कसलंही डेकोरेशन नाही. खरं म्हणजे याच शब्दांमुळे तो त्यांच्या कल्पनेतला गवई आपल्या रंग-रूपासह आपल्या डोळ्यसमोर उभा राहतो. अर्थात मीदेखील हे वेगळेपणानं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण यातील घटना ही त्यापेक्षा महत्त्वाची आहे. त्यातील तपशील हे त्या घटनेपुरतेदेखील आहेत, आणि त्याचबरोबर एकंदरीत अशा तपस्वी-संगीतकाराचं ‘त्या काळातील’ जगणंदेखील अधोरेखित व्हावं म्हणून असावेत. पुलंनी कथा फॉर्म निवडून हे लिहिलं असं म्हणवत नाही. कारण ते कथेच्या वाटेला कधी गेले नाहीत. ते जसं त्यांच्याकडून लिहिलं गेलं आणि तसंच ते प्रसिद्ध झालं असं वाटतं.
१९४७ साली ‘अभिरुची’च्या जून महिन्याच्या अंकात ही कथा आली, त्यावेळी तिचं स्वागत कसं झालं समजत नाही. तब्बल ७० वर्षांनंतर ही मी वाचली आणि ती निदान पुल-प्रेमींनी वाचावी असं वाटलं. अर्थात हे परीक्षण नाही. तशी पुलंच्या साहित्याची समीक्षा झाली नाही, कारण त्यातील सौंदर्य इतकं हळुवार आहे की, ते शब्दांत पकडणं अवघड. हे आणि हेच कारण त्यामागे असावं. तसं पाहिलं तर, त्यांची अनेक व्यक्तिचित्रं या कथाच आहेत. पण तरीही कथेची बीजं असलेल्या या कथा समोर येणं महत्त्वाचं आहेच.
.............................................................................................................................................
पुलंच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/author_profile/7/2
.............................................................................................................................................
‘राघव आणि ‘तारका स्वर्गीच्या’ ’
कथेतदेखील पुन्हा संगीताचंच वातावरण आहे. एका मनस्वी गायकाची आणि त्याच्या उदयास्ताची ही कथा मनाला चटका लावणारी आहे. राघव एक कलंदर गायक. लहानपणापासून गायनाच्या नादी. त्याचं गाणं अचानक मित्रांच्या गप्पात रेडिओवरून ऐकू येतं आणि राघवाच्या आठवणींचा ओघ मित्रांच्या गप्पात सुरू होतो. त्याचीच ही कथा. राघवचं व्यक्तिमत्त्व, कलंदरपणा, सुरुवातीपासूनचं त्याचं अनाथपण, सगळं अगदी भन्नाट आणि जगावेगळं. मात्र अस्सल गाणं हा त्याचा स्वभाव. हे सगळं खूप विस्तारानं कथेत येतं! ही कथा १९४७ सालच्या ‘मौज’ दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे.
पुलंच्या या कथेतदेखील संगीताची दुनिया आहे. मात्र ही ग्रहण लागलेल्या एका गायकाच्या दुरवस्थेची कथा आहे. त्या दुर्दैवी वातावरणात त्यानं सांभाळलेल्या मूल्यांची एक अनवट प्रसंगांची उतरंड या कथेत आहे. ‘अनवट’ यासाठी की, व्यसनासक्त अवस्थेतदेखील रामनाथावरील (देवस्थान) निष्ठा जपण्यासाठी राघव स्वत:ची एक चीज गहाण ठेवतो आणि रामनाथाच्या अर्चनेपुरतेच पैसे घेतो. अनेकांकडून उसने पैसे घेऊन उधारी केलेला हा कलंदर गायक हे ‘वीस रुपये चार आणे’ मात्र परत करतो. इतकंच नाही तर ते मिळाल्याचं कळल्याशिवाय खुल्या मैफिलीत ‘ती’ चीज गातदेखील नाही. अगदी बडोद्याच्या दरबारी गाणं होऊनदेखील...
संगीताच्या दुनियेतील मानमरातब, वैभव, स्वैराचार आणि दुर्दैवी घसरण यांच्या अनेक कथा-दंतकथा आपण ऐकतो. आजच्या तरुण पिढीला हे खूपच चकित करणारं वाटेल. पंचतारांकित होत चाललेल्या आजच्या मैफिलींचं स्वरूप खूप भिन्न आहे. कलावंतांचा आणि रसिकांचा संबंध हा एकरेषीय आहे. ‘झोकून देणारी भणंगता’ हा विषय कौतुकाचा नाही, तरी त्यात अस्सलतेचा भाग होता. या कथा त्या जमान्यातील आहेत. आता हे विषयदेखील अभावानेच दिसतात, शिवाय ‘पुलंच्या कथा’ म्हणूनदेखील दुर्मीळ आहेत.
पुलंच्या या दोन्ही कथा १९४७ मधल्याच आहेत. संगीताची दुनिया पुलंनी खूप जवळून अनुभवली होती. त्यातील हे अनुभव कथेचा फॉर्म घेऊन यावेत असं पुलंना वाटलं असावं. हा जरा सोयीचा मामला असावा. अजूनदेखील अशा कथा अप्रकाशित असतील का, हा एक प्रश्न आहेच.
या दोन्ही कथांमधून आलेले प्रसंग, त्यातून जाणवणारी निष्ठा, हे सगळं अलौकिक आहे. या कथा आपल्याला हळवं करून जातात. या दोन्ही कथांमधून संगीताच्या दुनियेतील सच्चेपणा आणि झपाटलेपण आहे. आज दृश्यस्वरूप तसं राहिलं नाही हे खरं, मैफिलींचे concerts झाले आहेत, हेदेखील खरं पण तरीही ‘आनंदाचे डोह’ नको असतात असं तर नाही? त्याची प्रचीती या कथांमधून स्पर्श करते, हे नक्की.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
jayantraleraskar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment