अजूनकाही
आपल्या पुराणकथांमध्ये संकटात सापडलेल्या भक्तगणांची सुटका करण्यासाठी देव अवतार घेतो, अशा कथा प्रचलित आहेत. हाच नियम प्रमाण मानून आपल्या चित्रपटातील नायकांनीही आता ‘अवतार’ घ्यायला सुरुवात केली आहे की, अशी शंका येऊ लागली आहे. त्याचं एक ठळक उदाहरण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला ‘माउली’ हा चित्रपट. सुमारे तीन वर्षांपूर्वी दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या ‘लई भारी’ या चित्रपटात रितेश देशमुखनं ‘माऊली’ची भूमिका करून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याचा हा ‘माऊली’ सुष्टांचा रक्षणकर्ता आणि दुष्टांचा कर्दनकाळ होता. हाच ‘माऊली’ आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आला आहे. लेखक-दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी ‘माऊली’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा रितेशच्या ‘माऊली’चं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. हा ‘माऊली’ डिट्टो ‘लई भारी’तील ‘माऊली’सारखाच आहे.
‘लई भारी’मध्ये जसा कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला ‘विठ्ठल’ आहे, तसाच तो याही चित्रपटात आहे. ‘लई भारी’मध्ये मारामारी करण्यासाठी जशी ‘वीट’ होती, तशीच ती याही चित्रपटात आहे आणि अर्थातच थोड्याफार फरकानं या ‘माऊली’ची अॅक्शनही तशीच आहे. (म्हणूनच त्याला ‘अवतार’ म्हणावा लागेल). हे सर्व पाहता हा चित्रपट ‘लई भारी’चा सिक्वेल आहे की काय अशीही शंका येते. मात्र तसं नाही. कारण या चित्रपटाची कथा थोडी वेगळी आहे.
‘लई भारी’ची कथा खुद्द पंढरपुरातील आहे, तर या ‘माऊली’ची कथा कापूरगावमध्ये घडते. माऊली सर्जेराव देशमुख नावाचा पोलीस इन्स्पेक्टर कापूरगावला बदलून येतो. त्याचं नाव माऊली असलं तरी तो काहीसा भित्रा आणि बावळट असतो. गावात नाना लोंढे नावाच्या गुंडाची दहशत असते. गावातील विठ्ठलाच्या मंदिराशेजारीच त्याचं दारूचं दुकान असतं. नियमाप्रमाणे मंदिराशेजारी दारूचं दुकान चालवायला परवानगी नसते. म्हणून नानानं आपल्या दहशतीच्या जोरावर हे मंदिरच कायमचं बंद करून त्याला टाळं ठोकलेलं असतं. त्यामुळे गावातील लोकांची इच्छा असूनही ते मंदिरात जाऊ शकत नाहीत. याशिवाय टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विक्रीवरून सगळं गावच नाना लोंढेनं वेठीस धरलेलं असतं. त्याच्याविरोधात जाण्याची कोणाचीच हिंमत होत नाही. एवढंच नव्हे तर त्याच्या दहशतीमुळे या इन्स्पेक्टर माऊलीलाही त्याचा ‘हस्तक’ व्हावं लागतं. अशा परिस्थितीत गावात मसाले विकणारी रेणुका नावाची तरुणी इन्स्पेक्टर माऊलीला नाना लोंढेची दहशत संपुष्टात आणण्याचं आवाहन करते. तो ती कशी संपवतो?, त्यासाठी त्याला कोण प्रवृत्त करतो? हे पडद्यावर पाहणंच संयुक्तिक. कारण दिग्दर्शकानं कथेला दिलेली कलाटणी महत्त्वाची असून कथेचं खरं मर्म तिथंच आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच टिपिकल ‘फिल्मी’ आहे. त्यामधील काही अतार्किक गोष्टीचीही जाणीव होते. तरीदेखील कथेला देण्यात आलेली कलाटणी ही कथेची उत्सुकता वाढवणारी ठरली आहे. कथा ज्या पद्धतीनं सादर करण्यात आली आहे, त्यावर दाक्षिणात्य (आणि हिंदीही) चित्रपटांचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे मारामारी तसंच हिंसाचार अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. मारधाड दृश्यात तर आपण रोहित शेट्टीचा चित्रपट पाहत असल्याचा भास होतो. (‘लई भारी’पासूनच हे लोण मराठी चित्रपटात आलं आहे.). क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेले ‘भारी’ संवाद ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. कथेनुसार ठराविक जागी गाणीही ऐकायला मिळतात. केवळ करमणुकीसाठी असलेले रितेश आणि जेनेलिया यांचं एक गाणं याही चित्रपटात आहे. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ‘लई भारी’सारखीच वाटतात.
रितेश देशमुखनं ‘माऊली’च्या भूमिकेत तडाखेबंद काम केलं आहे. नवतारका संयमी खरेनंही पदार्पणातच ‘मसालेवाली’ची भूमिका ठसकेबाज पद्धतीनं रंगवली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र जोशीनं अतिशय वेगळ्या पद्धतीनं रंगविलेला नाना लोंढे हा खलनायक त्याच्या देहबोलीतून खरोखरच ‘टेरर’ निर्माण करणारा वाटतो. त्यामुळे तोही चांगला लक्षात राहतो. सिद्धार्थ जाधवनं बहुरूपी पोलिसांच्या भूमिकेत मनोरंजन करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. श्रीकांत यादव, उमेश जगताप, विजय निकम, प्रशांत तपस्वी आदी कलाकारांच्याही भूमिकाही पूरक आहेत.
.............................................................................................................................................
लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment