अजूनकाही
‘गर्वाचं घर खाली’ असं आपण शालेय शिक्षणातच शिकतो. पण शालेय शिक्षणातल्या अनेक गोष्टी आपण प्रसंगानुरूप अथवा सोयीस्कर विसरतो. तशी ही शिकवणही अनेक जण विसरतात. मुळात मानवानं तयार केलेल्या शब्दांचा एकच एक असा अर्थ नसतो. भाषेचं व्याकरण हे एक वेगळंच प्रकरण आहे. त्यातून हल्लीचा काळ असा की, कसलंच व्याकरण गांभीर्यानं घेतलं जात नाही. त्यामुळे भाषेच्या (कुठल्याही) नावानं बोंबाबोंब आहे.
‘गर्वाचं घर खाली’ असं शिकूनही आपण ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘गर्व से कहो हम भारतीय है’, ‘गर्व आहे मला मराठी असण्याचा’ वगैरे छाती ठोकून म्हणतच असतो. मग या ‘बोध’वचनाचं प्रयोजन काय?
तर त्याचं साधं प्रयोजन असं असावं- वेगानं वर जाणारी गोष्ट गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खाली येते. ती गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर गेली तर ती अंतराळाच्या निर्वात पोकळीत तरंगत राहते. व्यावहारिक भाषेत सांगायचं तर ती ‘घर का ना घाट का’ होते. ‘गर्वाचं घर खाली’मध्ये हे सगळं विज्ञान आहे. माणसाला गर्व होतो, तेव्हा त्याची विचारक्षमता करण्याचं ठिकाण मेंदू म्हणजेच डोकं अतिआत्मविश्वासानं तडतडू लागतं. यालाच साध्या भाषेत ‘डोक्यात हवा जाणं’, असं म्हणतात. पण आरोग्यशास्त्राप्रमाणे मेंदूवरची अतिरिक्त (वैचारिक) सूज ‘फट म्हणता ब्रह्महत्या’प्रमाणे संपूर्ण शरीरच पांगळं करू शकते. ‘गर्वाचं घर खाली’ या तीन शब्दांत ते साधेपणानं सांगितलंय. यातून जमिनीवर येणं, वास्तवाची जाणीव, हवेचा दाब इ. गोष्टी अनुभवांती कळतात. ‘अनुभवातून शहाणपण’ सगळेच शिकतात असं नाही. तरीही ‘गर्वाचं घर खाली आलं’ या वस्तुस्थितीला निदर्शक चित्रातून पर्यावरण तरी बदलतं. गर्दी जमते आणि म्हणते- ‘शेवटी हेच होणार होतं!’
११ डिसेंबरला भारतदेशी असं एक ‘गर्वाचं घर’ खाली झालं. मुळात ते घर म्हणजे एक तंबू होता. आता तंबू म्हटला की, त्याच्या परिघात अनेक गोष्टी येतात. एका छत्राखाली आणि एका खांबावर अनेक गोष्टी सुखानं, परस्पर सहकार्यानं नांदत असतात. एवढ्या तंबूत भांड्याला भाडं लागणं, एकाला दोन पोरं, दुसऱ्याला चार असंही होत राहतं. आचार-विचारापासून व्यवहारापर्यंत आणि इतिहासापासून कलासंस्कृतीपर्यंत सर्व गोष्टीत सदवर्तन आणि व्याभिचार दोन्ही दिसून येतात. त्या त्या वर्तनाला बक्षीस आणि शिक्षाही असतेच. जोपर्यंत सहमतीनं सर्व चालू असतं, तोवर ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वानुसार तंबू उखडला जाणार नाही याची काळजी घेतली जाते.
भारत देश नामक रंगीबेरंगी तंबूत, संविधानाच्या एका खांबावर हे असंच चालू असतं. संविधान तयार व्हायच्या आधीही ते ‘गंगाजमनी तहजीब’ म्हणून चालू होतं. तेव्हा खांब सहिष्णू म्हणून ओळखला जायचा!
अशा या तंबूच्या बाहेर २०१४ साली एका उंटावर बसून एक सांडणीस्वार आला. तो आला उंटावरून, पण त्याचा आवेश अश्वमेधावर बसून आल्यासारखा. ‘अतिथी देवो भव:’ अशी संस्कृती असलेल्या तंबूवाल्यांनी त्याचं मनापासून स्वागत केलं. त्या सांडणीस्वारानं स्वत:च सांगितल्यामुळे तो ५६ इंची छातीचा आहे हे तंबूला कळलं. मग कौतुकानं सगळ्यांनी ती पाहूनही घेतली. तंबूतल्या प्रत्येकानं त्याला आपल्या प्रथेप्रमाणे फेटे, पगड्या, उपरणी, जाकिटं दिली. मात्र एक गोल टोपी मात्र त्यानं झुरळ झटकावी तशी झटकली. देणाऱ्याला वाटलं आपण डोक्याच्या मानानं एक साईज कमी आणला की जास्त? या प्रश्नानं तो ओशाळून बाजू झाला. दरम्यान उंटानंही तंबूबाहेर फतकल मारली, तरीही पाठीवरच्या ‘बाक’कडे बघून उंट स्वत:शीच हसला. म्हणाला- ‘बसलो तरी मी किमान एवढा उंच असतोच!’
सांडणीस्वार बराच बोलका निघाला. तो आल्यापासून बोलतच होता, न थांबता, थकता. खूप वर्षं अपत्य नसलेल्या घरात अपत्य झालं आणि ते थोडं किंचाळलं तरी गोड वाटतं, तसं तंबूवाल्यांना झालं!
सुरुवातीच्या आगतस्वागतानंतर सांडणीस्वारानं सगळ्यांना टाळ्या वाजवत लक्ष द्यायला लावलं… कशात आणि कसं राहताय? तंबूची काय परिस्थिती आहे बघितलंय? बाहेरून पाहिलंय कधी या तंबूला? मी येताना इतर तंबूवाले तुमच्या तंबूबद्दल हेटाळणीनं बोलले. एवढंच काय, याच तंबूतले अनेक मला बाहेर भेटले. म्हणाले- ‘आम्ही कर्मदरिद्री त्या तंबूत जन्मलो!’ मला कळलंय- गेली सत्तर वर्षं तुम्ही एका(च) कुटुंबाचे ऐकत हा तंबू चालवताय. आजोबा, मुलगी, नातू, सून, पणतू… एकामागोमाग एक तेच. या एवढ्या मोठ्या १२५ कोटींच्या तंबूवर एका कुटुंबाचं नियंत्रण? केलंय काय त्यांनी? ना आत काही सोयीसुविधा, ना बाहेर. योजनांच्या नावांनी नुस्ता भ्रष्टाचार आणि रंगीबेरंगी तंबूचा कसला अभिमान? तंबू एक खांबी, तसा एक रंगी, एक संस्कृती, एक आधारी असावा… धबधब्याच्या प्रपातासारखा सांडणीस्वार संपूर्ण तंबूला प्रदक्षिणा घालत अखंड बोलत होता.
नाही म्हटलं तरी तंबूत थोडी हलचल झाली. काहिलीनं अंग जळत असताना लहर यावी तसं झालं. बरं पाहुणा अखंड बोलत होता. एकामागून एक विषय मांडत होता. पार या तंबूचं आजचं भव्य आकारमान मुळात कसं अतिभव्य होतं आणि एका परिवारामुळे, त्यांच्या करंट्या कारर्किदीमुळे कसा तंबू कापला, छाटला गेला, कशी एका परिवाराच्या उदात्तीकरणासाठी इतर लोहपुरुष, नेताजींची कोंडी केली गेली… कसं घरातल्या घरात काहींचे लाड, काहींची उपेक्षा करण्यात आली... कसा या कुटुंबानं व त्यांच्या पित्त्यांनी खोऱ्यांनं पैसा ओढला…
आता लोकांना कधी न जाणवलेल्या गोष्टी जाणवू लागल्या. खरंच आपण या एका परिवारावर किती विसंबून राहिलो, सगळा तंबू जणू एकाच घराला आंदण दिला हे सांडणीस्वाराचे शब्द खरे वाटू लागले. तंबूचं विभाजन विसरूनही ५० वर्षं होऊन गेली होती, पण खपली निघाली, रक्त वाहू लागलं. ते तापूही लागलं.
दरम्यान सांडणीस्वारानं आता पवित्रा बदलून मला सिंहासन नको, सेवकाची जागा द्या, मी राजा नाही, तर चौकीदार, पहारेदार म्हणून काम पाहीन आणि या तंबूची अंतर्बाह्य सुरक्षा करेन... मी कामात शिस्त आणेन… मी व्यवहारात शिस्त आणेन… मी सर्वांनाच शिस्त लावेन… सर्वांनाच सर्व नवं, ताजं आणि चांगलं जीवन देईन… मी गुन्हेगारांना शासन करेन… मी सोनेरी टोळ्या उदध्वस्त करेन… मी लुटीचा माल परत आणेन… ही लूट किती आहे माहितीय? तुम्हा प्रत्येकाच्या बटव्यात काही लाख रुपये सहज जमा होतील!
बघता बघता तंबूतलं वातावरण बदललं. ताणलेल्या दोऱ्या सैल करून या नव्या स्वाराला आत घेतलं. त्यासाठी संपूर्ण परिघ खुला करण्यात आला. बदल आता तुला हवं ते! कापड, खांब, दोऱ्या, खुंट्या, व्यवहार, आचार-विचार बदल आणि नवं ताजं चांगलं जीवन दे आम्हाला. प्रगती, विकास या शब्दकोशातच राहिलेल्या शब्दांना बाहेर काढून त्यांना सदेह साकार. घे ही छिन्नी, घे हा हातोडा आणि घे हा सत्तर वर्षांचा दगड नि कोर नवं शिल्प!
सांडणीस्वार म्हणाला- ‘मी नतमस्तक आहे.’ म्हणून त्यानं खरंच मातीवर मस्तक ठेवलं. तंबू गहिरवरला. मग उठून तो म्हणाला मला उंट लागेल आत! उंटाशिवाय मी अपूर्ण आहे. तंबूनं गहिवरल्या वातावरणात उंटालाही आत घेतलं. उंटावर बसलेला तो स्वार आता तंबूच्या छताला टेकलेला भासू लागला!
आता सांडणीस्वार उंटासह तंबूभर फिरू लागला. बाहेर असताना सेवकाचा भाव चेहऱ्यावर असणारा स्वार आता दगडी चेहऱ्याचा झाला आणि उंट स्वत:ला हत्ती, घोडा, वाघ, सिंह असं सर्व काही समजू लागला. उंटानं प्रथम जिथं जिथं एकोपा होता, तिथं तिथं भिंती घातल्या. त्यानंतर पांजरपोळातील सांड मोकळे सोडले. विविधरंगी तंबूत आता दोनच रंग ठरवले गेले. एक, आवडता; दुसरा, नावडता. दरम्यान स्वारानं त्या कुटुंबाच्या नावे जे जे काही होतं, ते मोडीत काढलं. नवे इतिहासकार, नकाशावाले, खजानजी वगैरे नेमले गेले. मोकळे सांड गल्लीपासून विद्यापीठ ते संसद मंडळ असा उच्छाद मांडू लागले. उंटानं या सांडांच्या पाठीवर बैलबुद्धीचे सरदार बसवून त्यांच्या टोळ्या बनवल्या. आणि जे जे नावडतं त्यांना शिंग, ढुशी मारत जखमी कर, ठार मार असं सुरू केलं.
स्वार आत आला तरी त्याची भाषणं सुरूच राहिली. त्याच्या बोलकेपणाचा इतका गवगवा झाला की, काही लोकांना तो फोटोतही बोलताना ऐकू येऊ लागला. ते अर्थातच त्याचे ‘भक्त’ झाले. सतत बोलण्यानं स्वार पुढे पुढे विसंगत बोलू लागला. काळ, वेळ, स्थळ यांची अदलाबदल बिनदिक्कत करू लागला. लोकांना वाटलं हा बोलायचा थांबून काही ऐकेल. त्याचं बोलणं आता ‘सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा’ असं उलटसुलट सारखंच ऐकू येऊ लागलं!
दरम्यान उंटानं तंबू ताब्यात आल्यासारखा आपला संचार आतल्या आत असा वाढवला की, बसल्या जागी लोक तंबूबाहेर फेकले जाऊ लागले. उंट आणि स्वार मनाला येईल ते करू लागले. आतमध्ये त्यांनी बऱ्यापैकी जम बसवला. सर्वत्र उंट आणि स्वार. स्वार आणि उंट. कुणी काही विचारलं, त्याला फटकारलं. कुणी हटकलं, त्याला संपवलं. जो बोलू पाही त्याची शेपटी पिरगाळली जाई. आता त्या परिवाराऐवजी उंट आणि स्वार हे दोघंच राज्य करू लागले. आता ते कुणाला जुमानेनात. ते आता ‘इथं आम्हीच राहणार सदैव, आमचीच शिस्त, आमचेच नियम, आमचेच कायदे, आमच्याच शिक्षा’ असं दमात घेऊन म्हणू लागले. तंबूत घुसमट वाढू लागली. लोक हातात हात घेऊ लागले, मुठी वळू लागल्या, घोषणाही दिल्या जाऊ लागल्या.
तंबूला आता आपल्या वैभवशाली गंगाजमनी तहजीबची, त्यावर आधारित संविधानाच्या खांबाची जाणीव झाली. रंगीबेरंगी महावस्त्राची, इंद्रधनुष्यी सहकाराची आणि त्यातून निपजणाऱ्या शांततेच्या वातावरणाची याद ताजी झाली. हा उंट व हा स्वार या तंबूच्या खांबालाच बदलायचं कारस्थान आस्ते कदम करतोय हे लक्षात येऊ लागलं. अवघ्या आर वर्षांत बोलक्या पोपटाचे पंख, त्याच्या लालभडक चोचीहून आखूड वाटायला लागले. उंटाचं विरूप रूप नजरेत ठसू लागलं. त्या दोघांचं गोड बोलून तंबूत येणं आणि आता तंबूच उखडून टाकायचा डाव लोकांनी ओळखला आणि त्यांनी सुरू केली उंटासह स्वाराला तंबू बाहेर काढण्याची योजना.
योजना सनदशीर मार्गाची. शेतकरी अवजारे घेऊन आले, बेरोजगार पोटातली आग, स्त्रिया परंपरेचं जू भिरकावत पुढे सरसावल्या. आदिवासी ‘वानर’ लेबल भिरकावून दगड हातात घेऊन ‘श्रीराम’ म्हणण्याऐवजी ‘उलगुलाल’ म्हणू लागले. हा उंट, हा स्वार गोतास काळ ठरणार हे ओळखून भिंती पडल्या, हेवेदावे मिटले, सामंजस्य वाढलं. प्रतिकार तीव्र झाला.
आणि ११ डिसेंबर २०१८ रोजी स्वारासह उंट तंबूबाहेर काढण्याच्या मोहिमेला प्रारंभिक यश मिळालं. तंबूवाल्यांचा आत्मविश्वास वाढलाय. उंटासह आत घुसून तंबूचा मूलाकारच बिघडवलेल्या स्वाराला ‘गर्वाचं घर खाली’ कसं येतं हे दाखवायचा चंग सगळ्यांनी बांधलाय. १२५ कोटीतले काही कोटी एका रात्रीत असे अंगावर येतील याची कल्पना नसलेला उंट आणि सांडणीस्वार आता खऱ्या अर्थानं नतमस्तक होऊ पाहताहेत. उंटाच्या कानात कुणीतरी पुटपुटलं- ‘वेळ जशी येते, तशीच ती जातेही!’ उंट कुबडासह आणि सांडणीस्वारासह शहारला!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 17 December 2018
संजय पवार, तुम्ही नाटककार आहात. मग तुम्हाला अलंकार माहितीये असेलंच. अलम् कारयति इति अलंकार:. अलम् या संस्कृत शब्दाचा अर्थ मराठीत 'आता पुरे' वा 'आता बास' असा होतो. जे केल्यावर 'आता पुरे' असं म्हणावंसं वाटतं त्याला अलंकार म्हणतात. सांगायचा मुद्दा काय की अलंकार प्रमाणाबाहेर वापरायचा नसतो. या निकषावर तुमचा लेख वाचू जाता त्यात रूपक नामे अलंकाराचा अतिरेक दिसतो आहे. अलंकार मोजकेच पण ठाशीव असावेत. अशाने अलंकारधारकाचं सौंदर्य खुलतं. मात्र तुमच्या लेखात रूपक अलंकाराचा प्रमाणाबाहेर वापर दिसतोय. त्यामुळे सोनं लादल्यावर भप्पी लाहिरी जसा भडक व बटबटीत दिसतो तसा लेख बोजड झाला आहे. अलंकारामुळे लेखाचं आकलन सुगम व्हायला हवं. प्रत्यक्षात मात्र रूपकाच्या अति आहारी गेल्याने लेखाचं आकलन क्लिष्ट होऊन बसलं आहे. आपला नम्र, -गामा पैलवान
Alka Gadgil
Sat , 15 December 2018
गोडसे को 'मोहनलाल' पे इतना 'जुस्सा' आया कि वो 'मुठ्ठी को मौत' में लेकर '600 करोड़ भारतीयों' के ख़ातिर 'बिहार के तक्षशिला में सिकंदर' को ये समझाने गये कि 'गुजरात के बेटे श्यामा प्रसाद मुखर्जी', 'गुप्त राजवंस के चंद्रगुप्त' से '2000 साल पुराने कोणार्क सूर्यमंदिर में मिले.' ~गोभी जी