‘स्पायडर-मॅन : इन्टू द स्पायडर-वर्स’ : स्टायलिस्टीक चित्रण, तुफान डायलॉगबाजी, थक्क करणारं अॅनिमेशन!
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘स्पायडर-मॅन : इन्टू द स्पायडर-वर्स’चं पोस्टर
  • Sat , 15 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie स्पायडर-मॅन : इन्टू द स्पायडर-वर्स SPIDER-MAN: INTO THE SPIDER-VERSE

‘मार्व्हल’च्या बहुतांशी सुपरहिरोंप्रमाणे ‘स्पायडर-मॅन’च्या महत्त्वाच्या थीम्सपैकी एक म्हणजे आपण काहीतरी करू शकू याबाबत स्वतःवर विश्वास ठेवत, तसं करण्याची क्षमता आपल्यात असण्याचा स्वीकार करणं ही आहे. मग यापाठोपाठ चांगलं नि वाईट यांच्यातील भेद ओळखून चांगला तोच मार्ग निवडण्याचं धैर्य आणि निर्णयक्षमता बाळगणं. ‘मार्व्हल कॉमिक्स’मधील अधिकाधिक सुपरहिरोजची निर्मितीच मुळात अमानवी शक्तींचा सामना करणं, संपूर्ण जग वाचवणं यापेक्षा त्या-त्या सुपरहिरोच्या निर्मितीच्या वेळच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या पडसादांवर आधारित असलेली आहे. ज्यांचा उद्देश अमेरिकन समाजात निर्माण झालेल्या अस्थिरतेला समोर येणाऱ्या आव्हानाला सामोरं जाण्याच्या मानवी प्रवृत्तीला जागणाऱ्या, स्वतःच्या निवडीनुसार वाईटाचा सामना करायला निघालेल्या व्हिजलांटी प्रकारच्या सामान्य मनुष्यांची कथा सांगणं हा आहे. ‘स्पायडर-मॅन : इन्टू द स्पायडर-वर्स’देखील मार्व्हलच्या या मूलभूत संकल्पनांहून वेगळा नसला तरी तो व्हिज्युअली सुरेख आणि स्टायलिस्टिक आहे. ‘फ्रेन्डली नेबरहूड स्पायडर-मॅन’ या संज्ञेला जागणारा आहे.

माइल्स मोरॅलिस (शामीक मूर) हा स्पायडर मॅनबद्दल आस्था असलेला आपली नवीन शाळा, आई-वडिलांसोबत विशेष जिव्हाळ्याचं नातं नसलेला आणि आयुष्यात काहीतरी करू पाहणारा किशोरवयीन मुलगा आहे. आपला काका, अॅरनच्या (महेर्शाला अली) सांगण्यावरून ग्राफिटीबाबतची आपली आवड जोपासण्यासाठी एका बंद असलेल्या सबवे स्टेशनवर ग्राफिटी चितारत असताना माइल्सला रेडिओअॅक्टिव्ह स्पायडरच्या दंशानंतर ‘स्पायडर-मॅन’सारख्या शक्ती प्राप्त होतात. दरम्यान काही अनपेक्षित कारणांनी त्याची भेट खरा पीटर पार्कर ऊर्फ स्पायडर-मॅनशी (जेक जॉन्सन) होते. विल्सन फिंक ऊर्फ किंगपिन (लाइव्ह स्च्रेबर) आणि त्यासोबत काम करणारी शास्त्रज्ञ (कॅथरीन हान) अनेक समांतर विश्वांचा दरवाजा ठरणारी पोकळी निर्माण करण्यात यशस्वी होतात. यू नो द ड्रिल. अवघ्या जगाच्या अस्तित्वाला धोक्यात घालणारं तंत्रज्ञान चुकीच्या व्यक्तींच्या हातात पडल्यानं जगाला वाचवण्याची जबाबदारी नवीन किशोरवयीन स्पायडर-मॅन आणि दुसऱ्या डायमेन्शन्समधून माइल्सच्या विश्वात आलेल्या स्पायडर-मॅनच्या इतर रूपांवर येऊन पडते.

या अनेक स्पायडर-रूपांत माइल्सला नव्यानं मिळालेल्या शक्तींच्या वापराविषयी त्याला शिकवणारा पीटर पार्कर (जेक जॉन्सन), (आणि अॅनिमेटेड रूपातही सुंदर दिसणारी) स्पायडर-वुमन ग्वेन (हैली स्टाइनफील्ड) येतात. यासोबतच अॅनिमेशन विश्वातील पेनी पार्कर (किमिको ग्लेन), पीटर पॉर्कर/स्पायडर-हॅम (जॉन मलनी) आणि नाझींशी लढा देणाऱ्या दशकातून आलेला स्पायडर-मॅन न्वार (निकोलस केज) यांच्या रूपात अतरंगी पात्रांची रांग लागते. किंगपिनचा सामना करत आपापल्या विश्वात परतण्यासाठी या सर्वांचं एकत्र येणं गरजेचं असतं. त्यांच्या एकत्र येण्यातूनच हे भन्नाट स्पायडर-वर्स साकारलं जातं.

दर वर्षागणिक विस्तृत होत जाणारं मार्व्हलचं विश्व आणि दरवर्षी (त्यांचे आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचे) ढिगानं येणारे सुपरहिरो चित्रपट यांत दरवेळी काहीतरी नवीन करत, चित्रपटांना एकाच वेळी हलकंफुलकं, भावनिक आणि परिणामकारक बनवणं, यात खरं चित्रपटाच्या यशाचं मर्म दडलेलं आहे. ‘स्पायडर-मॅन : इन्टू द स्पायडर-वर्स’ नेमकं हेच अगदी यशस्वीपणे साध्य करतो. आपण भूतकाळातील जगप्रसिद्ध कॉमिक्स कथा सांगत आहोत, असं कथन करत; काहीसा ‘डेडपूल-वजा-डेडपूल’ फॉर्म्युला वापरत आधीच्या स्पायडर-मॅन चित्रपटातील क्लिशेजहून वेगळ्या गोष्टी करत आणि चित्रपटातील पात्रांकरवी वेळोवेळी या क्लिशेजवर शाब्दिक कोट्या करवून घेत चित्रपटाची मांडणी केली जाते. स्टायलिस्टीक चित्रण, तुफान डायलॉगबाजी, थक्क करणारं अॅनिमेशन यांच्यामुळे हे विश्व व्हिज्युअली समृद्ध आणि सुंदर बनतं.

यावर्षी आलेल्या पिक्सारच्या ‘इन्क्रेडिबल्स २’मधील अॅनिमेशन आणि चेस सीक्वेन्सेसना तगडी स्पर्धा देणारी दृश्यं या चित्रपटात दिसतात. ‘जम्प स्ट्रीट’ आणि ‘द लेगो मुव्ही’सारख्या हटके चित्रपट मालिकांचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे फिल लॉर्ड आणि क्रिस्टोफर मिलर इथं सहनिर्माते म्हणून दिसतात. लॉर्डची कथा आणि सहाय्यक पटकथा लेखनाचा, तसेच या जोडीचा प्रभाव चित्रपटभर चतुराईनं लिहिलेल्या गमतीशीर विनोदी दृश्यांमधून जाणवत राहतो. डॅनियल पेम्बर्टनचं संगीत प्रभावी आहे आणि चित्रपटाचा साऊंडट्रॅक मजेशीर, किशोरवयीन पात्र असणाऱ्या चित्रपटाला शोभणारा आहे.

निकोलस केजला न्वार स्पायडर-मॅनच्या रूपात आवाज द्यायला लावण्यासारखे निर्णय सुखावणारे आणि चित्रपटाच्या विनोदी स्वभावात भर घालणारे आहेत. ‘स्पायडर-मॅन : इन्टू द स्पायडर-वर्स’च्या केंद्राशी इतर कुठल्याही स्पायडर-मॅन चित्रपटासारखी तत्त्वं अस्तित्वात असली, तरी यावेळी त्यासोबत नाविन्यपूर्ण मांडणीचीही साथ लाभलेली आहे. मार्व्हलनं गेल्या वर्षी ‘स्पायडर-मॅन : होमकमिंग’द्वारे स्पायडर-मॅनचं विश्व ज्या पद्धतीनं पुनरुज्जीवित केलं, अगदी त्याच पद्धतीनं या चित्रपटाद्वारे अॅनिमेटेड चित्रपटांमध्येही प्रभावी मांडणीच्या रूपात नवीन विश्व उभारायला सुरुवात केली असं म्हणता येईल.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख