हे लेख सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत ह्या दोन्हींच्यामध्ये आंदोलित होणाऱ्या मनासाठी आहेत!
ग्रंथनामा - झलक
गणेश देवी
  • ‘त्रिज्या’या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 14 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक त्रिज्या Trijya गणेश देवी Ganesh Devi

डॉ. गणेश देवी यांचं ‘त्रिज्या’ हे छोटेखानी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेलं हे मनोगत...

.............................................................................................................................................

या छोट्याशा पुस्तकात मराठी वाचकांसमोर माझ्या मनात गेले अनेक वर्षे पिंगा घालणारे काही प्रमुख विचार मांडले आहेत. पुस्तकात प्रस्तुत केलेल्या लिखाणास ‘लेख’ हे सन्माननीय नाव देणे योग्य नाही. लेखांना स्वत:ची काही शिस्त असते. त्यामागे काही संकल्पना-संदर्भ असतो. तो या लेखनाच्या मागे नाही. त्यातील काही, मी स्वत:पुरता विचार करत असताना केलेल्या त्रोटक नोंदी आहेत. काही फक्त विचारांचे पुसटसे धागे आहेत. काही जाहीर व्याख्यानात उच्चारलेले तात्पुरते विचार आहेत. पण जे आहे, ते सगळे एका विस्तृत विचारपटलावरचा सुस्पष्ट नकाशा आहे. हा नकाशा थोडासा, मध्ययुगातील खलाशांनी बनवलेल्या दर्याच्या नकाशासारखा. भूगोलाच्या अभ्यासकांना मान्य होणार नाही, तरीही त्या दर्यावर्दी भटक्यांना पूर्ण मार्गदर्शन करू शकेल असा. म्हणून, या पुस्तकात जे आहे त्याला मी थोड्याफार संकोचाने ‘वैचारिक लेख’ म्हणू इच्छितो. त्यातल्या कल्पना, संकल्पना माझ्यापुरता थोडाफार प्रकाश देत आल्या आहेत. तो प्रकाश तशाच प्रकारे वाचकास मिळेल हा माझा दावा नाही. किंबहुना दावे करणे वगैरेला मी कंटाळून गेलो आहे.

मला फक्त जाता जाता, जमेल तितके, जे मूल्यवान वाटते ते नमूद करावेसे वाटले. म्हणून हे सारे. हे लेख सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नाहीत. ते विचारवंतांसाठीपण नाहीत. पण ह्या दोन्हींच्यामध्ये आंदोलित होणाऱ्या मनासाठी आहेत.

या लेखांच्यामध्ये काही तुटक्या ओळी आहेत, त्या कविता नाहीत. ते फक्त विचार आहेत. काही सरळ आहेत. स्पष्ट आहेत. काही अस्पष्ट आहेत. त्या तुटक्या ओळीत वाचकांनी स्वत:चे विचार, कृती आणि आवाज मिळवून त्या कविता पूर्ण करायच्या आहेत. अर्थात, ही अपेक्षा जरा जबरदस्तीची आहे, पण जाता जाता, आणि कदाचित परतणे शक्य होणार नाही म्हणून तीही करतो.

जो केंद्र नाही आणि जो परीघ नाही, असा हा मधलाच लटकलेला आवाज, खूप अस्पष्ट, क्षीण, तुमच्यापर्यंत पोचवला आहे. तो सांभाळला जावा.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......