‘Human, Time, Space and Human’ : हा सिनेमा एकाच वेळी फँटसी ते भावना कोरून काढतो
कला-संस्कृती - चलत्-चित्र
कल्पना मेंढेकर
  • ‘Human, Time, Space and Human’चं पोस्टर
  • Tue , 11 December 2018
  • कला-संस्कृती चलत्-चित्र ह्यूमन टाइम स्पेस अँड ह्यूमन Human Time Space and Human

उत्क्रांतीनंतर मानवात झालेले बदल प्रामुख्यानं दिसले ते पुरुष किंवा नर वर्गात. पोट भरल्यानंतर शरीर चाळवतं आणि दुसरी भूक जोर धरू लागते. या भुकेसाठी अनेक खेळी, पैसा, राजकारण, शक्ती आणि भावनिक खेळ या सर्व शक्ती वापरल्या जातात. प्रेमात शरीर, मन दोघांच्या सहमतीनं असल्यास ती निसर्गाची सुंदर रचना, तर फक्त शरीर हिसकावून भूक शमवणं, हे निसर्गाच्या विरोधात जाणारं दुष्टचक्र ठरतं.  

नुकत्याच गोव्यात झालेल्या ‘इफ्फी’ (IFFI)मध्ये या विषयावर असलेला सिनेमा बघायला मिळाला. त्याचं नाव होतं- ‘Human, Time, Space and Human’. हा एक कोरियन सिनेमा होता. हा सिनेमा आवडण्याची काही कारणं आहेत. काही गोष्टी आपल्या अंतर्मनात खूप खोलवर रुजलेल्या असतात. आपल्या भवतालात असं काही घडू शकेल, ही कल्पनाच मुळात करवत नाही किंवा अतिशय सुरक्षित वातावरणामुळे अमानवीय कृत्य घडणं, पाहणं आणि ते आपल्या मेंदूनं पचवणं तितकंसं सोपं होताना दिसत नाही.

मानव, अवकाश, प्रकाशवर्षं आणि पुन्हा मानव याची सांगड घालणाऱ्या या सिनेमाची कथा, एका लहानशा सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेवर घडते.

एक नवीन लग्न झालेलं जोडपं या युद्धनौकेवर हनिमूनसाठी येतं. बोट निघाल्यानंतर काही क्षणांतच त्यांना कळतं ही जागा संसार सुरू करण्यासाठी अजिबात योग्य नव्हती, कारण या युद्धबोटीवर अनेकांचे प्राण गेलेले आहेत. या बोटीवर मर्यादित माणसांसाठी जागा उपलब्ध असल्या तरी त्यात एक क्रूर क्रिमिनल ग्रुप असतो, काही सेक्स वर्कर असतात, तर एक राजकीय नेता त्याच्या मुलासकट असतो, काही तरुण मुले एन्जॉयमेंटसाठी, तर एक प्रेमी युगुल,  जहाज चालवणारे कॅप्टन आणि त्याचे सहकारी. या सर्वांसोबत एक अद्भुत, गूढ वृद्ध व्यक्ती बोटीवर वावरताना दिसते.

वृद्ध व्यक्तीला बोटीवर इतस्ततः पडलेली माती, वाळू गोळा करताना अनेक जण कुतूहलानं पाहतात, तर काही वेडे म्हणून सोडून देतात. कारणंही विचारतात, तो खुणेनेच त्यांना समजून सांगतो, ही  माती एक दिवस उपयोगी पडेल.

सत्ता तिथं राजकारण हा प्रश्न इथंही निर्माण होतो. नेता आणि त्याच्या मुलाला प्रथम दर्जाची वागणूक मिळते. कॅप्टन त्यांना चांगलं खाणं वाढतो. हे बघून क्रिमिनल ग्रुपचा म्होरक्या बंदुकीच्या जोरावर त्या सेवा त्याच्या ग्रुपसाठीही वळवून घेतो. यामुळे जहाजावरची इतर माणसं  दुखावतात. प्रश्न मांडायला लागतात, तेव्हा क्रिमिनल ग्रुपकडून दमदाटी केली जाते. तेव्हा  नेत्याला नवपरिणीत ओशिकामा आणि त्याची पत्नी सु थेट जाब विचारतात. धुसफूसत का होईना नेता तयार होतो, पण त्यामुळे तरी त्याचा इगो दुखावतो.

पोटाची आग विझल्यानंतर बोटीवर वासनेची भूक बळावते आणि त्याला ओशिकामा आणि सु बळी पडतात. म्होरक्या नेत्याला खुश करण्यासाठी सु ला घेऊन यायचं कबूल करतो. यात ओशिकामाची हत्या होते. त्याचा मृतदेह बोटीबाहेर फेकण्यात येतो. आणि सु वर क्रिमिनल आणि इतर ग्रुपकडून गॅंगरेप होतो. या सगळ्यात नेत्याचा मुलगा सभ्य वाटत असला तरी वासनेची भूक शमवण्यात तोही हात धुवून घेतो. 

परिस्थितीनं हतबल झालेली सु आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा गूढ वृद्ध व्यक्ती तिला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तिला बोटीच्या तळाशी असलेल्या भागात घेऊन जाते. तिथं सु ला एक वेगळीच दुनिया दिसते. तिथं दोन अंडी उबवायला ठेवलेली असतात. छोट्या छोट्या भांड्यांत लहान-लहान रोपं उगवली असतात. हे पाहून सु वृद्धास त्याचं कारण विचारते. तेव्हा तो गूढरित्या त्याचं उत्तर देतो की, हे कुणाला जिवंत ठेवण्यासाठी अन्न तयार करण्याची प्रक्रिया करणं हे माझं कर्तव्य आहे.  सु ला या गूढ वाक्याची उकल होत नाही, पण एक दिवस अचानक सु बोटीबाहेर बघते आणि किंचाळते. तिला किंचाळलेले बघून सगळे त्यांच्या केबिनबाहेर येतात, तेव्हा बाहेरचं दृश्य बघून प्रत्येकाला मृत्यूचं भय वाटू लागतं. बोट आता समुद्राच्या पाण्यावर नसून अवकाशात झेपावत असते. जमीन, समुद्रतळावर संपर्क होऊ शकत नसतो. ही आपदा कशी आली, का आली याचं उत्तर कुणाकडेही नसतं. पण वृद्ध व्यक्ती  शांतपणे स्मित करताना दिसते. जणू त्याला या आपदेची चाहूल खूप पूर्वीपासून होती. त्याला कळत असतं सु वर झालेल्या अत्याचारामुळे ही परिस्थिती उदभवली आहे.

जहाजाचा कॅप्टन सगळ्यांना बोटीवर एकत्र बोलावतो, सर्वांना आपदेसाठी तयार करताना इथं तो खाण्याचं साहित्य किती दिवस पुरेल याबद्दल माहिती देतो. इथून खऱ्या जगण्या-मारण्याची ओढ सुरू होते. अगदी त्याच काळात सु ला बाळाची चाहूल लागते, तिला हे पाप वाटत असल्यानं ती पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करते. तिला वाटतं या बाळाचा नक्की बाप कोण असावा.  इथं पुन्हा ती वृद्ध व्यक्ती तिला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि ते मूल ओशिकामाचं कशावरून नसावं हे पटवून देते. आता सु त्या येणाऱ्या बाळाची काळजी आणि बोटीवर उदभवलेले अन्नाचे संकट या दोन्हींचा सामना करताना, नेत्याचा मुलगा आणि क्रिमिनल ग्रुपच्या म्होरक्याला ती ‘तुम्हीच बाळाचे बाप असाल’ असं सांगते. त्यामुळे ते तिला खाणं आणून देतात.

दिवसागणिक परिस्थिती हतबल होत जाते, अन्नासाठी अनेक खून पडतात. आता या हत्या झालेल्या शरीराची विल्हेवाट लावताना वृद्ध बाबा त्या मृतदेहाचा माती म्हणून उपयोग करतात. त्या मृतदेहाच्या कापलेल्या अवयवावर रोप लावतात. अन्नाची भीषण गरज मानवी अवयव कापून थोपवली जाते, हळूहळू सु सोडून सगळे जीव मरतात. आता तिची आणि तिच्या तान्हुल्या बाळाची गरज वाढलेली झाडं, बोटीवर झालेलं जंगल, अंड्यांतून जन्मलेल्या कोंबड्या, पुन्हा अंडी अशा एका नव्या निर्माण झालेल्या जैव सृष्टीतून भागवली जाते.

सु आता एक मध्यमवयीन आई तर बाळ तरुण होऊ लागतं.. आता त्याला दुसरी भूक जाणवू लागते...

भुकेभोवती फिरणारी ही कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. हा सिनेमा एकाच वेळी हॉलमधल्या लोकांच्या डोळ्यात प्रेम, कारुण्य, संताप, तर भविष्यात ओढवू शकणाऱ्या परिस्थितीवर अंजन घालतो. स्पेस ही एक फँटसी सोडली तर या सिनेमात अनेक छोट्या-मोठ्या फँटसी पुढे येत राहतात. जसं बोटीवर तळाशी झाडं लावणं, अंडी, कोंबड्या पाळणं, हे करणारी वृद्ध व्यक्ती. तोही एक फँटसी वाटत राहतो. या चराचरसृष्टीत दमन, हिंसा, वासना चालत असली तरी निसर्ग तिथं न थांबता सृजनाचं आपलं कार्य सतत चालू ठेवतो. त्यामुळे बाळ पापातून जन्माला येतंय की, प्रेमातून याची त्या वृद्धाला फिकीर नसते. त्याला जिवंत ठेवणं हेच त्याचं कार्य तो समजतो.  इथं फँटसी विविध पातळ्यांवर काम करत मानवी भावनांचं प्रच्छन्न दर्शन घडवते. इथं म्हातारा म्हणजे अथकपणे काम करणारा निसर्ग आहे असं वाटू लागतं.

एकूण हा सिनेमा मानवी भावनांच्या खोल मुळाशी घेऊन जातो. अशा वेळी नैतिकता काही सीमा मर्यादा राखू शकणाऱ्या वाटत असल्या तरी त्या फार काळ टिकाव धरणार नाहीत असा संदेश या सिनेमातून मिळतो.

हा सिनेमा एकाच वेळी फँटसी ते भावना कोरून काढत, यथार्थ जोडत आपल्याला खिळवून ठेवतो.

   

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......