अजूनकाही
मानवी स्वभावाचा तळ लागणे खरोखरीच मोठे कर्मकठीण काम असते. व्यक्तीपरत्वे कोणाच्या मनात काय आहे, हे सांगता येणे त्या निर्मात्याला शक्य होईल का? म्हणूनच कदाचित त्याने मानवी मनात लालसा निर्माण केली असावी. त्यावरून अंदाज लावता येतो. कोणाला कशाची लालसा आहे? कोणाच्या मनात कशाची हाव असू शकते? याचा अंदाज करणे सोपे जाते. सध्या आणि गत अनेक वर्षांपासून सुरू असणारा सत्तेच्या गुलामांचा संशयकल्लोळ पाहता सत्ताकांक्षी लोकांच्या मनाचा तळ सहज लागू शकतो. पण तरीसुद्धा हे लोक वेड पांघरून पेडगावला जाण्याचा जो अट्टाहास करतात, तो निखळ मनोरंजनाचा भाग ठरतो.
मनातले इप्सित साध्य करण्यासाठी एखादी सर्वसामान्य व्यक्ती जे-जे करते, तसाच यांचाही प्रवास असू शकतो. मात्र सत्तेप्रत जाण्याचा मार्ग असा साधा-सोपा-सरळ असत नाही. हा प्रवास सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासापेक्षा नौटंकीबाज ठरतो. आपल्याला जे साध्य करावयाचे आहे, ते तसे उघड कळू न देता सत्ताकांक्षी लोक जे-जे म्हणून भास-आभास निर्माण करत जातात, तो नजारा भुवया उंचावणारा असतो. जसे अस्तित्वात नसलेले प्रश्न निर्माण करणे आणि अस्तित्वात असलेले प्रश्न नाहीसे करणे ही फार मोठी किमया असते. धोरणी मंडळी अशी किमया मोठ्या कष्टाने साधत असतात. मोठ्या कष्टाने जमवलेली बाब असते ती!
प्रश्न प्रलंबित ठेवणे हा यातला पायाभूत घटक असतो. प्रश्न सुटले तर जनसामान्यांना आपली आठवण कुठून येणार, या कल्पनेतून बहुतांशी प्रश्न रेंगाळत ठेवले जातात. प्रश्नच नसतील तर जनतेला आपली गरज भासणार नाही. हा भयगंड मनात ठेवून प्रश्न वर्षांनुवर्षे ताटकळत, अनुत्तरित ठेवण्याची कला ही मंडळी कुठल्या महाविद्यालयात, विद्यापीठात शिकतात हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळेच ‘चुटकीसरशी प्रश्न सोडवणारा नेता’ असे संबोधन वा वाक्प्रचार लिहायला-बोलायला-ऐकायला मजेशीर असला तरी तो तसा प्रत्यक्षात नसतो हे आवर्जून सांगावे लागेल. हे संबोधन बोलीभाषेतच प्रचलित असते, वास्तवात असे काही अनुभवण्यास मिळाले असेल तर तो चमत्कार मानावा लागेल. कारण असे चमत्कार सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबात येत नाहीत. असे घडत असल्याचे उमाळे सत्ताकांक्षी लोकांच्या मलईतला हवाहवासा भाग खायला मिळणारी मंडळीच काढत असतात.
चुटकीसरशी प्रश्न सोडवणारा नेता असत नाही. कारण ज्याला मुळातच प्रश्न सोडवायचे नसतात, तो उत्तम राजकारणी होण्याच्या पायऱ्या चढत असतो. त्यामुळे अशा समस्या, मुद्यांतील प्रश्न, विषय चुटकीसरशी ओळखणारी व्यक्ती सत्ताकांक्षी होऊ शकते, असा याचा खरा मतितार्थ घ्यायचा असतो.
अस्तित्वात नसलेला प्रश्न उपस्थित करून अशी मंडळी जनसामान्यांसमोर दिवसा उजेडी तारे दाखवत असतात. कारण ते सर्वसामान्यांचे प्राधान्यक्रमच बदलवून टाकतात. कधी कोणाचे, कोणत्या जनसमुदायाचे प्राधान्यक्रम बदलून टाकावयाचे, याचा क्रम अशा सत्ताकांक्षी मंडळीतील जाणत्यांना पुरता ठाऊक असतो. म्हणून तर कधी एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावनांना हात घालण्यात येतो, तर कधी शेतकऱ्यांप्रती स्नेहभाव दाटून येतो, तर कधी महिला कल्याणाची आस व्यक्त केली जाते. विशेषत: विशिष्ट जनसमुदायाबद्दलचा हा कळवळा सत्तेबाहेर पडल्यानंतर अधिक उफाळून येतो.
अशा मंडळीची अस्तित्वात नसलेल्या प्रश्नांप्रमाणेच दुसरी एक खासीयत असते. सर्वसामान्य लोकांचा, मतदारांचा फारसा संबंध नसलेल्या बाबी त्यांच्यासमोर खास त्यांच्या समस्या म्हणून पेश करण्यात येतात. सर्वसाधारणत: कुठल्याही सुशिक्षित नागरिकासमोर रोजगाराची संधी हा यक्षप्रश्न असतो. मात्र ही हुशार मंडळी त्याच्यासमोर त्याच्या आयुष्यात फारसा संबंध नसलेल्या अनेक गोष्टी अशा रीतीने सादर करतात की, त्याचा संभ्रम वाढतो. अशा गोंधळलेल्या समूहनिर्मितीचा आणि त्यांच्या भावना उद्वेगावर स्वार होत सत्ताकांक्षी मंडळी सत्तेप्रत पोहचत असतात. विशेषत: ज्यांच्या दररोजच्या आयुष्यातील प्रश्न निराळे असतात, अशा सर्वसामान्यांच्या मनावर ही सत्ताकांक्षी मंडळी स्वत:ची स्वप्ने थोपवत असतात. त्यामुळे अशा मंडळींच्या विधानांवर सरळसोट विश्वास ठेवायचा नसतो, हे आता सर्वसामान्य जनतेलाही कळायला लागले आहे.
त्यामुळेच तर ‘आता आपण सक्रीय राजकारणातून निवृत्त होणार. यानंतर नव्या रक्तास संधी देणार’ अशी घोषणा ऐकायला मिळाली की, त्याचा अर्थ ते निवृत्त होणार असा नसतो. तर अशी घोषणा करणाऱ्यांच्या घरातली नवी व्यक्ती त्यांची जागा घेणार असाच असतो, हेसुद्धा जनतेच्या परिचयाचे झाले आहे.
या सत्ताकांक्षी मंडळींचा करिश्मा अन करामतच अशी प्रभावी असते की, जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना भाकरीपेक्षा अस्मितेचा मुलामाच जास्त महत्त्वाचा वाटायला लागतो. बहुदा या सत्ताकांक्षी मंडळींनी अशी भुरळ पाडायची कला उपजतच असते. स्वत:वरील समस्या त्यांना जनतेच्या आहेत असा आभास जो निर्माण करायचा असतो. जनतेच्या समस्या, त्यांची दुखणी-खुपणी मात्र या लोकांना आपली कधीच वाटत नाहीत. सर्वसामान्यांच्या वेदना आपल्याच आहेत असा आभास निर्माण करत व्यक्तीगत स्वप्नांची पुर्तता करण्यात ही मंडळी अगदी पारंगत असतात.
राजकारणाची बाराखडी गिरवणाऱ्यांचा हा सर्वाधिक लोकप्रिय मार्ग आहे. असा मार्ग चोखाळणाऱ्यांना सत्ताकांक्षी असेच संबोधन असते. वर्तनात प्रचंड लवचीकता असणारी ही मंडळी आपण समजतो, तशी साधीभोळी नसतातच मुळी. साधेभोळेपणाचा आव आणण्यात पटाईत चतुरस्त्र आणि अभिनयसंपन्न मात्र निश्चितच असतात. त्यामुळे तर नेता आणि अभिनेता यांच्यात साधर्म्य असते.
पृथ्वीतलावर राहणाऱ्या सर्वाधिक शहाण्या व्यक्ती म्हणून यांचा उल्लेख करावा लागतो. कारण दोन अधिक दोन बरोबर आठ होतात हे ठाऊक असणारेच आपल्यावर राज्य करत असतात. असा तिरपांगडा हिशोब सामान्य मतदाराला जमत नाही. कारण हे येरागबाळ्याचे काम नोव्हे! जनसमूहाची मती गुंग करणारे अव्वल सोंगाडेच हे करो जाणे!
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment