...तोवर आपण मिथकांमधील पात्रांची जात शोधत राहू. हनुमान दलित होता. उद्या रावण मुस्लिम होता, असंदेखील बोललं जाऊ शकतं.
पडघम - सांस्कृतिक
सुरेंद्रनाथ बाबर
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हनुमान
  • Mon , 10 December 2018
  • पडघम सांस्कृतिक हनुमान Hanuman रावण Ravan रामायण Ramayana मिथक Myths योगी आदित्यनाथ Yogi Adityanath दलित Dalit

मिथक आणि सत् यात नेमका काय फरक असतो? मिथक भ्रामक असतं. एखाद्या सत्याची विचित्र अशी दृष्टी मिथक निर्माण करते. मिथक हे व्यक्तिनिष्ठ, सांस्कृतिक आणि विश्वासावर आधारलेलं असतं; पण सत् हे पूर्णतः अचूक, निश्चित आणि वस्तुनिष्ठतेवर आधारलेलं असतं. त्यामुळे पुरातन कथा म्हणजे मिथकं अनेक भाषांमध्ये, अनेक भागांत वेगवेगळी आढळून येतात. सत्याकडे जाण्याचा, त्यातून उचित बोध सांगण्याचा तो एक अलंकारिक, रूपकात्मक प्रयत्न असतो.

अनेकजिनसी हिंदू संस्कृतीत अनेक मिथकं आपणास पहावयास मिळतात. त्यात एक चुकीचं, दुसरं बरोबर हा भेदभाव दिसून येत नाही. कारण ते प्रत्येक समाजाचं त्यांच्या परंपरेनुसार झालेलं जीवनाबद्दलचं त्याचं आकलन असतं. उदा. आदिवासी समाज महिषासुराला देव मानतो, ‘रामचरितमानस’ मात्र त्याला राक्षस मानतं. ही दोन मिथकं सत्य-असत्य न सांगता त्या त्या लोकपरंपरेचं सत्यासंदर्भातलं आकलन सांगतात, जे समाज सापेक्ष असतं.

वास्तवात मिथकं आपल्या आयुष्याला कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकतील, यासाठी आपण कथा वाचत असतो. म्हणजेच काय तर, ज्यातून काहीतरी बोध होईल आणि त्यांचा आपल्या आयुष्यात मार्ग दाखवण्यात केव्हातरी उपयोगी होईल, अशी माफक अपेक्षा ठेवून आपण जगत असतो. 

पौराणिक कथा ह्या कोणत्याही वास्तवात रचल्या गेल्या असल्या तरी वास्तव बदललं की, कथेची रूपरेषा बदलू शकते. पण बोधात साम्य राहतं. मिथकं ही पूर्णतः मिथ्या आहेत की, एकेकाळचं वास्तव, हे प्रश्न आजच्या काळात महत्त्वाचे ठरत आहेत. मिथककथांतील पात्रांची जात-धर्म शोधण्याचे प्रकार आहेत. पण त्यांमधील सत्य शोधून त्याचं तात्पर्य काय असेल, त्याचा बोध काय असेल हे महत्त्वाचं ठरताना दिसत नाही.

त्यामधील बोध काय आहे ही बाब आजकाल बाजूला पडू लागली आहे. म्हणजे ग्रीक मायथॉलॉजीमधला ‘नार्सिस्ट’ कोणत्या जातीचा/धर्माचा होता हे शोधणं जास्त गरजेचं आहे की, आपण वास्तवात ‘नार्सिस्ट’ होत आहोत, हे कळणं जास्त गरजेचं आहे? म्हणूनच मिथकांमधील तत्त्व शोधणं जोवर शक्य नाही, तोवर आपण मिथकांमधील पात्रांची जात शोधत राहू. मग हनुमान दलित होता, ब्राह्मण किंवा जैन हे चालत राहील.

हिंदू धर्म ‘वेद’ समोर घेऊन येतो, पण जेव्हा हिंदू संस्कृती पुढे येते, तेव्हा ती ‘महाभारत’, ‘रामायण’ यासारखी महान महाकाव्यं घेऊन येते. धर्म हा संहिता घेऊन येतो, पण संस्कृती तुम्हाला जगण्यात समृद्ध करेल अशी पौराणिक मिथकं घेऊन पुढे येते. मिथकांच्या बाबतीत इस्लाम, ख्रिस्ती आणि यहुदी यांच्यातही अनेक संघर्ष आहेत. पण त्यांच्या धर्मसंहिता वेगळ्या आहेत. उदा. पौराणिक कथेत एक स्त्री आणि पुरुष होते, ज्यांनी सफरचंद खाल्लं. ते इस्लाममध्ये आदम आणि आवा झाले आणि ख्रिस्ती लोकांनी त्यांना अॅडम आणि इव्ह केलं. कथा तीचं राहिली पण दृष्टी बदलली.

मिथकं संस्कृतीतूनच पुढे आलेली असतात आणि धर्म हा वास्तवात राहून बनवला गेला असला तरी तो सांस्कृतिक/भौगोलिक मूल्यांवर आधारित असतो. त्यातून अनेक वादही निर्माण झाल्याचं दिसतं. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मावर मूळ यहुदी/हिब्रू भाषेतील मिथकांचा जास्त प्रभाव असल्यानं या दोन्ही धर्मांना ‘अब्राहमिक धर्म’ असंदेखील म्हटलं जातं. हे सर्व मिथकांतील साम्यता लक्षात घेऊन निर्माण केलेलं तत्त्वज्ञान आहे, असं लक्षात येतं.

धर्मसंहिता आणि मिथक यावर धर्माचं राजकारण उभं राहतं. कारण मिथकांना धर्मात विशेष महत्त्व आहे. तत्त्वज्ञान किंवा काही प्रेरणा मिथकांतून/कथांमधून लोकांपर्यंत पोहचल्या की त्यांचा जनमानसावर अधिक प्रभाव पडतो. कारण त्यांना संस्कृतीचा आधार असतो. इथेच आपल्याला धर्माच्या अडगळीचा आणि संस्कृतीच्या समृद्धतेचा प्रत्यय येतो.

संस्कृतीतून पुढे आलेली मिथकं जनमानसात जेवढ्या लवकर मिसळतात, तशी धर्मसंहिता पोहचत नाही. ती पोहचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मिथकं बोलीच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत राहतात. त्यामुळे ती बंदिस्त राहत नाहीत. या हस्तांतरणामुळे एका मिथकाला अनेक अंगं निर्माण होऊ लागतात. हात, पाय, तोंड, डोकं अशा अनेक अंगांच्या जोरावर ती संपूर्ण समाजात पसरू लागतात. आणि जेव्हा त्या मिथकांना एका विशिष्ट साच्यात बंदिस्त करण्याचा विचार होतो, तेव्हा ती मिथकं समाजालाच गिळंकृत करू लागतात.

हे आपण इस्लाम, यहुदी, ख्रिस्ती मिथकांबाबतीत पाहतोच आहोत. जेव्हा मिथकं समाजात रुळतात, तेव्हा ती लोकांची बनतात. लोक त्यांच्याकडे आपापल्या दृष्टीनं, आपापल्या धार्मिक चष्म्यातून पाहू लागतात. त्यामुळेच भारतात रामायणाच्या अनेक आवृत्त्या दिसतात. सुमारे ३०० भाषा आणि ३००० बोलीभाषा यांमध्ये रामायण वेगवेगळ्या स्वरूपात आहे, असा एक लेख ए. के. रामानुजन यांनी लिहिलेला आहे. म्हणून लक्षात येतं की, मिथकातून तत्त्वज्ञान जन्माला येऊ शकत असलं तरी ते सत्यरूपात समोर येऊ शकत नाही. त्याला अनेक दृष्टीतून पाहिल्यामुळे सत्य सापेक्ष बनत जातं. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, तत्त्वज्ञान अनेक मार्गानं जन्माला येऊ शकतं. म्हणून एकच तत्त्वज्ञान सांगणारी अनेक मिथकं निर्माण होऊ शकतात किंवा झालेली आहेत.

त्यापैकीच एक रामायण. त्यातील प्रसिद्ध रामायण म्हणजे ‘वाल्मिकी रामायण’. जैन धर्मातील रामायणाकडे धार्मिक व्यवस्थेतून पाहिलं जातं. तुलसी रामायण, मल्याळम भाषेतील रामायण, केरळमध्ये बोलीतून आलेलं मुस्लिम रामायणदेखील अस्तित्वात आहे, जे ‘मप्पीला रामायण’ म्हणून प्रसिद्ध आहे. यावरून एकाच कथेच्या अनेक दृष्टींमुळे अनेक आवृत्या निर्माण होतात, हे लक्षात येतं. ‘मप्पीला रामायण’ काहीसं विनोदी असून अरेबिक प्रभावामुळे त्यात ‘रावणा’ला ‘सुलतान’ असं संबोधलं आहे. म्हणून उद्या रावण मुस्लिम होता, असंदेखील बोललं जाऊ शकतं.

मिथकांबाबत इतका संघर्ष का? यावर ‘मिथ=मिथ्या’ ह्या पुस्तकाचे लेखक देवदत्त पटनाईक एका मुलाखतीत म्हणतात, “हम दुनिया को रणभूमि बना देते हैं कि मेरा सच सच है, तेरा सच झूठ. अगर हमें इसे रणभूमि नहीं बनाना है, तो हमें संवाद करना चाहिए. दुसरों की बात देखनी चाहिए, सुननी चाहिए. जैसे जैनियों में कहते हैं अनेकांतवाद.”

केवळ एक सत्य श्रेष्ठ आहे, बाकी असत्य ही धारणा धार्मिक असहिष्णुतेला बढावा देते. मुस्लिम लोक यहुदींच्या देवाला राक्षस मानतात. त्यामुळे एक मिथक हेच सत्य मानणं हे अनेकांगी समाजास धोकादायक ठरतं. त्यामुळे भिन्न भिन्न मिथकं, विचार यांचा सन्मान करून सत्य तपासणं महत्त्वाचं ठरतं, पण तसं होताना आज आपणास दिसत नाही, हे दुर्दैव.

त्यामुळे जैन स्वामी, हिंदू योगी जेव्हा हनुमानाच्या जातीबद्दल वक्तव्य करतात, तेव्हा समाजातील अनेकांतवाद, बहुसंस्कृतीवाद, संवाद संपत चालला आहे, हे लक्षात येतं. माझं तेवढं अंतिम सत्य हे तत्त्वज्ञान वाढीस लागतं आहे. हे अनेकजिनसी समाजासाठी केवळ घातक नसतं, तर त्यातून साहित्य, तत्त्वज्ञान नष्ट होण्याचा धोका असतो. असहिष्णुतेमुळे नवी साहित्यनिर्मिती होऊ शकत नाही. अशा वेळी राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त यांच्या दोन ओळी महत्त्वाच्या वाटतात,

‘‘राम तुम्हारा चरित स्वयं ही काव्य है,

कोई कवि बन जाए सहज संभाव्य है|”

.............................................................................................................................................

लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.

advbaabar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......