‘विराट’ (कोहली) पर्व
पडघम - क्रीडानामा
सिद्धार्थ खांडेकर
  • विराट कोहली वानखेडे स्टेडियमवर
  • Tue , 13 December 2016
  • क्रीडानामा क्रिकेट Cricket विराट कोहली Virat Kohli सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar डॉन ब्रॅडमन Don Bradman

प्रतिस्पर्धी संघ आणि प्रतिस्पर्धी मीडियाला विराट कोहली अजिबात झेपत नाही. इंग्रजीत ज्याला ‘कॉकी’ म्हणतात आणि ज्याला मराठीत थेट प्रतिशब्द नाही (उचापतखोर, चिथावणीखोर यांचे मिश्रण म्हणता येईल फार तर) असा कोहली सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे किंवा महेंद्रसिंग ढोणी यांसारख्या ‘जंटलमन’ भारतीय आयकॉन्सचा ‘आल्टर इगो’ ठरतो. त्याचा स्वभाव बराचसा सौरव गांगुलीच्या स्वभावाशी साधर्म्य सांगतो. सौरव उत्तम कर्णधार तर होताच, पण त्याचा क्रिकेटमधील वैयक्तिक रेकॉर्ड अभूतपूर्व, अद्भुत वगैरे कधीच नव्हता. त्याची फलंदाजीची शैली सुरेख होती. पण तंत्रात, कौशल्यात अनेक मर्यादा होत्या. विराट कोहली मात्र निव्वळ उत्तम नेतृत्वामध्ये समाधान मानणाऱ्यांतला नाही. त्याला उत्तम फलंदाजही व्हायचे असते. त्या दिशेने त्याचे अथक प्रयत्न सुरूच असतात. हाती घेतलेले काम पूर्ण करायचे असते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करत असताना शेवटपर्यंत म्हणजे अर्थातच लक्ष्य गाठेपर्यंत त्याला क्रीझवर राहायचे असते. कसोटी सामन्यांमध्ये अनुकूल/प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्यांवर त्याला शतक बनवायचे असते. शतक बनल्यावर द्विशतक बनवायचे असते. भागीदाऱ्या रचायच्या असतात. समोर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे की, नवव्या क्रमांकावरील फलंदाज, याने काहीच फरक पडणार नसतो! फलंदाजीचे पॅड्स उतरवल्यानंतर विराट कर्णधारपदाची टोपी चढवतो आणि पूर्णपणे त्या भूमिकेत समरस होतो. तो सौरवइतकाच उत्तम कर्णधार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना महेंद्रसिंग ढोणीपेक्षा कितीतरी अधिक धाडस आणि कल्पकता दाखवतो. आणि इतके करूनही त्याला सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या तोडीचा फलंदाज बनायचे आहे हे विलक्षण आहे. प्रत्येक कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रचंड ऊर्जा, एकाग्रता, ईर्ष्या, भान, फिटनेस आणि आत्मविश्वास लागतो. कोहलीकडे इतके सगळे गुण ठासून भरले आहेत, हे भारताचे भाग्यच मानावे लागेल.

अपेक्षांच्या बाबतीत आपल्याकडे सर्वाधिक न भूतो न भविष्यति दडपण हे सचिन तेंडुलकरवर होते. बरीच वर्षे टीमचे प्लॅनिंग त्याच्या भोवती फिरायचे. आपल्या टीमइतकेच प्रतिस्पर्धी संघांचेही! नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला सचिनवरील दडपण काहीसे कमी होऊ लागले, कारण राहुल द्रविड, वीरेंदर सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अर्थातच सौरव असे चांगले, सातत्यपूर्ण फलंदाज भारताला लाभले. अनिल कुंबळेला हरभजन सिंगसारखा साथीदार मिळाला. जवागल श्रीनाथच्या अस्तानंतर झहीर खानसारखा मॅचविनर गोलंदाज मिळाला. मागील दशकाच्या मध्यावर ढोणी आला. एकंदरीतच सातत्य आणि समतोल या आघाड्यांवर भारताची कामगिरी चांगली होऊ लागली. सचिनवर मनमोकळेपणाने फलंदाजीवर अधिक चांगल्या रीतीने लक्ष केंद्रित करता येऊ लागले. सचिन, राहुल, सेहवागसारख्या फलंदाजांमुळे सौरव गांगुली आणि नंतर महेंद्रसिंग ढोणीला नेतृत्वावर लक्ष केंद्रित करता आले. फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या एकट्याला झेपणाऱ्या नाहीत, हे प्रांजळपणे मान्य करून (पण तत्पूर्वी इंग्लंडमध्ये २००७मध्ये कसोटी मालिका जिंकून) राहुलने नेतृत्वाला आणि नंतर क्रिकेटलाच रामराम ठोकला. कोहलीवरील जबाबदारीचे ओझे आणि त्याची बहरत जाणारी फलंदाजी यांचे मोजमाप घेण्यासाठी ही पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

मुंबईत वानखेडेवर त्याने केलेली २३५ धावांची खेळी अतिशय लक्षवेधी ठरली. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच चेतेश्वर पुजारा बाद झाला, त्यावेळी सामना बऱ्यापैकी रंगतदार अवस्थेत होता. कोहली अक्षरश: दिवसभर खेळला आणि त्याने भारताला इंग्लंडची धावसंख्या (४००) ओलांडून दिली. पण तेवढ्यावरच समाधान न मानता त्याने चौथ्या दिवशी जयंत यादवसमवेत २४१ धावांची विक्रमी भागीदारी रचली. स्वत: शतकाकडून द्विशतकाकडे मजल मारलीच, शिवाय यादवलाही शतक पूर्ण करू दिले. २००हून अधिक धावांची आघाडी घेऊन भारताने या सामन्यात इंग्लंडला डोके वर काढूच दिले नाही.चौथी कसोटी जिंकून भारताने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. चेन्नईला होणारा पाचवा सामनाही भारतच जिंकेल आणि ही मालिका ४-० अशी खिशात घालेल हे जवळपास निश्चित दिसते. २००८नंतर आणि तीन मालिका गमावल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या दोन कसोटी मालिका भारताने ०-४ (व्हाइटवॉश) आणि १-३ अशा गमावल्या होत्या. या दोन मालिकांदरम्यानच्या काळात भारतात झालेली मालिकाही आपण १-२ अशी गमावली होती. मुंबईत इंग्लंडविरुद्ध झालेले यापूर्वीचे दोन्ही कसोटी सामने (२००६, २०१२) भारताने गमावलेले होते. त्यामुळेच वानखेडेवर सोमवारी मिळवलेल्या विजयाचे वर्णन कोहलीने ‘स्वीटेस्ट’ असे केले आहे.

कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये सध्या कोहलीची सरासरी ५० धावांच्या वर आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. या वर्षभरात त्याने तीन द्विशतके झळकवली आहेत. क्रिकेटच्या इतिहासात त्याच्याशिवाय आजवर केवळ चारच फलंदाजांना ही कामगिरी साधता आली. ते आहेत : सर डॉन ब्रॅडमन, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क आणि ब्रेंडन मॅककलम. यांतले कोहली, क्लार्क आणि मॅककलम यांनी कर्णधार असताना अशी कामगिरी करून दाखवलेली आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेत कोहलीने आतापर्यंत ६४० धावा जमवलेल्या असून, इंग्लंडविरुद्ध हा विक्रम ठरतो. यापूर्वी राहुल द्रविडने इंग्लंडमध्ये २००२मध्ये झालेल्या मालिकेत ६०२ धावा जमवलेल्या होत्या. एखाद्या कसोटी मालिकेत ६००हून अधिक धावा बनवण्याचा पराक्रम भारतीय फलंदाजांनी आजवर सात वेळा करून दाखवलाय. सुनील गावस्कर, दिलीप सरदेसाई, राहुल द्रविड आणि विराट कोहली हे ते फलंदाज. यांतील गावस्कर, द्रविड आणि कोहली यांनी ही कामगिरी दोन वेळा करून दाखवली आहे. मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम (७७४ वि. वेस्ट इंडिज - १९७०-७१) आजही गावस्कर यांच्या नावावर आहे. कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता पुढील कसोटीत (तेही चेन्नईसारख्या फलंदाजी-फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर) गावस्करांचा विक्रम मोडण्यासाठी आवश्यक १३५ धावा कोहली सहज जमवू शकेल, असे सध्या तरी दिसते. विक्रमांची आणि आकडेवारीची चर्चा आणखीही करता येईल. पण काही बाबी या आकडेवारीपलीकडच्या असतात. उदा. कोहलीची सध्याची ५०.५३ची सरासरी त्याच्या कौशल्याची साक्ष पटवते. पण कर्णधार बनल्यानंतरच्या ३४ डावांमध्ये कोहलीची सरासरी आहे ६५.५०! आजवर कर्णधार म्हणून त्याच्यापेक्षा अधिक चांगली फलंदाजी साक्षात डॉन ब्रॅडमन (१०१.५१) यांनाच देता आली आहे. म्हणजे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कोहलीची धावांची आणि जिंकण्याची भूक वाढतेच आहे. 

इंग्लंडचा बुजुर्ग गोलंदाज जेम्स अँडरसनने परवा म्हटले की, कोहलीचा फॉर्म विशेषत: भारतीय खेळपट्ट्यांवर अधिक दिसून येते. पण त्याच्या तंत्रात मर्यादा असून त्या वेळोवेळी उघड्या पडल्या आहेत. इंग्लंडचे विख्यात अष्टपैलू क्रिकेटपटू सर इयन बॉथम यांनीही अशा प्रकारचे विधान समालोचन करताना केले होते. बॉथम किंवा अँडरसन यांच्या विधानात तथ्य असले, तरी ते पूर्ण सत्य नाही. ही मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या नऊ कसोटी सामन्यांत कोहलीची सरासरी होती २०.१२, यात केवळ एकच अर्धशतक होते. २०१४मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत कोहली विशेष चाचपडत होता. त्याला लक्षपूर्वक ऑफस्टंपबाहेर मारा करण्यात आला आणि पेशन्सचा अभाव असलेला कोहली विकेट फेकत राहिला. त्या मालिकेत कोहलीची सरासरी होती अवघी १३.४०. अँडरसननेच त्याला चार वेळा बाद केले होते. याबाबत कोहलीला विचारले असता, त्याने दिलेले उत्तर हजरजबाबीपणा, परिपक्वता, चाणाक्ष बुद्धी अशा विविध गुणांची साक्ष पटवणारे ठरते. कोहली म्हणतो : ‘ती एक फेज होती. माझी कामगिरी चांगली झाली नाही हे वास्तव आहे. पण तो संघ इंग्लंड असू शकतो किंवा आणखी कुठलाही संघ असू शकतो. माझ्या कारकिर्दीतली एक नामुष्की यापलीकडे त्या कालखंडाचे माझ्या लेखी महत्त्व नाही. त्यावेळी इंग्लंडविरुद्ध वाईट खेळलो म्हणून आता चांगला खेळूनच दाखवतो वगैरे विचार मी करत नाही किंवा असला विचार मला सतावत नाही. माझ्यासाठी दररोज नवीन दिवस आहे, नवीन आव्हान आहे आणि नवीन प्रतिस्पर्धी आहे!’

याच कोहलीने ऑस्ट्रेलियात २०१४-१५मधील मालिकेत ८६च्या सरासरीने ६९२ धावा जमवल्या होत्या याचा विसर बॉथम-अँडरसन यांना पडला काय? ऑस्ट्रेलियात धावा जमवणे वेळप्रसंगी इंग्लंडमधील फलंदाजीपेक्षाही कठीण असते. कोहली काहीवेळा चटकन भडकतो म्हणून त्याला उचकवण्याचे प्रकार वरचेवर होत असतात. फरक इतकाच की, सध्याचा कोहली हे खेळ ओळखून आहे. म्हणूनच बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर तोंडावर बोट ठेवून तो प्रतिचिथावणी देऊ शकतो. तितका आत्मविश्वास कोहलीकडे आला आहे, म्हणूनच तो आज सर्वोत्तम फलंदाज आहे. आणि भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे! विराट कोहलीच्या नेतृत्वाचे हे पर्व अधिक प्रदीर्घ आणि यशस्वी ठरण्याची दाट शक्यता आहे. नव्हे, तसा विश्वास कोहलीलाच वाटू लागला आहे!

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

sidkhan@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......