‘केदारनाथ’ : जुन्याच साच्यात डिजास्टर फिल्मच्या पार्श्वभूमीची भर घातलेली एक कथा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘केदारनाथ’चं एक पोस्टर
  • Sat , 08 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie केदारनाथ Kedarnath सुशांत सिंग राजपूत Sushant Singh Rajput सारा अली खान Sara Ali Khan अभिषेक कपूर Abhishek Kapoor

बॉलिवुडमधील मेनस्ट्रीम चित्रपटांकडून साध्या सरळ डिजास्टर चित्रपटाची अपेक्षा ठेवणं रास्त ठरत नाही. कारण अतिरेकी नाट्यमयता आणि भावनाक्षोभक, पारंपरिक प्रेमकथा या गोष्टी मुख्य प्रवाहातील चित्रपटाला सुटत नाहीत. त्यामुळे ‘केदारनाथ’सारख्या चित्रपटातही प्रेमकथा आणि मेलोड्रामा पुढाकार घेतात. अर्थात ‘केदारनाथ’ला प्रेमकथेवर अधिक भर देण्याबाबत फार दोष देण्यात अर्थ नाही. कारण त्याच्या ट्रेलरमधूनच त्याचा कल लक्षात येतो. मात्र इथं बाब अशी की, सदर चित्रपटात प्रेमकथा आणि मूळ आपत्ती यांच्या मांडणीत म्हणावा तितका समतोल राखण्यात आलेला नाही. ‘केदारनाथ’ असं नाव देत, त्याचा वापर मूळ आपत्तीला बाजूला सारत केवळ तिची लोकप्रियता कॅश इन करण्यासाठी केला जातो. याखेरीज प्रेमकथेत वर्षानुवर्षं वापरल्या गेलेल्या जुन्याच, रटाळ साच्यात केदारनाथची पार्श्वभूमी घातली जाते, तेव्हा मात्र काहीच नवीन न देऊ पाहणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती का केली असावी, असा प्रश्न पडतो. नंतर लक्षात येतं की, हे तर चित्रपटाच्या नायिकेच्या भूमिकेतील अभिनेत्रीकरिता तयार केलेलं लाँचपॅड आहे. कदाचित त्यामुळेच कथानकाला तसाही फार वाव मिळाला नसावा.

अर्थात मूळ आपत्तीवर लक्ष केंद्रित नसणं हा चित्रपटाच्या कथनातील आणि मांडणीतील अनेक दोषांपैकी एक दोष झाला. कारण मुळातच चित्रपट एकाच वेळी अनेक गोष्टी करू पाहतो. त्याला आपत्तीच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा दाखवायची आहे, हिंदू-मुस्लिम आणि सधन-निर्धन असा संघर्षही दाखवायचा आहे. नायकाला सोज्वळ आणि नायिकेला बंडखोरही दाखवायचं आहे. पारंपरिक प्रेमकथेत असणारा खलनायकही उभा करायचा आहे. असं काहीच नाही जे या चित्रपटाला करायचं नाहीये. त्याला सर्वच साध्य करायचं आहे. फक्त फरक इतकाच आहे की, या सर्व बाबी प्रभावीपणे एकत्र गुंफत, परिणामकारक ठरेल अशा एकसंध पटकथेचा अभाव आहे. शिवाय अपारंपरिक गोष्टी करण्याचा आव आणत सगळं काही पारंपरिक, नावीन्य हरपलेल्या बॉलिवुडी प्रेमकथेच्या साच्याचा वापर चित्रपटाला मारक ठरणारा आहे.

मंदाकिनी मिश्रा (सारा अली खान) ही केदारनाथच्या एका पंडिताची मुलगी, तर मन्सूर खान (सुशांत सिंह राजपूत) हा आपल्या वडिलांचा वारसा चालवत यात्रेकरूंची ने-आण करून उदरनिर्वाह करणारा मुलगा आहे. तर अशा प्रकारे हिंदू-मुस्लिम आणि सधन-निर्धन दोन्ही तफावती असलेलं जोडपं तयार झालं. दोघं प्रेमातही पडली. पण काहीतरी तर संघर्ष पाहिजे ना, मग आला मंदाकिनी ऊर्फ मुक्कुचा भावी नवरा आणि तिचे वडील (नितीश भारद्वाज). या दोघांच्या निमित्तानं खलपात्रंही तयार झाली. नायिकेचं बंड पुकारूनही झालं. थोडक्यात ऐंशी-नव्वदच्या दशकापासून अगणित चित्रपटांमधून पाहून झालेल्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग नवीन करायला वाव उरतो कुठे! इथेच ‘केदारनाथ’च्या आपत्तीचा कथानकात सोयीस्कररीत्या समावेश केला जातो आणि ‘केदारनाथ’ हा चित्रपट बनतो.

नाही म्हणायला मुस्लिम कुटुंबीयांची केदारनाथप्रती असलेली श्रद्धा आणि धर्माचं बाजारीकरण करण्याला विरोध असे मुद्दे येतात. मग त्यांच्या संदर्भानं छोटेखानी हिंदू-मुस्लिम वादही येतो. पण या सर्व बाबी अगदीच क्लिशेड प्रेमकथा, वर्गवाद, धार्मिक भेदभाव, नैसर्गिक आपत्ती अशा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ स्वरूपात, अगदीच विस्कळीतपणे समोर मांडल्या जात असल्यानं चित्रपटाला अपेक्षित असलेला शोकांतिकेसमान परिणाम कुठेही जाणवत नाही.

‘केदारनाथ’च्या कथानकाची समस्या अशी आहे की, चित्रपटाला स्वतःच्या रटाळ असण्याची जाणीव दिसत नाही. ज्यामुळे आपण काहीतरी अनकन्व्हेन्शल करत आहोत, अशा आविर्भावात जवळपास तासभर मंदाकिनी आणि मन्सूरची प्रेमकथा रंगवली जाते. त्यातही क्वचित इतर खलप्रवृत्तीच्या पात्रांचं दर्शन होत राहतं आणि मूळ आपत्तीजनक परिस्थिती प्रेमकथा उरकल्यानंतर सुरू होते. त्यामुळे चित्रपटाची सुमार मांडणी त्याच्या अतिरिक्त लांबीमुळे अधिक खटकत राहते. प्रेमकथा आणि आपत्तीची संभावना यांची ‘टायटॅनिक’वजा मांडणीही इथं नसल्यानं डिजास्टर चित्रपटातील थ्रिल तसं अनुभवण्यास मिळण्याची शक्यता नाहीच. अर्थात याला मुख्य प्रवाहातील चित्रपटांची भारतीय प्रेक्षकाला भावनिकतेचे डोस देण्याची प्रवृत्ती अधिक कारणीभूत म्हणता येईल. त्यामुळे आधी उल्लेख केल्याप्रमाणे चित्रपटाच्या प्रेमकथेवर भर देण्याच्या प्रवृत्तीप्रमाणेच याकडेही दुर्लक्ष करावं लागतं.

चित्रपटातीळ जवळपास सर्वच कलाकार स्वीकारार्ह प्रकारात मोडतात. कुणीही समोर उभ्या केलेल्या (मुळातच अप्रभावी असलेल्या) पात्रांना आपल्याला त्यांच्याप्रती सहानुभूती, राग किंवा इतरही कुठली भावना जाणवेल अशा पद्धतीनं साकारताना दिसत नाही. परिणामी प्रेमकथेचं यशस्वी/अयशस्वी ठरणं, आपत्तीत कुणी वाचणं/न वाचणं अशा कुठल्याच बाबीशी (चित्रपटाला अपेक्षित असलेलं) भावनिक नातं जुळणं शक्य होत नाही. हितेश सोनिकच्या स्कोअरचा तेवढा उल्लेख करावासा वाटतो, नसता अमित त्रिवेदीची गाणीही तशी विशेष प्रभावी नाहीतच. किंवा खरं तर ती चित्रपटाच्या टोनला जुळणारी नसल्यानं विशेष परिणामकारक नाहीत असं म्हणणं अधिक योग्य राहील.

एकूणच ‘केदारनाथ’च्या रूपात लेखिका कनिका ढिल्लन जुन्याच साच्यात डिजास्टर फिल्मच्या पार्श्वभूमीची भर घातलेली एक कथा समोर आणते, जी अभिषेक कपूरच्या स्वीकारार्ह दिग्दर्शनाच्या सहाय्यानं पडद्यावर उभी राहत असली तरी यावर्षी आलेल्या कनिकाच्या ‘मनमर्जियाँ’प्रमाणे मनात रेंगाळण्यात अयशस्वी ठरते.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......