‘केदारनाथ’ : चांगले सिनेमे देणारे अभिषेक कपूर मळलेल्या वाटेला ‘राजमार्ग’ मानतात तेव्हा वाईट वाटतं!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘केदारनाथ’चं एक पोस्टर
  • Sat , 08 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie केदारनाथ Kedarnath सुशांत सिंग राजपूत Sushant Singh Rajput सारा अली खान Sara Ali Khan अभिषेक कपूर Abhishek Kapoor

डिझास्टर मुव्हीज किंवा आपत्तीपट ही हॉलिवुडची मक्तेदारी. यात मानवाच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या आपत्तींची मालिका दाखवली जाते. त्यातून मानव कसा सहीसलामत बाहेर पडतो आणि टिकून राहतो हे दाखवलं जातं. एक कुटुंब असतं. नायकाच्या घरी कौटुंबिक समस्या चालू असतात. मग त्यांना बाजूला सारून तो धीरोदात्तपणे संकटाला सामोरा जातो. आपत्तीमधून सर्वांना बाहेर काढतो. यात नेहमी नैसर्गिक आपत्ती केंद्रस्थानी असते. तीन वर्षांपूर्वी आलेला ‘सान अँड्रीएस’ हा सिनेमा त्याचं उत्तम उदाहरण आहे. ‘केदारनाथ’ हा आपत्तीपट म्हणून त्याच्याशी नातं सांगतो.

केदारनाथमध्ये राहणारा मन्सूर खान (सुशांत सिंग राजपूत) हा पिठ्ठू आहे म्हणजे पाठीवर किंवा घोड्यावर स्त्री-वृद्ध भाविकांना घेऊन जाणारा. हिंदी, पंजाबी, भोजपुरी वगैरे भाषा लीलया बोलणारा. मंदिराच्या पायऱ्यांवर भक्तांना सोडून तिथेच त्यांची वाट बघणारा. ते मंदिरातून वापस आले की, त्यांच्यासोबत सेल्फी घेणारा. मुक्कू ऊर्फ मंदाकिनी मिश्रा (सारा अली खान) ही एका पंडिताची (नितीश भारद्वाज) सतत तोंडात शिव्या असणारी मुलगी. तिच्या क्रिकेटच्या वेडापायी घरचे चिंतीत असतात. तिचा कुल्लू नामक व्यक्तीशी साखरपुडा झालेला असतो. कुल्लूला केदारनाथमध्ये एक मोठं हॉटेल बांधून परिसराचा विकास करायचा असतो. पण हा विकास फक्त आपल्या हिंदू व्यापारांपुरता असावा अशी त्याची मनीषा असते. त्यातच मुक्कूचं लक्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मन्सूरकडे जातं. ती त्याच्याकडे आकर्षित होते.

हॉलिवुडच्या आपत्तीपटांची कथा ही थेट आपत्तीच्या आसपास सुरू होते आणि आपत्तीतून बाहेर येत संपून जाते. बॉलिवुडमध्ये मुळातच आपत्तीपट हा चित्रपट प्रकार म्हणून कधी अस्तित्वातच नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणत्या पद्धतीने कथा मांडावी याचं काही मॉडेल त्यांच्यासमोर नसल्यामुळे त्यांनी हॉलिवुडमध्ये वापरतात तसं मॉडेल वापरलं आहे. हॉलिवुड आपत्तीपटात एक संघर्ष असतो. तो कौटुंबिक असतो किंवा तत्सम काहीतरी, जो कथानकाला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत नेण्यासाठी कामाला येतो. त्यामुळे नायकाला दोन आघाड्यांवर लढावं लागतं. नैसर्गिक आपत्ती व घरगुती संघर्ष. दोन्हीतून व्यवस्थित बाहेर पडणं हे त्याचं कर्तव्य असतं.

‘केदारनाथ’ जवळजवळ याच पद्धतीचा वापर करतो. मे २०१३ मध्ये कथानकाला सुरुवात होते व जूनच्या त्या तारखेला संपते. साधारण दोनेक महिन्यांचा काळ हा कथेच्या वाढीला दिला जातो. त्यात स्थानिक लोकांच्या समस्या ते क्रिकेटचं वेड असा भाग व्यापला जातो.

तरीही ‘केदारनाथ’ कमी पडतो तो कथेच्या पातळीवर. इतकी चावूनचोथा केलेली कथा का वापरलीय याचं उत्तर दिग्दर्शक अभिषेक कपूरच देतील. सर्वांत पहिला प्रश्न म्हणजे कथेत संघर्ष असावा म्हटल्यावर तो हिंदू-मुस्लिमच असावा असा नियम आहे का? मुंबईच्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर घडणारा हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून दर्शवणारा ‘बॉम्बे’सुद्धा याच पद्धतीने घडतो. उलट कथानकाच्या मांडणीत हा त्याच्याशी साम्य दाखवतो. पटकथाकार कनिका ढिल्लननी नुकतीच ‘मनमर्ज़ियाँ’मध्ये उत्तम कामगिरी केली होती. इथेसुद्धा त्यांनी पंडिताच्या घरची, पिठ्ठूची व व्यापाऱ्यांच्या संवादात भाषिक बदल ठेवून मजा आणलीय.

वर चर्चिलेल्या मुद्द्यावर पुन्हा यायचं तर हिंदू-मुस्लिम संघर्ष सोडून भारतात दुसरे संघर्ष नाहीत का? अठरापगड जाती-धर्मांनी भरलेल्या या देशात हिंदू-मुस्लिम हाच संघर्ष सिनेमात नेहमी पेटता ठेवून दिग्दर्शक नेमकं काय साधतात हे त्यांचं त्यांनाच माहीत. वास्तवात आजही हिंदू-मुस्लिम संघर्ष आहेच, पण तो ज्या पद्धतीने सिनेमात येतो ते अविश्वसनीय व वास्तवापासून फारकत घेणारा असतो. तसेच पाच वर्षांपूर्वीच्या घटनेवर आधारित सिनेमा रचताना इतर गोष्टींचा विसर निर्मात्यांना का पडला असं वाटतं.

केदारनाथमध्ये जे झालं त्याला निसर्ग जितका कारणीभूत आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी आपला समाज कारणीभूत आहे, हे निर्विवाद सत्य घटना घडल्यानंतर समोर आलेलं आहे. निर्माता-दिग्दर्शक या वास्तवाला पडद्यावर न आणता आणि त्यातून आपल्या अनैतिक बाजूवर नेमकं बोट ठेवण्याच्या संधीला वाया घालवतात, हे जास्त क्लेशकारक आहे. विकासाच्या नावाखाली अनिर्बंध, अनधिकृत बांधकामे व धरणे यामुळे केदारनाथची दूरवस्था झाली. ही बाजू कुठेही सिनेमात येत नाही.

कुल्लू हे पात्र केदारनाथ परिसरात विकास व्हावा, तिथे येणाऱ्या यात्रेकरूंना सुविधा मिळाव्यात म्हणून एक मोठं हॉटेल बांधण्याचं ठरवतो. तर सोबतच मन्सूरसारख्या लोकांनी काय करावं हेही सांगतो. एवढ्यावरच तिथं काय कामं चालू आहेत हे दिग्दर्शक दाखवतात. पण त्यांचं सारं लक्ष हे मन्सूर-मंदाकिनीच्या प्रेमावर केंद्रित झालेलं. भारतीय प्रेक्षकांना पडद्यावरील प्रेम आवडतं म्हणून तेच कथेच्या केंद्रस्थानी ठेवायचं असं ते ठरवतात. त्यामुळे स्थानिक प्रशासन, आमदार-खासदार, मंदिर प्रशासन, दलाल, व्यापारी मंडळी वगैरे सर्वसामान्य जन बाजूला राहतात. कथा फक्त नायक-नायिकेच्या प्रेमसंबंधापुरती राहते. तिला व्यापक संघर्षाचं चित्र म्हणून उभं राहता येत नाही.

दुसऱ्या बाजूनं बघितलं तर ते योग्यच आहे. प्रेक्षक नायक-नायिकेच्या सोबत राहतो, पण मग त्याला हिंदू-मुस्लिम संघर्ष, त्यांची गाणी, लग्नातला नाच हेही बघावं लागतं. त्यामुळे एक वेळ अशी येते की, हा सिनेमा नेमका कुणाचा आहे अभिषेक कपूरचा कि यशराज फिल्म्सचा असं वाटायला लागतं. प्रेक्षकानुनय करणं कथेसाठी घातक असतं. त्यामुळे कथेच्या इतर शक्यता लोप पावून रेडीमेड डिश जशी असते, तसं ते तयार केलं जातं. हिंदू-मुस्लिम संघर्ष दाखवून अभिषेकनं खूप शक्यता वाया घालवल्या आहेत. त्यामुळे सिनेमाच्या इतर चांगल्या बाजूही यापुढे फिक्या पडायला लागतात. व्हीएफएक्स व केदारनाथ गावात येणारा प्रलय हा सध्याच्या हिंदीतल्या तांत्रिक बाबींमध्ये नक्कीच वरच्या दर्जाचा आहे. नुकताच येऊन गेलेला ‘तुंबाड’ हे अजून एक उदाहरण.

यात अमित त्रिवेदींची गाणी काय तो दिलासा आहे. ‘नमो नमो’, ‘स्वीटहार्ट’, ‘काफिराना’ व ‘जाँ निसार’ ही गाणी खास त्रिवेदींच्या शैलीतली. सुरुवातीलाच येणारं व सिनेमॅटोग्राफर तुषार कांती रेंच्या अप्रतिम सिनेमॅटोग्राफीमुळे नटलेलं लक्षात राहणारं ‘नमो नमो’ हे गाणं तर ऐकण्या-बघण्यासारखं. इतर विभागात सहाय्यक भूमिकेत नितीश भारद्वाज, सोनाली सचदेव व पूजा गोर उत्तम साथ देतात. सुशांत सिंग राजपूत सहज, नैसर्गिक अभिनय करण्याऐवजी अनावश्यकपणे भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही ठिकाणी गरज नसताना ओव्हर अॅक्टिंग केली गेली आहे. कदाचित विषयाचा आवाका बघून व भारावून जाऊन त्यांच्याकडून असं घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पिठ्ठू लोक जसे काम करतात, तसे आपणही अंगमेहनत करावी, ही त्यांची मनिषा इथं पूर्ण झालेली दिसते, पण भावूक प्रसंगात मात्र जास्तीचा अभिनय घडला आहे. त्यावर दिग्दर्शकाचं नियंत्रण असणं गरजेचं होतं.

सारा अली खानला पहिलाच सिनेमा म्हणून ही कथा मिळावी हे चांगलच झालंय. अभिनय करण्याच्या बऱ्याच जागा यात आहेत, ज्या ती अगदी प्रामाणिकपणे करते. तिच्यात अभिनय गुण आहेत असं म्हणता येतं. हे गुण आईच्या जवळ जाणारे आहेत. इथली मंदाकिनी बघून ‘बेताब’, ‘सनी’, ‘साहेब’मधली अमृता सिंग आठवली तर वावगं ठरू नये. तिनं आलिया भटच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमणा केली तर तिची कारकीर्द फुलायला वेळ लागणार नाही.

केदारनाथची घटना आर्थिक उदारीकरणामुळे विकासाच्या नावाखाली जो हैदोस घातला जातोय त्याचं प्रतीक आहे. एका बाजूला महासत्ता होण्याची स्वप्नं बघायची, तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या जीवाची कसलीही पर्वा न करता विकास करायचा अशी अवस्था सध्या सर्व राज्यातल्या सरकारांची झाली आहे. जेव्हा काही हजार भाविक मरण पावतात आणि बरेचसे बेपत्ता होतात तेव्हा आपल्याला जाग येते. मग त्यावर उपाय वगैरे सुचवले जातात. हे सर्व चीड आणणारं आहे. निदान सिनेमात तरी यावर काही बोललं जाईल असं वाटतं, पण ‘केदारनाथ’सारखे पारंपरिक मार्गाने जाणारे सिनेमे ती अपेक्षा फोल ठरवतात. ‘रॉक ऑन’ व ‘काय पो छे’सारखे चांगले सिनेमे देणारे अभिषेक कपूर मळलेल्या वाटेलाच राजमार्ग म्हणतात तेव्हा वैषम्य वाटतं. सोबत वर्तमानकालीन समाजावर ताशेरे ओढण्याची खूप मोठी संधी ते वाया घालवतात याचंही वाईट वाटतं.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख