महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सर्वार्थानं लोकनेते असलेल्या वसंतदादा पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष (१३ नोव्हेंबर १९१७ ते १३ नोव्हेंबर २०१८) फारसा गाजावाजा न होता पार पडलं, त्याबद्दल खंत वाटली. वसंतदादा पाटील यांचं स्मरण करत असताना आवर्जून नमूद करायलाच हवं की, त्यांच्यात सुसंस्कृतपणा आणि जनतेविषयी कळवळा वैपुल्यानं होता.
वसंतदादा पाटील हे एकमेव असे मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत की, ज्यांचा उल्लेख कायम ‘कमी शिकलेले’ असा प्रशासन आणि समाजातील अभिजन वर्गात केला गेला. मात्र वसंतदादा यांच्यात तुडुंब असणारा सुसंस्कृतपणा मला अन्य कोणाही मंत्र्यात आढळला नाही. शिक्षण आणि सुसंस्कृतपणा याचा काहीच संबंध नाही, असा अनुभव मला तरी एक पत्रकार म्हणून वसंतदादा यांच्या संदर्भात आला. चार वेळा मुख्यमंत्रीपदी राहूनही कोणत्याच टर्ममध्ये वसंतदादा यांना पूर्ण कालावधी काम करता आलं नाही. तसं घडलं असतं तर, कदाचित वसंतदादा पाटील यांच्या कामाची अक्षयमुद्रा महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण आणि प्रशासनावर उमटली असती याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच आघाडीचं सरकार आलं आणि वसंतदादा मुख्यमंत्री (दोन टप्प्यात - १७ एप्रिल १९७७ ते ६ मार्च १९७८ आणि ७ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८) झाले तेव्हाच जर त्यांना काँग्रेसची पूर्ण साथ मिळाली असती तर कदाचित इतिहास घडला असता. पण, तसं घडायचं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणात मशहूर झालेल्या ‘खंजीर’ प्रयोगातून वसंतदादा पाटील यांचं हे मुख्यमंत्रीपद गेलं. वसंतदादा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हाचा एक प्रसंग आठवतो. वसंतदादा तेव्हा काठीच्या आधारानं चालत असत. त्याबद्दलही तेव्हा टीका-टिप्पणी होत असे. त्यांचे सत्तेतील सहकारी आणि उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे यांना एकदा एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला की, ‘सरकार कसं चाललं आहे ?’ तर नासिकराव तिरपुडे उत्तरले होते, ‘चाललंय की काठी टेकत टेकत!’. अशी उपेक्षा कायमच वसंतदादा पाटील यांच्या वाट्याला आली.
१.
महाराष्ट्रातील अभिजनांनी वसंतदादा पाटील यांच्या कमी शिक्षणाची खूप टिंगल केली. क्वचित टरही उडवली तरी माझा वसंतदादा पाटील यांच्या संबंधातला अनुभव सुसंस्कृतपणाचा कळसच होता. १९८३च्या डिसेंबर महिन्यात नागपूरला होणार्या भारत-पाकिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याचं समालोचन मराठीतून न करण्याचा निर्णय आकाशवाणीनं घेतला असल्याची टीप मला तेव्हा ज्येष्ठ समालोचक असलेले बाळ पंडित यांनी दिली. त्यावेळी मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. अर्थातच ती बातमी मोठी होती. केवळ बातमीच दिली नाही तर एक मोठं आंदोलन उभं करण्यासाठी मी पुढाकार घेतला. त्यात नागपूर श्रमिक पत्रकार संघ, विदर्भ साहित्य संघ या संस्थाही सहभागी झाल्या. त्या आंदोलनाचं नेतृत्व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, महानुभाव संशोधन डॉ. भाऊसाहेब कोलते यांनी केलं. चित्रकार भाऊ समर्थ, विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे, साहित्यिक राम शेवाळकर, डॉ. यशवंत मनोहर, मनोहर म्हैसाळकर अशी अनेक मंडळी त्यात सहभागी झाली होती. त्या मागणीसाठी आम्ही एक मोर्चा काढायचं ठरवलं. नेमकं त्याच वेळेत विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत होतं. आम्ही मोर्चा काढत असल्याचं पोलिसांना रितसर एका पत्राद्वारे कळवलं. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही असा असा मोर्चा काढणार असल्याचं कळवलं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4598/Dene-Praneshache
.............................................................................................................................................
बाकीच्या तपशीलाचं सोडून द्या, पण आम्ही मोर्चाला सुरुवात केली न केली तोच, पोलिसांच्या दोन गाड्या आमच्यापाशी आल्या. क्षणभर मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की, हे सरकार काय साहित्यिकांना, पत्रकारांना काय अटक करणार आहेत की काय? पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. एक पोलीस अधिकारी जीपच्या खाली उतरले. त्यांनी भाऊसाहेब कोलते आणि अन्य प्रमुख मंडळींना विनंती करून जीपमध्ये आणि बाकीच्यांना मागच्या व्हॅनमध्ये बसायला सांगितलं. तुम्ही मोर्चा काढायचा नाही. तुमचा मोर्चा गाडीतूनच घेऊन येण्याचा आदेश देणारा फोन मुख्यमंत्री कार्यालयातून आला असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग पोलिसांच्या वाहनातून आम्हाला विधिमंडळाच्या परिसरात नेण्यात आलं. विधिमंडळाच्या परिसरात आम्ही मोर्चेकरी पोहोचलो तर मुख्यमंत्र्यांचे तेव्हाचे सचिव सोहनी आम्हाला घेण्यासाठी पोर्चमध्ये उभे होते. भाऊसाहेब कोलते आणि आम्हा सर्वांचं त्यांनी स्वागत केलं. आम्हाला घेऊन ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले आणि त्यांनी सभागृहात बसलेल्या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना आम्ही आल्याचा निरोप दिला. सोगा सावरत, लगबगीनं वसंतदादा पाटील तातडीनं सभागृहातून केबिनमध्ये आले. सगळ्यांना त्यांनी नमस्कार केला. भाऊसाहेब कोलते यांना तर प्रणामसदृश्य अभिवादन केलं आणि चक्क मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून ते भाऊसाहेब कोलते यांच्या शेजारच्या एका खुर्चीत बसले. मग त्यांनी सांगितलं, ‘तुम्ही निवेदन वगैरे आणलं असेल तर ते द्या; पण मी दिल्लीत नभोवाणी मंत्र्यांशी बोललेलो आहे. मराठीतील समालोचन पुन्हा सुरू केलं जाईल. आकाशवाणीवरून या सामन्याचं समालोचन मराठीतूनही करण्याच्या सूचना त्यांनी आकाशवाणीला दिलेल्या आहेत आणि नभोवाणी मंत्रालयाकडून मला त्या संदर्भात कळवण्यातही आलं आहे. पण तुमच्या समाधानासाठी म्हणून नभोवाणी मंत्र्यांशी बोलून घेतो’, असं म्हणून त्यांनी फोन उचलून- तेव्हा मोबाईल नव्हते - त्यांच्या सहायकाला नभोवाणी मंत्र्याला फोन लावायला सांगितलं. फोन लागल्यावर त्यांच्या ‘त्या’ प्रसिद्ध मराठीळलेल्या हिंदीत वसंतदादा पाटील नभोवाणी मंत्र्यांशी बोलले. मग त्यांनी आम्हाला चहा आणि अल्पोपहार दिला. आमचं काम संपलेलं असल्यामुळे मग आम्ही उठलो. भाऊसाहेब कोलते काठी टेकत टेकत आलेले होते. वसंतदादा पाटील सोबत करत भाऊसाहेब कोलते आणि आमच्या शिष्टमंडळाला सोडण्यासाठी जातीने पोर्चमध्ये पोलिसांच्या वाहनापर्यंत आले. ‘बाबांनो, हे साहित्यिक आणि पत्रकार आहेत. त्यांना नीट जिथून आणलं तिथं व्यवस्थित सोडा. तक्रारीला जागा ठेवू नका’, अशा सूचना पोलिसांना दिल्या आणि नमस्कार करून वसंतदादा पाटील पुन्हा सभागृहात जाण्यासाठी वळले. साहित्यिकांची अशी अगत्यपूर्ण दखल घेणारे आणि त्यांना सोडायला पोर्चपर्यंत येणारे एकमेव मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या रूपात चार दशकांच्या पत्रकारितेत अनुभवायला मिळाले.
मुख्यमंत्री वसंतदादांच्या संदर्भातला माझा एक अनुभव तर मोठा विलक्षणच आहे. तेव्हाही मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. एकदा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील नागपूरला येणार होते. सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही नागपूरचे अनेक प्रश्न तेव्हा रेंगाळलेले होते. त्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी मी एक अतिशय कडक असा मजकूर तयार केला आणि वृत्तपत्राच्या भाषेत ज्याला अँकर किंवा बॉटम लीड म्हणजे वृत्तपत्राच्या तळाची बातमी म्हणून मोठ्या ठळक अक्षरात प्रकाशित झाली. माझ्या दृष्टिकोनातून ती परखड आणि सत्य पत्रकारिता होती. माझ्या तारुण्याचाही त्यात जोष मिसळला गेल्यामुळे ते शब्द नको तेवढे तीव्र, कठोर झाले होते. ती भाषा वापरताना मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात मी काही असंसदीय शब्द वापरले होते. अर्थात हे दुसऱ्या दिवशी वरिष्ठांनी लक्षात आणून दिलं. दुसऱ्या दिवशी तो मजकूर प्रकाशित झाल्यावर साहजिकच खळबळ उडाली. आमचे संपादक माझ्यावर जाम नाराज झाले. आमचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक नरेश गद्रे यांच्याकडे मला ते घेऊन गेले. नरेश गद्रे यांचा मी अतिशय लाडका वार्ताहर होतो. त्यांनी माझ्याकडे अगदी आपादमस्तक बघितलं. नंतर नरेश गद्रे चिडूनच मला म्हणाले, ‘मूर्खा, आपण आपल्या वृत्तपत्राला सरकारकडून मिळणाऱ्या जाहिरातीचे दर वाढवून देण्यासंबंधी आज पत्र देणार होतो. तू तर चक्क वाट लावली आपल्या मागणीची वगैरे वगैरे. मी त्यांना ‘सॉरी’ म्हणालो आणि गप्प उभा राहिलो. थोड्या वेळानं वातावरण शांत झाल्यावर नरेश गद्रे मला म्हणाले, ‘असं कर हे पत्र द्यायला मी रात्री जेव्हा जाणार आहे तेव्हा तू माझ्यासोबत चल आणि वसंतदादांची माफी माग’. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील रामगिरी या निवासस्थानी नरेश गद्रे आणि आमच्या संपादकांसोबत ठरल्याप्रमाणं मीही गेलो.
या दैनिकाचे संस्थापक संपादक अनंत गोपाळ शेवडे होते. ते मोठे गांधीवादी म्हणून ओळखले जात असत, शिवाय इंदिराजी गांधी यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता. हे ज्ञात असल्यामुळे आम्हाला वसंतदादा बसले असलेल्या हॉलमध्ये तातडीने प्रवेश देण्यात आला. आत जातानाच नरेश गद्रे यांनी मला बजावून सांगितलं होतं की, ‘तू मुख्यमंत्र्यांच्या समोर बसायचं नाही’. रामगिरीला वसंतदादा ज्या हॉलमध्ये बसलेले होते, त्या हॉलमध्ये आम्ही प्रवेश केला. माझ्या सोबतचे सर्व वसंतदादांच्या आजूबाजूच्या सोफ्यावर स्थानापन्न झाले. वसंतदादांना नरेश गद्रे यांनी ते मागणीचे निवेदन दिलं. वसंतदादांनी त्याच्यावर लगेच दर वाढवून द्या असा आदेश लिहिला आणि स्वाक्षरी केली आणि तो कागद तेव्हा तिथे हजर असलेले माहिती खात्याचे महासंचालक ए. एम. देवस्थळे यांच्याकडे दिला. तेव्हा मुख्यमंत्र्यांना वृत्तपत्राच्या जाहिरातीचे दर वाढवून देण्याचा थेट अधिकार होता. त्याप्रमाणे त्यांनी हे आदेश दिलेले होते. मग चहा-पाणी झाल्यावर आलेले लोक उठतील या अपेक्षेत वसंतदादा होते, पण सगळे रेंगाळले होते. ‘मग आता आणखी काही?’ असं त्यांनी विचारलं.
तेव्हा वसंतदादांना नरेश गद्रे यांनी सांगितलं की, ‘हा आमचा मुख्य वार्ताहर आहे. आज तुमच्या विरुद्ध जो मजकूर लिहिलेला आहे. तो त्यानं लिहिलेला आहे आणि त्याबद्दल तो दिलगिरी व्यक्त करण्यासाठी इथे आलेला आहे.’
वसंतदादांनी माझ्याकडे बघितलं आणि ते गद्रेंना म्हणाले, ‘मी याला ओळखतो. मराठीचं आंदोलन यानंच केलेलं होतं.’ वसंतदादा पुढे मला म्हणाले, ‘अरे, मुख्यमंत्रीपदाचा एक आब असतो. तो आब तुम्ही पत्रकारांनी सांभाळला नाही तर आम रयतेला कळणार कसं? तू तरुण आहेस. अशा चुका होत असतात. यानंतर अशी चूक पुन्हा करू नको.’ मग ते गद्रेंकडे वळून पुढे म्हणाले, माफी वगैरे मागण्याचं काही कारण नाहीय. होतं असं कधी. रक्त उसळलेलं असतं, उसळलेल्या रक्तानं काही वेडेवाकडं लिहिलं तर ते फार गंभीरपणे घ्यायचं नसतं. निघा तुम्ही.’
ज्या व्यक्तीविषयी आपण टोकाची भूमिका घेऊन लिहिलेलं आहे, एवढ्या मोठ्या पदावर असूनही आपल्या संस्थेच्या हिताचा निर्णय घेताना झालेल्या टीकेची कोणतीही दखल घेत नाही, हा जो वसंतदादा यांचा सुसंस्कृत समंजसपणा अनुभवायला मिळाला त्यामुळे मी स्तंभितच झालो.
वसंतदादांचं शिक्षण, त्यांचं रांगडं वागणं, त्यांचं जनतेत मिसळणं हे सगळं त्या काळामध्ये उपहासाचा विषय झालेलं होतं. पण मला मात्र वसंतदादांमधला सुसंस्कृतपणा खूपच भावला.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4662/The-Power-of-your-subconcious-mind
.............................................................................................................................................
२.
भरजरी कपड्यात किंवा सूटाबुटात मी तरी वसंतदादा पाटील यांना कधीच पहिलं नाही. जाकीट घातलेले वसंतदादा मात्र काही वेळा पाहिल्याचं आठवतं. मंत्रीपदी असो की मुख्यमंत्रीपदी, वसंतदादा पाटील यांच्या कामाची शैली विलक्षण होती. त्यांची प्रशासनावर मजबूत अशी पकड होती. कोणतं तरी थातुरमातुर कारण सांगून काम टाळलं जातंय हे त्यांच्या पटकन लक्षात येत असे आणि त्याबद्दल अधिकार्यांना ते जाब विचारत. त्यामुळे अधिकारी त्यांना टरकूनच असत. वसंतदादा साधारणपणे ‘जनता’ किंवा ‘लोक’ असं म्हणत नसत. ते ‘रयत’ असा शब्दप्रयोग करत. रयतेच्या एखाद्या प्रश्नावर जर त्यांना निर्णय घ्यायचा असेल आणि तो निर्णय घेण्यामध्ये जर कुठल्या नियमाचा अडथळा नोकरशाहीनं उपस्थित केला तर वसंतदादा पाटील त्या अधिकार्याकडे न बघता फाईल त्याच्याकडे सरकवत असत आणि किंचित जरबेच्या आवाजात सांगत, ‘हे रयतेच्या हिताचं काम आहे. सरकार रयतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आहे. नियम आणि कायदा रयतेच्या हिताच्या आड आले नाही पाह्यजे. घेऊन जा ही फाईल आणि हे काम नियमात बसवून आणा. करून आणा काम लवकर, तोपर्यंत मी इथंच थांबतो’, असं स्पष्ट सांगत असल्यामुळे अधिकाऱ्यांना कामं पटापट करावी लागत आणि वसंतदादा कार्यालय सोडण्याच्या आत त्या मागणी करणाऱ्या कामाचे आदेश जारी होत असत.
वसंतदादा पाटील हे खर्या अर्थानं रयतेचे नेते होते, पण त्यांना सत्तेत मोकळेपणानं काम करता आलं नाही आणि याला कारण आपल्या राजकारणाचा बेछूट बाज करणीभूत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या गोटातला खास नेता असं समजून काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वानं कायमच वसंतदादा यांना सत्तेच्या दालनात म्हणा की पक्षाच्या प्रांगणात म्हणा मुक्त विहार करू दिला नाही. सतत त्यांचे पंख कापण्याचाच प्रयत्न केला. लढवय्या स्वातंत्र्यसैनिक, जनतेची नस ओळखणारा नेता, सहकाराची आच आणि त्या क्षेत्रात यशस्वी प्रयोग राबवतानाचा भविष्याचा अचूक वेध घेत शिक्षणाच्या खाजगीकरणासारखा दूरगामी निर्णय घेण्याची भविष्यवेधी नजर असणारा शासक अशी वसंतदादा यांची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील, मात्र त्यांच्या कामाचं यथायोग्य मूल्यमापन महाराष्ट्रानंही केलं नाही, हेही तेवढंच खरं. सांगलीपुरतं मर्यादित करून पक्ष, सरकार आणि राजकीय विश्लेषकांनीही वसंतदादा पाटील या लोकनेत्याची उपेक्षाच केली.
मात्र कॉटनचा किंवा खादीचा सदरा किंवा कुडता, फार क्वचित झुळझुळीत सदरा, अनेकदा स्टार्च केलेलं तर कधी न केलेलं धोतर, धोतराचा सोगा एका हातावर टाकलेला, पायात वहाणा घातलेले; मागे वळवलेले पण काहीसे उडत असणारे डोईवरचे केस, गव्हाळ वर्णाचा उजळ चेहरा आणि जाड-मोठ्या फ्रेमच्या चष्म्याआडच्या डोळ्यातून वात्सल्य ओसंडणारे डोळे... ही वसंतदादांची प्रतिमा माझ्या कायम स्मरणात आहे.
(हा ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या ‘राजकारणापलीकडचे राजकारणी’ या लेखाचा संपादित आणि सुधारित मजकूर आहे.)
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment