अजूनकाही
माणसामाणसातल्या संवादातला मोकळेपणा हरवत चालला आहे.
कोणा स्वयंसेवी संघटनेच्या पाहणीचा हा निष्कर्ष नाही. हा आमचा-तुमचा-सर्वांचा रोजचा अनुभव आहे.
चांगल्या आणि दर्जेदार संवादासाठी मुळात वातावरणात एक प्रकारचा मोकळेपणा असावा लागतो. दिवसेंदिवस तो कमी कमी होत चालला आहे. परिणामी, संवादातलं मोकळेपण हरवत चाललं आहे. निदान या संवादात तरी असा मोकळेपणा राखता येतो का तो पाहू या. मंचावरून भाषण देणारा वक्ता मी अमुक विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे म्हणतो आणि नंतर तास-दीड तास स्वत:चेच विचार आपल्याला सुनावत असतो. मंचावरून केल्या जाणाऱ्या भाषणात संवादच नाही, तिथं मोकळेपणा कुठला!
असो. मुद्दा मोकळेपणाचा आहे आणि व्यक्ती-व्यक्तीमधल्या संवादातून तो लोप पावतो आहे, याकडे लक्ष वेधण्याचा आहे. वैचारिकदृष्टया विरोधी असलेल्या दोन समूहांमधल्या संभाषणात मोकळेपणाची तशी अपेक्षा नसते. जिथं वाद आणि प्रतिवाद एवढंच चालतं तिथं संवादाचा प्रश्न येत नाही. खरा प्रश्न आहे, तो समविचारी माणसांच्या अनौपचारिक गप्पांमध्येही आढळून येणाऱ्या मोकळेपणाच्या अभावाचा. त्यांच्यापैकी कोणीच मोकळेपणानं स्वतःच्या चुका, स्वतःचे वैचारिक पराभव, भावनिक दुर्बलतेनं झालेली कोंडी मान्य करण्याचा खिलाडूपणा दाखवत नाहीत. तात्त्विक चर्चेतला आडमुठेपणा बाजूला ठेवू या; पण रोजच्या आयुष्यातल्या साध्यासुध्या गोष्टी, उदाहरणार्थ वैवाहिक, प्रापंचिक जीवनातल्या अडचणींचा, मानसिक दौर्बल्याचा किंवा मानसिक गंडाचा, तसंच शारीरिक समस्यांचा तपशील इतरांसमोर मांडायला कोणीच तयार नसतं. वरकरणी किरकोळ, पण महत्त्वाची सुख-दु:खं कोणी मोकळेपणानं मांडताना आढळत नाही. तथाकथित जीवश्चकंठश्च मित्रमंडळींच्या मैफिलीतदेखील अवघड जागची दुखणी, म्हणजे शारीरिक, बौद्धिक, कौटुंबिक क्षेत्रांमधल्या गुंतागुंतीच्या समस्या इतरांपाशी कोणी मोकळेपणानं उघड करताना दिसत नाही.
मोकळेपणानं बोललेल्या प्रत्येक गोष्टीला मूल्यात्मक दर्जा असेलच असं नाही. त्याची आवश्यकताच नाही. ‘मनमोकळं बोलणं’ हेच एक स्वतंत्र मूल्य आहे. मोकळ्या निवेदनात विपुल प्रामाणिकपणा आणि आपलेपणा भरलेला असतो. लेखकलोक काही प्रमाणात मोकळ्या मनानं काही अनुभव आणि विचार वाचकांसमोर मांडताना दिसतात. आत्मचरित्रपर लेखनात सत्यकथन करण्याची आणि स्वतःच्या आयुष्यातल्या घटना मोकळेपणानं वाचकांसमोर मांडायची भूमिका असते; पण आत्मचरित्रकाराचं आयुष्य अनेक जणांच्या साक्षीनं घडलेलं असतं. लेखक सत्याचा विपर्यास करत असल्याचे किंवा घटना अतिरंजितपणे मांडत असल्याचे आक्षेप या साक्षीदारांकडून पुढं येत राहतात. लेखकानं प्रांजळपणाचा केवळ आव आणून प्रत्यक्षात बरंच काही दडवलं असल्याचे आरोप होऊ लागतात. अलीकडच्या लेखिकांच्या कादंबऱ्या वाचल्या की लेखकांच्या तुलनेत लेखिका अधिक मोकळेपणानं बोलू-लिहू लागल्या असल्याचं जाणवतं. आत्मचरित्रवजा कादंबऱ्यांमधून थेटपणे आणि कथा-कादंबऱ्यांमधून पात्रांच्या आडून स्त्रिया मोकळेपणानं स्वत:चे विचार मांडायला लागल्या आहेत. तुलनेनं या क्षेत्रातलं पुरुषांचं थिटेपण बोचत राहतं. मोजके अपवाद वगळले, तर पुरुषी लेखन ओठ आवळून चाचरत बोलल्यासारखं वाटतं. अर्वाच्च, असंस्कृत शब्दांचा वारेमाप वापर, शारीरिक अवयवांची, कामक्रीडेची तपशीलवार वर्णनं म्हणजे मनमोकळं बोलणं अशा खुळ्या समजुतीत पुरुषांचं लिखाण आज अडकून पडलेलं आहे.
स्वतःच्या खाजगी अवकाशावर आक्रमण होण्याच्या भयापोटी मध्यमवर्गाला बोलण्या-वागण्यातला मोकळेपणा धोकादायक वाटतो. वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय प्रश्नांवरची स्वतःची वैयक्तिक मतं हा वर्ग चारचौघांमध्ये सहसा व्यक्त करत नाही. ‘शेजाऱ्यांवर प्रेम करा’, असं प्रत्येक धर्मात सांगितलेलं असलं, तरी मोठ्या शहरांमध्ये शेजार-शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीशी त्याचा मनमोकळा प्रेमसंवाद सोडा, परिचयही नसतो. ‘शेजाऱ्यापाजाऱ्यांशी किंवा बाहेरचा मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहप्रवासी नागरिक यांच्याशी संवाद साधताना काय धोरण ठेवावं? कितपत मोकळं असावं? कुणाशी कितपत मोकळं वागावं? मनात उमटणारं सगळं जसंच्या तसं सर्वांसमोर मांडत राहावं की, मनातल्या मनात त्यासाठी एक सेन्सॉर बोर्ड स्थापन करावं?’ मध्यम आर्थिक स्तरातल्या असुरक्षिततेनं ग्रासलेल्या समाजाला हे प्रश्न भंडावून सोडत असतात.
‘संवाद’ ही द्विमार्गी प्रक्रिया असते. समोरच्या व्यक्तीची किंवा समूहाची मानसिकता, सोशिकपणा जोखून संवादोत्सुक माणसाला मोकळं बोलण्याची स्वतःची हौस भागवावी लागते. महत्त्वाचा आणि नेहमी दुर्लक्षिला जाणारा दुसरा मुद्दा म्हणजे संवादात समोरच्या माणसाच्या मोकळ्या बोलण्याला अवकाश आणि उत्तेजन देणं हे मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या व्यक्तीच्या कर्तव्याचा एक भाग असतो. स्वत:चं निवेदन मोकळं असून भागत नाही; संवाद मोकळा असावा लागतो.
लहान वयात मुलं एकमेकांशी ज्या मोकळेपणानं बोलतात-खेळतात, त्यात कमालीची सहजता असते. जसजसं वय वाढत जातं, तसतशी ही सहजता नष्ट होते आणि मोकळेपणाला ओहोटी लागते. काळाच्या ओघात व्यक्तीला स्वत:च्या खऱ्या-खोट्या गुणांविषयी, बुद्धीविषयी अभिमान वाटायला सुरुवात होते. याचंच कालांतरानं अहंगंडात रूपांतर होत असावं. मनमोकळ्या संवादाच्या आड येणारा एक घटक म्हणून याकडे पाहता येईल. शहरी सुशिक्षित माणसांपेक्षा ग्रामीण अशिक्षित माणसं अधिक मोकळीढाकळी असतात. एका परदेशी पाहणीनुसार, विद्वान माणसं सामान्य माणसांच्या तुलनेनं कमी संवादोत्सुक असतात; कमी मनमोकळी असतात. समाजात सामंजस्याची भावना वाढण्यासाठी, वैचारिक देवाणघेवणीतून साधल्या जाणाऱ्या बौद्धिक समृद्धीसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये आणि वर्गांमध्ये मोकळेपणानं साधला जाणारा संवाद आवश्यक आहे. समोरच्या व्यक्तीविषयी अति आदरभावना असेल, तर मोकळेपणानं बोलणं-वागणं कठीणच जातं. आर्थिक स्थितीतली तफावतही मोकळ्या संवादाच्या आड येते. मालक कितीही दिलदार, उदारमतवादी असो, गाडीचा ड्रायव्हर मालकाशी मोकळेपणानं बोलू-वागू शकत नाही.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधल्या मोकळ्या नातेसंबंधाला मात्र आता ओहोटी लागली आहे. डॉक्टर आणि पेशंट यांच्यातल्या मोकळ्या नात्याची जागा आता शत्रुत्वानं घेतली आहे. जिथं प्रियकर-प्रेयसी नात्यातलं मोकळेपण संपुष्टात येत चाललं आहे आणि त्याची जागा व्यावहारिक रोखठोकपणा, हिशेबी वृत्ती घेते आहे तिथं इतर नात्यांमधल्या मोकळीकीबद्दल काय बोलावं! कलाक्षेत्रातलं आजचं चित्र याहून शोचनीय आहे. व्यावहारिक हितसंबंधांचा विचार करून कृत्रिम मैत्र्या केल्या जातात. राजकीय क्षेत्रातल्या दांभिकतेनं तर टोक गाठलं आहे. संसदेत एकमेकांशी तावातावानं भांडणारे नेते संसदेच्या सभागृहाबाहेर एकमेकांच्या हातावर टाळ्या देत हास्यविनोद करताना दिसतात! एखाद्याला आपल्या देशातल्या निकोप लोकशाहीचं कौतुक वाटावं, असं हे द्दश्य. मात्र वास्तवात, सभागृहातली तात्त्विक भांडणं जेवढी खोटी असतात, तेवढंच या हास्यविनोदातून आपल्यासमोर येणाऱ्या त्यांच्या दिलखुलासपणाचं आणि खिलाडूपणाचं चित्रही खोटं असतं.
आजच्या काळात मोकळे विचार घेऊन मनमोकळेपणानं बागडणारे संवादप्रेमी लोक पाहायचे असतील, तर संगणकावर जावं लागेल. आजच्या तरुण पिढीनं ब्लॉग, च्यॅट आणि फेसबुक यांच्यावर निर्माण केलेला उत्स्फूर्त कल्लोळ अनुभवावा लागेल. सायबर जगताबाहेरचं चित्र निराशाजनक आहे. अलीकडे मन मोकळं करून कुणाशी बोलावं अशा व्यक्ती भेटेनाशा झाल्या आहेत, ही प्रत्येक संवेदनशील व्यक्तीची तक्रार आहे. मोकळेपणानं बोलण्याची नुसती तीव्र इच्छा असून चालत नाही, तर आपला मोकळेपणा मानवणारा, सोसणारा आणि आवडणारा श्रोता भेटावा लागतो. मोकळेपणा स्वीकारण्याची, त्याचं स्वागत करण्याची क्षमता देशातल्या सामाजिक, राजकीय वातावरणात असावी लागते. आहे का तशी व्यवस्था आपल्या देशात?
लेखक पत्रकार आहेत.
awdhooot@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Kumar Thoke
Fri , 16 December 2016
संपूर्ण लेखात मनमोकळेपणे बोललात हे विशेष...
jagdish kabre
Tue , 13 December 2016
योग्य आणि मार्मिक शब्दात आजच्या सुशिक्षित वर्गाचं विश्लेषण केलं आहे. "चळवळ, आंदोलन, मोर्चा, निषेध यात सामान्य लोकांनी का सहभागी व्हाव" यावर बोलतांना नाझींविरुद्ध लढणाऱ्या एका कवीच गीत... कवी म्हणतो ते (नाझी) जेव्हा यहुदींना (ज्यू लोकांना ) मारायला आले मी तेव्हा काहीच बोललो नाही. कारण मी यहुदी नव्हतो... ते (नाझी) जेव्हा कामगारांना आणि ट्रेड युनियन कार्यकर्त्यांना मारायला आले, मी तेव्हाही काहीच बोललो नाही. कारण मी कामगार किंवा ट्रेड युनियन कार्यकर्ता नव्हतो... ते (नाझी) जेव्हा कम्युनिस्टांना मारायला आले. मी तेव्हाही काहीच बोललो नाही. कारण मी कम्युनिस्ट नव्हतो... मग ते जेव्हा मला मारायला आले तेव्हा माझ्यासाठी बोलणार कोणीही नव्हतं...
Bhagyashree Bhagwat
Mon , 12 December 2016
लेख नक्कीच अंतर्मुख करतो आणि मध्यमवर्गीय काहीशा दांभिक सभ्यतेकडेही बघायला लावतो.