ब्राह्मण परिषद : वृत्तवाहिनीची घिसाडघाई, उघडा डोळे, बघा नीट!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • ब्राह्मण परिषदेचं पोस्टर
  • Wed , 05 December 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar ब्राह्मण परिषद Braman Parishad एबीपी माझा ABP Majha

मराठा आरक्षणाचं विधेयक दोन्ही सभागृहात विनाचर्चेनं पारित झालं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबरला ‘जल्लोष’ करण्याचा शब्द पाळला. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं १६ टक्के आरक्षणाचा अध्यादेशही निघाला. त्याला कुणी न्यायालयात आव्हान दिलंच तर न्यायालयानं एकतर्फी स्थगिती न देता शासनाचं म्हणणं ऐकून घ्यावं, यासाठी ‘कॅव्हेट’ दाखल करून सरकारनं आपल्या बाजूनं तटबंदी मजबूत केली. शिवाय हे आरक्षण तत्काळ लागू करून आता होणाऱ्या व पूर्वी स्थगिती दिलेल्या नोकरभरतीतही ते लागू करण्यात येणार आहे.

एवढं करूनही एक याचिका न्यायालयात दाखल केली गेलीच. न्यायालयानं ती दाखलही करून घेतलीय. त्याचं पुढे काय होतं हे कळेलच.

हे सर्व करून मुख्यमंत्री फडणवीस हुश्श करतात न करतात तेवढ्यात धनगरांची आंदोलनं सुरू झाली. त्यांना भाजपनं ऐन निवडणुकीत आश्वासन देऊन महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीत सामील करून घेतलं. राज्यात महायुती सत्तेत येऊन आता शेवटचं वर्ष शिल्लक आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा तिढा केंद्राच्या अखत्यारित येतो. तिथंही पूर्ण बहुमतातलं रालोआ पुरस्कृत मोदी सरकार आहे. त्या सरकारचे तर आता शेवटचे दोन-अडीच महिने राहिलेत. पण तिथंही काही घडलं नाही. नाही म्हणायला महादेव जानकर मंत्री झाले, एवढीच जमेची बाजू.

धनगरांपाठोपाठ लिंगायतही रस्त्यावर उतरलेत. याशिवाय मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न अनुत्तरित आहेच.

या पार्श्वभूमीवर गुजरातमधून ब्राह्मण आरक्षणाची मागणी पुढे आली आणि प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे महराष्ट्रातही या मागणीसाठी ब्रह्मवृंद सरसावले.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

ब्राह्मणातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण द्यावं या मताला, ‘मंडल’राजा व्ही. पी. सिंगही आले होते. रामदास आठवलेसुद्धा ही मागणी करतात. त्यांच्या पक्षात स्वतंत्र ब्राह्मण सेल (विभाग) आहे. पण या सर्वांपेक्षा घाई झाली एका मराठी वृत्तवाहिनीला! आणि तिनं चक्क दोन तासांची ‘ब्राह्मण परिषद’च भरवली वाहिनीवर.

या ब्राह्मण परिषदेचे प्रोमो सुरू झाले, तेच मुळी एका जानवेधारी, शेंडीधारी ब्राह्मणाच्या प्रतिमेनं. त्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणे पौराहित्य हाच ज्यांचा उपजीविकेचा व समाजमान्यतेचा मार्ग आहे, तो ‘ब्राह्मण’ असं कुठेतरी विशद झालं.

दोन तासांची ही चर्चा आता चार भागांत यूट्युबवर उपलब्ध आहे. यात अनेक मान्यवर ब्राह्मणांनी भाग घेतला. मतं मांडली, दु:ख मांडलं, व्यथा मांडल्या; तशीच चीड व संतापही व्यक्त केला.

चर्चेच्या शीर्षकात पौराहित्य करणारा ब्राह्मण दाखवला असला तरी प्रत्यक्षात भिक्षुकी करणाऱ्यांचा एकच प्रतिनिधी होता. याशिवाय एक ब्राह्मण शेतकरी, एक ब्राह्मण व्यावसायिक, एक स्त्री व्यावसायिकही होती. आणखी एक-दोघे छोटे उद्याजेक, एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि ‘सुमंगल दिनदर्शिका’कार, तसेच मूळचे पत्रकार पण आता हिंदी मालिकेतील खलनायिकांसारखे नागीण कंकू लावून फिरणारे भाष्यकार, सध्या अनेक चर्चांत दिसणारे व काही वेळा ब्राह्मण महासंघाचे तर प्रसंगी शिवसेनेचे असे एक नेते, चित्पावन संघटनेचे प्रतिनिधी असे सर्व होते. चर्चेचं सूत्रसंचालन एक तरुण निवेदिका करत होती. ती ब्राह्मण होती की नाही माहीत नाही, पण चर्चेदरम्यान सर्वजण तिला ‘आपले’ लोक, ‘आपलं’ काय चुकतं, ‘आपण’ कसं हे करत नाही, ‘आपल्या’ला आता हे करायला हवं, असं ‘आपले’पणानं संबोधत होते आणि तीही हे ‘आपले’च प्रश्न आहेत, या हिरिरीनं चर्चा पुढे नेत होती.

चर्चेत भाग घेतलल्या मान्यवरांपेक्षा निवेदिका वयानं लहान असल्यामुळे म्हणा किंवा प्रस्तुत विषयाचा आवाका समजला नसल्यामुळे म्हणा, ती वारंवार ब्राह्मण म्हणजे भट, ब्राह्मण म्हणजे नथुराम गोडसे, ब्राह्मण म्हणजे भिडे गुरुजी अशा झापडबंद पद्धतीनं आज ब्राह्मणांकडे पाहिलं जातं असं सांगत होती.

या तीन मुद्द्यांपैकी दोन मुद्दे स्वातंत्र्योत्तर काळातले. एक १९४८ सालचा तर एक २०१८चा. ‘भट’ असं म्हणणं किंवा हिणवणं हा बोलीभाषेतला गावखेड्यातून आलेला शब्द आहे. ही अशी उपनामं किंवा थेट जातीवरून महाराचा, मांगाचा, चांभाराचा, मराठ्याचा, माळ्याचा, असं सर्वचं जातींना संबोधलं जातं आजही. त्यामुळे ब्राह्मणांना ‘भट’ म्हटल्यानं फारच अवहेलना होते, असं म्हणणं म्हणजे गुलाबाचे काटे टोचतात म्हणण्यासारखं. कारण बामनाच्या किंवा भटाच्या या संबोधनातून प्रतवारी होत नाही. पण महार, मांग, चांभार, न्हावी या जातींची नावं एखाद्याला कमी प्रतीचा ठरवण्यासाठी वापरतात. उदा. ‘महारासारखा ढोल वाजवतो’, ‘महार-मांग आहेस का नाचगाणं करायला?’, ‘माणूस आहेस का हजाम?’ (न्हावी जातीचा उल्लेख विनाकारण व किती सहज लोक करतात हे अत्यंत खिलाडू वृत्तीनं राम नगरकरांनी त्यांच्या रामनगरी या आत्मचरित्रात सांगितलंय. ते या परिषदेच्या चर्चक व निवेदिकेनं आवर्जून वाचावं.)

चर्चा हिरिरीनं करणाऱ्या आणि ब्राह्मण समाज कसा हिणवला, नागवला जातोय, कसा तो अल्पसंख्य होत चाललाय, कशी बेरोजगारी आहे, कशी गुणवत्ता असून त्याला प्रवेश मिळत नाही, असं मांडणाऱ्या निवेदिकेनं थोडा अभ्यास केला असता तर ब्राह्मणांच्या आजच्या स्थितीमागची खरी कारणं कळली असती. उघडा डोळे, बघा नीट हे कधीतरी आपणही करायचं असतं!

या घाईगडबडीत योजलेल्या ब्राह्मण परिषदेतील निवेदिकेसह चर्चा करणाऱ्यांना इतिहास, समाजशास्त्र, राजकारण, धर्मशास्त्र यांच्या प्राथमिक अभ्यासाचा लवलेशही नव्हता किंवा त्यांनी तो झाकून केवळ ‘रुदाली’ची भूमिका वठवण्याचाच निर्धार केला असावा. जातीव्यवस्था वगळून ब्राह्मण अथवा ब्राह्मण्याची चर्चा करणं म्हणजे अंड्याशिवाय कोंबडीची उत्पत्ती धरून तिची पिसं काढणं!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

हिंदू धर्म किंवा जीवनपद्धती (त्या तपशीलात शिरायची ही जागा नव्हे) ही वर्णाश्रमावर आधारलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे ते चार वर्ण. त्यातच पुढे जाती, उपजाती निर्माण झाल्या. जातीव्यवस्था नीट समजून घ्यायची असेल तर जळमटं काढून फुले-आंबेडकर वाचावे लागतील. या चार वर्णांत ‘वर्णश्रेष्ठत्व’ हे ब्राह्मणांनी स्वत:कडे ठेवून इतर वर्णांसाठी गुणकर्म वाटून दिलं. त्यानुसार कार्य अथवा कर्म न केल्यास काय शिक्षा हेही ब्राह्मणांनीच ठरवलं. पण त्यातून त्यांनी स्वत:ला बाहेर ठेवलं. आणि सांगितलं, ‘कितीही झाला भ्रष्ट, तरीही ब्राह्मण तिन्ही लोकी श्रेष्ठ!’ 

थोडक्यात संपूर्ण समाजाची चाल, चरित्र, नियमन ब्राह्मण करत होते. क्षत्रिय राजधर्म तर वैश्य व्यापारधर्म पाळत, पण या सर्वांवर धर्मसत्तेतून ब्राह्मणांचा अंकुश होता. यातूनच पुढे जगात कुठेही नसलेली ‘अस्पृश्यता’ जन्माला घातली गेली. नुसतं ‘भट’ म्हटल्यानं अवमानित होणाऱ्यांनी एक दिवस ‘बिग बॉस’च्या घरातील खेळाप्रमाणे ‘अस्पृश्यता’ पाळून पाहावी. मानवी जीवनाला ‘कलंक’ अशी व्यवस्था ब्राह्मणांनी या देशात राबवली होती, हे ब्राह्मण परिषद चालवणाऱ्या वाहिनीला माहीत नाही? का तुम्हाला फक्त हिटलरचे गॅस चेंबर्स आणि सगळे मुसलमान सुलतान तेवढे आठवतात? प्रसारमाध्यमांचं भान सुटून ते कसे अत्यंत उथळ आणि विसंगत, परस्परविरोधी विधानांनी उन्मादी चर्चा दोन तास रेटू शकतात, याचं सप्रमाण वाईट उदाहरण म्हणजे ही ब्राह्मण परिषद!

काय आक्षेप, व्यथा, वेदना होत्या या ब्राह्मणांच्या? तर पौराहित्य करणाऱ्या बाह्मण मुलांना लग्नात अडचणी येतात. आता पूर्ण लग्नसंस्था गोत्र, नक्षत्रं, गुण, अवगुण, मुहूर्त सर्व तुम्हीच ठरवता आणि तुम्हाला लग्नात अडचणी? बरं हाच प्रश्न आज शेतकरी मुलांसमोर आहे, तसाच मागास जातीतील मुलामुलींत व मुस्लीम, ख्रिश्चन धर्मातही आहे. पण जाती-धर्माच्या, पंथाच्या अवैज्ञानिक, अशास्त्रीय, प्रसंगी अमानवी प्रथा मोडायच्या नाहीत, परंपरा सोडायच्या नाहीत, आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न न करता ‘लवजिहाद’ म्हणून माणसं मारायची मग काय होणार?

ब्राह्मण शेतकरी चर्चेत म्हणाला, कुळवाड्यांनी जमिनी घेतल्या वगैरे. कूळकायदा सर्वच शेतकऱ्यांना लागू झाला. फक्त ब्राह्मण शेतकऱ्यांना नाही. हे ब्राह्मण शेतकरी शेतीच्या प्रश्नावर जी आंदोलनं झाली, त्यात सहभागी होते? शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी ब्राह्मण होते. बामणाला शेतीतलं काय कळतं म्हणून त्यांनी स्वत: शेती खरेदी करून शेती केली. महाराष्ट्र आजही त्यांना अभ्यासू, क्रांतिकारी शेतकरी नेता म्हणून ओळखतो. त्यांच्या बिनीच्या शिलेदारांत किती ब्राह्मण शेतकरी होते?

चर्चेत आणखी एक मुद्दा आला, आता गावखेड्यात ब्राह्मणांचा उंबरा कमी झाला. शहरात स्थलांतरित झालेल्या ब्राह्मणांना इतर आरक्षणांमुळे संधी कमी झाल्या. गांधीहत्येनंतर ब्राह्मणांची जी हानी झाली, त्याबद्दल कुठलीही भरपाई दिली नाही.

पण याच चर्चेत एक जण म्हणाले, आपण कायम सत्ताधाऱ्यांना धरून राहिलो. बरोबर! यामुळेच पेशवाई बुडावल्यानंतर शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवणारा ब्राह्मणच होता. आजही प्रशासनात ब्राह्मणांचा टक्का जास्त. तो असणारच, कारण शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरुषांनाच होता! ब्राह्मणांच्या पाच-सात पिढ्यानंतर इतर वर्णांची पहिली पिढी शिकली. संविधान नसतं तर हा बॅकलॉगही भरला गेला नसता.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

आश्चर्य याचं वाटत होतं, हिरिरीनं, अहमहमिकेनं अगदी अल्पसंख्य ब्राह्मणांना अॅट्रोसिटीसारखा कायदा संरक्षण का मिळू नये, अशी मांडणी करणाऱ्या निवेदिकेला असा प्रश्न विचारावासा वाटला नाही, की ब्राह्मण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार का नव्हता? सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह व केशवपन या घृणास्पद परंपरा या कायद्यानं का बदलाव्या लागल्या?

गंमत म्हणजे या चर्चेत एक वक्ते म्हणाले, ‘आपण जन्मजात बुद्धिवान कारण आपल्याला सरस्वतीचे आशीर्वाद’, तर दुसरे म्हणाले, ‘वुई आर बॉर्न इंटेलेक्चुअल्स!’ यावर निवेदिका सहमत होत होती, पण या बॉर्न इंटेलेक्चुअल्स आणि सरस्वतीपुत्रांना हे माहीत नाही का, की त्यांच्या आई, बहिणी, आज्या यांना शिक्षणाचा अधिकार सरस्वती, गणपती यांनी नाही तर सावित्रीबाई फुलेंनी दिला? एवढा कृतघ्नपणा?

निवेदिका आज त्या जागेवर फुले दाम्पत्यांमुळे आहे हे समजायला गुगल किंवा विकिपीडियावर जायला नको. संपत्तीत हिंदू स्त्रीला विवाहोत्तर वाटा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाची भेट. पण सावरकर, चाफेकर, फडके यांचाच गुणगौरव गाणाऱ्यांच्या घरात फुले-आंबेडकर सोडाच कर्वे, आगरकर, गोखले, गांधी, महर्षि शिंदे, न्या. रानडेही नीटसे सांगितले जात नाहीत. अंदमानच्या सेल्यूलर जेलच्या कहाण्यांनी डोळे पाणावऱ्यांनी एकदा महाड, काळाराम सत्याग्रह आणि नामांतरचा लढा नुस्ता वाचून काढावा.

याच चर्चेत एक चर्चक म्हणाले, ते पूर्वी तुम्ही असं केलंत वगैरे ते आता विसरा. तो काळ गेला. बदललो आपण. छान. गुड. मग त्या बाबरानं बांधली मशिद. त्याला किती काळ झाला? मग तेही विसरा. त्यानंतरही बदललं ना सगळं, मग आता मंदिरचा वाद कशाला? ब्रह्मवृंदहो, टाळी एका हातानं वाजत नाही. तुम्ही इतिहास उकरलात तर मग काही मढी तुमचीही वर येणार!

स्वातंत्र्योत्तर भारतात जे ब्रेनड्रेन झालं, त्यात ब्राह्मणांचं प्रमाण किती? ग्रीन कार्ड होल्डरमध्ये किती? मग सरकारी पैशांवर शिकून परदेशात स्थायिक होणारे देशप्रेमी की द्रेशद्रोही?

शेवटी आरक्षण नाही, तर आर्थिक मदत द्या. आणि आता वाटलं तर आरक्षणही आपण घ्यावं, असा जवळपास ठरावच या परिषदेत झाला!

यूट्युबवर ही चर्चा अवश्य पहा. वर्णवर्चस्ववादी मानसिकतेचा ताठा, लग्न जमत नाही, दक्षिणा कमी मिळते अशा व्यथा आणि आपणच कसं आपलं संचित सांभाळत नाही वगैरे मुक्ताफळं ऐकण्यासारखी आहेत. ज्या धर्मात आजही स्त्रीला पाळी आली की, बाहेर बसवतात, त्या ब्राह्मणांचं समर्थन एका स्त्रीनं ‘आपली’च होऊन करावं यासारखा करंटेपणा व कृतघ्नपणा नाही!

शेपटीवाल्या प्राण्यांनी सभा भरवून शेपूट गळून जायची भीती व्यक्त केलेली आपण ऐकलीय. इथं शेपटीची जागा शेंडीनं घेतली इतकंच.

...............................................................................................................................................................

या परिषदेचे यू-ट्युबवरील चार भाग पाहण्यासाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Parag Patil

Sun , 09 December 2018

असो, आत्ता पुढचे ऐका: आपले मुद्दे : 1. ब्राम्हण परिषदेत फक्त ब्राम्हण असतात : बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण याला तुम्ही सरळ सरळ बोला ना! तिथे मुसलमान असतील का? हा शहाणपणा दाखवून सिद्ध काय करायचं? हिंदू आणि मुसलमान या विवादातातून स्वतः बाहेर या भटजी, कारण बहुजन समाज कधीच या बाहेर आलेला आहे. असो. ब्राम्हण परिषद नावाचा कार्यक्रम होता तो, ती काही खरोखर परिषद नाही. ते एक न्युज चॅनेल आहे. तिथे एखादा प्रश्न प्रश्न नसून मुद्दा असतो. तो समजायला सर्व तबक्यातील लोक असावेत असा मुद्दा लेखकाने मांडला. तो त्यांचा विचार आहे. याच्यात, अगदी त्यांना बुद्धीच नाही या सुरात आपले सूर लागले लगेच! अहो भटजी, त्यांचा विचार समजून घेणे हे प्रथम आणि टीका नंतर करा जरा. पिढ्यानपिढ्या शिक्षण घेतोय आपण, ते पण हा समंजसपणा आपल्यात दिसत नाही, आश्चर्यच!! 2. कधी कधी वाटते, की मला हे ही लोकांना समजवायला लागेल, किती शोकांतिका, असो. भटजी, आपण म्हणता, की फॉर्मल शिक्षण फुलेंनी सुरू नाही केले, घरच्या घरी शिक्षण पूर्वीपासून होते. भावा, फॉर्मल शिक्षणाचा अर्थ घरगुती शिक्षण असतो का रे? असो, खर तर हे अंतर समजण्यासाठी फॉर्मल शिक्षण मिळावे लागते, पण आपले लिखाण वाचून, आपल्याला हे ही मिळाले नाही असे वाटते. राणी लक्ष्मी बाई, म्हणे शिकल्या, अरे शिकल्या तर शिकल्या चांगली गोष्ट, पण सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी जेव्हा शाळा सुरू केल्या, त्या वेळी त्यांच्यावर शेण फेकण्याची कामं केली याला तरी मान्यता द्याल की नाही? आज पुणे विद्यापीठाला, नाव आहे सावित्रीबाई फुलेंचे, ते काय बिना काही कामाने का? जर बिना कामानेच नाव असते, तर सुकेथु ठेवले नसते का? नावाने तर आपण शिकले सावरले वाटतात, जरा लिखाणाने पण दिसू द्या की. 3. बस का भटजी साहेब. अच्छा, मला एक सांगा, एका माणसाने चोरी केली, किंवा सर्वच चोरी करतात, मग म्हणून आपण केली तर काय ती बरोबर ठरते? याच प्रकारे, हिंदू समाजात स्त्री चे हाल आहेत, पण हे विशेष नाही कारण इतर समाजात ही आहेत, हे आपले लॉजिक आहे, अगदी याच लॉजिक ला नोबेल पीस प्राईझ मिळाले पाहिजे. म्हणजे ही तुमची समजूत? अश्या किळसवान्या समजुती येतात तरी कुठून? स्त्री ला पाळी आली तर गणपती पूजा, कोणती ही पूजा करू देतात का रे ब्राम्हण? अरे सोवळ्या ला हात तरी लावू देतात का? आताच आनंदी बाई जोशींचे उदाहरण दिले, त्या बद्दल काय फक्त आपल्याला गर्व आहे? आम्हाला सर्वांना आहे. पण त्यांचा मृत्यू कधी झाला ? बावीस व्या वयात. एवढ्या लहान वयात, का? कारण, त्यांना तिकडचे जेवण आणि वातावरण झेपले नाही. जर हिंदू समाजाने त्यांना मांसाहार करण्याची परवानगी दिली असती तर आज त्या जास्त जगू शकल्या असत्या. एक मी पण उदाहरण देतो: रामानुजन श्रीनिवासन, यांचा यांचा पण मृत्यू तिशीच्या आत झाला. कारण? सर्वांना चांगलेच माहिती आहे. आणि आपण म्हणता, की कित्येक जातींमधे असे भेदभाव आहेतच, साफ चुकीचे, उलट पती वारले, म्हणून केशवपन केलेल्या लहान वयात असलेल्या स्त्रिया, मी पुण्यात प्रत्यक्ष पहिल्यात, या बद्दल आपले काय म्हणणे? 4. आंतर्जतीय विवाह , दारू पिऊन मारहाण करणे, या सर्व गोष्टी समाजात आहेत, याबद्दल एकदाही मी नकार देणार नाही. प्रश्नच नाही, आहेच. पण या मागचे कारण काय आहे? 1. शिक्षणाचा अभाव 2. नो अवरनेस पण हे येण्यासाठी, शिक्षणाचं असणे हे सर्वोत्तम गरजेचे आहे. अश्या गोष्टी जर ब्राम्हण समाजात कमी आहेत, तर त्याचे कारण शिक्षण होय. बुद्धिमत्ता नाही. कारण, सुपर कॉम्पुटर रमेश भाटकर ने बनवला, जो ब्राम्हण नव्हता. अब्दुल कलाम ही नव्हते, आणि आंबेडकर ही नव्हते. उलट आज काल च्या राज्यमंत्री नीं जे व्यक्तव्य दिलेत, जसे मोराचे प्रजनन, संविधान बदलायला आलोय , इतर शास्त्रज्ञ मूर्ख… हे सर्व लोक समाजाने कोण होते हे जरा पाहून घ्या ! जर शिक्षण घ्यायची संधी ब्राह्मणेत्तर समाजाला अगोदर पासूनच मिळाले असते तर आज ह्या गोष्टी निदर्शनांला आल्या नसत्या.


Parag Patil

Sun , 09 December 2018

सुकेथु श्रीनिवास आपण आपले मुद्दे जे मांडले, त्या मध्ये लॉजिक कमी आणि गर्विष्ठवणाची झलक जास्त दिसते हो! ब्राह्मणांना आरक्षण पाहिजे काय? अरे वा! म्हणे काही जण कष्ट करून विदेशात जातात त्यांचा राग येतो , महाशय, तुमच्या खापर पणजोबांनी पण शिक्षण घेतले , त्यांचा पण आजोबांनी घेतले असेल. त्याच वेळी बहुजनांचे पूर्वज हे तुमची मोलमजुरी करत असत. एवढे शिकले सावरले ले लोक तुम्ही, विदेशात गेलात तर काही तिर मारता रे? अरे जरा विचार कर, ज्यांना शिक्षणाचा अभाव होता, ते हे मागचे चाळीस पन्नास वर्षे झाले शिक्षण घेतात. तरीही त्यातले खूप जण जातातच ना विदेशात. आहेतच ना ते पण मोठ्या हुद्द्यांवर! जर एवढा शिक्षणाचा माज आहे आपल्याला, जर खूप कष्ट करून गरविषपणाचे भांडे भारत असेल तर मी एक विचारतो : एवढे शिकलात, तर का नाही लग्नसराई, बारश्यात, मंदिरात शूद्र लोकांना पूजा आणि इतर काम करवून घेण्यास परवानगी?? सर्व काम सारखेच असतात, तर का संडास साफ करणारे लोक फक्त दलित ? का आपला समाज स्वतः सुरू करत हे काम करणे? उत्तर सोपे आहे, की हे काम करणे खराब आहे, अरे हे कारण काय फक्त तुला मला समजते का? जे लोक करतात त्यांची किती हालत होत असेल याची जाणीव आहे का आपल्याला? आणि मी हे तुला का सांगतोय? कारण, हे सर्व फक्त आणि फक्त ब्राह्मणी नियम, म्हणजेच वर्ण व्यवस्थेमुळे झाले आहे. अरे जी व्यवस्था, या देशात हजारो वर्षे चालू राहिली, त्या व्यवस्थेनुसार ब्राम्हण सर्वात वर। आणि तरीही आज आरक्षण मागून जे करता, त्यावर वकिली गिरी करता आपण, आपल्याला काय नोबेल मिळाले पाहिजे नाही


Ravi

Sat , 08 December 2018

खरंय. हा लेख समाजाचा आरसा आहे. स्वतः च्या कुरुपपणा मुळे जर आरशाशी दुश्मनी दाखवली, तर अशा कंमेंट्स ला कोणीही काहीही करू शकत नाही.


Dhananjay Kulkarni

Thu , 06 December 2018

अतिशय चुकीचा आणि पूर्व ग्रह दुषित लेख आहे.


Sandesh Bhagat

Wed , 05 December 2018

फारच छान विश्लेषण


Sukethu Srinivas

Wed , 05 December 2018

अरेरे !! किती हा जळफळाट, किती हा ब्राम्हणद्वेष..कुणीतरी ओवा द्या रे याला. का कोण जाणे पण घाणीत वळवळणार्या जंताची आठवण होते मला जळफळाट पाहिला की. काही लोकांचे काही कळतच नाही हो की ते का ब्राम्हणांचा द्वेष करतात ते ? म्हणजे आरक्षण नाही आणि तरी ब्राम्हणातले काही जण कष्टाने शिकून सवरून ( सरकारी मदतीशिवाय) मोठ्या पदावर जातात, परदेशी जातात याचा या लोकांना राग असतो की आपल्याला एवढी सरकारी मदत आहे तरी आपण काही भरिव करू शकलो नाही व आपल्याला पोटापाण्यासाठी छोटे मोठे लेख लिहावे लागतात, थिल्लर नाटके करावी लागतात, पार्ट टाइम जाॅब करावे लागतात याचे शल्य असते ते कळत नाही. Let's forget it. लेखाकडे वळूया . लेखातील काही मुद्द्याशी मी असहमत आहे. ते पुढिलप्रमाणे १) लेखक म्हणतो की ब्राम्हण परिषदेत सर्व ब्राम्हणच होते. त्यावर माझे म्हणणे आहे की बरोबरच आहे ते. ब्राम्हण परिषदेत ब्राम्हण नसणार तर काय मुसलमान असणार का ? ब्राम्हणांचे प्रश्न, समस्या त्यांनाच माहित असणार इतरांना नाही, म्हणून सर्व ब्राम्हणच होते. या आधी मराठा आरक्षणाच्या चर्चेत सर्व मराठाच असायचे कारण त्यांचे प्रश्न तेच चांगल्या पद्धतीने मांडू शकतात. 2) लेखक म्हणतो की सरस्वतीपुत्रांच्या आया बहिणांना शिक्षणाचा अधिकार फुल्यांनी दिला. यावर असे सांगू इच्छितो की स्त्रियांसाठी formal school education (औपचारिक शालेय शिक्षण) चीं सुरूवात फुल्यांनी शाळा सुरू करून केली शिक्षणाची नव्हे. त्याआधीही काही प्रमाणात स्त्रिया शिक्षण घेत होत्या पण त्या घरच्या घरीच घेत होत्या. यासाठी मी झाँसीची राणी लक्ष्मीबाई ( ज्या कर्हाडे ब्राम्हण होत्या) यांचे उदा. देउ इच्छितो. त्यांचा जन्म १८२८ ला होता ( सावित्रीबाईंचा १८३१ ला झाला) व लक्ष्मीबाईंसाठी शिक्षकांची नेमणूक करून त्यांना घरीच शिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे लक्ष्मीबाईंसारख्या स्त्रिया आधीही घरी शिकत होत्या आणि मला नाही वाटत की त्यांना घरी शिक्षणाचा अधिकार त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सावित्रीबाईंनी दिला. ३) लेखकाने काही खोटे नाटे आरोप केले आहेत जसे की ब्राम्हणांत अजूनही स्त्रिला पाळी आली की स्त्रिला बाहेर बसवले जाते. हे अत्यंत हास्यास्पद वाटले. माझ्या माहितीत तरी असे कोणी ब्राम्हण नाहीत. कदाचित लेखकांच्या माहितीत असावे. पण ते जरी काही प्रमाणात खरे असल्यास लेखकाला मी सांगू इच्छितो की पाळी आलेल्या स्त्रिला अपवित्र मानणे हा प्रकार ( जो चुकीचा असला तरी) इतर धर्मातही आहे, फक्त हिंदू आणि ब्राम्हणातच आहे असे नाही. एवढेच काय काही आदिवासी जमातीतही पाळी आलेल्या स्त्रियांना पाड्याबाहेर वेगळ्या गोठ्यात बसवले जाते. या बद्दलची माहिती मागच्या महिन्यात लोकसत्तात आली होती. आता त्या आदिवासींवर काय ब्राम्हणी संस्कार झाले का ? आणि ब्राम्हणांना नावे ठेवणारयांना याची आठवण करू इच्छितो की बहुतेक क्षेत्रात नवी सुरूवात करणारया स्त्रिया व त्यांना पाठींबा देणारे हे ब्ाम्हणच होते. जसे की आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डाॅक्टर या ब्राम्हणच होत्या. ४) लेखक ब्राम्हणांना वर्णवादी वर्चस्वाले म्हणतो , तसेच परिषदेत चर्चा करणारयांचा अभ्यास नाही त्यांना समाजाची माहिती नाही असे म्हणतो. तर लेखकाला विचारावेसे वाटते की आंतरजातीय विवाह केल्याने मुलीला, मुलाला ठार मारणारे किती ब्राम्हण तुम्ही पाहिले आहेत ?( मी तर एकपण नाही पाहिला ) मग ते खून करणारे लोक कोण असतात त्याचा पहिले तुम्ही अभ्यास करा. तसेच दारू पिऊन बायकोला मारहाण करणारे तसेच हुंड्यासाठी बायकोला जाळणारे किती ब्राम्हण तुम्हास ठाऊक आहेत ? ( मला एकपण नाही माहित) तेही लोक कोण असतात याचा अभ्यास करा. तसेच भाऊ कदमने गणपती बसवला त्यामुळे त्याला समाजातूनच बहिष्कृत करू म्हणून धमकी देणारे कोण होते ? ते ब्ाम्हण नक्कीच नव्हते हो...मग ते जे कोण होते त्यांचा पण अभ्यास कर जरा...जातियवादाचा निषेध करत असाल तर दलितांकडून सवर्ण द्वेषाचा जो reverse casteism चा प्रकार केला जातो त्यांनापण निषेध करायचा प्रामाणिकपणा दाखवा जरा


Alka Gadgil

Wed , 05 December 2018

Shame on ABP Maza, it's shows it rightist and casteist colours every now and then. It's futile to look for sensitivity from these roaring channels


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......