शबरीमाला हे ठिकाण रामायणातलं ते ठिकाण मानलं जातं, जिथं सीतेच्या शोधात निघालेल्या रामाला शबरीनं प्रत्येक बोर उष्टं करून त्यातील गोड निवडून खायला दिलं होतं. शबरीमाला मंदिर केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्यात आहे. त्याचं व्यवस्थापन त्रावनकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी) करतं. याचे मुख्य भागधारक टीडीबी, तंत्री (मुख्य पुजारी) परिवार, पंडलम राज परिवार, अय्यप्पा सेवा संगम आदि आहेत. सरकारनं नियंत्रणात घेण्यापूर्वी हे मंदिर पंडळम राजाच्या अधिन असल्यानं धार्मिक प्रथांसाठी राजाची सहमती घेतली जाते. राजाचा प्रतिनिधी निलीमला पर्वतावरच्या एका उंची ठिकाणी बसून औपचारिकरित्या परवानगी जाहीर करतो. त्याबदल्यात भाविकांकडून त्यांना छोटी-मोठी भेट दिली जाते. दरवर्षी सुमारे तीन कोटी भाविक इथं भेट देतात, ज्यातून मंदिराच्या वार्षिक महसुलीत २४० कोटींची भर पडते. शबरीमाला मंदिरात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश आहे. इथं येण्यापूर्वी भाविकांना संभोग, नशा आणि मांसाहारापासून दूर राहून ४१ दिवसांचा उपास किंवा तपश्चर्या करावी लागते. यादरम्यान सगळे भाविक एकमेकांना ‘अय्यप्पा’ असं संबोधतात. त्यानंतर १८ पवित्र पायर्या चढून अय्यप्पाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. ‘अशुद्ध’ या संस्कृत शब्दाला मल्याळी भाषेत ‘अईत्थम’ म्हणतात. हा शब्द पूर्वी अस्पृश्यांसाठी वापरला जायचा. १९५० पासून अस्पृश्यतेवर बंदी घातल्यापासून हा शब्द मासिक पाळी आलेल्या महिलांसाठी वापरला जातो. अशा महिलेला दिवा लावणं, प्रार्थना म्हणणं, जवळच्या मंदिरात जाणं आणि पवित्र धार्मिक ग्रंथ हाताळण्यापासून थांबवलं जातं. शबरीमाला मंदिरात रजस्वला वयाच्या महिलांवर बंदी आहे.
अय्यप्पा कोण व अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश बंदी का, याविषयी काही आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकेप्रमाणे तो केरळच्या पंथळमथिट्टाच्या ठिकाणाचा पंथलम राज परिवारात जन्मलेला राजा होता. वावर नावाच्या अरब मुस्लिम सरदाराला अयप्पानं पराभूत केल्यानंतर वावर अयप्पाचा स्वामीभक्त बनला. तो इरूमेळीच्या मशिदीतून मंदिराकडे जंगलातून प्रवास करणार्या भक्तांचं संरक्षण करतो. मुस्लिम धर्मीयदेखील या मशिदीची यात्रा करतात. अय्यप्पांनी भक्तांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शारीरिक सुख, परिवारिक बंधनं या सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला, ज्यात मासिक पाळी येण्याच्या वयातल्या महिलांचा प्रवेशदेखील वर्ज्य केला.
दुसर्या आख्यायिकेप्रमाणे विष्णु भगवाननं मोहिनेचं रूप धारण करून महिषी वध आणि समुद्र मंथनातून निघालेलं अमृत देवांना पाजण्याची व्यवस्था केली. या मोहिनीवर शिव मोहित झाले. त्यांच्या नियोगातून अय्यप्पा या देवाचा जन्म झाला. त्यामुळे अय्यप्पा हे विष्णु (हरी) आणि शिव (हर) यांच्या संकरातून तयार झालेला हरिहर आहे. अयप्पाचा जन्म एका महिला राक्षसीणीला मारण्यासाठी झाला होता. तिला वरदान होतं की, ती फक्त शिव व विष्णुकडून होणार्या संतानाच्या हातानं मारली जाईल. जेव्हा तरुण अयप्पानं तिची हत्या केली, तेव्हा महिषीच्या देहातून शापमुक्त झालेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. तिनं अयप्पाला लग्नाचं साकडं घातलं. अयप्पानं भक्तांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी शबरीमालाला जाण्याचं आपलं उद्दिष्ट सांगितलं आणि म्हटलं की, मंदिरात प्रथमच येणारे भक्त (कन्नी स्वामी) संपले की, ते मंदिरात तिच्याशी लग्न करतील. ती जवळच्या मंदिरात वाट पाहत बसलेली मलिकापूरथम्मा देवी आहे, जिचीदेखील भक्त पूजा करतात. दरवर्षी हजारो नवीन भक्तांची भर पडत असल्यानं मलिकापूरथम्माची प्रतीक्षा काही संपत नाही. अयप्पाचं लक्ष विचलित होता कामा नये म्हणून मलिकापूरथम्माच्या तपश्चर्येशी एकरूपता व्यक्त करत आणि तिच्याप्रती आदर दाखवत मासिक पाळीच्या वयातल्या महिलांनी मंदिरात जाऊ नये असं भक्त मानतात. या वयाच्या महिलांनी अय्यपा मंदिरात जाणं मलिकापूरथम्माच्या प्रेम व त्यागाचा अपमान मानला जातो.
तिसर्या आख्यायिकेप्रमाणे अय्यपा पंडळम राजाकडे चिरापंचिरात या पारंपरिक ‘कालारी’ (मार्शल आर्ट) शाळेत शिकायला आले, ज्यांच्या प्रेमात कालारी प्रशिक्षकांची कन्या लीला पडली. पण ब्रह्मचर्याची शपथ घेतलेल्या अय्यपानं शेवटचा भाविक येईपर्यंत लग्न न करण्याची शपथ घेतली. लीला हीच ती मलिकापूरथम्मा.
या आख्यायिकांच्या आधारावर मंदिराकडून सर्वोच्च न्यायालयात असा तर्क मांडण्यात आला की, हा अय्यप्पा यांचा महिलाद्वेष नसून ब्रह्मचर्य आहे. अय्यपाच्या मंदिरात प्रवेशबंदी कोणी लागू केली याचं उत्तर मंदिर प्रशासनाकडे नाही. स्वतः अय्यप्पानं बंदी घातली असं भक्तांचं म्हणणं आहे. भक्तांच्या प्रार्थनेकडे लक्ष देता यावं म्हणून अय्यप्पा ब्रह्मचारी आहेत आणि जोवर प्रथमच मंदिरात येणारे भक्त (कन्नी स्वामी) संपत नाहीत, तोपर्यंत ते ब्रह्मचारी राहतील, असं मानलं जातं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
खरं तर हा कुतर्क आहे. लोकं जन्म घेत राहतील आणि पहिल्यांदा मंदिराची पायरी चढणार्यांची संख्या काही संपणार नाही. एखादा देव इतका अतार्किक होऊ शकतो, यातच सगळं आलं. पंडालम महालाकडून मुख्य तंत्री यांना तरुण महिलांनी प्रवेश केल्यास सर्व विधी थांबवून देण्याची सूचना केली आहे. ज्याचं तंत्री पालन करत आहेत. पूर्वीदेखील महिला या मंदिरात कमी-जास्त प्रमाणात जायच्या. १९९१ साली केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेत के. परिपूर्णन आणि के. बलनारायण मरार यांच्या खंडपीठानं निर्णय देताना न्यायालयानं ही बंदी प्रथा चालू ठेवण्याच्या बाजूनं निर्णय दिला. त्यांनी पोलिसांना ही बंदी पाळली जावी म्हणून बळ वापरण्याचे अधिकार देण्याचे आदेश केरळ सरकारने द्यावेत, असं आदेशात म्हटलं.
त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या अध्यक्षांनी २०१५ साली शबरीमाला मंदिरात येणार्या महिलांना मासिक पाळी चालू आहे की नाही, याची चाचणी करणारी मशीन लावण्याची मागणी केली होती. याची खिल्ली उडवत निकिता आझाद या इंग्रजी साहित्याच्या तरुणीनं ‘यूथ की आवाज’ या वेबसाइटवर त्यांना खुलं पत्र लिहिलं. त्यानंतर तिनं फेसबुकवर ‘हॅप्पी टू ब्लीड’ नावाची मोहीम सुरू केली, जी बरीच लोकप्रिय झाली. या ग्रुपच्या वतीनं इंदिरा जयसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे त्रावणकोर बोर्ड मंदिराच्या बाजूनं काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मानू सिंघवी महिलांना ४१ दिवसांचा उपास किंवा तपश्चर्या करून मंदिर प्रवेश शरीररचनेमुळे शक्य नसल्याचं मत ‘मनुस्मृती’चे दाखले देऊन सांगत होते.
घटनेच्या कलम ३२नुसार (मूलभूत अधिकार लागू करण्यासंदर्भात न्यायालयाचा हस्तक्षेप) इंडियन यंग लॉंयर्स एसोसिएशनच्या वतीनं या विरुद्ध दावा दाखल करण्यात आला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवण्यात आलं. तिथं महिलांना पूजास्थळात प्रवेश करण्यापासून थांबवणं हे घटनेच्या कलम १४ (समानतेचा अधिकार), १५ (लिंग व इतर आधारावर भेदभाव करण्यास बंदी), १९ (अभिव्यक्ती व भाषण स्वातंत्र्य) आणि २५ (धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार) च्या विरुद्ध आहे. पूजास्थळाच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापासून मज्जाव करणं धर्मपालन करण्याच्या स्वातंत्र्याच्या (कलम २५ (१)) विरुद्ध आहे. महिलांला मंदिरात प्रवेश न करू देणं पुरुष वर्चस्ववादी विचाराचं समर्थन असल्यानं त्याला धर्म म्हणता येणार नाही, कारण ते देवासमोर सगळे समान असण्याच्या संकल्पनेच्या विरुद्ध आहे. घटनेचं कलम २६ सर्व धार्मिक संप्रदाय व पंथांना धार्मिक बाबींचं व्यवस्थापन स्वतः करण्याचा अधिकार देत असलं तरी कोणाच्या धार्मिक अधिकारांच्या आड येता येत नाही. अय्यपा हा स्वतंत्र धर्म नसल्यानं महिलांच्या वयाबद्दलची अट हा धर्माचा ‘महत्त्वपूर्ण भाग’ नाही.
एप्रिल २०१६ पासून न्यायालयानं महिलांना शनिमंदिरात पूजा करण्याची परवानगी दिली असेल तर इथं का नाही? जर परंपरेनं योग्य मानल्या गेलेल्या अस्पृश्यता आणि सतीप्रथा यांसारख्या सामाजिक कुरीतींना कायद्यानं बंदी घातली गेली तर या परंपरेला का नाही? जैविक व शारीरिक मासिक पाळीच्या आधारावर महिलांना प्रवेश नाकारणं हे भेदभावपूर्ण व गैरसैंविधानिक आहे, असे तर्क याचिकाकर्ते व केरळ राज्य सरकारकडून मांडण्यात आले.
न्यायालयानं १९५०-६० पासूनच धार्मिक हेवेदावे निकाली लावण्यासाठी ‘गरजेच्या प्रथा’ ही चाचणी लागू करून धार्मिक प्रथा या संवैधानिक अधिकारांच्या आड येऊ नये हे सुनिश्चित करण्याचे प्रयत्न केले. आनंदमार्ग केस व शिरूर मठ केस या दोन्ही प्रकरणात हाच आधार न्यायालयानं वापरला. शनि शिंगणापूर आणि हाजी अली दर्ग्यातही धार्मिक परंपरा विरुद्ध लैंगिक समानतेचा मुद्दा उभा राहिला होता. त्या प्रकरणात नागरी हक्क आणि समानतेच्या तत्त्वांवर महिलांचा प्रवेशाचा अधिकार मान्य करण्यात आला.
शबरीमाला खटल्यात निर्णय देताना न्या. दीपक मिश्रा यांनी महिलांवर बंदीला ‘धार्मिक पुरुष सत्तावाद’ म्हटलं, तर न्या. अजय खानविलकर यांनी ‘पूजेचे अधिकार पुरुष व महिलांना दोघांना समान असावे’ असं मत नोंदवलं. न्या. रोहिंटन नरिमन यांनी अय्यप्पा हा स्वतंत्र संप्रदाय नव्हे, तर हिंदू धर्माचा एक भाग असल्याचं म्हटलं. न्या. धनंजय चंद्रचूड यांनी महिलांना बंदी ही एक प्रकारची अस्पृश्यता असल्यानं ती घटनाविरोधी आहे असं मत नोंदवलं. त्याउलट या पाच सदस्यीय खंडपीठात असलेल्या एकमेव महिला न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी ‘आपल्या निर्णयात धर्माचं कर्मकांड धर्माला ठरवू दिलं जावं. विवेकवादाची फुटपट्टी धर्मावर लागू करू नये. अय्यप्पा भाविकांना स्वतंत्र धार्मिक संप्रदाय मानला जावा’ असा निकाल दिला. खंडपीठानं सार्वजनिक पूजेचं हिंदू स्थळ (प्रवेश मान्यता) नियम १९६५’ च्या नियम ३ (ब) ला बेकायदेशीर ठरवलं.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
हा निर्णय आल्यानंतर केरळच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या डाव्या पुरोगामी आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मंदिर परिसरात महिलांच्या सोयीसाठी पावलं उचलणार असल्याचं जाहीर केलं. रेहाना फातिमा या अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्तीनं, तसंच इतर काही महिलांनी आत जायचा प्रयत्न केल्यावर मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिराचे बहुतांश तंत्री मंदिराच्या पायर्यावर भजन म्हणत जमा झाले आणि राजपरिवाराच्या आदेशाप्रमाणे मंदिराचं पावित्र्य भंग करण्याचे प्रयत्न झाल्यास सर्व पूजा विधी बंद करण्याची धमकी दिली.
दुसरीकडे काँग्रेस, भाजप यांच्या आशीर्वादानं उभ्या राहिलेल्या शबरीमाला आचार संरक्षण समिती, सबरीमला अय्यप्पा सेवा संघम, योगक्षेम सभा, हिंदू महासभा, शिवसेना, अ. भा. अय्यप्पा सेवा संघम, केरळ तंत्री समाजम आदि संघटनांनी गंभीर परिणाम भोगायची चेतावणी दिली आहे. राज्यभरात बंदची हाक देण्यात आली. भाजप अध्यक्षांनी हा निर्णय कपट कारस्थान असल्याचा संशय व्यक्त करत त्याविरुद्ध जनभावनांच्या उद्रेकाची भविष्यवाणी केली आणि न्यायालयाच्या आदेशविरुद्ध लोकांना एकत्र येण्याचं आव्हान केलं. भविष्यापेक्षा भूतकाळात रस असलेल्या आणि केरळात सत्ता मिळवण्याच्या ध्यासानं पछाडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं व भाजपनं मंदिरावर पुरुषसत्ताक विचारांची पकड मजबूत करण्याचंच काम सुरू केलं आहे. शेकडो लोकांच्या जमावानं - ज्यात महिलांचादेखील समावेश आहे - अय्यप्पाच्या नावाचा जयघोष करत रिपब्लिक टीव्ही, न्यूज मिनट वेबसाईट, सीएनएन - न्यूज 18, इंडिया टुडे, एनडीटीव्ही इंडिया, न्यूज मिनट, न्यू यॉर्क टाइम्सच्या महिला-पुरुष पत्रकारांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांच्यावर शारीरिक हल्ला चढवला. अय्यप्पाच्या ब्रह्मचर्य रक्षणार्थ कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतून येणार्या बसेसमध्ये घुसून महिलांना शिवीगाळी, मारहाण करत परत जायला सांगितलं जात आहे. मंदिराकडे जाणार्या सर्व मार्गांवर रॅली, रास्ता रोको, वाहन झडती आदि करून १० ते ५० वयोगटातल्या महिलांना वेचून त्यांच्यावर शारीरिक हल्ले करण्यात आले. काही ठिकाणी या झुंडीकडून आत्महत्या व आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सबरीमला, इरूमेळी, वदेसरिकरा पांबा आदि ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे. महाराष्ट्रात शनि शिंगणापूर प्रवेश आंदोलनातून चर्चेत आलेल्या तृप्ती देसाई यांना विमानतळावरच रोखण्यात आलं.
परिस्थिती चिघळवून त्याचा राजकीय फायदा आणि जातीय तेढ निर्माण करून मतांचं ध्रुवीकरण भाजपच्या बाजूनं करण्याची सोनेरी संधी म्हणून संघ या मुद्द्याकडे पाहत आहे. आपल्या विजयदशमीच्या भाषणात सरसंघचाचक मोहन भागवत यांनी सबरीमला निर्णयासंदर्भात न्यायालयावर टीका केली. स्मृति इराणी यांनी ‘रक्तानं माखलेले सॅनिटरी नॅपकिन घेऊन मित्राच्या घरी जाणार का?’ असा प्रश्न विचारून वादात भर टाकली. ज्यावर सोशल मीडियावर भरपूर टीकाही करण्यात आली. एका चित्रफितीतून भाजपचे केरळ राज्याचे अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई कशा प्रकारे आंदोलन मॅनेज करण्यात्न आलं, हे आपल्या कार्यकर्त्यांना सांगत असल्याचं उघड झालं आहे. त्यात त्यांनी मुख्य तंत्री कांजिवरू राजीवरू यांनी न्यायालयाच्या अवमानतेची भीती व्यक्त केल्यावर भाजपकडून आश्वस्त करण्यात आल्याचं सांगितलं. संघाकडून सबरीमलासाठी करसेवा आयोजित करून केरळ, कर्नाटक व तमिळनाडू राज्यांतून स्वयंसेवक जमवले जात आहेत. भाजपकडून कर्नाटकलगतच्या कासरगोड जिल्ह्यापासून सबरीमलापर्यंत सहा दिवसांची रथयात्रा काढण्यात आली. राज्याच्या मंत्रालयावर मोर्चा नेण्याची तयारी चालू आहे. त्यासाठी लाखोंचा भक्त संप्रदाय असलेल्या माता अमृतानंदमयींसारख्या धर्मगुरूंना वेगवेगळ्या जिल्ह्यात सभांमध्ये उतरवलं जाणार आहे. राज्यभर मोर्चे, नामजप यात्रा आणि मिरवणुका भाजपकडून काढण्यात येत आहेत, ज्यात काँग्रेसदेखील सहभागी आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस ए. एन. राधाकृष्णन यांचं सर्वांत जास्त भाविक जमा होतात, त्या दिवशी म्हणजे १५ डिसेंबर रोजी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते शबरीमालामध्ये जमा करण्याविषयीचं पत्र ‘मनोरमा न्यूज चॅनल’वर प्रसिद्ध झाल्यानं भाजपचा चेहरा जगासमोर आला आहे.
भाजप व संघाच्या लोकांनी स्वतःला ‘शहादत’ दिल्याचा गवगवा करू नये आणि परिस्थिती चिघळू नये म्हणून केरळचे मुख्यमंत्री फार सावधपणे परिस्थिती हाताळत आहेत. त्यांनी भाजप, काँग्रेस, शबरीमाला मंदिर प्रशासन व पंडळम राज परिवार आणि अय्यप्पा भक्तांची पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी धुडकावून लावत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केरळ शासनाच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ‘कम्युनिस्ट पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं समर्थन करतो आणि सबरीमला मंदिरात जाणार्या भाविकांना रोखणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल’ असा इशारा माकपचे केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी दिला आहे.
न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर झालेल्या जाळपोळ व हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत ३७०० लोकांना अटक करून ५४६ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा गैरफायदा भावनिक आधारावर भाजप आणि संघाला मिळू नये म्हणून केरळ पोलिस आयजी श्रीजित यांना आंदोलनकर्त्यांना पिटाळून न लावता भाविकांची सुरक्षा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी पंडलम राजघराण्याला फटकारत सुनावलं की, आता राजा-महाराजांचे दिवस संपले आहेत, तर सनातन्यांना सुनावलं की ‘पूर्वी नायर समाजाच्या महिलांना त्यांचे स्तन झाकण्याचेदेखील अधिकार नव्हते आणि कंबरेवरचे कपडे घालायला बंदी होती. तेव्हा या ब्राह्मणी परंपरेविरुद्ध लढल्यानेच ते संपले’.
सरकारच्या वतीनं आठवड्याचे दोन दिवस महिलांसाठी प्रवेश खुला ठेवण्याचाही प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाला मोठी सांस्कृतिक चळवळ हाती घ्यायची गरज निर्माण झाली आहे. १९५९मध्ये पीपल्स थिएटर, नाटक, शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करून कम्युनिस्ट विचारांना स्वीकारण्यासाठी समाजाची मानसिकता तयार केली होती. कम्युनिस्ट पक्षाकडून सबरीमला प्रश्नावर पक्षाची भूमिका स्पष्ट करणारी पुस्तिका छापून तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचवण्याचे प्रयन चालू आहेत.
शबरीमालाच्या घटनेतून झुंडशाहीच्या राजकारणामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लागू करण्यात अपयश आणल्याचं दाखवून दिलं आहे. यातून धर्म व झुंडीच्या बळावर करण्यात आलेलं राजकारण न्यायालयांना जुमानत नाही असा चुकीचा पायंडा पडू शकतो. भाजप व काँग्रेस हे दोन सर्वांत मोठे राजकीय पक्ष प्रबोधनात्मक व समाजसुधारणेची बाजू घेण्याऐवजी मतांच्या राजकारणासाठी सनातनी भूमिका घेऊन लोकमत तयार करतात आणि जनसमर्थन जमवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जातात. दोन्ही पक्षांच्या अशा प्रकारच्या भूमिकांमुळे सनातनी अंधश्रद्धा पसरवणार्या संघटना मजबूत होतात.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
केरळ राज्यात १९२०-३०पासून मंदिरप्रवेश आंदोलनं करण्यात आली आहेत. त्यामुळे तयार झालेल्या ऊर्जेमुळे डाव्या, पुरोगामी चळवळींनाही आधार मिळाला. या चळवळींमुळे समाजात जी पुरोगामी मूल्यं स्थापन झाली होती, त्यांना शबरीमालाच्या संघप्रणीत आंदोलनानं धक्का पोहोचला आहे. लैंगिक समानता आणि न्याय हा सर्वांसाठी लागू असावा, हे निश्चित करण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची आहे. पण भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्या महिलाविरोधी भूमिकेतून त्यांचं चारित्र्य दाखवून दिलं आहे. खरं तर पुरुष वर्चस्ववादी निर्णयांविरुद्ध सामाजिक चळवळ उभारणं हेदेखील एक राजकीय काम आहे. मात्र त्याला मतपेटीच्या राजकारणासाठी तिलांजली देण्यात आली आहे. परंपरा समर्थनाचा फायदा अनेक दर्गा आणि मशिदींना होणार म्हणून केरळ राज्यात मुस्लिम संघटना\पक्षदेखील भाजप व काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन करत आहे.
शबरीमालाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजप यांच्यामधला फरक संपला आहे. राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं, पण केरळ राज्यात काँग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे लैंगिक समानतेच्या व धार्मिक कट्टरतेच्या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका भाजपसारखीच आहे. सरकार बदललं की सरकारची भूमिका आणि प्रतिज्ञापत्र बदलत राहतात. पण डाव्या आघाडीच्या सरकारकडून नेहमी महिलांचा समानतेच्या अधिकारांची पाठराखण करण्यात आली. या प्रकरणातदेखील केरळ सरकारनं पाठिंबा दर्शवला आहे.
केरळच्या मुख्यमंत्र्यांनी यामागे केरळचं धर्मनिरपेक्ष सामाजिक स्वरूप विस्कळीत करण्याचं उद्दिष्ट असल्याचं म्हटलं आहे. शबरीमाला हे सेक्युलर धर्मक्षेत्र असल्याची भूमिका केरळ सरकारनं मांडली आहे. भाजपनं मात्र कट्टर भूमिका घेत आता शबरीमाला मंदिरात गैर हिंदूंना बंदी घालण्याची मागणी केली आहे. सरकारकडून ही भूमिका आधीच घेण्यात आली आहे की, ही जागा आदिवासींचं पूजास्थळ आहे. हे स्थळ पूर्वी बौद्ध पूजा केंद्र होतं, असं मानणारा एक प्रवाह आहे. अयप्पांचा मुस्लिम मित्र वावर नाडा नावाच्या जागेत मंदिर स्थापणेपासून स्थित आहे. शबरीमलाकडे इरूमल्ली मार्गे जाण्याच्या मार्गात वावरपल्ली नावाची मशीद आहे. तिथं सर्व जाती व धर्माचे भाविक मंदिरात जाण्यापूर्वी पूजाअर्चा करतात.
‘पेट्टा थुलाल’ हे शबरीमला तीर्थस्थळाचं महत्त्वाचं ठिकाण वावर मशिदीपासून सुरू होतं. ७२ वर्षीय उस्ताद अब्दुल रशीद मुस्लियार हे वावनूर घराण्याचे प्रमुख या मशिदीची व्यवस्था पाहतात. ही केरळची शतकांपासून चालू असलेली धर्मनिरपेक्ष संस्कृती आहे. अय्यपा देवाची प्रार्थना येसुदासनं गायली आहे, ते धर्मानं ख्रिस्ती आहेत. येसुदास अयप्पाचे भाविकही आहेत. अनेक ख्रिस्ती व मुस्लिम भाविक दरवर्षी तीर्थयात्रा करतात. मात्र भाजप व संघानं केरळ सरकारच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा थट्टा उडवत असं म्हटलं की, जर हे सेक्युलर पूजास्थळ असेल तर सरकारनं सर्व सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालयांत अय्यप्पा देवाचे पुतळे स्थापन करावेत. यापूर्वीदेखील भाजपच्या वतीनं इतर धर्मीयांना बंदी घालण्यासाठी करण्यात आलेल्या याचिकेत केरळ उच्च न्यायालयानं अय्यपा मंदिरात सर्व जाती-धर्माचे लोक येऊ शकतात असा निर्णय दिला आहे.
आसामच्या कामख्या मंदिरात देवीला मासिक पाळी येते असं मानून गर्भगृह बंद ठेवण्यात येतं. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात मागच्या ४०० वर्षांपर्यंत महिल्यानं प्रवेश होता, परंतु पुरुषांचं लक्ष विचलित होणं गैर इस्लामी असल्याचं कारण पुढे करून त्या दर्ग्याच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश नाकारला गेला. त्र्यंबकेश्वर मदिराचं गर्भगृह आणि शनि शिंगणापूर इथंदेखील शनि कोपित होईल म्हणून मूर्तीजवळ जाण्यास महिलांना बंदी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्र्यंबकेश्वर, शनि मंदिरं आणि हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या गोष्टी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आहेतच. ख्रिस्ती धर्मातदेखील रोमन कॅथॉलिक चर्चच्या पुजारीपदी महिलांची नेमणूक होत नाही. मशिदीत महिलांना नामजपासाठी प्रवेश नसतो. अनेक दर्ग्यांत महिलांना प्रवेशबंदी असते. दलितांना मंदिरात प्रवेश नाही आणि धर्मातले उच्च जातीय आपला जातिवाद व कट्टरता सोडायला तयार नाहीत, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्मात का राहावं हा प्रश्न पडला आणि त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्मत्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला. जर असाच प्रश्न महिलांना पडून त्यांनी धर्मत्याग करायचा ठरवला हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्माच्या धर्ममार्तंडांना तोंड लपवायला जागा राहणार नाही.
येत्या २२ जानेवारीला शबरीमालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ४८ पुनर्विचार याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यात येणार आहे. हा लढा मंदिर प्रवेशाचा नाही तर शतकांपासून लादण्यात आलेल्या सांस्कृतिक व धार्मिक मूल्यांविरुद्ध वैज्ञानिक, पुरोगामी व आधुनिक मूल्यांचा आहे.
.............................................................................................................................................
लेखक अॅड. संजय पांडे ऑल इंडिया लॉयर्स युनियन, महाराष्ट्रचे सदस्य आहेत.
adv.sanjaypande@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment