आजशी नाते सांगणारा ‘साप्ताहिक सकाळ’चा दिवाळी अंक!
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 03 December 2018
  • पडघम सांस्कृतिक दिवाळी अंक २०१८ Diwali ank 2018 साप्ताहिक सकाळ Saptahik Sakal

या वर्षीच्या निवडक दिवाळी अंकांची सविस्तर ओळख करून देणारी ही लेखमालिका आजपासून.

.............................................................................................................................................

‘सकाळ साप्ताहिक’चा या वर्षीचा दिवाळी अंक ‘आज’ अशी नाते सांगणारा, समकालीन वास्तवाचे भान राखणारा आहे. कोणताही ‘आज’ त्या काळातील लोकांना हवा तसा असतोच असे नाही. त्यातील काहीजणांना तो जसाच्या तसा चालतो, तर बऱ्याच जणांना बदल हवा असतो. साहित्यात हे बदल कोणते असू शकतात, याची झलक या अंकात दिसून येते.

अंकाची निर्मिती

अंकाची निर्मिती अतिशय दर्जेदार आहे. संपादक, सहसंपादक, मांडणी व सजावट यांच्या अथक प्रयत्नांमुळे अंक अतिशय देखणा झाला आहे. सर्व चित्रकार अनिल उपळेकर, अभय पुरंदरे, प्रतीक काटे, दीपक संकपाळ यांच्या चित्रांनी लेख व कथा उठावदार झाल्या आहेत. काही लेखातील चित्रे खुद्द लेखकांनीच दिली आहेत.  हास्यचित्रे विजय पराडकर, जय जाधव यांची आहेत.

कोणत्याही दिवाळी अंकात लेख आणि कथा हे दोन मुख्य आधारस्तंभ असतात. ह्या आधारस्तंभाची रचना ह्या अंकात मुख्य आणि इतर अशी केली आहे. लेख आणि कथा, भटकंती, फोटो-स्टोरी, मनोगत, मैफल कवितांची, हास्यचित्रे, वार्षिक राशिभविष्य अशी विविध आकर्षणांनी अंक सजवला गेला आहे.

बाळ फोंडके यांचा ‘पोस्ट ट्रुथ’ आणि ‘फेक न्यूज’ यांचा उहापोह करणारा ‘कानोकानी’, मंदार दातार यांचा ‘जिगरबाज गवत’, अनिल अवचट यांचा ‘ऋण बांबूचे’, प्रवीण दवणे यांचा ‘स्माईली आणि क्रायली’, राधिका टिपरे यांचा ‘अंटार्क्टिकाची सफर, शैलेश माळोदे यांचा ‘माळढोक वाचेल पण...’ हे वाचनीय लेख त्यांच्या कथन विषयाच्या नवीन माहितीसह नव्या समस्येबाबत नव्या अपेक्षा व्यक्त करतात.

प्रवासाची अन त्यायोगे होणाऱ्या ज्ञानभटकंतीच्या समृद्धीचे मानकरी आहेत गणेश देवी, माधव गाडगीळ, मृणाल तुळपुळे, श्रीकर अष्टपुत्रे. संजय दाबके यांची ‘होरपळलेला युरोप- तेव्हा आणि आत्ता’ ही फोटो-स्टोरी माणसाच्या फिनिक्स प्रेरणेची साक्ष देते.  

‘प्रिय लोकशाही’ हे अभिनेत्री विभावरी देशपांडे यांचे मनोगत चिंतनाची वेगळी दिशा दर्शवते. लक्ष्मीकांत देशमुख यांची ‘प्यार की राह दिखा दुनिया को’ ही दीर्घ कथा, गौतम पंगु यांची ‘ओंकार कथा : दुवा’, अभिजित पेंढारकर यांची ‘प्रायश्चित्त’, अभिजित आपटे यांची ‘पावसाळा’ ही भयकथा, श्रीनिवास शारंगपाणी यांची ‘आकाशीचा चंद्र नवा’ ही विज्ञानकथा यांनी कथा विभाग भरगच्च आहे. 

‘कानोकानी’

‘कानोकानी’ ह्या शब्दाचे यथार्थ वर्णन करणारा बाळ फोंडके यांचा लेख ‘पोस्ट ट्रुथ’ आणि ‘फेक न्यूज’ ह्या संकल्पना स्पष्ट करतो. हे दोन शब्द ऑक्सफर्ड आणि कॉलिन्स या शब्दकोशांनी स्वीकारले आहेत. मराठीत सत्यपश्चात्य आणि मिथ्यवार्ता असे शब्द फोंडके देतात. वेगळे वाटणारे हे शब्द एकाच उगमाचे फलित आहेत, याचा इतिहास मांडला आहे. ‘फेक न्यूज’ ही ट्रम्प यांची देणगी असूनही ती त्यांनी नाकारण्यातच त्यातील विरोधाभास व्यक्त होतो. परिणामी ‘फॉल्स न्यूज’ हा आणखी एक नवा शब्द शोधला गेला. तिच्याशी संबंधित ‘अफवा’ कशी काम करते, याचा शोध डेव्हिड लेझर आणि सिनान आराल या दोन वैज्ञानिकांनी घेतला. लेझरने बातमी आणि अफवा यातील तात्त्विक फरक स्पष्ट केला तर आरालने सत्य आणि असत्य यांचा प्रसार नेमका का व कसा होतो याचा शोध घेताना ‘अफवा’ची व्याख्या केली. त्यासाठी त्याने २००६ ते २०१७ दरम्यान  किमान सव्वा लाख अफवा तपासल्या! फिल्लीपो मेन्शर, किसर मेकर, लिन हॅशर या वेगवेगळ्या देशातील संशोधकांनी केलेले प्रचंड कामाचा आढावा फोंडके यांनी घेतला आहे. लेझरच्या मते, भविष्यातील युद्धे ही केवळ देशांमधील युद्धे राहाणार नसून ती घराघरात पोहोचतील आणि त्यांचा आधारच मूलतः ‘अफवा’ असेल. जॉर्ज ऑर्वेलच्या ‘1984’ आणि ‘Animal Farm’मध्ये सत्याचा अपलाप कसा होईल, सत्य कसे हद्दपार होईल, याचे केलेले काल्पनिक चित्रण आज सत्य ठरू पाहात आहे, याची मांडणी या लेखात आहे. भारतासह सारे जगच या खाईत लोटले जात असताना सत्याची पाठराखण करणे, हे नवे आव्हान नव्या युगासमोर असल्याचे भान फोंडके देतात.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘ऋण बांबूचे’

अनिल अवचट ह्या सिद्धहस्त लेखकाने ‘ऋण बांबूचे’ ह्या लेखात मानवी जीवनातील बांबूने बजावलेली जिवंत भूमिका अतिशय रसाळ पद्धतीने उभी केली आहे. व्यक्तिगत आयुष्यात पाळणा, कपडे वाळत घालण्याची काठी, शिडी, स्वंयपाक घरातील-जेवण्याची भांडी म्हणून उपयोगी पडणे, म्हातारपणाची काठी ते तिरडी आणि सामाजिक जीवनात घरे, वस्त्या, जंगलात पुलाचे काम, ते बांधकामात वेगवेगळ्या ठिकाणी अनिवार्य असणारा (स्लॅब आधीचे सेंटरिंगच्या कामाला लागणारा बांबू), बांबूची शेती, बाजारीकरण आणि बांबूचे अखिल मानवी भावजीवनातील महत्त्व सांगता सांगता अवचट त्यात गुंतलेली आदिवासीपासून ते उद्योगसमूहापर्यंत रचल्या गेलेली विविध काळातील अर्थव्यवस्था, पर्यावरणीय व्यवस्था यांचे निरुपण करतात. मानवी विकासात विविध भूमिका बांबू कसा बजावतो, याचे दर्शन या लेखात घडते. “मला मार्केट आणि मर्कट या शब्दात खूप साम्य आढळते” ही अवचटांची कोपरखळी जाता जाता कंसात येते. ह्या लेखाचे निष्कर्ष विधान आहे : “माणसाला सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे बासरी. इमारती, पूल, फर्निचर हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर; पण त्यात जीव भरला जातो तो बासरीतून...”

‘जिगरबाज गवत’

गवताकडे कुणी लक्ष देतं का? दुर्लक्ष करणाऱ्या वस्तूंच्या यादीतही गवत नसते, इतके दुर्लक्ष गवताकडे केले जाते, याकडे अगदी ‘लक्षपूर्वक लक्ष देणारा लेख आहे मंदार दातार यांचा ‘जिगरबाज गवत’. गवताने माणसाला काय काय दिले आहे, काय काय करायला भाग पाडले आहे, याची मनोरंजक साहित्यिक आणि शास्त्रीय माहिती या लेखात मिळते. डायनासोर नष्ट झाल्यानंतरच्या काळात सहासात कोटी वर्षांपूर्वी गवताचे अवतरण पृथ्वीवर झाले; प्राण्यांच्या आणि माणसाच्या जगण्यासाठी ते अनिवार्य बनले. जगाचा जवळपास २० टक्के भाग व्यापणारे गवत स्थिर पण निश्चित अस्तित्व कसे टिकवत राहिले, याचे हे अल्पदर्शन आहे. माणूस आणि गवत यांचे नाते मुख्यतः धान्य, अन्न या स्वरुपात म्हणजे जगणे याच स्वरूपाचे आहे. गहू, बार्ली, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, नागली, राळे, सातू ही सारी गवतेच आहेत!! ऊस हेही एक गवत आहे, याची नवीच माहिती मिळते. अन् बांबू हेही एक गवत आहे, हा मुद्दा या लेखाला अनिल अवचटांच्या लेखाशी नात्याने जोडून टाकतो.

‘स्माईली आणि क्रायली’

प्रवीण दवणे यांची ‘स्माईली आणि क्रायली’ मोबाईलने नव्या पिढीला कसे ‘येडपट’ केले आहे, याची झलक दाखवते. सेल्फीने दिलेला ‘सेल्फ सॅडिसिक्षम’ (हा दवणेंचा नवा शब्द) नवी मनोरुग्णता, जीवघेणा ‘किकी डान्स’ ब्लू व्हेल ह्यांनी तरुणाईला कसे ग्रासले आहे, याचा धोकादायक इशारा वाचकाला मिळतो. मानसिक गरजांचे विरेचन करण्यासाठी सशक्त आणि तर्कशुद्ध उपायांची गरज यात अधोरेखित होते.

अंटार्क्टिकाची सफर’

अंटार्क्टिका हे जगप्रवाश्याचे स्वप्न असते. हा प्रवास शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि आर्थिक आरोग्याशी निगडीत आहे, याची आठवण राधिका टिपरे यांचा ‘अंटार्क्टिकाची सफर’ हा लेख करून देतो. त्यांनी या धाडसासाठी थोडेथोडके नाही तर बत्तीस हजार डॉलर्स (गुणिले अंदाजे ६५ बरोबर वीस लाख ऐंशी हजार) मोजले आहेत! पण समाधान त्याच्या कैकपटीचा आहे, हे लेख वाचल्यावर कळून येते. अंटार्क्टिका हे दक्षिण गोलार्धाचे अंतिम टोक. आर्क्टिकच्या विरुद्ध अर्थाचे म्हणून ते नाव आले, अशी मूलभूत माहिती देत लेखिका त्यांच्या जोखीमभऱ्या मोहिमेची सविस्तर माहिती देतात. पेंग्विन, सी लायन्स, सील्स, एलिफंट सील्स हे प्राणी आणि अल्बेस्ट्रॉस, जायंट पेट्रल, स्नो पेट्रल यासारखे समुद्रपक्षी हे मूल रहिवासी असलेले पृथ्वीवरील दुर्गम पर्यटनस्थळ. प्रवासाची संपूर्ण तयारी, भौगोलिक माहिती, प्रवासाचा आरंभ, अंटार्क्टिका मोहिमा, शेवटी व्हेलचा थरार अशी सारी माहिती वाचकाला गुंगवून टाकते. त्यांनी स्वतः काढलेल्या विविध फोटोंनी लेख उत्तम सजवला गेलाय. वाचकाला अंटार्क्टिकाला जाण्याची जबरी प्रेरणा देण्यात लेख यशस्वी झाला आहे.

‘माळढोक वाचले, पण...’

ग्रेट इंडियन बस्टार्डचे मराठी नाव ‘माळढोक’, माळ म्हणजे गवताळ क्षेत्र आणि ढोक म्हणजे कपाळ; म्हणून गवताचे कपाळ आहे तो माळढोक. ‘जिगरबाज गवत’ शी नाते सांगणारा शैलेन्द्र माळोदे यांचा ‘माळढोक वाचले, पण...’ हा लेख माळढोक का सबकुछ बतावतो! मूळचे काश्मीरचे पण माळढोकसाठी सोलापूरच्या नान्नज गावी राहणारे डॉ. बिलाल हबीब, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे माजी संचालक असद रहमानी, माळढोकवर पीएच.डी. पूर्ण केलेले सुतिर्थ दत्ता यांनी घेतलेले श्रम स्पष्ट करताना ब्रिटिश कालखंडापासून माळढोकच्या शिकारीमुळे आज २०१८ साली साऱ्या भारतात जास्तीतजास्त २४९ माळढोक उरले आहेत आणि जतन करणे किती अवघड आहे, आणि त्याचवेळी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचे संबंधित मंत्रालय कसे कसोशीने प्रयत्न केले आहे, याची माहिती वाचकाला सुन्न करते. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘प्रवास म्हणजे विशाल जाणीव’

‘भटकंती’ या विभागाचे मुशाफिर गणेश देवी ‘प्रवास म्हणजे विशाल जाणीव’ असल्याचे अधोरेखित करतात. ‘केल्याने देशाटन...’मुळे ज्ञानात भर पडतेच; पण देशाटन संवेदनशील माणसाला नम्र अन निर्भय बनवते, हा नवा नैतिक मुद्दा देवींच्या लेखातून जाणवतो. प्रवासाने जगाविषयीचा दृष्टीकोन विस्तारतो, तो साहित्यात कसा प्रतिबिंबित होतो याचेही भान देवी देतात. माणसांच्या स्वभावाचे दर्शन झालेला डॉन क्विहोते, इंग्रजी साहित्याचा पहिला बहर प्रवासाचा होता, बाबा पदमजी यांची ‘यमुना पर्यटन’ (१८५७) ते शांतिनाथ देसाईंची ‘मुक्ती’ कादंबरी (१९५७), सुरेश जोशींचा ‘गृहप्रवेश’ कथासंग्रह, इत्यादी सारे भारतीय भाषांमधील साहित्य प्रवास आणि स्थलांतर हे ‘सामाजिक मुक्ती’ चे द्योतक होते. ‘सामाजिक जाणिवा प्रगल्भ’ हे माधव गाडगीळ यांचा लेख देवींच्या लेखाशी जोडला जातो. या साऱ्यांच्या लेखनातून ‘केल्याने देशाटन...’चा निखळ अनुभव येतो.

‘सामाजिक जाणीव प्रगल्भ’

केंद्रात पर्यावरण मंत्रालय निर्माण करण्याची प्रेरणा तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पर्यावरणतज्ज्ञ आणि लेखक माधव गाडगीळ यांच्यामुळे मिळाली, ही महत्त्वपूर्ण माहिती गाडगीळ यांच्या ‘सामाजिक जाणीव प्रगल्भ’ या लेखातून वाचकाला होते. त्यांचे वडील बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ यांनी माधवरावांना भटकंतीची दीक्षा दिली. भटकणे, ह्या छंदालाच व्यवसाय कसा केला आणि त्या व्यवसायालाच सामाजिक जाणिवेचे स्वरूप लाभत गेले, याची थोडक्यात कहाणी या लेखात आहे. पर्यावरण खाते काम करीत असले तरी शासन यंत्रणा अगदी मूळापासून कशी भ्रष्ट आहे आणि तीच आदिवासी, वनवासींचे शोषण कसे करते, हा त्यांचा मुद्दा आजही महत्त्वाचा आहे.          

‘अनुभवसंपन्न खाद्यकहाणी’

‘अनुभवसंपन्न खाद्यकहाणी’ या मृणाल तुळपुळे यांचा लेख खाद्य भटकंतीची मजा आणतो. स्थलदर्शनाबरोबर त्या त्या देशाचा अविभाज्य अंग बनलेला खाद्यसंसारसुद्धा पर्यटकांना कसा पोटभरून अनुभव देतो, याची मांडणी यात आहे. युरोपची त्यांनी केलेली भटकंती वाचकांना वेगवेगळे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ कसे व कुठे मिळू शकतील आणि ते कसे ‘अनुभवावे’ याचे प्रशिक्षण देतात. या लेखात व्हिस्की घातलेली आयरिश कॉफी, रम घातलेली डॅनिश कॉफी जशी भेटते तसा ‘ऱ्हाईन फॉल’ला चक्क आणि झक्क वडापावचा स्टॉल थाटात उभा असतो. देशोदेशीच्या ‘डेलिकसीज’चा अनुभव घेता ‘युरोपात भारतीय जेवणाची विविधता नसते’ हा गैरसमज दूर होतो.

‘रानवाटांचे अनुभव’

‘रानवाटांचे अनुभव’ हा श्रीकर अष्टपुत्रे यांचा लेख भटक्याचे रुपांतर अभ्यासकात कसे होत जाते, याचा दाखला देणारा आहे. ‘निसर्ग हाच एक मोठा ग्रंथ आहे’ ह्या गॅलिलीओच्या वैज्ञानिक कथनाची प्रचीती ते देतात. निसर्गात फिरताना पुस्तकात नसणारे अनेक अनुभव जणू काही आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातात. त्यांची सह्याद्रीची सफर वाचताना निसर्ग आणि वन्यजीव संवर्धन हा मोठा विषय ऐरणीवर येतो. पर्यटकांनी त्याला बाधा न पोहोचवता निसर्गाचा आनंद घेणे आवश्यक आहे, याचे भान वाचकांना येते.                         

‘होरपळलेला युरोप – तेव्हा आणि आता’

पोलंडमधील क्रॅकोव हे गाव जगाला माहित झाले ते ‘शिंडलर्स लिस्ट’ या पुस्तकामुळे आणि चित्रपटामुळे. संजय दाबके यांच्या ‘Now and Then’ ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या छायाचित्रीकरणाच्या मालिकेची सुरुवात  क्रॅकोवमधूनच झाली. ‘होरपळलेला युरोप – तेव्हा आणि आता’ हा त्यांचा लेख महायुद्धाच्या आगीत होरपळून गेलेल्या क्रॅकोव, बर्लिन, मिलान आणि प्राग या गावाची यातनांची कहाणी कथन करतो. क्रॅकोवमधील शिंडलर्स फॅक्टरी, ज्यूंच्या घेटोचे प्रवेशद्वार, बर्लिनमधील ब्रँडेनबर्ग गेट, मिलानमधील मुसोलिनीचे व त्याच्या सहकाऱ्यांचे मृतदेह उलटे टांगलेला चौक, प्रागमधील हायड्रीच मर्डर टर्न, मेथॉडियस चर्च यांची ‘तेव्हाचे आणि आजचे छायाचित्रे’ तुलनात्मक रीतीने मांडून दाखवल्यामुळे हा लेख वाचकाला त्या काळात नेतो आणि कुणाचीही मदत न घेता उद्ध्वस्त झालेला युरोप फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभा कसा राहिला, याची भक्कम जाणीव देतो. असा अभ्यास करणे, तशी त्याकाळातील छायाचित्रे मिळवणे आणि स्वतः त्याजागेवर जाऊन पुन्हा त्या जागा शोधून काढत काढत आत्ता त्या जागांची छायाचित्रे काढणे, हे खऱ्या संशोधकाला शोभणारे अथक कष्ट दाबके यांनी घेतल्याने लेखाची उंची वाढली आहे.

“प्रिय लोकशाही”

विभावरी देशपांडे या प्रसिद्ध अभिनेत्रीने लिहिलेला “प्रिय लोकशाही” हा पत्रलेख संवेदनशील मनाचे प्रतिनिधीत्व करतो. लोकशाही जीवनव्यवस्थेचे शिक्षण प्रत्येक भारतीय कुटुंबातच प्रथम सुयोग्य रीतीने लाभले पाहिजे, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि जबाबदारीची जाणीव तसेच “माझ्या रोजच्या कामात माझी राष्ट्रभक्ती उमटली पाहिजे” हे घटक त्या शिक्षणाचा गाभा असावेत, लोकशाही हरू न देण्याचे आश्वासन तेव्हाच देता येईल, याचे भान वाचकात जागवण्याची ताकद या पत्रात आहे.     

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

कथा

कथा विभागात ‘प्यार की राह दिखा दुनिया को’ ही लक्ष्मीकांत देशमुख आणि “दुवा : एक ओंकार कथा” ही गौतम पंगू या दीर्घकथा दहा पानांच्या तर ‘पावसाळा’ ही अभिजित आपटेंची लघुकथा केवळ एका पानाची आहे.

‘प्यार की राह...’ ही काश्मीरमधील एका मुस्लिम युवकाच्या दहशतवादविरोधाची कथा आहे. त्याची मानसिक आंदोलने आणि देशाप्रती असलेल्या नैतिकतेची परिमाणे अचूकपणे टिपली गेली आहेत. ‘पावसाळा’ ही एकपानी गूढकथा मुळात वाचण्यासाठीच असल्याने त्या गूढाला वाचकांनी थेट भिडणे आवश्यक आहे. पृथ्वीला आणखी एक चमचम चांदीचा चंद्र पृथ्वीला मिळाला तर काय बहार उडेल, याची कल्पना ‘आकाशीचा चंद्र नवा’ ह्या श्रीनिवास शारंगपाणी यांची वैज्ञानिक कथेत आढळते आणि भारतीय वैज्ञानिकाने हा शोध लावल्याने भारताला ही चांदी मिळेल, असे भाकीत त्यात असल्याने भारताची चांदी होण्याची संधी आढळते. जनमनात विषासारखी भिनलेली अंधश्रद्धा स्त्रियांचा बळी कशी मागते, याची करूण कहाणी अभिजित पेंढारकर यांची ‘प्रायश्चित्त’ ही कथा सांगते.

“दुवा : ...” ही लग्न ठरलेल्या जोडप्याची कथा आहे. भावी पतीला कर्करोग झाल्याचे समजल्याने उभयतांच्या मनाची घालमेल आणि कर्करोगावर आधुनिक वैद्यक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय असा विषय आहे. त्यांचा बिघडू पाहणारा संसार ओंकार हा तिसरे पात्र सावरते, महत्त्वाची भूमिका बजावते, म्हणून ही ओंकार कथा.     

मैफल कवितांची

मैफल कवितांची जमवली आहे ती संदीप काह्रे, अंजली कुलकर्णी, इंद्रजित भालेराव, रेणू पाचपोर, संतोष शेणई, ऐश्वर्य पाटेकर, रवींद्र दामोदर लाखे, दुर्गेश सोनार, प्रथमेश किशोर पाठक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, सुनील ज्ञानदेव कापसे, रामन रणदिवे, आश्लेषा महाजन, एकनाथ आव्हाड, आसावरी काकडे, शिरीन म्हाडेश्वर, संजय बोरुडे, प्रकाश होळकर ह्या आघाडीच्या कवींनी. प्रत्येकाच्या कविता नवीन काहीएक निश्चित विधान देवून जातात. त्या मुळातून अनुभवणे हाच आनंदाचा मार्ग आहे.    

प्रकाशन : सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड

संपादक संचालक : श्रीराम जयसिंगराव पवार

मुद्रक – प्रकाशक : राहुल मोतीकुमार गडपाले

सहसंपादक : ऋता मनोहर बावडेकर

संपादन साह्य : रोहित रत्नाकर हरीप, रोशन सुरेश मोरे

मांडणी-सजावट: वैभव विनय वनारसे, विशाल महादेव भगत

मूल्य :  ११० रुपये

मुखपृष्ठावरील छायाचित्र : पर्ण पेठे, छायाचित्र : नुपूर नानल, लुक डिझाईन : जान्हवी जठार

.............................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......