तुमची दैवते कोणती, तुमचे गोत्र कोणते असल्या भाकडकथांनी देश प्रगती कधीच करत नसतो!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • अयोध्येतील राममंदिराचा संकल्पचित्र
  • Mon , 03 December 2018
  • पडघम देशकारण राममंदिर Ram Mandir भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi संघ RSS

निवडणुकांच्या निमित्ताने का होईना सध्या सर्वच राजकीयजनांना आपण हिंदू असल्याचा आत्मसाक्षात्कार होतोय, ही बाब समाधानकारक मानावी लागेल. विशेषत: राजकीय पक्षाच्या प्रणेत्यांना आपल्यातल्या या चिरंतन प्रवाहाची आठवण व्हावी यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. सत्ताधीशांचा धर्म तसा निराळा असतो. तरीसुद्धा त्यांना आपला पिंडधर्म आठवावा हे सुखावह आहे.

लोकशाहीत तर सत्ताधीशांचा धर्म अधिक उत्तरदायित्वाचा, जबाबदारीचा असतो. जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे दैनंदिन जगणे सुखकर व्हावे यासाठी जनता मतदार बनून तुमची निवड करत असते. सरकार बनवण्याची संधी प्रदान करत असते. अशी संधी मिळाल्यानंतर सत्ताधीशांनी राजकीय धोरणनिर्धारण म्हणून जनतेच्या आशा-आकांक्षा सिद्धीस न्यावयाच्या असतात. मतदारांच्या अडी-अडचणींचे निराकरण करून त्यांना सन्मानपूर्वक जगता येईल अशा रीतीने या सत्तेचा सदुपयोग करायचा असतो.

सत्तेची संधी मिळालेल्यांसाठी जनतेने टाकलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे, त्यांच्या विश्वासाला जागणे हाच धर्म असतो. या प्राधान्यक्रमाला वा प्राधान्याने केल्या जाणाऱ्या कर्माला राजधर्म असे संबोधले जाते. हा राजधर्म पाळला जावा अशीच मतदारांची अपेक्षा असते. भारतीय राज्यघटनेत या राजधर्माच्या पालनाबाबतचे यथासांग मार्गदर्शन केलेले आहे. बरे सध्या राजकीय पक्षांकडून ज्या हिंदू धर्माचा गजर केला जात आहे तो हिंदू धर्मही अशा राजधर्माच्या काटेकोर पालनाचाच आग्रह धरत आलेला आहे.

हिंदू असणे काय असते? हिंदुत्व काय असते?, हिंदू असणे म्हणजे नेमके काय?  हिंदू धर्म परंपरा काय आहेत? हिंदू धर्म ज्या जगत्कल्याणाची भाषा- परिभाषा मांडतो हे सर्व समजून घेण्याची आस जगाला अनादिअनंत काळापासून लागलेली होती. आजही या शाश्वत मानवतावादी जीवनप्रवाहाबाबत या विश्वाला असणारे कुतुहल संपलेले नाही. प्रश्न आहे तो भारतात सत्तास्पर्धेत रंगलेल्यांच्या धर्मश्रद्धा पालनाचा आणि हिंदुत्व समजून घेण्यामागच्या त्यांच्या अंतस्थ हेतूंचा. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचे निर्वाहन करताना आपल्या प्रजाजनांची जात-धर्म, जीवनश्रद्धांचा विचार करावयाचा नसतो. त्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता केवळ ‘इदं न मम’ या तत्त्वाने करायची असते. निवडणुकीच्या मोसमात भारतातील यच्चयावत राजकीय धुरिणांना नेमका या तत्त्वाचा विसर पडतो अन् ते स्वत:च जात, धर्म, गोत्र शोधत बसतात. दुर्दैवाने याला कोणीही अपवाद नाहीत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे. या सरकारला आपण या कार्यकाळात काय केले हे अथवा येत्या पाच वर्षांच्या काळात काय करणार आहोत हे सांगण्यात कुठलाच रस नाही. याऐवजी ते धार्मिक मुद्यांना हात घालत आहेत अथवा आपण सत्तेवर येण्यापूर्वी काय नव्हते याचा हिशेब मांडण्यात व्यस्त आहेत. तर विरोधकांनाही या सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमधील उणिवांपेक्षा धार्मिक अस्मितेची भुरळ पडताना दिसते आहे. त्यामुळे गत चार-साडेचार वर्षांच्या काळात झालेल्या विकास प्रकल्पांची, लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची अवस्था काय व कशी आहे? हे बघायलाच कोणी तयार नाही. या सरकारच्या कर्तृत्वाचे मोजमाप, यशापयशावर साधकबाधक चर्चा होण्याच्या शक्यताच दिसून येत नाहीत.

आर्थिक विकासाचे दावे करताना सत्ताधाऱ्यांकडून संख्याशास्त्राचा आधार घेतला जातो वा आकडेवारी उद्घृत केली जाते. राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची नावे पुन:पुन्हा तोंडावर फेकली जातात. पण किती लोकांच्या जगण्यात सकारात्मक परिवर्तन आले?, किती जणांची जीवनशैली उंचावली? याबाबत व्यवस्थितरीत्या चर्चा होणे संभवतच नाही. विरोधकांनाही त्यात फारसे स्वारस्य असल्याचे दिसत नाही. अन्यथा गत आठवड्यातल्या  राजधानी दिल्लीतल्या दोन महत्त्वपूर्ण घडामोडींकडे असे दुर्लक्ष झाले नसते. अयोध्येत राममंदिर उभारणीची घाई झालेल्या मंडळींनी आयोजित केलेल्या शक्तिप्रदर्शनाकडे जनसामान्यांनी केलेले सपशेल दुर्लक्ष आणि शेतकऱ्यांनी संसदेवर काढलेला मोर्चा या त्या दोन संवेदनशील घटना आहेत.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दीडपटीने वाढ करण्याचे सरकारचे आश्वासन किती फसवे आहे याचा पुरावा म्हणून एका कांदाउत्पादक शेतकऱ्याने कांद्याचे पैसे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवले आहेत. जगाच्या पोशिंद्याला उपाशी ठेवून तुम्हाला धर्म कसा जोपासता येणार आहे? मुळात हे तुमच्या राजधर्माला शोभून दिसणारे आहे का? हा सवाल कोणीतरी या सरकारच्या कानावर घालायलाच हवा. पिकवण्यासाठी घातलेले पैसेही उत्पन्नातून निघत नसतील तर सरकारचे  किमान आधारभूत मूल्याचे अवडंबर किती पोकळ स्वरूपाचे आहे याचा आणखी कोणता पुरावा द्यायला हवा आहे? जनतेला आता तुमच्या धार्मिक अस्मिता कवटाळण्याच्या चालीरीती पुरत्या उमगलेल्या आहेत. तुमची दैवते कोणती, तुमचे गोत्र कोणते असल्या भाकडकथांनी देश प्रगती कधीच करत नसतो.

मंदिरातल्या रामापेक्षा जनतेच्या आयुष्यातला, त्यांच्या जीवनशैलीतला राम जागा करण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची नाही का? राजधानीत धडकलेल्या शेतकऱ्यांनी सरकारला हे सांगूनही राजकीय पक्षांनी आपला अजेंडा बदललाच नाही तर येत्या निवडणुकीत या लोकांना वनवासात धाडण्याची शक्यता अधिक आहे. लोकांचे आणि स्वत:चे धर्म उगाळत बसण्यापेक्षा नियत कर्तव्ये पार पाडावीत, राजधर्माचे प्रामाणिक पालन करावे हेच उत्तम नाही काय?

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......