अजूनकाही
‘कुळवाडीभूषण शिवराय’ या श्रीकांत देशमुख यांच्या पुस्तकाला डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा संपादित अंश...
तुकोबा आणि जोतिबा यांच्यामधील आंतरिक नातं उलगडलं की तिथून शिवबा हा टप्पा फार दूर नसतोच. किंबहुना तो अटळ असतो. श्रीकांत देशमुखांसारखा शासकीय यंत्रणेचा हिस्सा होऊन राज्यशकट चालवणाऱ्या जागरूक व्यक्तीची तर तो जणू वाटच पाहत असतो. ‘कुळवाडीभूषण शिवराय’ हे पुस्तक देशमुखांच्या विचारप्रवासाचं एक पायाभूत चिंतन झाल्याचा संकेत समजायला हरकत नाही.
तुकोबा आणि शिवबा यांच्यामध्ये हे जोतिबा कसे काय आले, असा प्रश्न एखाद्याला पडणं शक्य आहे. देशमुखांच्या पुस्तकाचा विषय ‘शिवाजी’ हा आहे. तरीही यात या प्रश्नाचं निराकरण होईल इतकी क्षमता निश्चितच आहे. तुकोबांना ‘शेतकऱ्यांचा संत’ आणि शिवरायांना ‘शेतकऱ्यांचा राजा’ म्हणून ओळखणारा पहिला माणूस म्हणजे जोतीराव फुले. जोतीरावांनीच शिवाजीराजांना ‘कुळवाडीभूषण’ असं संबोधलं. शिवाजी म्हणजे शूद्रातिशूद्र रयतेचा राजा अशी भूमिका घेतली. देशमुखांचं हे पुस्तक जोतीरावांच्या या लोकविलक्षण शब्दावरील स्वतंत्र भाष्यच होय.
जोतीरावांचा छत्रपती शिवाजीराजे यांच्यावरील पोवाडा १८६९ मध्ये प्रकाशित झाला. या पोवाड्यात जोतीरावांनी शिवचरित्राचा एक वेगळा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला. परंतु यासंबंधीची त्यांची भूमिका कितीतरी आधी म्हणजे १८५५ मध्येच सिद्ध झालेली दिसते. त्यांच्या ‘तृतीय नेत्र’ या नाटकातील विदूषक म्हणतो “ब्राह्मणाने इतर शूद्र आणि अतिशूद्र जातींवर केलेली विद्याबंदी उठवून त्यांना शिकवून शहाणे करण्याकरिता ईश्वराने या देशावर इंग्रजांना पाठविले आहे. शूद्रादि अतिशूद्र शिकून शहाणे झाल्यावर ते इंग्रजांचे उपकार विसरणार नाहीत व मग पेशवाईपेक्षा शंभर पटीने इंग्रजी राज्य पसंत करतील. पण पुढे जर मोगलांप्रमाणे इंग्रज लोक देशातील प्रजेला छळतील तर विद्या शिकून झालेले शूद्र-अतिशूद्र लोक पूर्वी शूद्रांत झालेल्रा जहाँमर्द शिवाजीप्रमाणे आपले शूद्रादि-अतिशूद्रांचे राज्य स्थापून अमेरिकेतील लोकांप्रमाणे आपला कारभार आपणच पाहतील.”
जोतीराव इथं शिवाजीचा उल्लेख ‘शूद्र’ असा करतात व शिवाजीचं राज्य शूद्रातिशूद्रांचं राज्य असल्याचं, इतकंच नव्हे तर ते ‘लोकांचं राज्य’ असल्याचंही सूचित करतात. हेच सूत्र घेऊन पुढे त्यांनी पोवाडा लिहिला हे उघड आहे.
इ.स. १८१८ साली पेशवाई बुडून मराठी राज्य नष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुज्ञ लोक साहजिकपणे पारतंत्र्यातील आशेचा किरण म्हणून पूर्वेतिहासातील शिवाजीराजांची आठवण करू लागले. आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दिग्दर्शन’ या मासिकाच्या मे १८४० च्या अंकात शिवाजीराजांच्या मोठेपणाचे व वर्तमान काळातील संदर्भतेचं सूतोवाच केलं. “शिवाजीने आपल्या राज्याच्या बंदोबस्तार्थ जे कायदे केले त्या धोरणाने काही थोडा बहुत अजून राज्यकारभार चालला आहे. म्हणोन तो प्रकार आदी समजणे अवश्य आहे,” असं सांगून त्यांनी शिवाजीराजांनी केलेल्या कायद्याचा उल्लेख केला. यात “प्रतिवर्षी शेताची पाहणी करून जमेचा आकार ठरवावा. तो असा की, रयतेस तीन वाटे देऊन दोन वाटे सरकारांत वसूल घ्यावा. पूर्वी मुसलमानांच्या राज्यात मखत्याने मामलकी सांगण्याची रीती पडली होती. तिजमुळे मक्तेदारांपासून रयतेवर जुलूम होऊन रयतेस सुख होत नसे. हा सर्व प्रकार ध्यानात आणून त्याने मुसलमानांपासून जो मुलूख जिंकला होता त्यात ती मखत्याची चाल मोडून टाकली. शिवाजीचे पदरी जे सरदार होते ते त्यास अशी मसलत देत असत की, फौजेचा खर्च परभारा गावांवर तोडून द्यावा. परंतु तसे केल्याने सरदारांचे प्राबल्य वाढेल व रयतेस उपद्रव होईल. त्यामुळे त्याप्रमाणे कधी केले नाही. शिवाजीमहाराज यांची रिती फारशी जाहागिरी देण्याची नव्हती, कारण मुलुखांत जाहागिरदार फार झाल्यास त्यानेकरून सरकारचा अमल कमी होतो. त्यात संतुष्ट होऊन कोणास वंशपरंपरा जाहागिरी देणे, हे तर सर्वथा नव्हतेच. स्वारांबद्दल किंवा चाकरीच्या संबंधाने कोणास जातीने क्वचित देत असत. कदाचित वयात देणे झाल्यास मामलदारांवर द्यावी, गावगना देण्याची रिती नव्हती. कारण तशाने रयतेस इजा होती. हे तर काय, परंतु त्याचे राज्यात सरकार परवानगीशिवाय देशमुख, देशपांडे वगैरे यांसही आपले हक्काचा वसूल घेण्यास अखत्यार नसे. शिवाजीच्या राज्यांत हर एक फिर्रादीची पंचाइत करून इनसाफ करीत असत व धर्मशास्त्राप्रमाणे कज्जांचे फैसले होत असत.”
शिवराज्याची रंत्रणा ही कशा प्रकारे रयतेच्या हितासाठी राबवली जात होती, याकडे जांभेकरांचं लक्ष गेलं. या प्रकारच्या सर्व निरीक्षणांचं आणि मुद्द्यांचं सैद्धान्तिक सार लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ‘राज्यक्रांती’ असं करून काढलं. लोकहितवादींनीच संत तुकारामांची तुलना ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस याच्याशी करून तुकारामविषयक चर्चेस चालना दिली. मात्र शिवाजी आणि तुकोबा यांच्यातील नातं लोकहितवादींच्या लक्षात आलं नाही. ते श्रेय फुल्यांनाच दिलं पाहिजे. शिवछत्रपतींच्या कार्याचं वर्णन धर्मनिरपेक्षपद्धतीनं करण्याचा प्रयत्न राजारामशास्त्री भागवत यांनी केला. तो करताना त्यांनी शिवरायांच्या ‘मराठपणा’वर अधिक भर दिला.
एकोणिसाव्या शतकातील विचारविश्वावर तुकोबांचा प्रभाव लक्षणीय आहे. आणि तो केवळ एकट्यादुकट्या विचारवंतापुरता मर्यादित नसून धार्मिक, सामाजिक चळवळींना कवेत घेणारा होता. जोतीराव फुल्यांचा सत्यशोधक समाज आणि न्या. रानडे यांचा प्रार्थना समाज या दोन्ही समाजांसाठी तुकोबा आदर्श नायक व मार्गदर्शक ठरले. विशेष म्हणजे रानड्यांनी मराठी सत्तेच्या उदयाच्या मीमांसेत स्वराज्याचे प्रवर्तक शिवाजीमहाराजांबरोबर त्यांच्यासाठी योग्य ती पूरक पार्श्वभूमी निर्माण करणाऱ्या मराठी संतांच्या उपदेशालाही स्थान दिलं. भागवत आणि रानडे यांच्या मांडणीतून महाराष्ट्र धर्माची संकल्पना पुढे आली. भागवतांप्रमाणे रानड्यांनीही शिवचरित्राचा अन्वयार्थ लावताना त्यांच्या धर्मनिरपेक्षतेकडे विशेषत: हिंदू व मुसलमान धर्मांकडे पाहण्याच्या समदृष्टीकडे लक्ष वेधलं. रानडे-भागवतांचा लेखनप्रपंच हा फुल्यांच्या पोवड्यानंतरचा आहे. तथापि आपण शिवचर्चेच्या समग्र विश्वात डोकावत असल्यामुळे त्याचा विचारही अवश्य ठरतो.
देशमुखांनी विशेषत: महात्मा फुल्यांना वाट पुसत शिवरायांचं ‘कुळवाडी भूषण’ हे रूप समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अनुषंगानं त्यांनी अनेक मतमतांतरं विचारात घेऊन त्यांचा ऊहापोह केला आहे. ‘शिवरारांना समजून घेणं’ हाच त्यांचा प्रोजेक्ट आहे. शिवरारांकडे एक मुत्सद्दी, संवेदनशील लोकनेता म्हणून ते पाहतात.
शिवरारांची कामगिरी, योगदान आणि स्थान नेमकेपणानं समजून घ्यायचं झाल्यास तत्कालीन समाजव्यवस्था समजून घ्यायला हवी, हे वेगळं सांगायला नको. समाजव्यवस्था ही मुख्यत्वे अर्थव्यवस्थेवर म्हणजे उत्पादनाच्या आणि वितरणाच्या व्यवस्थेवर आधारित असते हेही सर्वमान्य आहे. ही व्यवस्था म्हणजे समाजरचनेचा भौतिक पायाच होय. मार्क्सवादी पद्धतीनं विचार केला तर तेव्हा मध्ययुगीन सरंजामशाही होती असे म्हणता येते. देशमुखांनी या व्यवस्थेची चर्चा ‘शिवकालीन गावगाडा’ या प्रकरणात केली आहे. हा गावगाडा बलुतेदारीवर आधारित होता. पण अंतिमत: बलुतेदारी ही जातिव्यवस्थेवरच आधारित होती.
योगायोगानं शिवाजीराजांचा जन्मच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाला. त्यामुळे कळायला लागल्यापासूनच दुष्काळ, अवर्षण, शेतकऱ्यांची दैना याविषयीची बोलणी त्यांच्या कानी पडतच असणार. या थोरल्या दुष्काळावर देशमुखांनी एक प्रकरण लिहिलं आहे. याच दरम्यान पुणे-सुपे प्रांत शहाजीराजांना अर्जानी झाला. त्यातील कार्यात मावळचा भाग त्यांनी बालशिवाजीच्या नावे पोटमोकासा करून दिला. तत्कालीन व्यवस्थेनुसार शहाजीराजांनी विजापूरच्या आदिलशहाच्या वतीने या प्रांताचा कारभार पाहायचा होता व बालशिवाजीनं शहाजीराजांच्या वतीनं. त्याचा परिणाम म्हणून बालशिवाजीला अर्थातच बालवयातच येथील परिसर आणि प्रजा यांची प्रत्यक्ष ओळख झाली. रयतेचे हाल कसे होतात. त्यात निसर्गाचा वाटा किती, मानवाच्या म्हणजे वतनदार सरकारी अधिकाऱ्याचा हात किती याचं जवळून दर्शन झालं. १६२८-१६३० या दरम्यान महाराष्ट्राचं संकट होऊन आलेल्या दुष्काळानं एका बाजूला संत तुकारामांना घडवलं तर दुसल्या बाजूला शिवाजीराजांना. शिवरायांनी केलेल्या “प्रयोगाचे स्वरूप सकृत्दर्शनी राजकयर दिसत असले तरी त्याचा पाया हा मूलत: आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक स्वातंत्र्याचा होता,” हे देशमुखांचं विधान मध्ययुगातील परिस्थितीशी विसंगत वाटत असलं तरी शिवाजीराजांविषयी ते सत्य आहे.
आपल्रा सैनिकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अशी शिवरायांची सैन्याला सक्त ताकीद होती. देशमुख सांगतात “कृषिप्रधान समाजाचा विचार राजांनी वारंवार केला आहे. शेतकऱ्याला महत्त्वाचे काय, शेतीला महत्त्व कशाचे, याचा स्वत: कुणबी होऊन विचार केला तरच कळेल.” शिवाजीराजे असा विचार करत होते. देशमुख त्यांचा ‘कृषक समाजाप्रती’ असलेल्या विलक्षण संवेदनशीलतेवर अचूक बोट ठेवतात. राजसत्तेनं ‘कुणबीया कुणबीयाची खबर घ्यावी’ असं धोरण ठेवणारा हा एकमेवाद्वितीय राजा होय.
शिवरायांचं ‘कुळवाडीभूषण’ असणं सिद्ध करण्यासाठी देशमुख सभासदाच्या बखरीबरोबर रामचंद्रपंत अमात्रांच्या ‘आज्ञापत्रा’चाही योग्य तो उपयोग करून घेतात. ही बखर आणि आज्ञापत्र यांच्यात एक लक्षणीय सुसंगतता आहे. सभासद व अमात्य या दोघांनीही शिवरारांना त्यांच्या परिपक्व काळात जवळून पाहिलं होतं व त्यांच्या राज्यकारभाराचं मर्म जाणलं होतं.
शिवरायांच्या शेतीविषयक धोरणाची स्वतंत्रपणे चर्चा केल्यानंतर देशमुख जोतीराव फुल्यांच्या मांडणीकडे वळतात. पद्धतिशास्त्राचा विचार केला असता हे योग्यच आहे. या चर्चेमागचा मुख्य आधार अर्थातच जोतीरावांनी १८६९ मध्ये प्रसिद्ध केलेला शिवाजीमहाराजांवरील पोवाडा आहे. शिवाजीराजांकडे शूद्रांचा व कुणब्यांचा राजा म्हणून पाहणारे फुले हे पहिलेच प्रतिभावंत होते. “कुणबी, महार, मांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षेत्र्यांच्या उपरोगी हा पडावा” असा फुल्यांचा हेतू होता. शेती आणि शेतीशी संबंधित कामं करणाऱ्या जातींना फुले क्षेत्री अथवा क्षत्रिय ठरवतात.
जोतीरावांनी लिहिलेल्या या पोवाड्यामागची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. दक्षिणा प्राईज कमिटीनं शिवाजीराजांवर काव्यरचना मागवून त्यांना बक्षिसं देण्याचं जाहीर केलं होतं. अण्णा किर्लोस्कर, कुंटे, फुले, लेले अशा कवींनी आपापल्या रचना पाठवल्या. त्यात स्वतंत्र म्हणता येतील अशा रचना महादेव मोरेश्वर कुंटे आणि फुले यांच्याच होत्या. कुंट्यांच्या महाकाव्यात मराठी भाषा आणि मराठीपणा यावर भर दिला गेला होता. संस्कृतचा अभिमान बाळगणारे शास्त्रीपंडित आणि इंग्रजीच्रा मोहात पडलेले नवशिक्षित मराठी भाषेला व सर्वसामान्य मराठी माणसाला तुच्छ लेखत. आपल्या काव्याच्या प्रस्तावनेत कुंट्यांनी या तुच्छतावादी लोकांवर टीकेचे प्रहार केले. यादृष्टीनं कुंटे त्यातल्या त्यात फुल्यांच्या जवळ येतात. तथापि कुंटे भाषिक आणि सांस्कृतिक पातळीवर रेंगाळतात. सर्वसामान्य मराठी माणसाविषयी आस्था प्रगट करताना ते जातीय विश्लेषणाच्या शोषणाच्या खोल पाण्यात उतरत नाहीत. फुले ज्याप्रमाणे सर्वसामान्य कुणब्यांना समजतील असेच शब्द जाणीवपूर्वक निवडून निवडून वापरतात, त्याचप्रमाणे कुंट्यांनीही संस्कृतप्रचुर शब्द मुद्दाम टाळून काव्यात्म न वाटणारे खडबडीत-ओबडधोबड शब्द ठरवून वापरले. कुंट्यांच्या सर्वसामान्य माणसाविषयीच्या आस्थेला दाद द्यायला हवीच. परंतु जेव्हा ही बाब सांस्कृतिक, भाषिक पातळीवरून जातीय-भौतिक पातळीवर पोहोचते, तेव्हा कुंट्यांच्या मर्यादा उघड्या पडतात. हंटर कमिशनपुढे साक्ष देताना कुंट्यांनी महारमांगादि खालच्या जातींच्या मुलांच्या शिक्षणाविषयी जी मतं व्यक्त केली त्यावरून हे स्पष्ट होतं. साधेसोपे देशी मराठी शब्द वापरण्यात कुंट्यांनी मराठीचा अभिमान प्रगट केला खरा; पण महाकाव्यासाठी त्यांनी केलेल्या संस्कृतनिष्ठ वृत्तांच्या निवडीवरून ते संस्कृतच्या प्रभावापासून पुरेसे मुक्त होऊ शकले नव्हते, असंच म्हणावं लागतं. याउलट फुल्यांनी ‘पोवाडा’ हा अस्सल मराठी छंद वापरून मराठीपणा पूर्णत्वास नेला. कुंट्यांनी आपल्या शिवकाव्याच्या प्रस्तावनेत आधुनिक मराठी कवितेचं सैद्धान्तिक विवेचन अतिशय उत्तमरीतीनं केलं, परंतु त्याची प्रत्यक्ष लिखाणात, काव्यनिर्मितीच्या व्यवहारात पूर्ण अंमलबजावणी करण्यात ते कमी पडले. फुल्यांनी असं सिद्धान्तन केलं नाही. प्रत्यक्ष निर्मिती मात्र यशस्वीरीत्या करून दाखवली.
१८६९ साली अशा प्रकारची शिवकाव्यं लिहिली गेली, तोपर्यंत महाराष्ट्रात शिवचरित्राच्या संशोधनानं व चर्चेनं मूळ धरलं नव्हतं. ग्रँट डफनं लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हाच शिवचरित्राचा व शिवचर्चेचा मुख्य आधार होता. शिवाजीराजांची गोब्राह्मणप्रतिपालक ही प्रतिमा अद्याप पुरेशी ठसठशीत झालेली नव्हती. चिपळूणकर, कीर्तने, साने, राजवाडे यांचा उदय अद्याप व्हायचा होता. तथापि रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू असल्याची समजूत मात्र प्रचलित होती. या पार्श्वभूमीवर फुल्यांच्या पोवाड्याचा विचार केला असता फुल्यांची मांडणी आज जेवढी प्रतिक्रियात्मक वाटते तितकी ती नव्हती, असं म्हणणं भाग पडतं. फुल्यांचा शिवचरित्राचा अन्वयार्थ सकारात्मक असण्यास फार महत्त्व आहं असं मला वाटतं.
शिवाजीमहाराजांचा जयजयकार आपण कितीही उच्च स्वरात करत असलो तरी आपलं एकंदर वर्तन पाहता “शिवाजीचे नाव घेत आपण शिवाजीच्या समकालीन विरोधकांच्या भूमिकेत वावरत आहोत,” या निष्कर्षापर्यंत देशमुख येतात ते कोणाला धक्कादायक वाटेल. पण दुर्दैवानं त्यात तथ्यांश आहे. मोडू घातलेला गावगाडा दुरुस्त करून पुन्हा मार्गी लावायच्या ऐवजी, या थोर नेत्यांना आपापल्या जातींच्या अस्मितांची प्रतीकं करून मिरवण्यातच आपला पुरुषार्थ वाढत चालला आहे. पण नेमक्या याच कारणामुळे देशमुखांच्या पुस्तकाचं महत्त्व वाढलं आहे. ज्या गोष्टीचा उच्चार सहसा कोणी करत नाही तो करण्याचं धैर्य देशमुखांनी दाखवलं. या धैर्याला व्यासंगाची व सखोल चिंतनाची जोड दिली. चिंतनात आत्मटीकेलाही स्थान दिलं आहे. तात्पर्य, ‘हा तो नव्हे निराशेचा ठाव’ असं मानून आपली परंपरा बळकट करण्यावर भर दिला पाहिजे, एवढंच या पुस्तकाच्या निमित्तानं म्हणून देशमुखांच्या पुढील वाटचालीसाठी शुभ चिंतितो.
कुळवाडीभूषण शिवराय - श्रीकांत देशमुख, हर्मिस प्रकाशन, पुणे, पाने – १३२, मूल्य – १४० रुपये.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment