ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. या जयंती वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जात आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो. (काल ‘अक्षरनामा’ला सुट्टी असल्याने हा लेख आज प्रकाशित करत आहोत.) या मालिकेतला हा चौतिसावा लेख... ७ ऑक्टोबर २०१८ रोजी अ.भा. मराठी साहित्य महामंडळ व वि. सा. संघ द्वारे सेवाग्राम इथं आयोजित ‘गांधीविचार व मराठी साहित्य’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात केलेले बीजभाषण...
.............................................................................................................................................
गांधीजी आणि कस्तुरबा ह्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमाच्या परिसरात ‘गांधीविचार आणि मराठी साहित्य’ ह्या विषयावर हे चर्चासत्र घडवून आणणाऱ्या आयोजकांचे मनःपूर्वक आभार! ह्या चर्चासत्रात मराठी काव्य, कथात्म साहित्य व वैचारिक साहित्य ह्यावर दीर्घ निबंध सादर होणार आहेत. म्हणून मी बीजभाषणातून प्रत्येक साहित्यप्रकाराचा आढावा न घेता गांधीविचार व मराठी साहित्य ह्यांच्या परस्परसंबंधात मला पडलेले काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करू इच्छितो.
भाषणाची सुरुवात मी एका गांधीसमर्थक नसणाऱ्या प्रतिभावंत कवीच्या कवितेने करणार आहे. सत्तर वर्षांपूर्वी मर्ढेकर म्हणाले होते –
“अशीच जावी काही वर्षे
आणि महात्मा यावा पुढचा
आम्हांस आम्ही पुन्हा पहावे
काढून चष्मा डोळ्यांवरचा”
पुढचा महात्मा केव्हा येईल हे कोणालाच सांगता येणार नाही. पण बा-बापूंच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने मराठी सारस्वतविश्व आपला चष्मा पुसून गांधींबद्दल पुनर्विचार करणार आहे का, हा मला पडलेला पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे.
गेल्या १०० वर्षांत मराठी साहित्याने गांधी व्यक्ती व विचार ह्यांना कसा प्रतिसाद दिला, व त्यामागची कारणमीमांसा काय होती, हे अर्थातच ह्या बीजभाषणाचे प्रमुख सूत्र असणार आहे. साररूपात मी म्हणेन की गांधींच्या जीवन-कार्याचा मराठी जनमानसावर अतिशय खोल व व्यापक परिणाम झाला. त्यांच्या चळवळीत तनमनधन झोकून देणारे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रात निर्माण झाले. रचनात्मक कार्याच्या बाबतीत तर ‘महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे’ असे खुद्द गांधीजी म्हणाले होते. गांधीविचारांचे साक्षेपी विवेचन करणारे पहिल्या पिढीतील स्वतंत्र विचारकही ह्या भूमीत जन्मले. असे असले तरी महाराष्ट्राच्या प्रस्थापित साहित्यिक परंपरेने गांधींना कधीही आपले मानले नाही. त्यांचा विरोधच नव्हे, तर त्यांची कुचेष्टा व निंदा करण्यात मराठी साहित्यिकांनी आणि येथील तथाकथित बुद्धिमंतांनी धन्यता मानली. आजही गांधीजींवर कमरेखालचे वार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याची कारणमीमांसा आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यासाठी गरज पडल्यास मराठीच्या साहित्येतिहासाची झाडाझडतीही घेतली पाहिजे.
गांधीजींविषयी तुमचे मत काहीही असो, त्यांच्याविषयीची काही तथ्ये तुम्हाला डावलून चालणार नाहीत. गांधी हे गेल्या दोन शतकातील जगातील सर्वाधिक चर्चित व्यक्तिमत्त्व आहे. जगातील शंभरहून अधिक देशांत गांधींची स्मारके आहेत – त्यांच्या नावाचा रस्ता, पुतळा, पोस्टाचे तिकीट... कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गांधीजींची स्मृती हे देश जपत आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत. कारण जगातील कोणत्याही विचारकाला किंवा कार्यकर्त्याला अभिनव वाटणारा विचार ह्या म्हाताऱ्याने १०० वर्षांपूर्वीच केवळ सांगितलेलाच नसतो, तर अंमलातही आणलेला असतो. म्हणूनच त्याच्या कट्टर विरोधकांनाही त्याला ‘प्रातःस्मरणीय’ म्हटल्याशिवाय गत्यंतर नसते. आईनस्टाईन गांधींबद्दल असेही म्हणाला की, “जे कार्य भगवान बुद्धाने सुरू केले, ते गांधींनी पूर्णत्वास नेले.” गांधीहत्येनंतर एक ख्रिश्चन तत्त्वज्ञ म्हणाला, “येशू ख्रिस्तानंतरचा एकमेव ख्रिश्चन आज मृत्युमुखी पडला.” बुद्ध-ख्रिस्ताशी होणारी ही गांधींची तुलना अनाठायी नव्हती. गांधींच्या मृत्युनंतर किंवा त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी सर्व जगाने त्यांचा सन्मान केला, त्याच्या मुळाशी गांधी ह्या ‘महात्म्या’विषयीचा अपरंपार आदरभाव होता.
पण त्याच वेळी जग असेही मानत होते की हा ‘संत’ असेल, पण ‘आजच्या’ काळाचा तत्त्वज्ञ नाही, ह्या जगाची रचना समूळ बदलू शकेल अशा ताकदीचा हा माणूस नाही. संत माणसांना ‘आतून’ बदलवतो, पण जग बदलण्यासाठी त्याची पायाभूत रचना, त्यातील सत्तासंबंध बदलणे गरजेचे असते. गांधींचे सत्य व अहिंसेचे तत्त्वज्ञान कितीही उदात्त असले, तरी ते अव्यावहारिक व सत्तासंबंधांवर आधारलेली ‘बाह्य’ सामाजिक-राजकीय रचना बदलण्यास असमर्थ आहे, असे सारे जग १९४८ किंवा १९६७ सालीही मानत होते. कारण त्या काळात ह्या जगात मार्क्सवादाच्या रूपाने भांडवलशाहीला आव्हान देणारे एक सशक्त तत्त्वज्ञान उभे होते. अर्ध्या जगाचा चेहरामोहरा त्याने बदलला होता व उरलेल्या अर्ध्या जगाला ‘मानवी’ चेहरा स्वीकारण्यास बाध्य केले होते. भांडवलशाही असो की मार्क्सवाद, दोन्ही युरोपात जन्मलेले व युरोपकेंद्री विचार होते.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
गेल्या पन्नास वर्षांत पृथ्वीचा लंबक पश्चिमेकडून पूर्वेकडे झुकला आहे. मार्क्सवादाचा झपाट्याने अस्त झाला. समाजवादी डोलारा कोसळला. ह्या एकध्रुवीय जगात भांडवलशाहीची एकछत्री सत्ता प्रस्थापित झाली. समाजवादाच्या पुनरुत्थानाच्या खाणाखुणा अजूनही दिसत नाहीत आणि नागडी भांडवलशाही ज्या वेगाने बेमुर्वत शोषणाच्या व नैसर्गिक संसाधनांच्या समूळ नाशाच्या दिशेने निघाली आहे, त्यामुळे जगभरातील साऱ्या सुजाण व्यक्तींना ह्या पृथ्वीच्या अस्तित्वाचीच काळजी वाटू लागली आहे. म्हणून आता गांधींचा द्वंद्वात्मकतेपलीकडे नेणारा, व्यवस्थेतील विषमता व शोषण ह्यांच्याविरुद्ध संघर्ष करताना सर्वांच्या अंतिम हिताचा विचार करणारा समग्र विचार जगाला पटू लागला आहे, हे गांधी-१५० वर्षाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल.
गांधीविचार आणि भारत
जगभरात गांधीविचारांचे वारे वेगाने वाहत असताना भारत मात्र आपल्या राष्ट्रपित्याला नाकारण्याच्या (disown) पवित्र्यात आहे, निदान तसे चित्र सामाजिक व अन्य माध्यमांतून उभे केले जात आहे. गांधींच्या प्रभावामुळे ज्यांना आपले द्वेषाधारित राजकारण पुढे रेटता आले नव्हते, त्यांनी गांधींच्या हत्येनंतरही त्यांचा सातत्याने ‘वध’ करण्याचे अभियान जोरात सुरू केले आहे. गांधीजनांनी त्याचा समर्थपणे प्रतिवाद केला नाही आणि आंबेडकरवाद्यांपासून स्त्रीवाद्यांपर्यंतच्या सर्व छटांच्या पुरोगाम्यांनी तर गांधींना कधी आपले मानलेच नव्हते. त्यामुळे, गांधींचे चारित्र्यहनन जोरात सुरू आहे. कसलेही राजकीय भान नसणारा आत्ममग्न तरुणवर्ग, स्वार्थापलीकडे काहीही पाहू न शकणारा मध्यमवर्ग व विकासाच्या चकचकाटाला भूललेला वंचितसमूह हे सर्व समाजघटक आज गांधींपासून दुरावलेले दिसतात.
ह्या पार्श्वभूमीवर आपण मराठी साहित्याने गांधींकडे कसे पाहिले, ह्याचा लेखाजोखा घेणार आहोत.
मराठी कविता आणि गांधीजी
कविता हा इतर वाङमयप्रकारांच्या तुलनेत अधिक उत्कट आणि स्वयंस्फूर्त फॉर्म आहे. तो आत्मनिष्ठ असला तरी समकालीन वास्तवाचे प्रतिबिंब त्यात लवकर पडते. अर्थातच स्वातंत्र्यपूर्व काळात सारा देश गांधींच्या व्यक्तित्वाने प्रभावित झालेला असताना सर्व भारतीय भाषांमध्ये गांधी ह्या व्यक्तीवर किंवा त्यांनी सुरू केलेल्या राजकीय-सामाजिक चळवळींवर असंख्य कविता व गीते रचली गेली. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. भा. रा. तांबे, माधव ज्युलियन, यशवंत, विठ्ठलराव घाटे ते मर्ढेकर, पु. शि. रेगे आणि त्यानंतर कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, पाडगावकर, बापट, बोरकर, राजा मंगळवेढेकर ह्या विविध पिढ्यांमधील विविध प्रवृत्तीच्या कवींनी गांधींवर कविता लिहिल्या आहेत.
बाबा आमटेंची कविता म्हणजे साक्षात ‘ज्वाला आणि फुले’. त्यांच्यातील वैचारिक झापडे नाकारणारा कार्यकर्ता कवी म्हणतो –
गांधी माहात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही
आणि उद्याच्या पिढ्यांना त्याची ओळख पटण्यासाठी क्वचित कॉम्प्युटर लागेल!
पण काळाच्या भाळावर उमटलेली
ही तप्त युगमुद्रा
कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही!
नंतरच्या काळात ही तप्तमुद्रा मराठी कवींच्या मनःपटलावरून का पुसट झाली याचा शोध आपल्याला इतर साहित्यप्रकारांच्या सोबत घ्यावा लागणार आहे. ऐन गांधीयुगातही गांधी ह्या व्यक्तीबद्दल परमादर असणारे कुसुमाग्रजांसारखे मराठी कवीदेखील स्वतःला गांधी-विचारांचे म्हणवून घेत नव्हते, हेदेखील आपण ध्यानात ठेवले पाहिजे. तरीही गांधी व्यक्ती व विचार ह्यांच्याशी संवाद साधणाऱ्या असंख्य मराठी कवितांपैकी काही वैशिष्ट्यपूर्ण कवितांचा निदान नामनिर्देश करणे येथे आवश्यक आहे: उदा., विंदा करंदीकरांनी गांधीहत्येनंतर आलेल्या कमालीच्या अस्वस्थतेतून लिहिलेली कविता, गांधींचा सारा विचार काव्यरूपात जनसामान्यांपर्यंत पोहचविणारी तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’, गांधींच्या बदनामीचा आरोप लागून कोर्टबाजीत अडकलेली वसंत गुर्जरांची ‘मला गांधी भेटला’ आणि अगदी अलीकडच्या काळात प्रकाशित झालेले रा. ग. जाधवांचे ‘बापू : एक भाषित चिंतनकाव्य’.
मराठी कादंबरीतील गांधी
वास्तवदर्शन, कल्पना व चिंतनशीलता ह्या सर्वांना कमाल अवकाश देणारा वाङ्मयीन अभिव्यक्तीचा प्रकार म्हणजे कादंबरी. त्यामुळे कोणत्याही विचाराचा साहित्यविश्वावरील प्रभाव अन्य ‘फॉर्म’च्या तुलनेत कादंबरीतून अधिक जाणवू शकतो. आधुनिक मराठी कादंबरीच्या उदय आणि प्रारंभिक विकासाचा टप्पा हा राजकारणातील गांधीयुगाला समांतर असा काळ आहे. ह्या काळात गांधींनी समाजजीवनात घडवून आणलेल्या उत्पातांची दखल मराठी कादंबरीकार आणि समीक्षक ह्यांनी कशा प्रकारे घेतली? फडके, खांडेकर, माडखोलकर, पु. य. देशपांडे, श्री. व्यं. केतकर, वा. म. जोशी ह्यांच्या लिखाणाचा हा कालखंड. गो. म. कुलकर्णी ह्यांनी त्यांच्या ‘गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य’ ह्या महत्त्वाच्या निबंधात ह्या सर्वांच्या लिखाणाच्या गांधीविषयक दृष्टीकोनाची मीमांसा केली आहे. फडकेंचा गुलछबू नायक नायिकांचे विभ्रम टिपण्याच्या त्याच्या मुख्य ‘व्यवसाया’सोबत कधी कधी गांधींच्या आंदोलनात भाग घेतानाही दिसतो. कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे खुद्द ना. सी. फडकेही कधी काळी ह्या आंदोलनात सहभागी झाले होते. पण ‘आपल्याला हे झेपणार नाही’ हे ध्यानात आल्यामुळे ते त्यातून लवकरच बाहेर पडले, आणि त्यांनी आपले चटोर कादंबरीलेखनाचे कार्य पूर्ववत हाती घेतले. स्वाभाविकपणे त्यांचा नायकही गांधींच्या आंदोलनात दिसला, तरी मनाने कधी रमला नाही आणि त्याने त्याबद्दल कधी विचार मांडला, तर तो वावदूक टीकेच्या रूपाने.
खांडेकर मनाने गांधीविचाराशी एकरूप झाले होते. त्यांच्या लिखाणात गांधीवादी आदर्शवाद ठायी ठायी जाणवतो. परंतु, गो. म. कुलकर्णी ह्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास “आपण निर्माण केलेल्या कल्पनाजालात लेखक स्वतःच स्वतःला अडकवून घेत असल्यामुळे खांडेकरांच्या मूळ सात्त्विक आणि प्रामाणिक गांधीप्रवण जाणीवेला सुघटित रूप प्राप्त होत नाही, ह्याचे कितीतरी पुरावे त्यांच्या कादंबरीविश्वातून काढून दाखवता येतील (अपवाद त्यांची ‘उल्के’सारखी एखाददुसरी कादंबरी)”.
फडके त्यांच्या उथळपणामुळे आणि खांडेकर त्यांच्या कृत्रिम, भरजरी, विचारवहनाला प्रतिकूल शैलीमुळे बाजूला ठेवले, आणि मराठीतील विचारक कादंबरीकारांकडे पहिले, तर आपल्याला काय दिसते? ‘राजकीय’ कादंबऱ्या लिहिणाऱ्या ग.त्र्यं. माडखोलकरांचे नायक (सुरेश डोळके ह्यांच्या शब्दात) ‘राजकीय प्रवृत्तीचेच नाहीत. त्यांची कोणत्याही वादावर निष्ठा नाही. (त्यामुळे) त्यांचे पर्यवसान नाकर्त्या वावदूक व स्वप्नरंजनात्मक सुखवाद्यात झाले आहे.’ अर्थात, अराजकीय असणे हीदेखील एक राजकीय दृष्टी व कृती असते. गांधींचा भर अशा मंडळींना आपल्या कोशातून बाहेर खेचून काढून त्यांना देशातील दरिद्रनारायणाचे दर्शन घडवून त्याच्या सेवेला जुंपण्यावर होता. आजच्या भाषेत सांगायचे तर आपल्या उच्चवर्णीय सुविधाभोगी वर्गातील प्रत्येक अनुयायाने अनिवार्यतः ‘डी-कास्ट’ व ‘डी-क्लास’ व्हायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. स्वाभाविकच गांधी व गांधीवाद ह्यांचा तिरस्कार हे माडखोलकरांच्या (आणि अन्य कादंबरीकारांच्या) ‘अ-राजकीय’ नायक कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य असल्यास नवल नाही. “सत्य आणि अहिंसा हे गांधींचे मुखवटे असून ते मुळात एक खलनायक आहेत’ असे. माडखोलकरांच्या ‘मुखवटे’ कादंबरीच्या नायकाचे मत आहे.
विद्वान आणि बुद्धिमंत म्हणून गणल्या गेलेल्या केतकरांनी आपल्या ‘आशावादी’ कादंबरीत गांधींविषयी असे उद्गार काढले आहेत, “गांधी हा केवळ वैदू आहे, समाजशास्त्रज्ञ नव्हे, किंवा राजकारणातला प्रज्ञावंत मनुष्य नव्हे. मांत्रिक ज्याप्रमाणे सोपे मंत्र सांगून रोग बरा करण्याचे ढोंग करतो आणि शेवटी तुमचा माझ्या मंत्रावर विश्वास नाही, म्हणून रोग्यालाच दोष देऊन आपण चालता होतो, त्या थोतांडी मांत्रिकापेक्षा ह्या महात्म्याची किंमत काय जास्त आहे?”
मराठी नाटक आणि गांधीजी
स्वातंत्र्यपूर्व काळात अन्य साहित्यप्रकारांच्या तुलनेत मराठी नाटकांनी मात्र ‘गांधी : व्यक्ती व विचार’ ह्यांची जोरदार पाठराखण केलेली दिसते. ह्याचे कारण नाटक ही रसिकांशी प्रत्यक्ष नाते जोडणारी ललित कला आहे आणि त्यामुळे समकालीन संवेदना आणि विचारप्रवाह ह्यांच्यापासून ती फारशी अलिप्त राहू शकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वराज्यासाठी चाललेल्या लढ्याचे प्रतिबिंब तत्कालीन नाटकांत पडलेले दिसते, हे सर्वविदित आहे. सदानंद मोरे ह्यांनी आपल्या ‘लोकमान्य ते महात्मा’ ह्या ग्रंथात ह्या भारतीय राजकारणातील ‘टिळक ते गांधी’ ह्या संक्रमणाचा मराठी जनमानसावर पडलेला प्रभाव विस्ताराने नोंदला आहे. भारतीय राजकारणाचे केंद्र आता महाराष्ट्राबाहेर जाते आहे म्हणून सुरुवातीला भांबावलेल्या महाराष्ट्राने (विशेषतः येथील बहुजन समाजाने) नंतर गांधींना स्वीकारले. ह्या परिवर्तनाचे प्रतिबिंब आपल्याला तत्कालीन मराठी नाटकांत पडलेले दिसते. टिळक-गांधी समन्वय मांडणारे वासुदेवशास्त्री खरे ह्यांचे ‘उग्रमंगल’, ‘अहिंसेच्या सुताला लोकमान्यांच्या तत्त्वज्ञानाचा पीळ’ जोडणारे वीर वामनराव जोशी ह्यांचे ‘रणदुंदुभी’, द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट सांगताना द्रौपदीचे वस्त्र हे खादीप्रसाराचे माध्यम बनवू पाहणारे ‘संगीत पट-वर्धन’, काँग्रेसचा कौन्सिल बहिष्कार व स्वराज पक्षाचा कौन्सिल प्रवेश ह्या विरोधी भूमिकांवर मल्लीनाथी करणारे काकासाहेब खाडिलकर ह्यांचे ‘संगीत मेनका’ अशी बरीच उदाहरणे त्यांनी ह्या संदर्भात दिली आहेत. अर्थात त्या काळात कोणाच्याही राजकीय विरोधाची पर्वा न करता गांधींची देशाच्या अमूलाग्र सामजिक-राजकीय परिवर्तनाची भूमिका पूर्णपणे उचलून धरणारे मामा वरेरकर ह्यांचे नाव ह्या संदर्भात घेतलेच पाहिजे. त्यांचे ‘सत्तेचे गुलाम’ रसिकांच्या पसंतीला उतरले. पण गांधी-आंबेडकर ‘पुणे करारा’वर वातावरण तापले असताना त्यांनी गांधींची अस्पृश्यतानिवारणाची आग्रहाची भूमिका व त्यामुळे सवर्ण हिंदू समाजाचे होणारे हृदयपरिवर्तन ह्यांचे चित्रण करणारे ‘तुरुंगाच्या दारात’ हे नाटक लिहून रंगभूमीवर आणले. सरोजिनी नायडूंनी बेळगाव काँग्रेसमध्ये मामांना सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. परंतु, बहुसंख्य मराठी नियतकालिकांनी त्याची बातमीही छापली नाही व ह्या नाटकाच्या विरोधाची भूमिका कायम ठेवली, ह्यावरून तात्कालिक मराठी राजकारणाचे प्रतिबिंब तेव्हाच्या मराठी नाटकांत कसे पडत होते, हे दिसून येते. पुणे करारात गांधीजींच्या समर्थनाची भूमिका घेणाऱ्या बाळू पाळवणकर ह्या प्रसिद्ध क्रिकेटपटू व दलित नेत्यावर हे नाटक बेतलेले होते, अशी साक्ष सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा ह्यांनी त्यांच्या ‘A Corner of a Foreign Field’ ह्या पुस्तकात काढली आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
गांधीविचार आणि मराठी वैचारिक साहित्य
गांधी व्यक्ती व विचार ह्यांच्या संदर्भात मराठी साहित्यातील सर्वांत समृद्ध दालन वैचारिक साहित्य हे आहे; पण दुर्दैवाने त्यालाही अनेक दशकांपासून उतरती कळा लागली आहे. ह्याविषयी ज्येष्ठ गांधीविचारक किशोर बेडकिहाळ सविस्तर मांडणी करणार असल्यामुळे मी ह्याविषयीची निरीक्षणे थोडक्यात नोंदवतो :
पहिल्या पिढीचा सकस वारसा : गांधीयुगाच्या पहिल्या कालखंडात मराठीत अतिशय उच्च दर्जाचे वैचारिक साहित्य निर्माण झाले. कारण त्याचे हे लेखक भारतातील विचारवंतांच्या पहिल्या फळीचे मानकरी तर होतेच, पण ते गांधींच्या कार्यात प्रत्यक्ष वाटा उचलणारे सेनापती-शिलेदारही होते. विनोबा, साने गुरुजी, आचार्य दादा धर्माधिकारी, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, काका कालेलकर, अवंतिकाबाई गोखले ह्या विचारकांच्या आचरणात गांधी विचारांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. किंबहुना, आचार-विचारातील एकात्मता हा गांधी दर्शनाचा अविभाज्य भाग निदान गांधीयुगाच्या प्राथमिक काळात प्रकर्षाने पाळला जात असल्याने त्याचा जनमानसावर अधिक खोलवर ठसा उमटत असे, हेही येथे नमूद केले पाहिजे.
विमर्शाकडून निरुपणाकडे : त्यानंतरच्या काळात दा. न. शिखरे, द. न. गोखले, गं. बा. सरदार, नलिनी पंडित, नरहर कुरुंदकर, चंद्रशेखर धर्माधिकारी, अशा निवडक लेखकांनी हा वारसा पुढे चालवलेला दिसतो. ह्यातील ढोबळमानाने गांधीवादी नसणाऱ्या लेखकांनी आपापल्या विचारांच्या परिप्रेक्ष्यातून व बदलत्या काळाच्या संदर्भात गांधीविचारांची समतोल समीक्षा केल्याचे दिसते. परंतु, गांधी-विचार नव्या काळानुसार नव्याने परिभाषित करण्याची प्रक्रिया खंडित होऊन त्याचा वारसा केवळ निरुपणाच्या रूपात शिल्लक राहण्याची प्रक्रिया ह्याच कालखंडात सुरू झाल्याचे आपल्याला ध्यानात येते.
तिसरी पिढी : ऐंशीच्या दशकापासून लिहिते झालेले अनेक वैचारिक लेखक दोन-तीन दशके किंवा त्याहून अधिक काळ गांधीविचारांच्या परिप्रेक्ष्यातून समकालीन घटनाची चिकित्सा करताना आपल्याला दिसतात. त्यात वसंत पळशीकर ह्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कारण त्यांच्याइतकी विषयांची व्यापकता व विचारांची मौलिकता इतरत्र क्वचितच आढळते. य. दि. फडके, भा. ल. भोळे, फक्रुद्दीन बेन्नूर, सु. श्री. पांढरीपांडे, यशवंत सुमंत, जगन फडणीस, यदुनाथ थत्ते, रामदास भटकळ, गणेश देवी, सुरेश द्वादशीवार ही ह्या पिढीतील महत्त्वपूर्ण नावे आहेत.
सध्याची पिढी : सध्याच्या काळात मिलिंद बोकील, पराग चोळकर, अभय बंग, (शहाद्याचे) प्रा. विश्वास पाटील अशा दोन-तीन दशके दमदार लिखाण करणाऱ्या मंडळींसोबत चंद्रकांत वानखेडे, विजय दिवाण, चैत्रा रेडकर ते थेट संकेत मुनोत असे दोन पिढ्यांचे लेखक सध्या लिहिते आहेत.
गांधींचे चारित्र्यहनन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा. सावरकर ह्यांसारखे गांधींच्या विचाराचे विरोधक आणि त्यांचे अनुयायी गेली अनेक दशके गांधी-विचारांचा प्रतिवाद करीत आहेत. त्याशिवाय गांधींच्या विचारातील काही भाग मान्य असणारे, पण काही भागाबद्दल ते किंवा त्यांचे अनुयायी ह्यांच्याशी गंभीर मतभेद असणारे अनेक विचारक देशात व महाराष्ट्रात अतिशय समर्थपणे आपापली भूमिका मांडत आहेत. असा गंभीर व सखोल विमर्श होणे ही कोणत्याही समाजाच्या जिवंतपणाची खूण म्हणायला हवी. परंतु, गेल्या काही दशकांत गांधींचे व्यक्तिगत आयुष्य व त्यांचे सार्वजनिक जीवन, कार्य व तत्त्वज्ञान ह्यांच्यावर चिखलफेक करणारे लिखाण प्रसारित केले जात आहे. सामाजिक माध्यमांच्या उदयानंतर तर ते चारित्र्यहननाचे हत्यार बनले आहे.
अनुवाद : वर नमूद केलेल्या चार टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात इतर भाषांमधील उत्तम वैचारिक साहित्य मराठीत अनुवाद करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले. आता इतक्या वर्षांनी अनुवादाच्या सुविधा व अनुवादकांची संख्या वाढली असतानाही हे कार्य इतक्या निष्ठेने आणि जोरकसपणे घडताना दिसत नाही. मराठीतील कसदार वैचारिक साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्याचे कार्य तर अजून प्राथमिक टप्प्यांत आहे. विनोबांचे साहित्य इंग्रजीत नेण्याची धडपड पराग चोळकर करीत आहेत. तसेच गुजराथीतून मराठी अनुवादाचे कार्य काका कालेलकरांच्या नंतर प्रा. विश्वास पाटील ह्यांनी अतिशय निष्ठेने केले आहे.
त्रुटी व आव्हाने : अलिकडच्या काळातील गांधीविषयक वैचारिक लेखनात खालील त्रुटी प्रकर्षाने जाणवतात :
1) गांधीजींच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेणारे बृहद् चरित्र अद्याप मराठीत लिहिले गेलेले नाही.
2) समकालीन जागतिक विचारव्यूहांची दखल घेऊन नव्या युगात गांधी विचारांचा नव्याने अन्वयार्थ सांगणारे लिखाणही मराठीत फारसे झालेले नाही.
3) गांधींच्या रचनात्मक कार्यासाठी उभे आयुष्य झोकून देणारे अनेक जीवनव्रती महाराष्ट्रात कार्यरत होते. परंतु, त्यांच्या कार्याची साधी तोंडओळखही महाराष्ट्राला नाही. त्यापुढे जाऊन पर्यायी विकासनीतीच्या दृष्टीने ह्या कार्याची समीक्षा करणाऱ्या, तसेच आजच्या काळातील त्याची प्रासंगिकता तपासणाऱ्या लिखाणाची आज आत्यंतिक गरज आहे.
4) गांधींच्या विवेचनातील अन्य पैलूंच्या तुलनेत त्यांची विज्ञान-तंत्रज्ञानविषयक भूमिका, बुनियादी तालीम व निसर्गोपचार ह्या क्षेत्रांतील प्रयोगांच्या मुळाशी असणारी वैज्ञानिकता, त्यांच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगांची मनोवैज्ञानिक-मनोविश्लेषणात्मक समीक्षा असे महत्त्वाचे मुद्दे मराठीत अद्याप दुर्लक्षित राहिले आहेत.
5) पारंपरिक भाषेत नवा आशय पेरणे ही गांधींची खासियत होती. त्यांच्या अनेक अनुयायांनीही गांधींची पारंपरिक परिभाषा उचलली. पण बदलत्या संदर्भात धर्म, रामराज्य, संस्कृती अशा बऱ्याच संकल्पनांचे अर्थ मुळातून बदलले आहेत. शिवाय गेल्या दोन पिढ्यांपासून मराठी माणसाचे ग्रामीण जीवन व एतद्देशीय परंपरा ह्यांच्याशी असणारे नातेही शबल झाले आहे. पुरोगामी म्हणविणाऱ्या समूहांच्या मनात तर ह्या परिभाषेबद्दल विलाक्ष्ण आकस दिसून येतो. अशा वेळी, ह्या समूहांशी संवाद साधण्यासाठी गांधीजनांनी आधुनिक परिभाषेचा उपयोग करणे आवश्यक ठरते.
ह्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी हा असा एकमेव मराठी साहित्यिक उरतो, ज्याच्या ललित व वैचारिक साहित्यातून गांधी विचारांचे प्रामाणिक दर्शन वाचकाला होते. कार्यकर्त्याचे आयुष्य जगत असतानाच १२१ पुस्तके लिहिणारे साने गुरुजी, ‘भारतीय संस्कृती’सारखे विचारसघन लिखाण करणारे विचारक, टॉलस्टॉयच्या ‘व्हॉट इज आर्ट’सारख्या महत्त्वाच्या ग्रंथाचा आणि परभाषेतील कितीतरी पुस्तकांचा अनुवाद करणारे समर्थ अनुवादक साने गुरुजी... पण मराठी साहित्यविश्वाने त्यांना ‘रडके साहित्यिक’ ठरवले. एका अर्थाने महाराष्ट्रातील प्रस्थापित साहित्यिक-वैचारिक विश्वाने साने गुरुजींची केलेली हेटाळणी व त्यांच्या कर्तृत्वाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष हे त्याच्या गांधी-विचाराशी असणाऱ्या नात्याचे द्योतक आहे, असे म्हणता येईल.
मराठीच्या तुलनेत इतर भारतीय भाषांमध्ये गांधींचे चित्रण कसे केले आहे, ह्याचा आढावा घेतल्यास गांधींविषयीचा आकस हा खास मराठी ‘phenomenon’ आहे की, त्याला अखिल भारतीय परिमाण लाभले आहे, ह्याचा निर्णय घेणे आपल्याला शक्य होऊ शकेल.
हिंदी साहित्यातील गांधी ‘दर्शन’
हिंदी साहित्याचा भौगोलिक, तसेच वैचारिक पैस मराठी साहित्यापेक्षा अधिक व्यापक आहे. हिंदी लेखक हा (मराठी लेखकाच्या तुलनेत) अधिक राजकीय भान असणारा व ते व्यक्त करणारा आहे. त्यामुळे विविध राजकीय विचारधारांचे प्रस्फुरणही हिंदीत अधिक समर्थपणे व्यक्त झाले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील हिंदी साहित्य व साहित्यिक ह्यांच्यावर गांधीजींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खोल ठसा उमटलेला आहे. आधुनिक हिंदी साहित्याचे आद्यपुरुष असणाऱ्या प्रेमचंदांचा लेखक म्हणून जन्मच गांधीजींच्या प्रभावातून झाला. त्यांनी १९२३ साली गोरखपूर येथे गांधींचे भाषण ऐकले आणि आपली २३ वर्षांची सरकारी नोकरी सोडून साहित्यसेवेला वाहून घेतले. गांधींचे अहिंसक स्वातंत्र्य आंदोलन व समाजसुधारणेची चळवळ ह्यांचे विलक्षण चित्रण प्रेमचंदांच्या व्यक्तिरेखा व कथानकातून केलेले दिसते. राष्ट्रकवि मैथिली शरण गुप्त ह्यांनी तर त्यांच्या गाजलेल्या ‘उपेक्षिता उर्मिला’पासून ‘साकेत’पर्यंतच्या रचनांविषयी प्रत्यक्ष गांधीजींशी पत्रव्यवहार केला होता. गांधींच्या प्रभावामुळे हिंदी साहित्य पंडिती थाटाच्या संस्कृतनिष्ठ हिंदीच्या जोखडातून बाहेर पडले आणि सर्वसामान्यांच्या बोलचालीच्या ‘खडी बोली’ला, तसेच हिंदी-उर्दू मिश्रित ‘हिंदुस्तानी’ला साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त झाली. काका कालेलकर, माखनलाल चतुर्वेदी, जयशंकर प्रसाद, सेठ गोविंददास, सियाराम शरण गुप्त, आचार्य रामचंद्र शुक्ल अशा अनेक लेखकांनी आपल्या ललित व वैचारिक कलाकृतीतून गांधीदर्शनातील मूल्यांचा पुरस्कार केला. त्यानंतर ही परंपरा क्षीण झाली असली, तरी अजून जिवंत आहे. अगदी अलीकडच्या काळात गिरीराज किशोर ह्यांनी आफ्रिकेतल्या ‘गांधीभाईं’वर ‘पहला गिरमिटिया’ नावाची बृहद् कादंबरी लिहून त्याचा प्रत्यय दिला आहे. विनोद कुमार शुक्ल हे आजच्या काळातील श्रेष्ठ लेखकांपैकी एक आहेत. त्यांच्या लिखाणातून प्रकट होणाऱ्या निसर्ग व मानवी जीवन ह्यांची आंतरिक एकात्मकता, सामान्य माणसाच्या संथ लयीतल्या आयुष्याचे सौंदर्य ह्या सर्व गुणवैशिष्ट्यांचे नाते लोकजीवनाशी तद्रूप झालेल्या गांधींशी आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, गांधी विचारांचा प्रत्यय आपल्याला मराठी ललित साहित्यातून येत नाही, जो हिंदी ललित साहित्यातून मिळतो. गांधीविचारांची परंपरा मराठीत अतिशय क्षीण झालेली दिसते, जी हिंदीत अद्याप तुलनेने अधिक समृद्ध आहे.
कोणत्याही साहित्यात एखाद्या परंपरेने किती सकस साहित्यकृती व ताकदीचे साहित्यिक निर्माण केले आहेत, हा त्या परंपरेचे सामर्थ्य जोखण्याचा महत्त्वाचा निकष ठरण्यास हरकत नसावी. ह्या दृष्टीने पाहिले असता हिंदी साहित्यात प्रेमचंद आणि फणीश्वरनाथ रेणू (ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे) निर्माण होऊ शकले. ‘गोदान’ आणि ‘मैला आंचल’सारख्या अजरामर कलाकृती निर्माण झाल्या, त्या तोडीचे ललित लेखक व कलाकृती मराठीत का जन्मल्या नाहीत, ह्याचा विचार आपण करायला हवा.
माझ्या मते प्रेमचंद, रेणू किंवा विनोद कुमार शुक्ल ह्यांच्यासारख्या हिंदी साहित्यिकांचे आपल्या मातीशी जे दृढ नाते आहे, ते मराठी साहित्यिकांनी केव्हाच गमावले आहे. हिंदीभाषी प्रदेशांच्या तुलनेत महाराष्ट्र आधुनिक असल्याचा दावा आपण नेहमी करतो. त्याच वेळी आपण हे विसरतो की वासाहतिक प्रभावामुळे महाराष्ट्रात परंपरा व आधुनिकता ह्यांचा नीट समन्वय साधला गेला नाही. आपण आधुनिकतेच्या केंद्रस्थानी असणारी समता, स्वातंत्र्य व न्यायादी मूल्ये आत्मसात न करता आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील बाह्यांगांवर (शहरीकरण, विभक्त कुटुंब, इंग्रजी शिक्षण) भर दिला. त्यामुळे, आपण परंपरेपासून तुटलो, आणि नवे स्वीकारू शकलो नाही. रेणू, प्रेमचंद ह्यांचे सारे आयुष्य खेड्यात गेले. विनोद कुमार शुक्ल शहरात राहिले, तरी त्यांचा छत्तीसगडी परिसर आणि त्यांची स्वतःची जीवनदृष्टी ग्रामकेंद्रीच राहिली आहे. त्या तुलनेत मराठीतील बहुसंख्य लेखक शहरात राहणारे व शहरी मनोवृत्तीचे आहेत. अगदी ग्रामीण जीवनाविषयी भरभरून लिहिणारे बहुसंख्य लेखकही त्याला अपवाद नाहीत. ‘परंपरा म्हणजे जातीव्यवस्था, सरंजामशाही मूल्ये, दमन, अर्थात सरसकट त्याज्य’, असे जणू महाराष्ट्रातील पुरोगामी साहित्यिकांनी ठरवूनच टाकले आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
समारोप
1) इ. स. १९२०-१९५० हा कालखंड म्हणजे भारताच्या इतिहासातील गांधीयुग. ह्या काळात मराठी साहित्यावर परभृत, उपऱ्या कलावादाचा प्रभाव होता. आत्ममग्न, व्यक्तिकेंद्री मध्यमवर्ग हा साहित्याचा प्रमुख निर्माता आणि ‘ग्राहक’ होता. ना. सी. फडकेंचा पोशाखी नायक असो, की श्री. ना. पेंडसेंच्या ‘लव्हाळी’तला ‘कॉमन मॅन’ नायक, गांधींच्या चळवळीपासून दोघेही अलिप्त राहिले. कारण आपल्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणणारे, त्याला भरड खादी नेसायला लावून, शौचकूप स्वच्छ करायला लावणारे, म्हणजेच त्याने ‘डी-कास्ट’ आणि ‘डी-क्लास’ होण्याचा आग्रह धरणारे गांधी ह्या नायकाला परवडत नाहीत. त्यामुळे, सर्वसामान्य मराठी माणूस त्या काळात गांधींच्या कार्य व व्यक्तित्वाच्या गारुडाखाली असला, तरी तेव्हाचे बहुतेक मराठी साहित्य गांधींची कुचेष्टा करण्यात धन्यता मानताना आपल्याला दिसते.
2) महाराष्ट्रातील सुशिक्षितवर्गाच्या गांधी-विरोधाला एक जातीवर्चस्ववादी अस्तरही आहे. टिळक युगाच्या अस्तानंतर देशच्या राजकारणाची सूत्रे गांधींकडे गेल्यावर स्वराज्य मिळाल्यावर ‘आपले राज्य’ येणार नाही ह्याची जाणीव झालेल्या समाजगटाने गांधी हे आपले राजकीय विरोधकच नव्हे, तर शत्रू आहेत, अशी स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधली. एकूणच देशाच्या राजकारणात बहुजन नेतृत्वाचा उदय झाल्यामुळे ह्या वर्गाच्या गांधी-विरोधाची परिणती गांधी-द्वेषात झाली व त्यातूनच गांधीजींची हत्या झाली. हत्येनंतरही गांधींचा देशावरील प्रभाव ओसरत नाही, हे पाहिल्यावर एकीकडे त्यांचे ‘बोन्साय’ करून त्यांना पुतळ्यात बंदिस्त करायचे व दुसरीकडे त्यांचे अखंड चारित्र्यहनन करून त्यांच्या खुन्याचे देव्हारे माजवायचे, अशी त्याची सध्याची रणनीती आहे. त्यामागे १०० वर्षांचा इतिहास आहे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
3) स्वातंत्र्यानंतरची सात दशके ह्या समाजातून जे साहित्य निर्माण होते आहे, ते केवळ जीवनातील परात्मभाव व क्षुद्रवाद ह्यांचे चित्रण करण्यात समाधान मानते आहे. परंतु, ह्या जीवनप्रणालीला व तिच्या मुळाशी असणाऱ्या तत्त्वज्ञानाला आव्हान देणारे गांधी आजच्या मराठी साहित्यिकाला समजू शकत नाहीत. समजले, तरी पेलू शकत नाहीत. कारण गांधींच्या खडतर रस्त्याने जाणे म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूची उलटतपासणी करणे होय, हे त्याला समजते.
4) महाराष्ट्रातील स्वतःला विवेकवादी म्हणवून घेणारा समूहदेखील गांधींपासून अंतर ठेवून आहे. गांधीजी हे रूढार्थाने धार्मिक नसले, तरी त्यांनी वापरलेल्या आध्यात्मिक परिभाषेमुळे आधुनिक विज्ञानवादी समूह त्यांच्यापासून दुरावला. गांधींना मानणारे साहित्यिकही स्वतःला गांधी-विचारांचे म्हणवून घेत नाहीत. सुरुवातीच्या काळात गांधी-विचाराच्या तुलनेत मार्क्स आणि अलीकडच्या काळात फुले-आंबेडकर हे आधुनिक व वैज्ञानिक दृष्टीने विचार करणाऱ्या साहित्यिक-विचारकांना जवळचे वाटतात, हे वास्तव आहे. अर्थात गांधींच्या नंतर त्यांच्या विचारांची मांडणी आधुनिक परिभाषेत, समकालीन समस्यांच्या संदर्भात व एक समग्र विचारव्यूह म्हणून करण्यात गांधी-विचारकांना जे अपयश आले, तेही ह्यासाठी कारणीभूत आहे.
5) स्वतःला आधुनिक, बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला खरे आकर्षण आहे ते तार्किकतेचा बुरखा ओढलेल्या मर्दानगीचे. गांधींच्या अहिंसक संघर्षाचा आधार प्रचंड मोठे मनोबल, म्हणजे धैर्य व वीरता हा होता. पण मराठी समाज हा वीरतेच्या नावाखाली आक्रमकतेची, शिवराळ भाषेची पूजा करणारा समाज आहे. ‘भाला’कर भोपटकर, अत्रे, ठाकरे अशांचे महाराष्ट्राला वाटणारे आकर्षण आजच्या सर्व जाती-जमातीच्या युवकांच्या फेसबुक पानांतून झळकते. अशा पर्यावरणात वाढलेल्या लेखकाला माणसातील ‘स्त्रीतत्वा’ला आवाहन करणारे गांधींचे राजकारण व समाजकारण समजत नाही, पटत नाही, भुरळ घालत नाही, हे समजण्यासारखे आहे. (महाराष्ट्राच्या मर्दानगीच्या सामुहिक आकर्षणामागे कोणती असुरक्षितता दडली आहे, ह्याचा मनोविश्लेषकांनी शोध घेणे गरजेचे आहे.)
6) उद्याचे काय?: गांधी विचार हा एक खुला अवकाश आहे. गांधीवाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, असे खुद्द गांधींनीच जाहीर केलेले आहे. गांधींना समजून घेऊन, आपल्यात मुरवून समकालीन वास्तवाला समग्रतेने व आपल्या प्रतिभाबळ व कल्पनाशक्ती ह्यांसह भिडणारा मराठीतला ‘रेणू’ किंवा ‘विनोद कुमार शुक्ल’ उद्या मराठी साहित्यात नवे क्षितीज निर्माण करू शकेल. ते घडले नाही तरी, किंवा तसे घडण्यापूर्वी गांधींचे नाव न घेताही गांधीविचारांचे ‘दर्शन’ मराठी साहित्यात नक्की होऊ शकेल, अशी आशा जागविणारी ही काही उदाहरणे :
- नंदा खरे हे मराठीतील बुद्धिमान वाचकांचे आवडते लेखक आहेत. मार्क्सवाद मानणाऱ्या खरेंची नवी कादंबरी ‘उद्या’ ही मराठीतील ‘1984’. त्यात त्यांनी कॉर्पोरेटिकरणाच्या बुलडोझरखाली चिरडल्या जाणाऱ्या समाजाचे प्रत्ययकारी चित्रण केले आहे. त्यात ह्या समग्र विध्वंसाविरुद्ध हिंमतीने उभे राहणारे आदिवासींचे जे ‘चारगाव’ चितारले आहे, ते गांधी-विनोबांच्या वैचारिक शिदोरीवर उभ्या राहिलेल्या मेंढा-लेखा आणि पाचगाव ह्या प्रयोगांचे ललित रूप आहे.
- देशीवाद हा सांप्रत काळातील मराठी साहित्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. दुर्दैवाने ही चर्चा दोन्ही बाजूंनी वितंडाच्या पातळीवर चालवली जात असल्याने ह्या संकल्पनेचे मर्म वाचकांपर्यंत पोहचत नाही. खरे तर वासाहतिक दडपणापासून मुक्त होऊन स्वतःची मुळे व मूल्यपरंपरा शोधण्याचा हा वैश्विक प्रयत्न आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याची सुरुवात झाली असली, तरी त्याचा आदिपुरुष मोहनदास करमचंद गांधी हाच आहे, आणि ‘हिंद स्वराज’ हा त्याचा आदिग्रंथ आहे. कारण गांधीविचार म्हणजे मूल्यविवेक परंपरेचा डोळस स्वीकार. हे मर्म समजून घेऊन त्यासोबत महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला कवेत घेत नवनिर्मिती करणारा हाच उद्याच्या मराठी साहित्याला नवी दिशा देणारा द्रष्टा साहित्यिक असेल.
- पर्यावरणीय साहित्य ह्या नव्या साहित्यप्रकारामागील प्रेरणाही गांधी विचार हीच आहे.
सरतेशेवटी, गांधी हे अमावास्येच्या रात्री आशेचा दीप तेवत ठेवणाऱ्या आस्थेचे नाव आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही ‘करके देखो’ म्हणणाऱ्या जिद्दीचे नाव आहे. त्यामुळे, उद्याच्या मराठी साहित्यात गांधींच्या नावाची खूण राहील का, ह्या प्रश्नाला उत्तर आजच्या विषण्ण करणाऱ्या वास्तवात ‘अजूनही येतो वास फुलांना’ असे म्हणणाऱ्या दिनकर मनवर ह्यांच्या कवितेनेच देता येईल. ते म्हणतात :
नाहीतरी हवेवर उजेडावर स्वप्नांवर नियंत्रण थोडेच आले आहे
नाहीतरी शर्टाच्या खिशावर गुलाब लाऊन फिरता येते की घराबाहेर
नाहीतरी अजूनही सूर्य उगवतोच की नाही पूर्वेला पृथ्वीवर सकाळी सकाळी
नाहीतरी अजूनही न चुकता सकाळ संध्याकाळ होत राहतात की नाही दररोज
नाहीतरी अजूनही पुनवेला चंद्र फुलतोच की नाही आकाशात संपूर्ण
नाहीतरी पक्षी उडत राहतातच की नाही हवेत स्वतःच्या इच्छेने
मी म्हणतो विश्वास ठेवायला काय हरकत आहे
की आपण अजूनही जिवंत आहोत
निवडक संदर्भ
१. किशोर बेडकिहाळ, (सं.), “परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा – वसंत पळशीकर ह्यांचे निवडक लेख”, लोकवाङ्मय प्रकाशन, २०१३
२. डॉ. द. दि. पुंडे, (सं.), “गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य”, प्रतिमा प्रकाशन, १९९५
३. भालचंद्र नेमाडे, (सं.), “साने गुरुजी पुनर्मूर्ल्यांकन”, साहित्य अकादेमी, नवी दिल्ली, १९९९
४. सदानंद मोरे, “लोकमान्य ते महात्मा”, राजहंस प्रकाशन, २००७
५. चंद्रकांत बांदिवडेकर, ‘हिंदी साहित्य में गांधीवाद’,
http://www.hindi.mkgandhi.org/gmarg/chap20.htm
.............................................................................................................................................
लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे माजी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
ravindrarp@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 03 December 2018
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, महाराष्ट्राने गांधींची सदैव कुचेष्टाच केली. याचं प्रमुख कारण म्हणजे गांधींचं ढोंग. देशाची फाळणी माझ्या प्रेतावरूनंच होईल म्हणून हिंदूंचा विश्वास संपादन केला. मात्र फाळणी जाहीर झाल्यावर ती रद्द करण्यासाठी साधं उपोषण घोषितही केलं नाही. प्रत्यक्ष उपास सोडा, नुसती घोषणा जरी केली असती तरी देशभक्तांना धीर आला असता. काय केलं या महात्म्याने? महाराष्ट्राने असल्या भित्र्या भागूबाईस का म्हणून डोक्यावर चढवून घ्यायचं? 'तुम्ही (=गांधीनेहरूंनी) आम्हांस लांडग्यांच्या तोंडी दिले आहे' हे कोण बोललंय माहितीये? सरहद्द गांधी ज्यांना म्हणायचे त्या खान अब्दुल गफारखानांचे हे आतडी पिळवटून टाकणारे उद्गार आहेत. तरीपण या महात्म्याच्या हृदयाला पाझर फुटला नाही. मुसलमानाने भारतवादी असणे जणू गुन्हा आहे, नाहीका? फाळणीच्या विषयावर गुळणी धरून स्वस्थ बसला असता हा इसम तरी ठीक होतं. पण पुढे ५५ कोटी रुपयांचं टेररिस्ट फायनान्सिंग केल्याशिवाय चैन पडेना. घरचं खाऊन त्याच ताटात शी करणे म्हणतात याला. तद्दन भिक्कारखोट इसम आहे हा. आंबेडकर त्याला 'मीडिया महात्मा' म्हणायचे. तेच बरोबर आहे. असो. एव्हढं बोलल्यावर हे सांगायला हरकत नाही की गांधी आणि त्यांचे संदर्भ वगळता उर्वरित लेख चांगला जमलाय. वसाहतवादाच्या अतिरिक्त प्रभावामुळे मराठी लेखकांनी गावगाड्यास नाकारलं, हे तुमचं निरीक्षण अतिशय समर्पक आहे. त्यामानाने हिंदी लेखक बरेच गावच्या मुळांना धरून आहेत. यावर तुम्ही अधिक चिंतन केलं असेल तर वाचायला आवडेल. एक विनंती आहे. ते गांधीबिंधी वगैरे फालतू गोष्टींना हाकलून लावा. केवळ मराठी साहित्याचा आढावा घेणारा असा एखादा लेख लिहाच. त्यात गांधींचा विषयोचित उल्लेख चालेल, पण तो हा मूळ मुद्दा नको. बघा जमवून आणाच. आपला नम्र, -गामा पैलवान