अजूनकाही
कृतयुगांत दैत्यांचा आदिपुरुष हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी खडतर तप केलं. हा दैत्य मुनी कश्यप व दिती याचा ज्येष्ठ पुत्र होता. त्यानं साडेअकरा वर्षं पाण्यात उभं राहून सहा ऋतुंमध्ये प्राप्त फळं-फुलं, पानं, तसंच अग्नी, वायू, जल यांचं सेवन करून ब्रह्माला प्रसन्न केलं. स्वयंप्रकाशित सुवर्णरत्नजडीत विमानात बसून ब्रह्मा त्याच्यासमोर अवतीर्ण झाला. त्या विमानाला सोनेरी किनारीचे पंख असलेले दुग्धवर्णी डौलदार हंस जोडलेले होते. बरोबर अष्ट दिशा, अष्ट वसु, नक्षत्रं, रुद्र, ग्रह आदी देवताही आल्या होत्या.
असुर, दैत्य, दानव हे ईश्वर प्रसन्न झाला रे झाला की, त्याच्याजवळ अजरामर होण्याचा वर प्रामुख्यानं मागत असत. हिरण्यकश्यपूही त्याला अपवाद नव्हता. तो म्हणाला, ‘‘हे पितामह ब्रह्मा, देव-राक्षस, यक्ष-गंधर्व, सर्प-वृक्ष, मनुष्य-पर्वत, नाग-गरुड व चराचरांत असणार्या जीवजंतूंकडून मला मृत्यू येऊ नये. शस्त्रानं वा अस्त्रानं, कोरड्या व ओल्या वस्तूपासूनही मला अभय असावं. तसंच पाताळ-भूमी वा नभ इथंही मला मृत्यू नको. रात्री वा दिवसा व घरांत किंवा बाहेरही मला मृत्यु नको. युद्धांत नेहमी माझाच विजय व्हावा. प्रैलोक्य माझ्या अखत्यारीत असावं. (थोडक्यात काय तर मी अमर व्हावं.)”
‘‘तसंच होईल दैत्यराज, तसंच होईल.’’ ब्रह्माचं वचन ऐकून सर्व देवता नवल करू लागल्या. त्या भयग्रस्तही झाल्या. हिरण्यकश्यपू पुन्हा बोलणार, तोच ब्रह्मा देवगणांसह गुप्त झाला. ब्रह्मा पाठोपाठ सारा देवलोक त्यांच्या मनोहारीणी नामक रम्य व अक्षय सभेत आले. सर्वांनी देवी गायत्री व ब्रह्मा यांना वंदन करून त्यांची स्तुतीपर वचनं गाऊन म्हटलं, ‘‘हे प्रभु, हिरण्यकश्यपूच्या नाशाचाही विचार करून ठेवावा, अन्यथा हा दैत्य आपणा सर्वांनाच जाचक ठरेल. पितामह, असा वर कसा दिलात?’’
‘‘देवांनो, त्याच्या तपश्चर्येचं फळ तर त्याला द्यायलाच हवं होतं. त्याचं पुण्य संपलं की, भगवान विष्णू त्याचा वध करेल हे सत्यवचन आहे. तेव्हा काळजी करू नका.’’ कमलोत्पन्न चतुराननाच्या आश्वासनानं इंद्रादी देवांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि जो तो आपापल्या भवनी गेला.
ब्रह्माकडून वर प्राप्त झाल्यावर हिरण्यकश्यपूला माज आला. त्यानं ऋषी-मुनी व व्रती यांना त्राही भगवान करून सोडलं. स्वर्गावर विजय मिळवून चंद्रसूर्यासह ऋतू-मुहूर्त यांना गुलाम केलं. आता विष्णूच आपला वाली आहे असं जाणून सर्व देव-यक्ष व अप्सरा यांनी क्षीरसागराकडे धाव घेतली. तिथं सहस्त्रफण्यांच्या शेषशय्येवर श्रीविष्णू आपली प्रिय पत्नी देवी लक्ष्मीसह विराजमान झाला होता. नारद-तुंबरु व गरुड शेजारीच मर्यादेनं उभे होते. देदीप्यमान युगुलाच्या दर्शनानंच देवांना अभय मिळाल्यासारखं वाटलं. त्यांनी त्या अव्यक्त, निराभय निर्गुण परमात्याला वंदन करून आपलं गार्हाणं मांडलं.
‘‘हे वात्सल्यसिंधू नारायण, तुम्हा उभयतांना आमचे कोटी कोटी प्रणाम. आम्हा सर्वांचं सुखनिधान तूच आहेस. परमदैवत व गुरुही तूच आहेस. ही पद्माक्षी समुद्रतनया लक्ष्मी आमची माता असून आम्ही बालकं आपल्याला शरण आलो आहोत. पूर्वी जसं आपण मोहिनीचं रूप घेऊन भस्मासुरापासून आमचं रक्षण केलं, तसंच या दैत्यापासून आम्हाला वाचवा.’’ अशा प्रकारचं देवांचं बोलणं ऐकून विष्णूनं त्यांना अभय दिल्यावर देव स्वगृही निघून गेले. विष्णूनं हिरण्यकश्यपूचा वध करण्याचं ठरवलं व ब्रह्माकडून दैत्यानं जे वरदान मागितलं होतं त्यानुसार स्थल, समय, अस्त्रं व रूप यांची सांगड घालून मुहूर्तावर देवांसह लक्ष्मीचा निरोप घेऊन दैत्याकडे प्रस्थान ठेवलं.
श्रीविष्णूनं आपल्या शरीराचा शिरापर्यंचा भाग सिंहाचा आणि घडापासून पायापर्यंतचा भाग मनुष्याचा केला व तो मनोवेगानं अदृश्य रूपांत दैत्त्यांच्या वैभवसंपन्न सभेत येऊन दाखल झाला. दीडशे योजने लांब, शंभर योजने रूंद व पाच योजने उंच असलेली ही सभा देवांचा शिल्पी विश्वकर्मा यानं निर्माण केली होती. तिचा वर्ण हिमगौर असून सुवर्ण, रजत व रत्नमय स्तंभांमुळे तिला अनोखं लावण्य प्राप्त झालेलं होतं. रंगीबेरंगी भरजरी झावळ्यामुळे ती मनोरम दिसत होती. आश्चर्य हे की, विमानाप्रमाणे आकाशात संचार करणारी होती. सभोवतालच्या उद्यानांत फळाफुलांच्या वृक्षांसह नानाविध वेली होत्या. शाश्वत स्वयंप्रकाश उत्सर्जित करणार्या सभेच्या आवारातील सरोवरे कुशशेय, सौगंधिक व सुवर्णकमळांनी परिपूर्ण होती आणि भ्रमरांच्या गुंजारवामुळे नादमय झाली होती. मयूर, शुक्र-सारिका, कोकिळा, सूर्यपक्षी, चक्रवाक यांच्या मधुरतम बोलांनी उद्यानं बोलकी झाली होती. ससे, खारी, हरणांचे विविध जातीचे कळप निर्भयपणे विहार करत होते. नानारंगी पुष्पं धारण करणार्या वेलींमुळे वनाचं सौंदर्य द्विगुणीत झालं होतं. दिव्य पताकामुळे संपूर्ण सभेला आगळी शोभा आली होती. अशा त्या दिव्य सभेचं निरीक्षण करत विष्णूनं मुख्य सभेत प्रवेश केला. तिथं असूरराज हिरण्यकश्यपू मोठ्या गुर्मीत रत्नजडीत सुवर्णसिंहासनावर आरूढ झाला होता. विष्णूनं एका रत्नजडीत विशाल परीघाच्या स्तंभांत प्रवेश केला.
हिरण्यकश्यपूच्या जवळच एका आसनावर बाळ प्रल्हाद आपल्या कयाधू मातेच्या मांडीवर बसून पित्याबरोबर विष्णूच्या अस्तित्वाबद्दल व महत्तेबद्दल चर्चा करत होता. सगळं राक्षसकुळ विष्णूची निंदा करत असता हा कुलकरंटा उलट त्याची स्तुती व भक्ती करतो, याचा हिरण्यकश्यपूला राग येई. आपलाच पुत्र म्हणून तो थोडा संयम बाळगी. पण पुत्राचं विष्णूप्रेम त्याला सहन होत नसे. अगदी समजू लागल्यापासून त्याचा कल विष्णूकडे आहे हे लक्षात येताच त्यानं त्याला शुक्राचार्यांच्या स्वाधीन करून त्याच्या हृदयातून, डोक्यांतून व मनातून विष्णूचं खूळ नाहीसं करण्याची ताकीद दिली. पण गुरुलाही त्यानं दाद दिली नाही. उलट समवयस्क मुलांना तो विष्णू भक्तीरसाचं अमृत पाजू लागला. ते पाहून पित्यानं कठोरपणे प्रल्हादला हत्तीच्या पायी दिलं. विषारी नाग चाववले. कड्यावरून लोटलं. उकळत्या तेलातही बुचकळलं. एकदा तर त्यानं आपली बहिण होलीकाच्या मांडीवर बसवून पेटलेल्या चितेत ढकललं. पण साक्षात मृत्युसुद्धा त्या निष्पाप बालकाला स्पर्श करू शकला नाही. होलीका मात्र जळून खाक झाली. प्रत्येक वेळी विष्णूनं आपल्या बालभक्ताभोवती मृत्युंजयाचं अभेद्य कवच निर्माण केलं. प्रल्हादाच्या तोंडी सतत वैर्याचं नाव ऐकून हिरण्यकश्यपूचे कान किटले. माता कयाधू पतीला म्हणाली, ‘‘घेईना का तो विष्णूचं नाव. आपल्याला तर त्याचा संसर्ग पोहोचत नाही ना? निदान त्याच्या वयाचा न नात्याचा विचार करा. शेवटी आपलं कुळ उज्वल करणार आहे तो.’’
खरं म्हणजे कयाधूनं असं म्हणणं तिचं धाडसच म्हणावं लागेल. पण विष्णूनं हिरण्याक्ष बंधूचा वध केला, याचा हिरण्यकश्यपूच्या मनात राग होता. तिचं बोलणं ऐकून तिची निर्भत्सना करून तीच प्रल्हादाला चिथवते, असा त्यानं आरोप केला. जोपर्यंत विष्णू आपला पाठीराखा आहे, तोपर्यंत बाळाच्या केसालाही धक्का लागणार नाही यावर तिचा विश्वास होता. त्यामुळे तिनं पतीच्या आरोपाकडे दुर्लक्ष करून तो विषय तिथंच संपवला.
श्रीविष्णूनं स्तंभातूनच सभेत सर्वत्र नजर टाकली. राजासह त्याचं बलाढ्य मंत्रीमंडळ व अतिथींसह मान्यवर राक्षसप्रभृती आपापल्या आसनावर बसून उंची मदिरा प्राशन करत लावण्यखणी देवांगनाचं नृत्य पाहात होतं. खास दासी त्यांना मदिराचे चषक भरून देत होत्या. देवांगनांमध्ये रंभा, मंजुघोषा, घृताची, सुमुखी, अलंबुवा प्रमुख होत्या. काही रूपसुंदरी हिरण्यकश्यपूच्या चरणांजवळ बसून त्याच्या कृपादृष्टीची अभिलाषा करत होत्या. राणी कयाधू प्रल्हादासह तो रंगविलास निर्विकार मनानं पाहात होती. कारण हे रोजचंच होतं. हिरण्यकश्यपू मधून मधून प्रल्हादाला विष्णूविषयी अपमानास्पद प्रश्न विचारत होता. प्रल्हादही न घाबरता उत्तरं देत होता. आत्ताही त्यानं विचारलं, ‘‘मूर्खा, माझ्या वैर्याचं गुणगान गातोस? या सभेत येण्याचं धाडस तरी आहे का रे तुझ्या त्या विष्णूत? अं!’’
‘‘होय तात. केवळ धाडसच नाही तर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, तसंच मनांत व हृदयात तो भरून राहिला आहे. जसा ब्रह्मा, महेश तसा विष्णू सर्व व्यापी आहे. चराचरांत तो वास करतो.’’
‘‘काय नतद्रष्ट कार्ट आहे. काय रे कुळबुडव्या, या काष्ठाच्या स्तंभांत आहे का तुझा विष्णू?” हिरण्यकश्यपू कडाडला.
‘‘हो आहे. माझा ईश्वर नाही अशी एकही वस्तू सृष्टीत नाही.’’
त्याची मुक्ताफळं ऐकून हिरण्यकश्यपूचं मस्तक ठणकूं लागलं. त्यांत पोटांत रिचवलेली मदिरा बाई मस्तकावर बसून थपडा मारू लागली. क्रोधातिशयानं त्याचं सर्वांग थरथरूं लागलं. त्यानं हातातील मद्यचषक जोरात भिरकावला व गदेला हात घातला. कयाधूच्या काळजाचा ठोका चुकला. तिनं आपलं लेकरू पदरात दडवलं. पण तसं अघटीत न घडता राजानं त्वेषानं गदेचा एकच जबरदस्त प्रहार पूर्वी निर्देश केलेल्या स्तंभावर केला. तो पुरेसा नव्हता म्हणून की काय स्तंभावर सणसणीत लत्ताप्रहार केला. त्यासरशी गदेच्या सर्वांगी जडवलेली व स्तंभावरील नक्षीकामाची नवरत्नं निखळून भूमीवर त्याचा सडा पडला. एवढंच काय पण राजाच्या दंडावर बांधलेली मोत्यांच्या बाजूबंदाची बंधनंही ताडकन तुटली. त्याच्या धूर्त विखारी नेत्रांत विष्णूविषयीच्या सूडाचा अंगार पेटला. त्याची धग मुख्यत्वे कयाधू व प्रल्हादाला लागली. स्तंभावरील आघातानं सभा भूकंप झाल्याप्रमाणे हादरली. असंख्य विजा कडाडल्या.
आणि त्या स्तंभाची मधोमध दोन उभी शकलं होऊन त्यातून ना कधी देखिली ना कधी पाहिली अशी विचित्र आकृती बाहेर आली. ना धड प्राणी व ना धड माणूस अशा त्या आकृतीचं मुख सिंहाचं होतं. सोनेरी आयाळ मानेवर व वक्षावर पसरली होती. पिवळे तीक्ष्ण सुळे, अक्राळविक्राळ जबडा व जळजळीत नेत्रद्वय पाहून शूरवीरांच्या वस्त्रांची ‘पितांबरं’ झाली. पण लहानग्या बाळ प्रल्हादानं विष्णूला ओळखलं. मातेच्या मिठीतून सुटका करून घेऊन त्यानं अतर्क्याच्या दिशेनं धाव घेतली. त्याच्या मांडीला सुकुमार हातांचा विळखा घातला. त्या आकृतीनं प्रल्हादाला अलगद फुलासारखं उचलून हृदयाजवळ धरलं. ते पाहून कयाधू भय व विस्मय यामुळे भूमीला खिळली. आश्वासक पावलं टाकीत विष्णू तिच्या जवळ आला. त्यानं तिचं लेकरू तिच्याकडे सुपूर्त केलं. हे स्वप्न की सत्य याचा तिला उलगडा होईना.
त्या अदभुत आकृतीच्या अंगाखांद्यावर एकही शस्त्र नव्हतं. अल्पावधीत त्यानं सभेची मोडतोड करण्यास प्रारंभ केला. सर्व सशस्त्र दैत्यांसमोर तो महाकाय प्राणी महामेरूप्रमाणे उभा ठाकला. सर्वांनी नरसिंहावर (अर्धे शरीर सिंहाचं व अर्धे नराचं म्हणून नरसिंह) शूल, मुसळ, पट्टीका, बाण व भाले टाकले, पण त्याने ती शस्त्रं काटेचमच्याप्रमाणे मोडीत काढली. काही वीर त्याच्या मागे जाऊन वार करू लागले. अजीत, काल, धर्म, ऋषी व ऐंद्र आदी चक्रांची नरसिंहानं वासलात लावली. सर्व दिव्य अस्त्रं त्या प्राण्यानं निष्प्रभ केली. सर्वांनी त्याला घेराव घातला, पण नरसिंहानं एकाच हुंकारासरशी सर्वांना उडवून दिलं. त्याच्या डरकाळ्यांनी पशुपशी, राक्षस भयानं पळून गेले. दैत्यांनी गिधाड, वराह, वाघ, कोंबडा, काक याची मुखं धारण करून त्याला भय दाखवलं, पण त्याच्या घनगंभीर गर्जनेनं सर्वांची तोंडं इवलीशी झाली. अग्नी, जल, वृक्ष व पाषाण यांच्या मार्यानंही तो तसूभरसुद्धा हलला नाही. हिरण्यकश्यपूनंही उसनं अवसान आणून गर्जना केली. त्यामुळे सारे सागर खवळले. सूर्य निस्तेज झाला. ग्रहतार्यांनी आपल्या कक्षा सोडल्या. यक्षगंधर्व व अप्सरा सभा त्याग करून निघून गेल्या. जगच काळवंडलं. कयाधू व इतर राण्यांनी आपलं सौभाग्य अडचणीत आल्याचं ओळखलं. एकाएकी नरसिंहानं हिरण्यकश्यपूला मांडीवर उताणं पाडलं. बळकट पंजांची तीक्ष्ण धारदार नखं त्याच्या पोटांत खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला.
घरांत नाही व घराबाहेरही नाही. ना दिवसा ना रात्री. शस्त्र किंवा अस्त्र न वापरता. ना आकाशांत किंवा ना भूमीवर. आणि ना मानवाकडून वा ना प्राण्याकडून मला मृत्यू येऊ नये असा वर त्या पाताळात राहणार्या पाताळयंत्री दैत्यानं ब्रह्माकडून मिळवला होता. हे सर्व लक्षात घेऊन विष्णूला नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला. उंबरठ्यावर, नखांनी, मांडीवर, संध्याकाळी नरसिंहानं त्याला ठार केलं!
ते बीभत्सदृश्य पाहून कित्येक कठोर हृदयी राक्षस मृत झाले. काही मूर्च्छित तर काही पळून गेले. रक्ताच्या चिरकांड्यांनी सभागृह पलाशवृक्षाप्रमाणे लाल झालं. त्याचा मृत्यू होताच नभांगणांत मंगलवाद्यं वाजू लागली. यक्ष किन्नर गाऊ लागले. देवांगना नाचू लागल्या. सूर्यचंद्रावरचं मळभ नष्ट झालं. चंद्रमा सर्व नक्षत्रांसह नभाच्या प्रांगणात दाखल झाला. सुगंधी वारा वाहू लागला. नंतर नरसिंहानं कृपादृष्टीनं सर्व सभा पूर्ववत केली. आपलं उग्ररूप त्यागून मूळ स्वरूपात म्हणजे शंख-चक्र, गदा, पद्म धारण करून प्रल्हादाला दर्शन देऊन कयाधूला व त्याला पुष्कळ वर देऊन संतुष्ट केलं व उपस्थित देवगणांसह वैकुंठाला गेले. नरसिंहाचा पराक्रम पाहायला आकाशांत समस्त देवलोकच उपस्थित होता.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment