दृष्ट लागेल इतका देखणा होतो ‘देवदास’चा नाट्यप्रयोग!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘देवदास’ या नाटकातील एक दृश्य
  • Sat , 01 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe देवदास Devdas

भारतीय साहित्यात जे स्थान हिंदी साहित्यकार मुन्शी प्रेमचंद यांचं आहे, तसंच स्थान बंगाली साहित्यिक डॉ. शरदचंद्र चटर्जी यांचं आहे. त्यांची ‘देवदास’ ही लघुकादंबरी किंवा त्यावर आधारित आलेले तीन हिंदी सिनेमे माहिती नसलेली व्यक्ती अगदी विरळा. त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट निघालेले आहेत. अभ्यासक असे सांगतात की, हिंदी, तेलूगू, बंगाली वगैरे भारतीय भाषांतील अवतार मोजले, तर ‘देवदास’वर एकूण अठरा चित्रपट बनलेले आहेत. हिंदी भाषेतच तर तीन देवदास आहेत. पी.सी. बरूआ यांनी दिग्दर्शीत केलेला कुंदनलाल सहगलचा ‘देवदास’ (१९३६) हा हिंदीतील पहिला अवतार, बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला दिलीपकुमार, सुचित्रा सेन व वैजंयतीमालाचा देवदास (१९५५) हा ‘देवदास’चा दुसरा हिंदी अवतार तर संजय लीला भन्साली यांनी दिग्दर्शित केलेला शाहरूख खान व ऐश्‍वर्या राय यांचा ‘देवदास’ (२००२) हा ‘देवदास’चा तिसरा हिंदी अवतार. अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केलेला अभय देओलच्या ‘देव डी’ या २००९ साली आलेल्या चित्रपटाला ‘देवदास’चा चौथा अवतार असं मला तरी म्हणवत नाही. गुलजार यांनासुद्धा ‘देवदास’वर चित्रपट काढायचा होता. त्यात ‘देवदास’ची भूमिका धमेंद्र, हेमा मालिनी चंद्रमुखी, तर पारो शर्मिला टागोर साकार करणार होती. पण या ना त्या कारणांनी हा चित्रपट तयार झाला नाही.

हे तपशील बघितले म्हणजे १९१७ साली वाचकांसमोर आलेल्या ‘देवदास’ या लघुकादंबरीची वाचकांवर किती मोहिनी असेल याचा अंदाज येतो. विसाव्या शतकातील भारतीय साहित्यातील एक अजरामर साहित्यकृती म्हणून ‘देवदास’कडे बोट दाखवता येतं. आता याच अजरामर कृतीवर आधारित ‘देवदास’ हे हिंदी नाटक मुंबर्इत सुरू आहे.

‘देवदास’चं कथानक विसाव्या शतकातील बंगाल प्रांताच्या ग्रामीण भागात घडतं. यात केंद्रस्थानी एक ब्राह्मण जमीनदार कुटुंब आहे. आणखी एक गरीब ब्राह्मण कुटुंब आहे. कादंबरीतील काही प्रसंग कलकत्ता व मुंबर्इसारख्या महानगरांत घडतात. सिनेमासारख्या माध्यमात हे दाखवणं सहज शक्य आहे, पण रंगभूमीच्या चिमुकल्या अवकाशात नाही. म्हणून रंगमंचावरील ‘देवदास’मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. यातील काही बदल रंगमंचासाठी करण्यात आले आहेत, तर काही बदल कथानकांत करण्यात आले आहेत. रंगमंचासाठी करण्यात आलेल्या बदलांचं सहज समर्थन करता येतं, मात्र कथानकात केलेल्या बदलांबद्दल असं म्हणता येत नाही. उदाहरणार्थ मूळ कादंबरीत पोलिस अधिकारी हे पात्र नाही, जे नाटकात एका प्रसंगी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं.

चुन्नीलाल कलकत्याबाहेर जात असताना त्याला गावाबाहेर एका झोपडीत अगदी साधेपणानं राहणारी चंद्रमुखी दिसते. त्याला फार आश्‍चर्य वाटतं, इथून या नाटकाची सुरुवात होते. चंद्रमुखी कलकत्त्याची एकेकाळची अतिशय लोकप्रिय व श्रीमंत कोठेवाली असते. चुन्नीलालला तिच्या चेहऱ्यावर अतीव तृप्ती दिसते. त्यांच्या गप्पा सुरू होतात. त्यातून चुन्नीलालप्रमाणे प्रेक्षकांनाही कळतं की, ती गेली काही महिने गावाबाहेर राहत आहे. तिने कलकत्त्यातले सर्व व्यवहार बंद केले आहेत. देवदास कुठे आहे तिला माहिती नाही, पण तिची श्रद्धा आहे की, तो एक दिवस तिच्याकडे नक्की येर्इल वगैरे वगैरे.

‘देवदास’ची कहाणी जवळजवळ सर्वांना माहिती आहे. यात थोडे बदल केले आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे पोलिस अधिकाऱ्याचं पात्र टाकण्यात आलं आहे. या अधिकाऱ्याला चंद्रमुखीबरोबर झोपायचं असतं. ती जेव्हा नकार देते, तेव्हा तो तिला अटक करून नेतो. याप्रकारे देवदासचा उत्तर आयुष्यातला व निष्कांचन अवस्थेतला आधारसुद्धा जातो.

या नाटकाची चर्चा सादरीकरणाच्या पद्धतीच्या दिशेनं करणं गरजेचं आहे. आपल्याला सिनेमातून माहिती असलेला देवदास एका ब्राह्मण जमीनदाराचा तरुण मुलगा असतो. कुंदनलाल सहगलचा ‘देवदास’ काय किंवा दिलीपकुमारचा ‘देवदास’ काय, हे दोन्ही चित्रपट कृष्णधवल होते. त्यामुळे या चित्रपटांमुळे देवदाससारखी जमीनदारांची मुलं त्या काळी किती ऐश्‍वर्यात जगत असतील याचा अंदाज येत नाही. एवढ्या वर्षांची ही त्रुटी या नाट्याविष्कारानं भरून काढली. आज तंत्रवैज्ञानिक प्रगतीमुळे रंगमंचावर जे जे नेत्रदीपक करणं शक्य आहे, ते दिग्दर्शक सैफ हैदर हसन यांनी ‘देवदास’च्या सादरीकरणात वापरलं आहे. यासाठी निर्माते अश्‍विन गिडवानी व त्यांची कंपनी ‘एजीपी वर्ल्ड’ यांनी नरिमन पॉइंट येथील एनसीपीएचं जमशेद भाभा थिएटर हे भव्य नाट्यगृह सलग आठवडाभरासाठी घेतलं होतं. दिग्दर्शक सैफ हैदर हसन व निर्माते अश्‍विन गिडवानी यांना अपेक्षित परिणाम या नाट्यगृहातच साधणं शक्य आहे.

या भव्यतेची सुरुवात पडदा वर जातो तेव्हापासून होते. चुन्नीलाल एका सायकल रिक्षानं जात असतो, तेव्हा त्याला चंद्रमुखी दिसते. या प्रसंगात चक्क एक सायकलरिक्षा रंगमंचावर येते. सायकलरिक्षाच्या घंटीनं प्रेक्षक जुन्या जमान्याच्या वाहतूक व्यवस्थेत जातात. नंतर प्रेक्षकांचं लक्ष जातं, ते चंद्रमुखीच्या झोपडीकडे. एकेकाळी अतिशय नटणारी, मुरडणारी, दागिन्यांनी मढलेली चंद्रमुखी आता अगदी साध्या कपड्यांत बघून प्रेक्षकांना तिच्यात झालेले बदल दिसतात. तिच्या आजूबाजूला आनंदानं बागडणारे पशुपक्षी, वातावरणातील प्रसन्नता वगैरेंमुळे चंद्रमुखी देवदासच्या प्रेमात आदिभौतिक पातळीवर किती पुढे गेली आहे आणि आता ती कशी आतल्या शांतीत न्हाऊन निघत आहे याचा प्रत्यय प्रेक्षकांना येतो. या पहिल्या प्रसंगापासूनच प्रेक्षकांना आपण एक वेगळाच ‘देवदास’ बघत आहोत याचा अंदाज यायला लागतो.

नाटक जसजसं पुढे सरकतं तसतसे कथानकातील ताणतणाव समोर येतात. देवदास आणि पारो यांच्या विवाहात ‘जात’ हा अडसर नसून ‘वर्ग’ हा अडसर ठरतो. पारोची घरची परिस्थिती खाऊनपिऊन सुखी अशी, तर देवदास एका धनाढ्य जमीनदाराचा मुलगा. इथंसुद्धा कथानकात जरा बदल केले आहेत. देवदासच्या निष्क्रियतेमुळे त्याचे वडील त्याला सतत टोमणे मारत असतात. या नाटकात देवदासला नर्तन करण्याची आवड दाखवली आहे, जी त्याच्या  वडिलांना मुळीच मान्य नसते. ते म्हणतात मुखर्जी घराण्यातील पुरुष एक तर जमीनदार होतात किंवा बॅरिस्टर. तिसरा पर्याय नाहीच. वडिलांच्या सततच्या कटकटींना कंटाळून देवदास कलकत्त्याला निघून जातो. तिथं चुन्नीलालमुळे तो चंद्रमुखीच्या कोठ्यावर जायला लागतो.

हे असे थोडे बदल सोडले तर कथानकात इतर बदल नाहीत. इथं विचार करायचा आहे तो देवदासच्या नाट्याविष्काराचा. यासाठी जे तंत्रवैज्ञानिक प्रयोग केले आहेत, त्यामुळे हा प्रयोग प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतो. यातील श्रीमंतीचं दर्शन समर्थनीय ठरतं, कारण देवदास मुखर्जी एका धनाढ्य जमीनदाराचा मुलगा असतो. त्या काळातील श्रीमंती, जमीनदारी, ऐश्‍वर्य देवदासच्या कृष्णधवल चित्रपटांत आविष्कृत होत नाही. ते सर्व रंगमंचावर बघायला मिळतं.

या नेत्रदीपक तंत्रवैज्ञानिक आविष्काराला अप्रतिम जोड मिळाली आहे नृत्यांची. चंद्रमुखी नृत्यांगना असल्यामुळे या नाटकात नृत्याला महत्त्व आहेच. या नाटकातील नृत्यांचं दिग्दर्शन शंपा सोनथालिया यांनी केलं आहे. शंपा प्रसिद्ध कथक गुरू गोपीकृष्ण यांच्या कन्या आहेत. देवदासमधील नृत्यं केवळ अप्रतिम आहेत. नृत्यांबरोबरच नेपथ्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’ वगैरे गाजलेल्या हिंदी चित्रपटांचं नेपथ्य करणाऱ्या ओमंग कुमार यांनी देवदासचा नाट्यप्रयोग वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.

गौरव चोप्रा (देवदास), सुखदा खांडकेकर (पारो), मंजिरी फडणीस (चंद्रमुखी) व संजीव त्यागी (चुनीलाल) यांच्या अभिनयामुळे आधीच नेत्रदीपक झालेल्या देवदासच्या प्रयोगाची कलात्मक उंची वाढते. त्यातही पारोच्या भूमिकेतील सुखदा खांडकेकरचा खास उल्लेख करावा लागेल. तिने अल्लड पारो, वयानं जवळजवळ तिप्पट असलेल्या बिजवराशी लग्न झालेली पारो, तरीही देवदास न विसरणारी पारो वगैरे सर्व छटा विलक्षण सहजतेनं व्यक्त केल्या आहेत. तिनं व्यक्त केलेला पारोचा भोळा स्वभाव प्रेक्षकांना चकित करून टाकतो. तिला साथ दिली आहे चंद्रमुखीच्या भूमिकेतल्या मंजिरी फडणीसनं. तिचं नृत्य जबरदस्त होतं. चुन्नीलालच्या भूमिकेतील कावेबाजपणा संजीव त्यागी सहजतेनं व्यक्त करतात. थोडी तक्रार आहे ती देवदासच्या भूमिकेतल्या गौरव चोप्रांबद्दल. काही प्रसंगी त्यांचा अभिनय जरा लाऊड होतो, तर काही प्रसंगी ते देवदासची हतबलता व्यक्त करण्यात थोडेसे कमी पडतात. ही किरकोळ उणीव सोडली तर सैफ हैदर हसन यांनी दिग्दर्शित केलेला ‘देवदास’चा प्रयोग दृष्ट लागेल इतका देखणा होतो.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................                         

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......