अजूनकाही
नाटककार, नाट्यचित्रपट दिग्दर्शक, कथालेखक, मालिका दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांना त्यांच्या ८०व्या जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी मागच्या आठवड्यात त्यांच्या आप्तेष्टांनी मुंबईत एक छोटासा समारंभ आयोजित केला होता. त्यानिमित्तानं मतकरी यांनी ‘आरण्यक’ या ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या नाटकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात मतकरी यांचे चिरंजीव आणि नव्या पिढीचे लेखक, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांचा ‘(कदाचित) इमॅजिनरी’ या कथासंग्रहाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.
विद्या वैद्य यांनी ‘आरण्यक’ या दु:खान्त नाटकाचा भव्य पट उलगडून दाखवला आणि रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यप्रगल्भतेच्या आवाक्याची प्रशंसा केली.
मतकरी यांच्या अनेक नाटकांचे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘(कदाचित) इमॅजिनरी’ या कथासंग्रहाचं मार्मिक विवेचन केलं. या कथासंग्रहाची शक्तिस्थानं अधोरेखित करताना केंकरे यांनी त्यांच्या शैलीची नवता, निरीक्षणातील सूक्ष्मता, मानवी जीवनातील विरोधाभास आणि लेखनातील चित्रशैलीचं प्रामुख्यानं कौतुक केलं.
वरील दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करताना ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी मतकरी यांचं ‘आरण्यक’ नाटक धर्मवीर भारतींच्या ‘अंधायुग’च्या तोडीची भव्य शोकांतिका असल्याचं सांगितलं. यावेळी सोनटक्के यांच्या हस्ते मतकरी यांचा सत्कार करण्यात आला. सोनटक्के आपल्या भाषणात मतकरी यांची एक सव्यसाची नाटककार म्हणून बालनाट्य, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक या क्षेत्रांतील त्यांच्या नेत्रदीपक कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले,
“विषय, आशय, शैली याबाबत सतत प्रयोग करणाऱ्या मतकरी यांनी कुणाचंही अनुकरण केलं नाही. अगदी स्वत:च्या यशस्वीतेचे आडाखे पुन्हा कधी वापरले नाहीत. ते सतत नावीन्याचा शोध घेत राहिले, आजही घेत आहेत. मतकरी यांनी आपली बरीच नाटकं दिग्दर्शित केली. त्यांच्या ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला.
“एक सक्षम कथालेखक आणि कादंबरीकार म्हणूनही मतकरी यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. मात्र त्यांच्या कलाकर्तृत्वाची राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर उचित दखल घेतली गेली नाही. मतकरी यांनी ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ही जबाबदारी आतातरी महाराष्ट्र शासन आणि संबंधित यंत्रणा गांभीर्यानं घेतील.
“हा सत्कार खरं तर तात्यासाहेब शिरवाडकर किंवा पु.ल.देशपांडे यांच्या सारख्यांच्या हस्ते व्हायला हवा होता. तरीही आपण स्वत: व सभागृहात उपस्थित सारे आप्तजन आणि मतकरी यांच्यावर अलोट प्रेम करणाऱ्या सर्व वाचक आणि रसिकांतर्फे मतकरी यांचं अभिष्टचिंतन करतो आणि भविष्यातही त्यांच्या हातून नाटक, साहित्य आणि कलेची अशीच अविरत सेवा घडत राहो.”
या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक कोठावळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन मिलिंद विनोद यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत केलं. कार्यक्रमाच्या शेवटी दिलीप प्रभावळकर यांनी रत्नाकर मतकरी यांची मुलाखत घेतली.
मतकरी यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभकामना देताना सोनटक्के म्हणाले, ‘मतकरी हे सातत्यानं लिहीत गेले. सतत ६० वर्षं ते लिहीत आहेत. पण मराठी समाजाचं नशीब बलवत्तर नसल्यानं त्यांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाला नाही, ही फार मोठी खंत आहे.’
सोनटक्के यांना या विधानाबद्दल कार्यक्रमानंतर विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “एक तर इतर भाषिक समाजाप्रमाणं आमचे कुणी हक्काचे राष्ट्रीय स्तरावर भाष्यकार नाहीत. राज्यशासन छोटे छोटे पुरस्कार देऊन त्यातच धन्यता मानतं. आपल्या उत्तम साहित्यकारांचं गुणवत्तापूर्ण साहित्य इतर भाषांमधून अनुवादित करण्याच्या, त्यांचा प्रचारप्रसार करण्याच्या कुठल्याही भरीव गुणात्मक योजना आमच्याकडे नाहीत.
“आपल्या साहित्य संस्था साहित्य संमेलनं भरवणं, कर्नाटक सीमेवरील प्रदेशात मराठी भाषेच्या रक्षणार्थ अधूनमधून आवाज देणं आणि मराठी शाळा वाचवण्याच्या कामात आपल्याच शासनाच्या दारात धरणं धरणं यातच सारी शक्ती पणाला लावत असतात. राष्ट्रीय स्तरावर ज्या मोजक्या मराठी साहित्यिकांचा मानसन्मान झाला, त्यांचे भाष्यकार हे परभाषिक आणि दिल्ली दरबारचं राजकारण जाणणारे होते ही वस्तुस्थिती आहे. मराठी साहित्यात प्रांतवाद, व्यक्तिगत हेवेदावे, बिरादरी या परिघाबाहेर जाऊन विचार करणारं खंबीर नेतृत्व नाही, हे आमचं दुर्दैव आहे.
“मतकरी यांच्यासारखी विद्वान, विपुल, वैविध्यपूर्ण साहित्य लिहून आपल्या कलात्मक गुणवत्तेच्या, प्रयोगशीलतेच्या बळावर बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस, संस्मरणीय नाटकं सातत्यानं लिहिणारा आणि ती दिग्दर्शित करून, वेळप्रसंगी पदराला खार लावून नाट्यनिर्मिती करणारा दुसरा नाटककार स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय स्तरावर कुणीही दिसत नाही.
“विषयवस्तू, आशय, भाषा, शैली, उदबोधन आणि रंजनाच्या स्तरावर त्यांची बहुतेक नाटकं लक्षवेधी आहेत. ‘अलबत्या गलबत्या’, ‘घर तिघांचं हवं’, ‘लोककथा ७८’, ‘विठोरखुमाई’, ‘इंदिरा’, ‘आरण्यक’ ही त्यांची नाटकं योजनस्तंभ म्हणून लौकिक मिळवून गेली. केवळ नाट्यक्षेत्रातील मतकरी यांच्या बहुमुखी प्रतिभेसाठी त्यांना नाटककार म्हणून आणि नाट्यदिग्दर्शक म्हणून संगीत अकादमी रत्न पुरस्कार दोन्ही दालनात खूप पूर्वी मिळायला हवा होता.
“नाट्यलेखनाव्यतिरिक्त मतकरींची साहित्यिक मुशाफिरी ही कसदार कथालेखन, कादंबरीलेखन आणि अन्य दालनांनाही समृद्ध करणारी आहे. साहित्य अकादमी आणि मूर्ती पुरस्काराच्या तोडीची आहे.
“मतकरी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला अगदी आटोपशीर मराठी चित्रपट ‘इन्व्हेस्टमेंट’ विषयवस्तू, सामाजिक बांधीलकी, उदबोधन आणि रंजनाच्या स्तरावर लक्षवेधी ठरला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. याशिवाय दूरचित्रवाणीवरही मतकरी यांनी सामाजिक भान जागवणाऱ्या पाच-सात मालिका लिहून दिग्दर्शित केल्या आहेत.
“मतकरी यांच्या समृद्ध साहित्यिक, कलात्मक विश्वाच्या प्रत्येक दालनाचं आकलन होत नाही, तोच दुसरं दालन उलगडायला लागतं. त्या दालनाचं क्षितीज पार करेपर्यंत आणखी दुसरं दालन तुम्हाला खुणावतं. त्यांचं कलाविश्व अविरतपणे विस्तारतच जातं हा आमचा भाग्ययोग आहे.
“मतकरी यांच्या साहित्यिक, रंगभूमीविषयक आणि चित्रपट आणि अन्य कलामाध्यमातील भरीव योगदानासाठी उशिरा का होईना ‘पद्मश्री’ या राष्ट्रीय सन्मानानं गौरव होणं महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीनं आवश्यक आहे.
“मतकरी हे कधीही कुठल्या गटाचे किंवा कंपूचे हितचिंतक झाले नाहीत, त्यांनी आपला कुठला मठ किंवा पंथ स्थापन केला नाही. अबोलपणाचा कुठला मुखवटा धारण करून किंवा स्तुतिपाठकांचं कोंडाळं करून स्वत:चंच कुठलं वलय त्यांनी कधी निर्माण केलं नाही. पण मला वाटतं यात त्यांचा शक्तिक्षय झाला असता. त्यांच्या रचनात्मक ऊर्जेवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला असता.”
या कार्यक्रमाला रामदास भटकळ, कमलाकर नाडकर्णी, दिलीप प्रभावळकर आणि मतकरी यांच्या बालनाट्यातील आणि व्यावसायिक नाटकातील अनेक कलावंत, जाणकार आणि आप्तजन उपस्थित होते.
ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment