अचानक शस्त्र म्यान केलेल्या सुषमा स्वराज
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • सुषमा स्वराज लालकृष्ण अडवानी आणि सोनिया गांधी यांच्यासह
  • Sat , 24 November 2018
  • पडघम देशकारण सुषमा स्वराज Sushma Swaraj लालकृष्ण अडवानी Lal Krishna Advani सोनिया गांधी Sonia Gandhi भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

घटना १९९९मधली आहे. देशाच्या राजकारणात तेव्हा नुकत्याच सक्रिय झालेल्या सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठी सोबतच कर्नाटकातील बेल्लारी येथूनही लढवण्याचा निर्णय घेतला. यात बेल्लारी हा काँग्रेसनं भाजपला दिलेला चकवा होता. एका रात्रीत हालचाली झाल्या आणि बेल्लारी लोकसभा मतदार संघातून गांधी यांच्या विरोधात लढण्याचा तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांचा आदेश पहाटे अडीच वाजता कळल्यावर, कोणतीही खळखळ न करता सकाळीच बेल्लारीला धाव घेत सुषमा स्वराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. (कर्नाटकातील खाण मालकांशी त्यांची घसट तेव्हापासून आहे!) ‘देश की बेटी’ विरुद्ध ‘परदेशी बहू’ असं स्वरूप त्या निवडणुकीला आलं आणि बेल्लारीकडे अवघ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं. गांधी यांनी बेल्लारीतून विजय तर मिळवला, पण तो मिळवण्यासाठी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला. स्वराज यांचा पराभव अपेक्षित होताच, पण तो केवळ ५६ हजार मतांनी  व्हावा अशी राजकीय किमया, आयुष्यात कधीही बेल्लारी न पाहिलेल्या, कन्नड भाषा न येणाऱ्या, त्या संस्कृतीशी पूर्ण अपरिचित असणाऱ्या स्वराज यांनी बजावली आणि पराभवातही यश असतं हे दाखवून दिलं.

१९९८च्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवसच आधी भाजपनं दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेण्याचा, तसंच विधानसभा निवडणुकीत पक्षाचं नेतृत्वही करण्याचा आदेश दिला आणि तो स्वराज यांनी न कुरकुरता पाळला. ५१ दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळताना सुषमा स्वराज त्वेषानं लढल्या. त्या विजयी झाल्या, पण पक्षाला विजयी करू शकल्या नाहीत.

नरेंद्र मोदी यांचा भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात झालेला उदय आणि लालकृष्ण अडवाणी यांना मागे सारत भावी पंतप्रधान म्हणून त्यांची झालेली निवड न रुचलेल्या भाजपच्या नेत्यांत स्वराज यांचा समावेश आहे. तरी पक्षानं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड केल्यावर (खरं तर संघानं ती करवून घेतल्यावर!) नाराज लालकृष्ण अडवाणी यांनी ‘लेटर बॉम्ब’ फोडू नये म्हणून नितीन गडकरी यांच्यासोबत शिष्टाई करणाऱ्यांत स्वराज आघाडीवर होत्या, कारण अडवाणी यांनी जर तो ‘लेटर बॉम्ब’ फोडला असता तर पक्षाची प्रतिमा डगाळली असती.    

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

एखाद्या राजकीय महाकादंबरीची महानायिका शोभावी असा, सुषमा स्वराज यांचा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय राजकारणातील प्रवास अत्यंत ऐटदार, काहीसा संघर्षमयी आणि अचंबितही करणारा आहे.

गव्हाळ वर्णाच्या, लहान चणीच्या आणि फर्ड वक्तृत्व असलेल्या स्वराज यांचा जन्म हरियाणातील पलवाल या गावी १४ फेब्रुवारी १९५२ रोजी लक्ष्मीदेवी आणि हरदेव शर्मा या दाम्पत्याच्या पोटी झाला. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असत. त्याच वयापासून त्यांचं नाव वक्ता म्हणून गाजू लागलं. कायद्याचं शिक्षण घेत असताना त्यांचे प्रेमबंध तेव्हा इंग्रजी वक्तृत्वात गाजत असलेल्या स्वराज कौशिक यांच्याशी जुळले. नंतर त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

१९७७च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली. नंतर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत स्वराज यांना उमेदवारी देण्याची शिफारस खुद्द जयप्रकाश नारायण यांनी केली. विजयानंतर त्या वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी मंत्री झाल्या. हरियाणाच्या कामगार मंत्री असताना एक त्रिपक्षीय करार करताना कामगारांची बाजू घेत हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवीलाल यांच्याशी थेट पंगा घेतल्यावर स्वराज यांनी बाणेदारपणे राजीनामा दिला, पण तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांचा पुन्हा मंत्रीमंडळात समावेश करायला लावला.

पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांच्याही स्वराज विश्वासातल्या होत्या आणि त्यांच्या राजीनामा प्रकरणात चंद्रशेखर यांनी देवीलाल यांना कसं झापलं होतं, यांच्या आठवणी अजूनही हरियाणाच्या राजकारणाच्या चघळल्या जातात.

केंद्रात जनता पक्षाचं सरकार असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या सय्यद शहाबुद्दीन यांच्या मागणीला स्वराज यांनी ठाम विरोध दर्शवला, तरी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर जनता पक्षात वाजत-गाजत झालेल्या फुटीनंतर स्वराज मात्र भारतीय जनता पक्षात सहभागी झाल्या नाहीत. त्या जनता पक्षातच राहिल्या. अखेर लालकृष्ण अडवाणी यांनी आग्रह केल्यावर त्यांनी १९८४ साली भाजपमध्ये प्रवेश केला. पण ज्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी, त्या पक्षप्रवेशासाठी भाजपच्या अशोक मार्गावरील राष्ट्रीय कार्यालयात पोहोचल्या, तेव्हा अडवाणी यांनी त्यांना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचं वृत्त सांगितलं. त्या हत्येमुळे त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणारी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली!

नंतर भाजप आणि देशाच्या राजकारणात स्वराज यांनी घेतलेली झेप ही एक राजकीय यशकथा आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे केवळ दोन सदस्य निवडून आले. इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या लाटेनंतर विशेषत: भाजपसारख्या नव्यानं सुरुवात केलेल्या पक्षाच्या वाढीसाठी तो अतिशय विपरित कालखंड होता होता. दुसऱ्या फळीतील प्रमोद महाजन, कुशाभाऊ ठाकरे यांच्याप्रमाणे स्वराज अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत ठाम राहिल्या. पक्ष विस्तारासोबतच स्वराज यांचा बोलबाला वाढू लागला. अफाट वाचन, कुशाग्र स्मरणशक्ती आणि दिवस-रात्र न बघता काम करण्याच्या सवयीनं त्यांचा हा बोलबाला वृद्धिंगत आणि राजकीय आकलन प्रगल्भ होत गेलं.

दरम्यान हरियाणा सोडून दिल्लीत बस्तान बसवत त्यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. क्षेत्र व्यापक झालं आणि नेतृत्वाची झेपही मग विस्तारतच गेली. त्यांची पक्षनिष्ठाही बावनकशी ठरली. लालकृष्ण अडवाणी यांच्या पुढाकारानंच त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली आणि संसदीय राजकारणावरही सुषमा यांनी ठसा उमटवला. भारतीय जनता पक्षात ज्या मोजक्या महिला त्या काळात यशस्वी ठरल्या, त्यात सुषमा स्वराज यांचं नाव अग्रक्रमावर आहे. पक्षाच्या पहिल्या महिला राष्ट्रीय सरचिटणीस, पहिल्या महिला प्रवक्त्या, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, अशी अनेक पहिलीवहिली पदं त्यांनी भूषवली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही केंद्रीय मंत्रीमंडळाच्या त्या अविभाज्य घटक होत्या. भाजपच्या केंद्रातील पहिल्या तेरा दिवसाच्या सरकारात असताना संसदेचं कामकाज दूरदर्शनवर प्रसारित करण्यासारखा धाडसी निर्णय घेणाऱ्या त्याच होत्या!   

.............................................................................................................................................

 पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y9vua5v7

.............................................................................................................................................

मनाला पटणारा नसला तरीही अटलबिहारी वाजपेयी आणि/किंवा लालकृष्ण अडवाणी यांनी दिलेला आदेश पाळणारा निष्ठावंत असा लौकिक स्वराज यांनी प्राप्त केला. (संघाच्या आदेशाप्रमाणे) अडवाणी यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद सोडावं लागलं, तोपर्यंत पक्षात सुषमा इतक्या उंचीला पोहोचलेल्या होत्या की, अडवाणी यांचा वारस म्हणून लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीत विराजमान होण्यासाठी स्वराज यांच्याशिवाय दुसरं कोणतचं नाव पक्षासमोर नव्हतं.

२००४मध्ये जी महिला पंतप्रधान झाली तर ‘मुंडन करेन’, ‘श्वेत वस्त्र परिधान करेन’ असा अशोभनीय आततायीपणा स्वराज यांनी केला होता, त्याच गांधी तेव्हा सभागृहात यूपीएच्या सर्वोच्च नेत्या म्हणून समोरच्या बाकावर स्थानापन्न होत्या! राजकारणातही काव्य असतं, त्याचा भारतीय लोकशाहीनं आणून दिलेला हा प्रत्यय होता!

याच काळात ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’ म्हणून स्वराज यांच्याकडे पाहिलं आणि बोललं जाऊ लागलं. कर्नाटकातील खाण मालकांशी असलेले अर्थपूर्ण सबंध वगळता (एव्हाना भारतीय राजकरणातील प्रत्येक नेत्याची ‘ती तशी ओळख’ ही अपरिहार्यता झालेली आहे!) स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीवर डाग नव्हता तरीही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पुरुषप्रधान संघटनेची संमती, नरेंद्र मोदी यांचा संभाव्य उदय आणि पक्षात पुरेसं ‘फॉलोइंग’ नसणं, हे स्वराज यांच्या ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’चं स्वप्न साकारण्यातील अडथळे ठरलेच.

एकेकाळी पक्षाची ‘मुलुख मैदानी तोफ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या स्वराज सध्या देशाच्या परराष्ट्र मंत्री आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर हे परराष्ट्र मंत्रीपद भूषवणार्‍या देशाच्या त्या दुसर्‍याच महिला आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणून सुरुवातीलाच स्वराज गाजल्या त्या ‘क्रिकेट माफिया’ ललित मोदी यांना व्हिजा मिळवून देण्यासाठी केलेल्या वादग्रस्त शिफारशीमुळे. एकेकाळी शिष्य असलेल्या नरेंद्र मोदी यांना लालकृष्ण अडवाणी यांनी नंतर विरोध का केला, हे ललित मोदी प्रकरणाचं वार सहन करावं लागल्यावर परराष्ट्र मंत्री स्वराज यांना चांगलंच उमगलं असणार. ज्यांच्या काळात ललित मोदी रुजले-फोफावले, मग आक्राळविक्राळ होत आवाक्याच्या बाहेर जात थेट राजरोसपणे परदेशी पलायन करते झाले, ते सर्व आणि ललित मोदी नावाचा न फेडता येणारा लबाडीच्या कर्जाचा डोंगर स्वराज यांच्या खात्यावर जमा करण्याची संधी तेव्हा भाजपतील विद्यमान अनेकांना मिळाली!

‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’ असणाऱ्या स्वराज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गळ्यातील ओढणं झाल्याचं चित्र निर्माण झालं. त्या चित्रातून राजकारणातील अनिश्चितता म्हणजे काय याचाही प्रत्यय स्वराज यांना पुरता आलेला असणारच. (जाता जाता इथं एक नोंदवून ठेवायला हवं. ललित मोदी नावाच्या थोर कुप्रथेचे आद्यप्रणेता ‘धर्मा तेजा’ हे काँग्रेसच्या नेहरू-इंदिरायुगीन आहे. नगरवाला, चंद्रास्वामी,  क्वात्रोची, सुखराम, सुरेश कलमाडी, राजा, परदेशी बँकातील पैसा ही त्या रोपट्याला आलेली फुलं आणि कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा त्याची फळं आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे पीक सर्वांत आधी काँग्रेसच्या शेतात उगवलं. ‘धर्मा तेजा’ नावाचा इतका प्रभाव त्या काळात होता की, ‘जंजीर’ चित्रपटाच्या खलनायकाचं नाव ‘तेजा’ ठेवण्याची उर्मी संवाद लेखकाला आवरली नव्हती!)

जयप्रकाश नारायण-चंद्रशेखर ते वाजपेयी-अडवाणी अशा बहुपेडी, विस्तृत राजकीय संस्काराचं संचित बाळगणाऱ्या, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून एकमेव-बेल्लारीचा अपवाद वगळता दहा निवडणुका जिंकण्याचा अनुभव पाठीशी असणाऱ्या स्वराज नावाच्या राजकीय कथेतील महानायिकेच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नाचा महाअपेक्षाभंग झाला. त्या पक्ष आणि सरकारात एकाकी पडल्या. केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, भारतीय जनता पक्षात जे काही घडलं, त्याला राजकारण(च) म्हणतात!

स्वराज पंतप्रधान झाल्या असत्या तर पक्षातील विरोधकांना त्यांनी राजकारणाची खेळी म्हणून नामोहरम केलं असतं; तेच नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. फरक असलाच तर तो पंख कापण्याच्या पद्धतीत आहे. नरेंद्र मोदी अशा ‘कापाकापी’च्या बाबतीत कसे धारदार, कुशल आणि प्रगल्भ आहेत हे संजय जोशी प्रकरणातून दिसलं आहेच. पक्षात सध्या अमित शहा आणि सरकारात नरेंद्र मोदी यांचीच चलती आहे. ट्विट करणं आणि गरजूंना व्हिजा मिळवून देणं यापलीकडे फार काही परराष्ट्रमंत्री म्हणून करण्यासारखी काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांच्यासाठी ठेवलेलं नाही. तसंही नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यावर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कलरज मिश्र असे अनेक धुरंदर नेते वळचणीला टांगले गेले आहेतच. त्यात आपलाही नंबर लागू नये म्हणूनच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन सक्रिय राजकारणातून बाहेरपडण्याचा समंजसपणा कदाचित स्वराज यांनी दाखवला असावा, असं म्हणण्यास भरपूर वाव आहे. शिवाय अलिकडच्या दोन-तीन वर्षांत प्रकृतीच्या तक्रारींही वाढलेल्या आहेत.

राजकारणात कोणतीच स्थिती कायम नसते (पक्षी : पी. व्ही. नरसिंहराव यांचं पंतप्रधान होणं!) म्हणून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं स्वराज आता सत्तेच्या सारीपाटावरून (स्वखुषीनं) बाहेर पडल्या आहेत असा निष्कर्ष आज काढता येणार नाही. एक मात्र खरं, भारतीय राजकारणाला न साजेशा पद्धतीनं स्वराज यांनी अचानक शस्त्र म्यान केलेली आहेत! 

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......