‘मुळशी पॅटर्न’ : वाढत्या शहरीकरणाचं दाहक वास्तव
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘मुळशी पॅटर्न’चं पोस्टर
  • Sat , 24 November 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie मुळशी पॅटर्न Mulshi Pattern ओम भूतकर Om Bhutkar प्रवीण तरडे Pravin Tarde मोहन जोशी Mohan Joshi महेश मांजरेकर Mahesh Manjrekar

गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा चौफेर विस्तार झाला. ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी’ म्हणून असलेली ओळख हळूहळू नष्ट होत असलेली ही पुण्यनगरी आता ‘आयटी हब’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे अनेक कंपन्या पुण्यात आल्या आणि त्यांच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्याचा सपाटा सुरू केला. अनेकांच्या दृष्टीनं जमीन ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ठरली. अनेक शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय क्षणात श्रीमंत झाले खरे, परंतु अचानक आलेली श्रीमंती फार काळ टिकू शकली नाही. पैसा आला, तसा कोठे गेला हे कळलं नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांची परवड सुरू झाली. शेतीचं वैभव संपुष्टात आल्यामुळे तरुण पिढी वैफल्यग्रस्त झाली. तिनं गुन्हेगारीचा आश्रय घेतला. त्यातून ‘लँडमाफिया’ जन्माला आले. त्यांना राजकीय शक्तींचा वरदहस्त लाभला आणि गुन्हेगारीला जणू मोकळं रान मिळालं. झटपट श्रीमंतीचा आणि आपलं वर्चस्व गाजवण्याचा हा ‘पॅटर्न’च मग रूढ झाला. त्यामुळे आतापर्यंत शांत शहर म्हणून असलेला पुण्याचा लौकिक धुळीस मिळाला.

खरं तर हा एका मोठ्या कादंबरीचा विषय, पण तो त्याआधीच ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर अवतरला आहे. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी वाढत्या शहरीकरणाच्या दुष्परिणामाचं हे दाहक वास्तव मोठ्या पडद्यावर मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. चित्रपटात शेतकऱ्यांची गरिबी, त्यांच्या व्यथा, वैफल्यग्रस्त झालेली त्यांची तरुण पिढी, बिल्डर्स लॉबीचा उन्माद, जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी निर्माण झालेली गुन्हेगारी, त्या अनुषंगानं घडलेला हिंसाचार, कायद्याच्या चौकटीत काम करणारे आणि त्यामुळे हतबल झालेले पोलीस असा मोठा कॅनव्हास आहे.

हा मोठा कॅनव्हास पडद्यावर सादर करताना पटकथा आखीवरेखीव हवी होती. मात्र पटकथा थोडी विस्कळीत वाटत असली तरी आणि विषयाची लांबण लावलेली असली तरी हा विषय हाताळताना जो ‘पॅटर्न’ अवलंबण्यात आला आहे, तो चांगलाच प्रभावी ठरला आहे. पुणे शहराच्या वाढीसाठी सर्वांत जास्त जमिनी मुळशीकरांच्या गेल्या. त्यामुळे चित्रपटास ‘मुळशी पॅटर्न’ हे नाव देण्यात आलं असलं तरी मूळ समस्येचा ‘पॅटर्न’ सामूहिक आहे. त्यामुळे ती काही एकट्या-दुकट्या शेतकरी कुटुंबाची समस्या राहत नाही. 

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘मुळशी पॅटर्न’मध्ये पाहायला मिळते ती राहुल्या (राहुल) या गरीब, बेकार पण बंडखोर तरुणाची कथा. त्याचे वडील एकेकाळचे पाटील. मात्र शेतजमीन विकून कफल्लक झाल्यानंतर ते पुण्यात येऊन हमाली करतात. त्यांच्याबरोबर नाईलाजानं राहुल्यालाही पुण्यात यावं लागतं. पुण्यात त्यांना झोपडपट्ट्टीत राहावं लागतं. त्याच्या आईला आणि बहिणीला धुणीभांड्याची कामं करावी लागतात. ‘आपण काय होतो आणि काय झालो’ याची सल कायम डोक्यात ठेवून वैफल्यग्रस्त झालेला राहुल्या आपल्या बापाला सतत टोचणी देत असतो. त्यातूनच सूडापोटी बदला घेण्यासाठी आणि झटपट श्रीमंतीसाठी तो गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारतो.

आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावणाऱ्या नन्याभाईची हत्या करून तो स्वतः ‘भाई’ बनतो. अर्थात हे ‘भाई’ पण टिकवण्यासाठी त्याने जो गुन्हेगारी मार्ग अवलंबलेला असतो, तोच त्याचा अपेक्षेप्रमाणे शेवटी घात करतो. 

राहुल्याची कथा पडद्यावर दिग्दर्शकानं फ्लॅशबॅक पद्धतीनं सांगितली आहे. त्यामुळे सुरुवातीलाच गुंडांच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पळणारा राहुल्या आपला जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत पळतच राहतो. या जीवघेण्या पळापळीच्या दरम्यान एकेक घटनांनी राहुल्याच्या आयुष्याला मिळालेली वेगवेगळी वळणं उलगडत जातात. हा वेग ‘पळापळी’ इतकाच वेगवान असल्यामुळे कथेची उत्कंठा कायम राहते.

चित्रपटाचा शेवटही धक्कादायक करण्यात दिग्दर्शकाला चांगलं यश मिळालं आहे. मात्र अधूनमधून पडद्यावर भयानक हिंसाचाराचं दर्शनही घडतं. (त्यामुळेच या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळालं आहे). चित्रपटात हमालांपासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत अनेक व्यक्तिरेखा आहेत आणि त्या प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वतःची काही दुःखं आहेत. काही अपेक्षा आहेत. त्या सर्वांच्या भावना अनेक प्रसंगातून छान चित्रित करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रवीण तरडे यांनी लिहिलेले समर्पक संवाद प्रभावी ठरले आहेत.

एका हॉटेलमधील प्रसंगात गरिबी आणि प्राप्त परिस्थितीमुळे निर्व्याज हास्य गमावल्यामुळे अस्वस्थ झालेला राहुल्या जेव्हा इतरांचं आनंददायी हास्य पाहतो, तेव्हा झालेली त्याची तगमग मनाला उद्विग्न करून जाते. हल्लीच्या काळातील गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील ‘नाते’संबधांवरही चित्रपटात चांगला प्रकाश टाकण्यात आला आहे. तसंच ‘आरोपीची जामिनावर सुटका झाली की, त्याची ती अंतिम सुटकाच अशा थाटात त्याचं होणारं स्वागत’ या बदललेल्या सामाजिक ट्रेंडचंही दर्शन होतं.

कायद्याच्या चौकटीमुळे हात बांधलेले पोलीस अधिकारी जेव्हा ‘आपल्याला गुन्हेगारी संपवायची नाही, तर गुन्हेगार संपवायचे आहेत’ असं भाष्य करतात, तेव्हा सद्यस्थितीतील ‘कायद्या’ची आणि ‘सुव्यवस्थे’चीच ते जाणीव करून देतात.

संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलेली चार गाणी या चित्रपटात आहेत. त्यातील ‘अरारा....’ या सध्या गाजत असलेल्या गाण्याचं टेकिंग छान जमून आलं आहे. (या गाण्याचा शेवटही तेवढाच ‘खतरनाक’ करण्यात आला आहे) 

राहुल्याच्या मुख्य भूमिकेत ओंकार भुतकरनं प्रभावी अभिनय केला आहे. एक साधा बेकार तरुण, प्रियकर आणि नंतर झालेला ‘भाई’ अशा विविध भूमिका त्यानं उत्तम प्रकारे प्रकट केल्या आहेत. मालविका गायकवाड ही नवोदित अभिनेत्री ‘चहावाली’च्या छोट्याश्या भूमिकेत लक्ष वेधून घेते. मोहन जोशी (राहुलचे बाबा), सविता मालपेकर (राहुलची आई), महेश मांजरेकर (शिरपा-हमाल), क्षितिज दाते (राहुलचा मित्र), अजय पुरकर (शिंदे-बिल्डर), गुंडांच्या भूमिकेतील प्रवीण तरडे (नन्याभाई), रमेश परदेशी (पिंट्याभाई) आणि देवेंद्र गायकवाड (दया), तसंच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत उपेंद्र लिमये आणि सुरेश विश्वकर्मा यांनीही आपापल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. महेश लिमये यांचं छायाचित्रण हीदेखील या चित्रपटाची एक जमेची बाजू आहे. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख