अजूनकाही
१. ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी असे व्यवहार करणाऱ्यांमधील काहींची नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करून दर महिन्याला त्यांना बक्षीस द्यावे, अशी नीती आयोगाने केंद्र सरकारला सूचना केली आहे.
बक्षीस राहूद्या, आपलेच पैसे काढण्यासाठी बँकेच्या-एटीएमच्या लायनीत पुढचा नंबर, कॅश विथड्रॉल लिमिटमध्ये थोडी वाढ, दोन हजाराच्या किरकोळ कामांसाठी निरुपयोगी नोटांऐवजी पन्नास-शंभर-पाचशेच्या नोटांमध्ये रक्कम दिली जाणं, असं काही ठोस उपयोगाचं प्रोत्साहन मिळेल काय?
…………………..
२. काँग्रेस व राष्ट्रवादी यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभूत करून हजार-पाचशेच्या नोटेप्रमाणे त्यांना कायमचे बाद करा : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निवडणूक सभेत आवाहन
त्यांचे हजार-पाचशे बाद करा आणि यांची दोन हजाराची रंग उडवत फिरणारी, गरिबाच्या रोजच्या कामासाठी बिनकामाची गुलछबू गुलाबो गळ्यात बांधून घ्या. त्यांनी भिकेला लावलं असेल, तर हे 'रांगेला' लावतात!
…………………..
३. निश्चलनीकरणाबाबत लोकसभेत बोलण्यास तयार असूनही विरोधक बोलू देत नसल्याने ‘जनसभे’त बोलणे भाग पडते : नरेंद्र मोदी
तुम्ही असं करा. ऑफिसातून बाहेर पडून कोणालाही संसद कुठे आहे, ते विचारा. लोक दाखवतील, माहितीये सगळ्यांना ती कुठे आहे ती. तिथे पोहोचल्यावर गेटवरचे लोक सोडतील तुम्हाला आत… टीव्हीवर रोज पाहतात ते तुम्हाला, ओळखतात चेहऱ्याने. आत गेलात की लोकसभा कुठे आहे ते विचारा. तिथे पोहोचलात की पंतप्रधानांचं आसन विचारा. तिथे जाऊन बसा तरी आधी. मग बोलायलाही मिळेल योग्य वेळी. सगळीकडे आपल्या मनात आलं की लगेच बोललं असं होत नाही लोकशाहीत. अवघडंय कळणं तुम्हाला. पण जमेल हळूहळू.
…………………..
४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'लकी' मानली जाणारी खुर्ची कानपूरमध्ये प्रचारसभेत त्यांना बसायला दिली जाणार आहे. मोदींनी पंतप्रधान होण्याआधी सर्वांत पहिली विजय शंखनाद रॅली १९ ऑक्टोबर २०१३ रोजी कानपूरमध्ये केली होती. तेव्हा ते या खुर्चीवर बसले होते. भाजपचे त्यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७१ जागा जिंकल्या. तेव्हापासून ही खुर्ची मोदींसाठी लकी समजली जाते.
खुद्द मोदींना याची कल्पना असेल, असं वाटत नाही. कारण, मोदी एखाद्या खुर्चीवर बसले, तर ते त्या खुर्चीसाठी लकी ठरतं, अशीच त्यांची आणि त्यांच्या भक्तगणांची समजूत असल्याचं दिसतं.
…………………..
५. जनतेच्या पैशांवर माज करण्याचे दिवस संपले. आम्हाला जनतेच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत; नेत्यांच्या नाहीत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दोन्ही मुद्दे अगदी बरोबर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हजार-पाचशेच्या नोटांमधून मतदारांचे सगळे कर भरून त्यांच्या तिजोऱ्या भरण्याची सुरुवात पक्षाने, माज न करता, केलीच आहे. शिवाय, लोकांचे पैसे गोळा करून बँकांना ज्या थकबाकीदार उद्योगपतींच्या कर्जबुडवेपणाच्या फटक्यातून मुक्त केलं जातंय, ते पक्षाचे, पक्षप्रमुखांचे, नेत्यांचे लाडके मित्र असले तरी ते काही पक्षाचे नेते नाहीत.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment