‘द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्स’ : विनोद, विचित्रपणा, सहानुभूती, खिन्नता, स्टाईल, गहनता यांनी ओतप्रोत भरलेल्या कथा
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्जस’चं पोस्टर
  • Sat , 24 November 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा Englishi Movie द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्जस The Ballad of Buster Scruggs Ethan Coen Joel Coen

अलीकडेच कुणीतरी म्हणाल्याचं आठवतंय की, ‘कोएन ब्रदर्सची नवीन फिल्म पाहून झाली की, मी सिनेमा माध्यमाच्याच परत प्रेमात पडतो.’ कोएन्सच्या एकूणच कामाचं शक्य तितक्या कमी शब्दांत वर्णन करणाऱ्या या वाक्याला खास दाद द्यावीशी वाटते. कारण गेल्या तीनेक दशकांच्या काळात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा शैलीच्या माध्यमातून त्यांनी एकूणच सिनेमा या माध्यमाला वेगवेगळ्या प्रकारे हाताळलं आहे. मग ते क्राईम-थ्रिलर आणि ब्लॅक कॉमेडी चित्रपट प्रकारांवर प्रभाव टाकणारे ‘फार्गो’, ‘द बिग लिबॉव्स्की’सारखे चित्रपट असोत किंवा ‘नो कंट्री फॉर ओल्ड मेन’सारखी टेन्स्ड फिल्म असो. कोएन्स दरवेळी आपल्या थक्क करणाऱ्या मांडणीच्या माध्यमातून अप्रतिम अशी कलाकृती समोर आणताना दिसतात. ‘द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्स’देखील याहून वेगळा नाही.

हा चित्रपट छोटेखानी लघुकथांचं एखादं पुस्तक वाचल्याची भावना निर्माण करणारा आहे, तो शब्दशः आणि रूपकात्मक अशा दोन्ही प्रकारांमुळे. उदाहरणार्थ, सुरुवातीला चित्रपटाच्या नावाचं एका पुस्तकाचं मुखपृष्ठ समोर दिसतं, तर पुढे चित्रपटभर एक हात येऊन त्याची पानं उलटत जातो. प्रत्येक लघुपटातील महत्त्वाच्या संवादाचं चित्र सुरुवातीला दिसतं, लघुपटाच्या शेवटीही पान उलटण्याआधी कथेचा शेवट करणारा परिच्छेद दिसतो. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे, हे सहा लघुकथांचं संकलन असल्याचा अनुभव देणारं दृकश्राव्य पुस्तक आहे. या क्लासिक वेस्टर्न शैलीच्या कथा आहेत… अशा कथा ज्या विनोद आणि विचित्रपणा, सहानुभूती आणि खिन्नता, स्टाईल आणि गहनता यांनी ओतप्रोत भरलेल्या आहेत. सदर सिनेमा म्हणजे कोएन्सनी चित्रपटांतील वेस्टर्न जान्रला लिहिलेलं सिनेमॅटिक प्रेमपत्र आहे.

चित्रपट ज्यापासून आपलं शीर्षक मिळवतो, तो लघुपट आणि त्यातील टिम ब्लेक नेल्सननं साकारलेला गुन्हेगार (आणि त्याची कथा) म्हणजे विनोदाच्या अॅब्सर्ड शैलीचा नमुना आहे. गिटार आणि गन्स, दोन्हींवरही तितकंच प्रभुत्व असलेला बस्टर क्लासिक वेस्टर्न सिनेमातील नायकांप्रमाणे भासतो. ‘नीअर अल्गडोन्स’मधील बँक लुटणारा काऊबॉय जेम्स फ्रँकोही विचित्रपूर्ण परिस्थितीत अडकून तितक्याच अॅब्सर्ड विनोदाला वाट करून देतो. तर हॅरी मेलिंगच्या वक्तृत्वावर उदरनिर्वाह करणारा लिएम नीसन हा एकपात्री टुरिंग टॉकीजचा चालक आहे. या दोघांच्या ‘मील टिकट’ नावाच्या कथेला विनोद आणि कारुण्याची झालर आहे.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘ऑल गोल्ड कॅन्यन’मधील टॉम वेट्स हा नदीकिनारी सोन्याचा शोध घेणारा म्हातारा आहे, तर ‘द गॅल हू गॉट रॅटल्ड’मधील झोई कझॅन ही एका वॅगन ट्रेनच्या माध्यमातून एका गावातून दुसरीकडे प्रवास करणारी तरुणी आहे. जवळपास प्रत्येक कथेत एखादा ट्विस्ट, उपहासाची एखादी जागा आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, ‘द मॉर्टल रिमेन्स’मध्ये समोर बसलेल्या दोन बाऊंटी हंटर्सशी खास टॅरंटिनो शैलीत (ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या शब्दांत सांगायचं झाल्यास ‘टॅरंटिनोएस्क’ प्रकारे) चर्चा करणारे तीन प्रवासी आहेत.

‘द बॅलड ऑफ बस्टर स्क्रग्स’च्या निमित्तानं कोएन्स नेहमीप्रमाणे मानवी भावभावनांचे निरनिराळे कंगोरे हाताळतात. बस्टर स्क्रग्जस हा गुन्हेगार असला तरी तो निर्भीड, चतुर आणि विनोदीही आहे. ज्यामुळे त्याकडे नायक म्हणून पाहणं सहजासहजी शक्य होतं; तर फ्रँको, मेलिंग आणि झोबाबत आपल्याला सहानुभूती वाटते, वेट्सच्या म्हाताऱ्याच्या प्रयत्नांची कदर करावीशी वाटते. यामागील कारण म्हणजे वेस्टर्न चित्रपटांमध्ये आणि अगदी कोएन्सच्या याआधीच्या चित्रपटांतही अनिश्चिततेला बरंच महत्त्व असतं. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता न येण्याच्या शक्यतांमुळे एकाच पात्रांविषयी अगदी टोकाच्या भावनाही वाटू शकतात. ही अनिश्चितता चित्रपटातील बऱ्याच घटकांना पूरक ठरते.

हे प्रेमपत्र असलं तरी त्यावर काही प्रमाणात रक्ताचे डागही आहेत. (म्हणजे, हा एक वेस्टर्न चित्रपट आहे. त्याच्याकडून हिंसेची अपेक्षा नाही ठेवणार?) त्यावर जितका सर्जिओ लिओनी, जॉन फोर्ड आणि क्वेंटिन टॅरंटिनोचा प्रभाव आहे, तितकेच जोएल आणि इथन कोएन्सच्या शैलीचे न पुसता येणारे ठसेही आहेत. शिवाय त्याला नितांतसुंदर अशा रंगपटलाची आणि कार्टर बरवेलच्या संगीताची साथ लाभलेली आहे.

सहावा लघुपट तुलनात्मकरित्या काहीसा कमजोर असला तरीही पाहणीय आहेच. कोएन ब्रदर्ससोबतच वर उल्लेखलेल्या सर्वच व्यक्तींच्या कामाशी परिचय असलेल्या, त्यांची शैली आवडणाऱ्या, किंबहुना एकूणच सिनेमाच्या कुठल्याही चाहत्याला ही वेस्टर्न चित्रपट प्रकाराला दिलेली मानवंदना आवडेल अशीच आहे.

टीप : सदर चित्रपट १७ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ऑनलाईन स्ट्रीमिंग सर्व्हिसवर प्रदर्शित झालेला आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख